ही दिवाळी ‘सकारात्मक विचारांची’ 

डॉ. विद्याधर बापट 
Sunday, 15 November 2020

सकारात्मक विचारसरणीचा मेंदूवर खूप चांगला परिणाम होतो. यामुळे मेंदूमध्ये prefrontal cortex मध्ये न्यूरॉन्सची वाढ होते. नवीन synapses तयार होतात.

असे म्हणतात, की आपला आयुष्याकडे, एकूणच जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असेल तरच आयुष्याकडून आपल्याला भरभरून आनंद, सुख, मन:शांती आणि यश मिळते. अर्थपूर्ण आणि आनंदी आयुष्य जगण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोनाची आवश्यकता असते. सकारात्मक दृष्टिकोनामुळे, तुम्ही जीवनाकडे पाहताना नेहमी त्यातली चांगली बाजू पाहता. इतकेच नव्हे तर असेही आढळून आले आहे, की सकारात्मक दृष्टिकोन दीर्घायुषी व्हायला मदत करतो. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

सकारात्मक दृष्टिकोन रुजण्यासाठी पुढील गोष्टी करता येतील - 
१. आनंदी असणे ही एक वृत्ती, दृष्टिकोन आहे. त्यासाठी आनंद निर्माण होणारा प्रसंगच घडायला हवा असे नाही. मी नेहमी आनंदीच राहीन हा विचार स्वत:त भिनवायला हवा. 

२. कामांची आखणी करावी. त्यात शारीरिक, मानसिक व्यायाम, ध्यान यांचा जरूर अंतर्भाव असावा. त्यामुळे उत्साह आणि चांगल्या मूडमध्ये दिवसाची सुरुवात होईल. 

३. कर्त्याची भूमिका, कर्त्याचा भाव मनात ठेवावा. म्हणजेच आपण जे काम करतोय, जी कृती करतोय त्याची जबाबदारी, त्याच्या परिणामांची जबाबदारी मनात स्वीकारायला सुरुवात करावी. आपोआप दृष्टिकोन बदलायला लागेल. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

४. माझ्या ‘वाट्याला’ आलेले आयुष्य हा भाव न ठेवता, माझ्यासाठी, माझ्या आनंदासाठी निर्माण झालेली जीवन जगण्याची संधी हा भाव जगताना ठेवायला हवा. आयुष्यात येणारी विपरीत परिस्थिती किंवा संकटे मला काहीतरी शिकवून जाण्यासाठी आहेत. मला जास्त जास्त कणखर बनवत आहेत. माझ्या आयुष्याचा ‘खेळ’ रंगतदार करीत आहेत, ही भावना ठेवायला हवी. त्यासाठी साक्षीभाव, ‘माइंडफुलनेस’सारखी तंत्रे शिकून घेता येतील. 

५. सतत फक्त आणि फक्त सकारात्मक विचार करायला हवा. स्वत:चा स्वत:शी असलेला संवाद (Self Talk) सकारात्मक असायला हवा. मी माझ्या ‘आत’ एक संरक्षक भिंत निर्माण करायला हवी, ज्यायोगे इतरांनी केलेली अनाठायी टिका, अपमान, चुकीचे आरोप, वाईट हेतूने आणलेले दडपण इत्यादी माझ्यावर परिणाम करणार नाहीत. मनाचे ‘पॉझिटिव्ह प्रोग्रामिंग’ शक्य आहे. त्यासाठी पद्धतशीर प्रयत्न करायला हवेत. 

६. माझ्या आयुष्याला काहीतरी उद्दिष्ट असेल तर सकारात्मक दृष्टिकोन निर्माण व्हायला मदत होईल. काही छोट्या कालावधीसाठी, तर काही दीर्घ कालावधीसाठी उद्दिष्टे ठरवायला हवीत. 

७. आयुष्यात नेहमी चांगलेच घडेल, ही अपेक्षा चुकीची आहे. प्रतिकूल घडले तरी त्याला तोंड देण्याचे सामर्थ्य माझ्यात आहे, हा ठाम विश्वास असायला हवा. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

८. सकारात्मक स्वयंसूचना उपयोगी ठरतात. उदा. मी परिस्थितीशी जुळवून घेऊ शकेन. ती क्षमता माझ्यात आहे. कितीही कठीण परिस्थिती आली, तरी मी निर्धाराने पुढे जात राहीन. चांगल्या गोष्टी मिळविण्यासाठी कष्ट करावेच लागतात आणि मी ते करेन. 

९. Creative Visualizationची तंत्रे खूप उपयुक्त ठरतात. परिस्थिती बिकट असते, तेव्हा आपण त्यातून चांगल्या रितीने बाहेर पडत आहोत. यशस्वी होत आहोत अशा पद्धतीची Creative Visualizations उपयोगी पडू शकतात. 

१०. सतत तक्रारी करण्याची सवय असेल, तर ती बदलायलाच हवी. त्यातून नकारात्मक दृष्टिकोन तयार होत जातो. गोष्टी, घटना मनाविरुद्ध घडत असतील तर काही काळ त्यातून मानसिकदृष्टया बाजूला होणे महत्त्वाचे आहे. 

११. सतत हसत राहण्याने आपण आनंदी राहतो आणि समोरच्यालाही प्रसन्न वाटते. स्वत:वरही हसता यायला हवे. मुळात या जगात गांभीर्याने घ्यावी अशी एकही गोष्ट नाहीय. हे आयुष्य म्हणजेच एक विनोद आहे, असेही म्हणता येईल. 

१२. आपल्यात कृतज्ञ राहण्याची भावना रुजवायला हवी. सकारात्मक दृष्टिकोन तयार होण्यासाठी कृतज्ञता वाटणे आणि त्याचबरोबर आवश्यक तेथे क्षमा मागण्याचा मनाचा मोठेपणा आपल्याजवळ असणे खूप महत्त्वाचे आहे. 

१३. सकारात्मक दृष्टिकोन हा तसा संसर्गजन्य असतो. आपण जितके सकारात्मक विचारसरणी असलेल्या व्यक्तींच्या सहवासात राहू, तितका आपल्यातही सकारात्मक दृष्टिकोन रुजायला मदत होईल. त्याचबरोबर स्फूर्तिदायक आणि सकारात्मक लेखन वाचणे, विचार ऐकणे याचाही उपयोग होऊ शकेल. 

सकारात्मक विचारसरणीचा मेंदूवर खूप चांगला परिणाम होतो. यामुळे मेंदूमध्ये prefrontal cortex मध्ये न्यूरॉन्सची वाढ होते. नवीन synapses तयार होतात. याच भागामध्ये मन, विचार यासंबंधीचे महत्त्वाचे कार्य चालते. विश्लेषण करणे व विचार करण्याची क्षमता वाढते. मनाची सतर्क राहण्याची क्षमता वाढते. सकारात्मक विचारसरणी एकदा रुजली की नव नवीन, सृजनात्मक विचार निर्माण होण्याची क्षमता वाढते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr vidyadhar bapat write article Diwali of positive thoughts

Tags
टॉपिकस
Topic Tags: