कायदा पाळा "मती'चा (डॉ. वैशाली देशमुख)

डॉ. वैशाली देशमुख vrdesh06@gmail.com
रविवार, 18 मार्च 2018

कायदे, नियम खूप विचार करून तयार केलेले असतात. ते मोडण्याची किंवा त्यांना किरकोळीत काढण्याची सवय लावण्यापेक्षा त्यांचं गांभीर्यानं पालन करण्याची सवय पालकांनी लावायला हवी. महत्त्वाचे कायदे, नियम जसेच्या तसे पाळायला हवेतच; पण त्यांची सुरवात लहानपणी अगदी छोट्याछोट्या गोष्टींपासून करायला हवी.

कायदे, नियम खूप विचार करून तयार केलेले असतात. ते मोडण्याची किंवा त्यांना किरकोळीत काढण्याची सवय लावण्यापेक्षा त्यांचं गांभीर्यानं पालन करण्याची सवय पालकांनी लावायला हवी. महत्त्वाचे कायदे, नियम जसेच्या तसे पाळायला हवेतच; पण त्यांची सुरवात लहानपणी अगदी छोट्याछोट्या गोष्टींपासून करायला हवी.

महिन्याचे दिवस. बरेच लोक सकाळच्या थंड हवेत रस्त्यावरून रमतगमत फिरत होते. तेवढ्यात आरडाओरडा झाला. सातवी-आठवीतला एक मुलगा स्कूटर चालवत होता आणि तो जवळजवळ एका आजोबांना धडकलाच. नशिबानं आजोबांना काही लागलं नाही, पण ते चांगलेच घाबरले होते. ""आई-बाबांचं लक्ष कुठे असतं कोण जाणे!'' एक जण म्हणाले. तेवढ्यात त्या मुलाचे बाबा मागून धावत आले आणि म्हणाले ः "अरे, ब्रेक का नाही दाबलास?''
"म्हणजे? तुम्हाला माहिती होतं हा गाडी घेऊन आलाय ते?''
"मग? मीच तर शिकवत होतो त्याला...'' बाबा अभिमानानं म्हणाले. ""नाहीतरी आजकालची मुलं ऐकतात कुठे? त्यापेक्षा आपणच शिकवलेलं काय वाईट? निदान नीट चालवेल तरी!''
बाबांनी त्यांचंत्यांचं लॉजिक लावलं होतं. शिवाय आपला मुलगा आपलं ऐकणार नाही, हे त्यांनी गृहीतच धरलं होतं. एकूणच अभ्यासाच्या बाबतीत किंवा काही धार्मिक बाबतीत अतिशय आग्रही असणारे पालक गाडी चालवायला देण्याच्या बाबतीत इतके उदार कसे होतात हे एक कोडंच आहे; पण "का बरं कायद्यानं ही बंधनं घातली असतील?' असा प्रश्न मनात आला नाही का त्यांच्या?
खरं तर नियम आणि कायदे तयार करताना खूप विचार केलेला असतो. मुलांचा मेंदू एखादं काम करायला सक्षम कधी होतो, त्याची निर्णयक्षमता मजबूत केव्हा होते, तणावाखाली तो केव्हा योग्य निर्णय घेऊ शकतो, असे अनेक घटक लक्षात घेतलेले असतात. प्रत्येक मूल वेगळं असतं, प्रत्येकाची परिपक्व होण्याची वेळदेखील वेगवेगळी असते; पण कायदा करायचा तर वयाचा काही तरी एकच कट-ऑफ वापरायला लागतो. मतदान करायला तुम्ही अठरा वर्षांचे असलात की पात्र ठरता; पण निवडणुकीला उभं राहायला मात्र पंचवीस वर्षं पूर्ण व्हावी लागतात. लग्न करायचं वय मुलींसाठी अठराच्या तर मुलांसाठी एकवीसच्या वर असायला हवं. पंचवीस वर्षांखाली मद्य खरेदी करता येत नाही. मेंदूचा विकास तसा तर आयुष्यभर चालूच असतो; पण त्यातही अधिकाधिक बदल वयाच्या पंचविसाव्या वर्षांपर्यंत होतात. मद्य, सिगरेटमधलं निकोटिन, अंमली पदार्थांमधली रसायनं या काळात मेंदूवर तीव्र परिणाम करतात. मेंदूच्या कामावर त्याचा विपरीत परिणाम होतोच, त्याशिवाय कायमचं व्यसन लागायची शक्‍यता वाढते. तीच गोष्ट गाडी चालवण्याची. अठरा वर्षांच्या आधी परवाना मिळत नाही. कारण त्याआधी मुलांना गाडी चालवण्याचे सगळे तांत्रिक पैलू शिकवले तरी संकटाच्या वेळी, आणीबाणीच्या वेळी निर्णय घेण्याची क्षमताच नसते मेंदूची. रहदारीच्या अपघातांचं प्रमाण किशोरवयीन मुलांमध्ये जास्त असण्याचं हेच तर कारण आहे. शिवाय या वयात अंगात इतकी रग असते, की कायदे मोडणं फार आकर्षक वाटतं. किशोरवयाचा गुणधर्मच आहे धोके पत्करण्याचा! ब्रेक नसलेल्या गाडीसारखे असतात यांचे मेंदू. म्हणूनच आपण रस्त्यावरून ट्रिपल सीट जाणारी, वेगमर्यादेचं उल्लंघन करून जाणारी मुलं बघतो. मोटारसायकल जोरात, वेडीवाकडी चालवत, सिग्नलची फिकीर न करता जाणारी मुलं बघतो. एकूणच या वयात कायदे समजावणं काहीसं अवघड जातं. त्यामुळंच नियम पाळणं लहानपणापासून अंगात मुरलं पाहिजे.

