मर्मबंधातली ठेव ही... (डॉ. वर्षा तोडमल)

- डॉ. वर्षा तोडमल
रविवार, 12 मार्च 2017

‘साहित्य क्षेत्रातील साहित्यिक आणि साहित्यकृती यांचा पुनःपुन्हा विचार करणे केवळ क्रमप्राप्त असते असेच नव्हे; तर या प्रकारचा पुनर्विचार ही खरे तर प्रगतिशील साहित्य व्यवहाराची गरजही असते,’ हे प्रा. रा. ग. जाधव यांचे उद्‌गार डॉ. स्वाती कर्वे लिखित ‘आठवणीतील पुस्तकां’च्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचे आहेत.

‘साहित्य क्षेत्रातील साहित्यिक आणि साहित्यकृती यांचा पुनःपुन्हा विचार करणे केवळ क्रमप्राप्त असते असेच नव्हे; तर या प्रकारचा पुनर्विचार ही खरे तर प्रगतिशील साहित्य व्यवहाराची गरजही असते,’ हे प्रा. रा. ग. जाधव यांचे उद्‌गार डॉ. स्वाती कर्वे लिखित ‘आठवणीतील पुस्तकां’च्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचे आहेत.

डॉ. स्वाती कर्वे यांनी ‘आठवणीतील पुस्तके’ याचं लेखन याच दृष्टिकोनातून अत्यंत हेतूपूर्वक केलेलं दिसतं. हे लेखन करताना विचारपूर्वक, जाणीवपूर्वक एक भूमिका निश्‍चित केलेली दिसते. अभ्यासाचं, वाचनाचं, लेखनाचं मध्यवर्ती सूत्र ठरवलेलं दिसतं. म्हणूनच पुस्तकांची केवळ तात्त्विक समीक्षा न करता, मराठी वाङ्‌मयाच्या इतिहासात आपल्या अंगभूत कलात्मक वैशिष्ट्यांनी स्वतःचं वेगळं अस्तित्व सिद्ध केलेल्या कलाकृतींचं सौंदर्य लेखिकेनं उलगडून दाखवलं आहे.

एकोणिसाव्या शतकाचा शेवट ते साधारण १९९०पर्यंतच्या पुस्तकांचा समावेश असणाऱ्या २५ पुस्तकांचा विचार लेखिकेनं केला आहे. कादंबरी, नाटक, कथासंग्रह, पत्रसंग्रह, प्रवासवर्णन, आत्मचरित्र, ललित, वैचारिक, अशी वेगवेगळ्या वाङ्‌मय प्रकारातील, वाङ्‌मयीन दृष्टीनं वेगवेगळ्या टप्प्यांवरची पुस्तकं निवडली आहेत. जानेवारी २०१२ ते ऑक्‍टोबर २०१३ या काळात ‘विपुलश्री’ मासिकातून प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांवरची समीक्षा म्हणजेच ‘आठवणीतील पुस्तके.’

मराठी नवकवितेचा आविष्कार ‘मर्ढेकरांची कविता’, निसर्गातील निर्मिती विनाशांच्या महानाट्याचं काव्यात्म वर्णन करणारं दुर्गा भागवत यांचं ‘ऋतुचक्र’, सतीश आळेकरलिखित ‘महानिर्वाण’, मानवी मनातल्या क्रौर्याचं दर्शन घडवणारं नाटक म्हणजे ‘शांतता! कोर्ट चालू आहे’, दलित स्त्रियांच्या आत्मकथनातले दोन पिरियड पीस म्हणजे ‘माझ्या जल्माची चित्तरकथा’ आणि ‘जिणं आमुचं’; ‘कीचकवध’सारखं प्रभावी राजकीय रूपक; तसंच ‘युगांत’, ‘निवडक ठणठणपाळ’, ‘बलुतं’, ‘वंगचित्रे’, ‘दुस्तर हा घाट’ अशा २५ पुस्तकांवर डॉ. स्वाती कर्वे अभ्यासपूर्ण दृष्टिकोनातून नवीन निष्कर्ष मांडताना दिसतात. ह. ना. आपटे यांची शतकापूर्वीच्या स्त्री-जीवनाचं कलात्मक दर्शन घडवणारी सामाजिक कादंबरी म्हणजे ‘पण लक्षात कोण घेतो!’ ही कादंबरी आज आपल्याला शंभर वर्षांपूर्वीचा काळ, स्त्री-जीवन, स्त्री-मनाची स्पंदनं आणि सामाजिक स्थिती-गती समजावून देते.

सामाजिक, सांस्कृतिक दृष्टीनं संक्रमणाच्या काळातल्या स्त्रीची घुसमट व्यक्त करणाऱ्या दहा कथांचा बाळुताई खरे ऊर्फ विभावरी शिरूरकर यांचा ‘कळ्यांचे निःश्‍वास’ हा कथासंग्रह. आत्मभानाच्या जाणिवेतून केलेला स्त्रीच्या भावजीवनाचा पहिला आविष्कार म्हणजे ‘कळ्यांचे निःश्‍वास’, असं लेखिका म्हणते.

मोकळेपणानं एकत्र वावरणाऱ्या आजच्या पिढीला नव्वद वर्षांपूर्वीच्या तरुण पिढीची प्रेमभावनेकडं बघण्याची भूमिका कोणती होती, तरुण मुला-मुलींच्या मानसिक धारणा काय होत्या हे सांगणारा; मोबाईल, इंटरनेट, चॅटिंगच्या युगात पत्र लिहिणं ‘आउटडेटेड’ झालेलं असताना, भावपूर्ण नात्याबरोबर गतकाळाला जिवंत करणारा पत्रव्यवहार म्हणजे ‘कुसुमानिल’ मनात गारवा निर्माण करतो. व्यंकटेश माडगूळकर यांची ‘वावटळ’ ही लघुकादंबरी. गांधीहत्येनंतर उठलेल्या सामाजिक ‘वावटळी’ला सामाजिक दृष्टीनं लेखिका अभिव्यक्त करते. ‘निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी’मध्ये साठोत्तर काळातल्या महानगरीय संवदनेबरोबर तत्कालीन तरुण पिढीच्या जीवनसंघर्षावर डॉ. कर्वे भाष्य करतात.

आस्वादक समीक्षेच्या अंगानं प्रत्येक पुस्तकाचं स्वरूप लेखिका व्यक्त करताना दिसते. ही पुस्तकं ज्या काळात प्रसिद्ध झाली, त्या काळाच्या पार्श्‍वभूमीवर, त्या-त्या विषयाचं वेगळेपण, महत्त्व, लेखकाची भूमिका, एक कलाकृती म्हणून लेखकानं केलेला आविष्कार, पुस्तकाचं सौंदर्य, परिणामकारकता आणि अर्थपूर्णता डॉ. कर्वे यांनी ताकदीनं स्पष्ट केली आहे. ‘कोसला’चं परीक्षण वाचून तर स्वतः नेमाडे पत्र पाठवून कळवतात, की ‘कोसला’वर तुम्ही नव्यानं काही निरीक्षणं मांडली आहेत. स्वातंत्र्योत्तर काळातली सामाजिकता लेखिकेनं फार उत्तम शोधली आहे.

आंतरशास्त्रीय अभ्यासपद्धती विद्यमान असताना सामाजिक, सांस्कृतिक दृष्टीनं; तसंच साहित्यातून समाजाकडे या दिशेनंही ही पुस्तकं समाजवास्तवाला कशी अभिव्यक्त करतात, याचा वेध डॉ. स्वाती कर्वे यांनी उत्तम रीतीनं घेतला आहे. कलाकृतीतून व्यक्त होणारा सामाजिक आशय, त्यासंबंधीचा दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. आज एकविसाव्या शतकातलं पहिलं दशक पूर्ण झाल्याच्या टप्प्यावर या सर्व पुस्तकांचं महत्त्व अधोरेखित होतं. अभिजात वाङ्‌मय या दृष्टीनंही या सर्व पुस्तकांची मौलिकता स्पष्ट करण्यात डॉ. कर्वे यशस्वी झाल्या आहेत. त्यांचं ‘आठवणीतील पुस्तके’ म्हणजे प्रत्येक पुस्तक आठवणीत राहण्यासाठी एक ठळक वैशिष्ट्य घेऊन येतं.

पुस्तकाचं नाव - आठवणीतील पुस्तके 
लेखिका - डॉ. स्वाती कर्वे
प्रकाशन - उत्कर्ष प्रकाशन, पुणे (०२० - २५५३२४७९)
पृष्ठं - २८६, मूल्य - ३०० रुपये

Web Title: dr. varsha todmal artical saptarang