कमी वजनाची मुलं (डॉ. वैशाली देशमुख)

dr vaishali deshmukh write article in saptarang
dr vaishali deshmukh write article in saptarang

कमी वजनाची मुलं असली, की साहजिकच त्याचं वजन वाढवण्याकडं आपला कल असतो. म्हणून मग त्यांना भरपूर उष्मांक असलेले पदार्थ खाऊ घातले जातात. या मुलांमध्ये या अतिरिक्त उष्मांकांची विल्हेवाट लावण्याची सोय नसते, कारण त्यांच्या शरीराला तशी सवयच नसते. ते उष्मांक मेदाच्या स्वरूपात शरीरात साठत जातात. आपल्या लहान चणीच्या मुलांना गुटगुटीत, गुबगुबीत करणं हे ध्येय ठेवलं, तर आपण त्यांच्यावर एक प्रकारचा अन्यायच करू कदाचित! त्यापेक्षा त्यांची वाढ योग्य पद्धतीनं होत आहे ना, याकडं लक्ष द्यायला हवं.

निमिष जन्माला आला तेव्हा एवढासा होता. त्याला बघितल्यावर चटकन लोकांची प्रतिक्रिया व्हायची ः ""अरे, किती चिमुकला दिसतो हा!'' आता तो सहावीत आहे. सगळ्या वर्गात छोटा दिसतो. त्याला काय, किती आणि कधी खायला घालावं म्हणजे त्याचं वजन वाढेल, याबद्दल नेहमी नानाविध मतं व्यक्त होत असतात. सांगणारे चांगल्या हेतूनंच सांगत असले, तरी मीरा, निमिषची आई, गोंधळून जाते. कारण निमिषच्या बालरोगतज्ज्ञांचा सल्ला वेगळाच असतो. त्या म्हणतात ः ""त्याला त्याच्या आलेखाप्रमाणं, त्याच्या वेगानं वाढू दे. त्याची स्पर्धा इतरांशी नाही, स्वत:शीच आहे.'' आई म्हणून मीरालाही कधीकधी वाटतं, की आपला मुलगा गुटगुटीत दिसावा. तो लहानखुरा दिसणं ही तिची स्वत:चीच चूक असल्यासारखं वाटतं तिला. मग ती सारखी डॉक्‍टरांकडे लकडा लावते ः ""डॉक्‍टर, याला काहीतरी टॉनिक द्या ना!''
आपण आकडेवारी वाचतो, प्रत्येक सेकंदाला भारतात अमुक इतकी मुलं जन्माला येतात म्हणून. जन्माच्या वेळी सगळीच काही पूर्ण दिवसांची, सुदृढ वजनाची नसतात. निमिषसारखी अपुऱ्या वजनांची बाळं जन्माला येण्याचं प्रमाण आपल्या देशात बरंच आहे आणि त्यामुळं बालमृत्यूचं प्रमाणही जास्त आहे. सुदृढ वजनाची बाळं जन्माला येण्यासाठी काय करायला हवं, यावर बरंच संशोधन झालंय. त्यावरून असं दिसतं, की ही कित्येक पिढ्यान्‌पिढ्या घडणारी प्रक्रिया आहे, अचानक एका पिढीत बदलणारी नाही. त्यासाठी सर्वांत आधी होणाऱ्या आईचं आरोग्य सुधारायला हवं. कारण याचं मुख्य कारण असतं आईचं कमी वजन, तिचं कुपोषण. ते जेव्हा सुधारेल, तेव्हा जन्माला येणाऱ्या बाळाचं वजन वाढेल. याला जितका समाजात खोलवर रुजलेला लिंगभेद जबाबदार आहे, तितकंच याविषयीचं अज्ञानही कारणीभूत आहे.

साठवणीचा वसा
आपल्या भारतीयांच्या शरीराची ठेवण वैशिष्ट्यपूर्ण आहे. बाहेरून लहानखुरे दिसत असलो, तरी आतल्या छुप्या मेदाचं प्रमाण आपल्यात भरपूर असतं. अडीअडचणीच्या काळात उपयोगाला यावेत म्हणून मिळेल तेव्हा उष्मांकांचा साठा करून ठेवण्याचीही आपल्या जनुकांना खोड आहे.
कमी जन्मवजन असलेल्या मुलांच्या बाबतीत सुरवातीचं कमी वजन हा धोका असतोच; पण त्याहूनही अधिक धोका नंतरचं अति-खाणं आणि अचानक वाढणारं वजन हा असतो. डॉ. बार्कर यांनी यासंबंधात बराच अभ्यास करून हे निष्कर्ष काढलेत. पुण्याच्या केईएम हॉस्पिटलमधल्या डॉक्‍टरांनीही यावर खूप संशोधन केलंय. कमी वजनाची मुलं असली, की साहजिकच त्याचं वजन वाढवण्याकडं आपला कल असतो. एकदा ते वाढलं, की सगळे प्रश्न सुटतील असं वाटतं. म्हणून मग त्यांना भरपूर उष्मांक असलेले पदार्थ खाऊ घातले जातात. या मुलांमध्ये या अतिरिक्त उष्मांकांची विल्हेवाट लावण्याची सोय नसते, कारण त्यांच्या शरीराला तशी सवयच नसते. ते उष्मांक मेदाच्या स्वरूपात शरीरात साठत जातात. हा लठ्ठपणा नंतर काबूत आणणं फार कठीण. शिवाय अशा परिस्थितीत उच्च रक्तदाब, हृदयरोग आणि मधुमेह हे "सिंड्रोम एक्‍स' नावाचं त्रिकूट शरीरात आपले हातपाय पसरायला लागतं. हे शत्रू इतके छुपे असतात, की वेळ निघून जाईपर्यंत ते लक्षातही येत नाहीत.

"रोड टू हेल्थ '
त्यामुळं जन्मजात लहानखुऱ्या असलेल्या मुलाचं वजन अतिरिक्त वाढत नाहीये ना यावर फार बारकाईनं लक्ष ठेवायला लागतं. यासाठी एक अगदी साधा सोपा मार्ग आहे तो म्हणजे "आरोग्याचा मार्ग!' हा "रोड टू हेल्थ' आपल्या मुलांचा उंची-वजनाचा तक्ता किंवा आलेख असतो. जागतिक आरोग्य संघटनेनं आणि भारतीय बालरोग संघटनेनं भारतीय मुलांचा वाढीचा पॅटर्न लक्षात घेऊन यासाठी खास आलेख बनवलेत. नियमितपणे, त्या त्या वयानुसार, यात मुलांची उंची, वजन भरत जायचं. तुमच्या डॉक्‍टरनी किंवा तुम्ही ते तसे बहुतेक वयाच्या साधारण दुसऱ्या वर्षापर्यंत भरलेही असतील. कारण तोपर्यंत नियमित लसीकरण होत असतं, आजारपणांच्या निमित्तानं डॉक्‍टरांकडे वारंवार खेपा होत असतात. त्यानंतर मात्र हळूहळू ते विसरलं जातं. इतकं की ते कार्ड कुठे ठेवलंय हेही आठवत नाही. आपण आपल्या मुलांना रोज बघत असतो. त्यामुळं नुसतं बघून वजन वाढलेलं पटकन लक्षात येत नाही. कुणीतरी खूप दिवसांनी भेटतं आणि यावर टिप्पणी करतं तेव्हा जाणीव होते; पण आलेखात मात्र याचं वेळच्यावेळी स्पष्ट प्रतिबिंब उमटतं. म्हणून तर हे करणं इतकं महत्त्वाचं आहे.
शिवाय नुसत्या वजनावरून एखादी व्यक्ती सुदृढ आहे की स्थूल आहे, हे सांगता येत नाही. त्यासाठी उंची आणि वजनाचं एक विशिष्ट गुणोत्तर काढायला लागतं. त्याला बॉडी मास इंडेक्‍स (BMI) म्हणतात. हा फॉर्म्युला असा ः
BMI = वजन / (उंची)2 (weight divided by height sqare)
यासाठी वजन "किलोग्रॅम'मध्ये तर उंची "मीटर'मध्ये मोजायला लागते. हा बीएमआयही वयानुसार तक्‍त्यात भरायला लागतो. कारण योग्य बीएमआय वयाप्रमाणं बदलतो. एखादा आकडा मोठ्या माणसांसाठी नॉर्मल असला, तरी तो लहान मुलांसाठी अयोग्य असू शकतो.

आपल्या लहान चणीच्या मुलांना गुटगुटीत, गुबगुबीत करणं हे ध्येय ठेवलं, तर आपण त्यांच्यावर एक प्रकारचा अन्यायच करू कदाचित! त्यापेक्षा त्यांची वाढ आलेखाप्रमाणे होतेय ना हे पाहून त्यात समाधान मानणं अधिक श्रेयस्कर! मग आपलं मूल खऱ्या अर्थानं सुदृढ आणि निरोगी आहे, असं म्हणता येईल. निमिषच्या बालरोगतज्ज्ञांनी म्हणून तर मीराला सबुरीचा सल्ला दिला. त्याचबरोबर त्यांनी तिला आणखीही काही गोष्टींकडं लक्ष द्यायला सांगितलं. त्या म्हणाल्या ः ""इतर मुलांहूनही अधिक कडक लक्ष त्याच्या जंक आहार टाळण्याकडं ठेवायला हवं. "घरचं अन्न' हा नियम आणि "बाहेरचं अन्न' हा अपवाद हे पथ्य पाळायला हवं. मग त्यासाठी निमिषचा थोडा रोष पत्करायला लागला तरी बेहत्तर. पटकन वजन वाढावं म्हणून सढळ हातानं तूप, चीज, साखर यांचा वापर करण्याचा मोह टाळा. कुठलीही गोष्ट साजरी करण्यासाठी भरपूर खाण्या-पिण्याचा घाट न घालता भटकंती, ट्रेकिंग, गप्पा, खेळ असे काही इतर मार्ग शोधायचा प्रयत्न करा. आणि हो! अभ्यासाइतकंच, किंबहुना काकणभर जास्तच महत्त्व त्याच्या खेळाला, व्यायामाला द्यायला हवं.''
मुलांमधली वाढती स्थूलता हा एक काळजीचा विषय आहे. फक्त कमी वजनाची मुलंच नव्हे, तर आपली पुढची सगळी पिढी या साथीला सामोरी जातेय. त्याविषयी आणखी काही महत्त्वाच्या गोष्टींबद्दल पुढच्या लेखात बोलूया.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com