साधे रोजच्या जगण्यातसुद्धा आपल्याला नियम पाळावे लागतात. मग ते पत्ते खेळणं असो की फुटबॉल. कारण त्याशिवाय कुठलीच गोष्ट सुरळीतपणे होणार नाही. प्रत्येक जण आपापल्या मर्जीप्रमाणं वागायला लागला, तर समाज कोसळायला वेळ लागणार नाही. कायदा आणि अंदाधुंदी यातला फरक म्हणजे समाज आणि कळप यातला फरक. दुसरं असं, की समाजात राहिल्यामुळे मिळणारी सुरक्षितता, सुखसोयी, संकटात मिळणारी मदत, मानसिक आधार या गोष्टी मी सोडून देऊ शकणार आहे का? नाही ना? मग समाजात राहून त्याचे फायदे आपण उपभोगणार असू, तर त्याचे नियम पाळणं हेही आपल्यावर बंधनकारक आहे. जसे इतरांनी नियम पाळले नाहीत तर आपल्याला त्रास होतो, तसाच त्रास आपण नियम पाळले नाहीत तर इतरांना होतो. "हा कायदा मला माहितीच नव्हता,' असं म्हणूनही सुटका होत नाही. आपण ज्या देशात राहतो, त्या देशाचे कायदे आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे. उद्या कुणी "खून करणं हा गुन्हा आहे हे मला माहितीच नव्हतं,' असं म्हणाला तर चालेल? आणि कायद्याविषयी फक्त अज्ञानच नव्हे, तर एक प्रकारची भीती असते आपल्या मनात. कित्येकांना युनिफॉर्म पहिला तरी घाम फुटतो.

