'वजनी' गट टाळण्यासाठी (डॉ. वैशाली देशमुख)

डॉ. वैशाली देशमुख vrdesh06@gmail.com
रविवार, 29 एप्रिल 2018

हल्लीच्या मुलांच्या आहारातले पदार्थ कॅलरीजनी ओथंबलेले, भरपूर प्रक्रिया केलेले आहेत आणि ते पचवायला मदत करणाऱ्या, समतोल राखणाऱ्या मैदानी खेळाचं मात्र त्याच्या दिवसभराच्या वेळापत्रकात स्थान दिसत नाही. ती दिवसभर कुठं न कुठं बसलेली असतात. टीव्ही-कॉम्प्युटरच्या पडद्यांनी त्यांच्या शरीराचा आणि मेंदूचा ताबा घेतलाय. त्यामुळे लठ्ठपणा वाढताना दिसतो आहे. त्यासाठी मुलांची जीवनशैली, आहार यांच्याबरोबर संपूर्ण कुटुंबाच्या काही सवयीही बदलणं आवश्‍यक आहे.

हल्लीच्या मुलांच्या आहारातले पदार्थ कॅलरीजनी ओथंबलेले, भरपूर प्रक्रिया केलेले आहेत आणि ते पचवायला मदत करणाऱ्या, समतोल राखणाऱ्या मैदानी खेळाचं मात्र त्याच्या दिवसभराच्या वेळापत्रकात स्थान दिसत नाही. ती दिवसभर कुठं न कुठं बसलेली असतात. टीव्ही-कॉम्प्युटरच्या पडद्यांनी त्यांच्या शरीराचा आणि मेंदूचा ताबा घेतलाय. त्यामुळे लठ्ठपणा वाढताना दिसतो आहे. त्यासाठी मुलांची जीवनशैली, आहार यांच्याबरोबर संपूर्ण कुटुंबाच्या काही सवयीही बदलणं आवश्‍यक आहे.

काळ साधारण चाळीस वर्षांपूर्वीचा!
दहा वर्षाचा गंपू.
गंपूचा दिवस लवकर सुरू व्हायचा आणि लवकर संपायचा. दिवसभरात तो सकाळचा नाश्‍ता, दोनदा जेवण (वरण-भात, पोळीभाजी), आणि संध्याकाळी काही तरी सटरफटर (चुरमुरे, चणे-शेंगदाणे, केळी, लाडू...) खायचा. वाढदिवस किंवा सणावाराच्या दिवशी यात खीर, पापड, मसालेभात, पुरणपोळी यातल्या एखाद-दोन पदार्थांची भर पडायची. दिवाळीत किंवा लग्नात चकली, चिवडा, लाडू, करंज्या खायला मिळायच्या. तो शाळेत चालत जायचा, मधल्या सुटीत भरपूर खेळायचा आणि शाळेतून आल्यावर पटकन्‌ अभ्यास संपवून पुन्हा बाहेर खेळायला जायचा. सुटीत दिवसभर मुलं खेळायची, सायकल चालवायची, टेकड्यांवर फिरायला जायची, पोहायची... नुसता धुडगूस चालायचा. सुटीतली पार्टी म्हणजे सगळ्यांनी मिळून लिंबाचं सरबत किंवा पन्हं आणि भेळ खायची किंवा रात्री आपापल्या घराचं जेवण आणून अंगणात अंगतपंगत करायची. पप्पूचं वजन होतं 27 किलो!
कट टू 2018.
दहा वर्षांचा सोनू.
तो सकाळी उठून चॉकोज किंवा बिस्किटांचा ब्रेकफास्ट करतो. मग स्कूलबसमध्ये बसून शाळेत जातो-येतो. त्याची शाळा म्हणजे आहे सहा मजल्यांची एक बिल्डिंग. एकदा वर्गात गेलं, की तो शाळा सुटल्यावरच वर्गाच्या बाहेर येतो. (त्यांना डबा खायला खाली उतरायची परवानगी नाहीये). घरी आल्यावर आई त्याला जबरदस्तीनं खाऊ घालायचा प्रयत्न करते. मग तो "जॅम-पोळीच हवी' किंवा "आज रात्री आईस्क्रीम आणणार असशील, तरच भात खाईन,' अशा अटी घालून काही तरी खातो. हे सगळं चालू असतं टीव्हीसमोर. कारण सोनू शाळेतून दमून आल्यावर त्याला काही करमणूक नको का? "टीव्ही चालू असेल, तर काही तरी पोटात तरी जातं त्याच्या...' आईचं स्पष्टीकरण. टीव्ही बघून झाला, की तो ट्युशनला जातो. तिथून आलं की होमवर्क. रात्री पुन्हा टीव्हीसमोर जेवण. मग थोडा वेळ मोबाईलवर गेम्स. दहाच मिनिटं, पाचच मिनिटं असं करत दहा-अकरा कधी वाजतात, पत्ताच लागत नाही. डोक्‍यात टीव्ही-मोबाईलमधली चमकदार चित्रं नाचत असतात, त्यामुळं झोप लवकर लागत नाही. सकाळी पुन्हा उठायची वेळ येते तेव्हा सोनूची झोप पूर्ण झालेली नसते.
सुटीच्या दिवशी त्याचं कुटुंब बाहेर फिरायला जातं. मॉलमध्ये फेरफटका, तिथल्या रेस्टॉरंटमध्ये बर्गर आणि अधूनमधून ज्यूस, मिल्कशेकचा रतीब. त्याच्या वाढदिवसाचा मेन्यू असतो पिझ्झा, पावभाजी, केक, आईस्क्रीम, कोक, आणि वेफर्स. मोठ्या सुटीत दिवसभर टीव्ही, मोबाईल आलटून-पालटून करमणूक करतात. मधूनमधून चरायला बिस्किट्‌स, चिवडा, चकली, वेफर्स, कोल्डड्रिंक्‍स, चीज यांचा साठा करून ठेवलेला असतो. सोनूचं वजन आहे चाळीस किलो!

बदललेली जीवनशैली
...आजच्या मुलांची जीवनशैली किती बदललीय! गंपूचं आयुष्य खूप वेगळं आणि साधं-सरळ होतं. खायचं-प्यायचं, खेळायचं, करमणुकीचे त्याचे पर्याय खूप मर्यादित होते. टीव्ही आणि कॉम्प्युटर अस्तित्वातच नव्हते आणि त्यामुळं त्यांच्यावर ताबा ठेवण्याचा प्रश्नच यायचा नाही. अभ्यासाचं ओझं प्रमाणात असायचं. खेळायला मोकळा वेळ, जागा आणि मित्र-मैत्रिणी हे सगळं उपलब्ध होतं. घरातच भरपूर मुलं खेळायला असायची, आई-बाबा त्यांच्यात्यांच्या कामात मग्न असायचे. म्हटलं तर मर्यादित पर्याय आणि म्हटलं तर स्वातंत्र्य!

सोनूला मात्र खाण्यापिण्याचे, करमणुकीचे वेगळेच आणि विविध पर्याय आहेत. त्याचा वरखाण्याचा, सुटीतल्या खाण्याचा आणि वाढदिवसाचा मेनू पाहा. हे सगळे पदार्थ कॅलरीजनी ओथंबलेले, भरपूर प्रक्रिया केलेले आणि कदान्नानं भरलेले आहेत आणि हे पचवायला मदत करणाऱ्या, समतोल राखणाऱ्या मैदानी खेळाचं मात्र त्याच्या दिवसभराच्या वेळापत्रकात स्थान दिसत नाही. तो दिवसभर कुठं न कुठं बसलेला असतो. स्कूल बसमध्ये बसतो, शाळेत बसतो, टीव्ही-कॉम्प्युटरसमोर बसतो, ट्युशनला आणि होमवर्कलाही बसतोच. टीव्ही-कॉम्प्युटरच्या पडद्यांनी रिकाम्या वेळेत त्याच्या शरीराचा आणि मेंदूचा ताबा घेतलाय. आज माझ्याकडे येणाऱ्या पेशंट्‌सना मी जेव्हा खेळायला सांगते, तेव्हा ते मलाच विचारतात ः ""कधी आणि कुठं खेळू?'' माझ्याकडे याचं उत्तर नसतं.

आपल्या शरीरातल्या कॅलरीज किंवा उष्मांकांचा जमा-खर्च होत असतो. जमा जास्त झाली किंवा खर्च कमी झाला, तर शरीरात उष्मांक शिल्लक पडत जातात, साठत जातात. ही साठवण होते फॅटच्या किंवा मेदाच्या स्वरूपात. आपल्या घरात कसं अडगळीचं समान साठत जातं, तसा हा मेद साठत जातो. आणि त्या सामानाइतका तो अनावश्‍यक तर असतोच; पण त्रासदायक आणि आवराआवर करायला अवघडही असतो. वजन वाढणं किती सहज आणि नकळत होतं आणि ते उतरवायला मात्र किती चेंगट असतं ते आपल्याला चांगलंच माहितेय. बालपणात वजन वाढतं, तेव्हा तर ते शरीरात पक्कं ठाण मांडून बसतं. अजूनही अशक्त, कुपोषित मुलांची संख्या भारतात भरपूर असली तरी दुसऱ्या टोकाचं कुपोषण म्हणजे लठ्ठपणा ही एकविसाव्या शतकातली नवीन साथ आहे. आपल्या देशातली जवळजवळ एक पंचमांश मुलं (वीस टक्के) वजनदार आहेत आणि आठ ते दहा टक्के मुलं लठ्ठ आहेत.

हे मी जेव्हा माझ्याकडं आलेल्या एका पेशंटला सांगितलं, तेव्हा ती मला म्हणाली ः ""असं काही नसतं. मी कितीतरी फिल्म स्टार्स बघितलेयत जे लहानपणी लठ्ठ होते; पण नंतर ते एकदम स्लिम झाले! मला वाटेल तेव्हा मी वजन कमी करू शकेन.'' याविषयी थोडं स्पष्टीकरण पाहूया.. चित्रपट कलाकार त्यांच्या प्रोफेशनची गरज म्हणून यासाठी प्रचंड मेहनत घेतात, तासन्‌तास जिममध्ये घालवतात. अनेकदा प्लॅस्टिक सर्जरीची मदत घेतात. त्यासाठी खास डाएट घेतात. एकंदरीत पैसा आणि वेळ पाण्यासारखा ओततात. हे सगळं आपण करू शकणार आहोत का? मला नाही वाटत कुठल्याही सर्वसामान्य माणसाला हे जमू आणि परवडू शकेल... आणि वेळेवारी वजन वाढू न देणं इतका सोपा उपाय असताना एवढा उलटा घास कशाला घ्यायचा?
मात्र, वेळेवारी वजन वाढू द्यायचं नाही म्हणजे नक्की केव्हा? मागच्या लेखात आपण वजन-उंची नियमितपणे आलेखात भरण्याविषयी वाचलं. बीएमआय नावाचं उंची-वजनाचं गुणोत्तर कसं काढायचं हेही पाहिलं. ते असं : बीएमआय = वजन (किलोग्रॅम)÷÷ [उंची (मीटर)]2

ज्या वेळी वजन आणि बीएमआय धोक्‍याच्या रेषेच्या दिशेनं जातायत, हे लक्षात येईल त्यावेळी लगेच आपल्या आहाराचा आणि व्यायामाचा आढावा घ्यायला हवा. जिथं चूक वाटेल तिथं दुरुस्ती करायला हवी. काही अपवादात्मक परिस्थितीत, जेव्हा हे तितकंसं सोपं नसतं तेव्हा, यासाठी तज्ज्ञांची मदत घ्यायला लागते.

मुख्य म्हणजे मुळात प्रमाणाबाहेर वजन वाढू नये म्हणून जीवनशैली बदलायला हवी, अधिक नैसर्गिक करायला हवी. इथं मी फक्त मुलांची जीवनशैली बदला, असं म्हणणार नाही. कारण बदल केलाच, तर परिणामकारक ठरण्यासाठी तो संपूर्ण कुटुंबाच्या सवयींमध्ये करायला लागतो. आजच्या यंत्रयुगात अगदीच काही जंगलातल्या मानवासारखं राहणं शक्‍य नाही; पण सहज करता येण्याजोगे बदल नक्कीच आहेत. ते आहेत आहार आणि विहार (वर्तणूक) या दोन आघाड्यांवर.
आहारात भरपेट नाश्‍ता; जेवणात भरपूर भाज्या-कोशिंबिरींचा समावेश; कणिक मळताना घातलेलं तेल, कोशिंबिरीतली फोडणी, सॅलड ड्रेसिंग अशा छुप्या मार्गानं पोटात जाणारं तेल यांच्यात कपात हे करता येईल. शिवाय ज्यूसपेक्षा आख्खी फळं खायची; घरात बिस्किटं, केक, शीतपेयं, चॉकलेट्‌स, आईस्क्रीम यांचा साठा ठेवायचा नाही; तहान भागवण्यासाठी पाणीच प्यायचं, चहा, कॉफी, ज्यूस नाही; जंक खाणं पूर्णपणे कटाप करता आलं नाही तरी निदान त्याचं प्रमाण कमी करायचं हेही करायचा प्रयत्न करता येईल.

आहारातल्या या बदलाबरोबरच रोज किमान एक तास मुलांना शारीरिक खेळ खेळायला द्यायलाच हवा. संध्याकाळचा वेळ शक्‍यतो खेळासाठी मोकळा ठेवायचा. जिना चढणं, चालत जाणं, हातानं काम करणं याची सवय मोडायला नको. जेवण आणि टीव्ही/कॉम्प्युटर/मोबाईल या दोन गोष्टी अजिबात एकावेळी करायच्या नाहीत... आणि शेवटचं; पण महत्त्वाचं म्हणजे "जंक फूड खाणे म्हणजे सेलिब्रेशन' ही कल्पना बदलायची.
वजन योग्य ठेवण्यासाठी आणखीही कितीतरी सहज-सोपे उपाय नक्कीच सुचतील. करायचा विचार यावर?

Web Title: dr vaishali deshmukh write article in saptarang