एक लक्षात ठेवायला हवं, "स्वत:चं रक्षण करणे' ही जशी आपली जन्मजात ऊर्मी आहे तशी "नियम पाळणं' ही नाही. कायदा पाळायला कुणाला आवडतं? मनापासून कुणालाच नाही खरं तर. अगदी भल्याभल्यांनाही कायदा सोयीचा नसेल, तेव्हा मोडायचा मोह होतो. आपल्या हक्कांविषयी आपण जितके जागरूक असतो तितकेच नियम पाळण्याबाबत नाखूष असतो. त्या हक्कांवर गदा आलेली फारशी नाही रुचत आपल्याला. मी कसं वागायचं ते हे कोण सांगणार, मी ठरवीन ना! पण व्यक्तिस्वातंत्र्य आणि समाजाचं भलं या दोन्हीमधल्या रस्सीखेचीत बऱ्याचदा व्यक्तिस्वातंत्र्याला माघार घ्यावी लागते. समाजाची मूलभूत गरज आहे ही. त्यामुळे अज्ञान वयात मुलांना कायदे समजावून देण्याची आणि ते पाळून घ्यायची जबाबदारी पालकांची आणि त्याचबरोबर समाजातल्या इतर घटकांची असते. आता तर कायद्यानं मान्य नसलेल्या वयात गाडी चालवली, तर शिक्षा पालकांना होते. तिथं "मुलगा/ मुलगी आमचं ऐकत नाही,' ही सबब चालत नाही.
छोटेछोटे नियम तोडणं ही मोठे नियम तोडण्याआधी केलेली चाचपणी असते. लहानपणी शाळेत युनिफॉर्मचे बूट घालणं टाळणारा आणि मग "विसरलो, बूट फाटलेत' अशी कारणं द्यायची सवय असलेला मुलगा हळूहळू दुसऱ्याच्या वस्तू उचलून आणणं, वाहतुकीचे नियम किरकोळीत काढणं आणि लाच घेणं अशा गोष्टी सहजपणे करायला धजावणार नाही का? त्याचं समर्थन करायला लागणार नाही का? त्यामुळे फक्त पोलिसांच्या कचाट्यातून सुटण्यासाठी नव्हे, तर आपल्या आणि आपल्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी, एक चांगला नागरिक होण्यासाठी सगळ्यांनी कायदे पाळणं आवश्‍यक आहे.

अर्थात नियम पाळायचे याचा अर्थ असा नाही, की आंधळेपणानं, विचार न करता जगत राहायचं! त्या त्या वेळच्या परिस्थितीप्रमाणं, गरजांप्रमाणं कायदा बदलत राहतो आणि तो तसा बदलायलाही हवा. मात्र, त्यासाठी जाळपोळ, दगडफेक, बसेस जाळणं असं काही तरी विध्वंसक करायला हवं असं नाही. विरोध करण्याचे योग्य मार्ग शोधून काढायला हवेत. गांधीजींनीही नियम, कायदे तोडले; पण कसे? त्यांनी अहिंसा, असहकार वापरला, सत्याग्रह केले.

इतर अनेक बाबतीत करतात तशीच या बाबतीतही मुलं पालकांचं अनुकरण करत असतात. मुलांना शाळेत सोडायला जाताना नेहमीच उशीर झालेला असतो. अशा वेळी "नो एंट्री'मधून गाडी घुसवताना, रॉंग साइडनं गाडी चालवताना, हेल्मेट न वापरताना मुलं नेहमीच आपल्या आईबाबांना पाहत असतात. मुलं यातून काय संदेश घेतात? - नियम तोडलेले चालतात, घाईच्या वेळी तरी नक्कीच चालतात असा! मग "कायदा मोडणार नाही याविषयी मी ठाम आहे का?' याचा आढावा पालकांना घ्यायला हवा. या बाबतीतला आपला "आतला आवाज' ऐकणं सगळ्यात उत्तम!

आता एक प्रश्न. सुदीपच्या टीचर म्हणाल्या, की त्यानं शेजारच्या मुलाच्या दप्तरातलं पेन चोरलं. आई म्हणाली ः ""शक्‍यच नाही, सुदीप असं करणारच नाही.'' मात्र, घरी आल्यावर तिनं त्याचं कपाट पाहिलं, तेव्हा तिला तिथं फक्त तेच पेन नव्हे, तर त्याच्या मालकीच्या नसलेल्या इतरही काही गोष्टी सापडल्या. तिनं काय करायला हवं?
यावर काही पर्याय आहेत. 1. सुदीपला शिक्षा करणं. 2. टीचरची माफी मागून त्यांचं सहकार्य मागणं. 3. अजून लहान आहे तो म्हणून दुर्लक्ष करणं. 4. आपल्या आणि दुसऱ्यांच्या वस्तूंमधला फरक सांगून त्याला त्या मित्रांना परत करायला सांगणं. 5. सगळ्या वर्गासमोर त्याला माफी मागायला लावणं. 6. पुन्हा अशी गोष्ट घडल्यास काय परिणाम होतील हे स्पष्ट करणं.
तुम्हाला काय वाटतं, यातले विषम आकड्यांचे पर्याय बरोबर, की 2,4,6 या सम आकड्यांचे?

Web Title: dr vaishali deshmukh write article in saptarang