माध्यमांतराचा रंजक रसास्वाद (डॉ. विजय केसकर)

डॉ. विजय केसकर
रविवार, 3 मार्च 2019

"माध्यमांतर' या विषयात विशेष रुची असणारे प्रा. डॉ. राजेंद्र थोरात यांचं "कुंकू ते दुनियादारी' हे तिसरं पुस्तक. एखाद्या साहित्यकृतीचं "माध्यमांतर' होतं, तेव्हा त्या साहित्यकृतीमध्ये माध्यमांतराची चिन्हं प्रतीत होत असतात. कादंबरीचं चित्रपट माध्यमात होणारी रूपांतर प्रक्रिया नऊ चित्रपटांच्या अनुषंगानं डॉ. राजेंद्र थोरात यांनी ओघवत्या शैलीत उलगडून दाखवली आहे. मराठी कादंबरीचं मराठी चित्रपटांतलं माध्यमांतर हे या पुस्तकाचं आशयसूत्र. प्रास्ताविकामध्ये लेखकानं कादंबरीचे चित्रपटरूप, नाट्यरूप, मालिकारूप आणि आकाशवाणी रूप यांचा थोडक्‍यात आढावा घेतला आहे.

"माध्यमांतर' या विषयात विशेष रुची असणारे प्रा. डॉ. राजेंद्र थोरात यांचं "कुंकू ते दुनियादारी' हे तिसरं पुस्तक. एखाद्या साहित्यकृतीचं "माध्यमांतर' होतं, तेव्हा त्या साहित्यकृतीमध्ये माध्यमांतराची चिन्हं प्रतीत होत असतात. कादंबरीचं चित्रपट माध्यमात होणारी रूपांतर प्रक्रिया नऊ चित्रपटांच्या अनुषंगानं डॉ. राजेंद्र थोरात यांनी ओघवत्या शैलीत उलगडून दाखवली आहे. मराठी कादंबरीचं मराठी चित्रपटांतलं माध्यमांतर हे या पुस्तकाचं आशयसूत्र. प्रास्ताविकामध्ये लेखकानं कादंबरीचे चित्रपटरूप, नाट्यरूप, मालिकारूप आणि आकाशवाणी रूप यांचा थोडक्‍यात आढावा घेतला आहे. "कुंकू', "वैजयंता', "रिटा', "जोगवा', "नटरंग' हे चित्रपट प्रस्थापित व्यवस्थेनं निर्माण केलेल्या रुढी-परंपरामुळं उद्‌ध्वस्त होत जाणाऱ्या जीवनाचं चित्रण करणारे. "श्‍यामची आई' हा चित्रपट संस्कारमूल्यांचं महत्त्व अधोरेखित करणारा, तर "बनगरवाडी' हा चित्रपट दुष्काळाचं सावट असणाऱ्या, धनगर समाजाच्या जीवनावर भाष्य करणारा. "जैत रे जैत' हा डॉ. जब्बार पटेल यांचा चित्रपट आदिवासी जीवन रेखाटतो, तर "दुनियादारी' या चित्रपटानं युवकांच्या महाविद्यालयीन जीवनाचं, स्वप्नांचं, मोरपंखी दिवसांचं चित्रण केलं आहे.

व्ही. शांताराम यांचा "कुंकू' हा चित्रपट नारायण हरी आपटे यांच्या "न पटणारी गोष्ट' या कादंबरीवर आधारित. कादंबरीतल्या विस्तृत कथानकाचं चित्रपटात माध्यमांतर होताना मर्यादा येतात, तशा मर्यादा याही चित्रपटाला आहेत. जरठ-बाला विवाह ही समस्या व्ही. शांताराम यांनी कौशल्यानं चित्रपटातून मांडली. व्ही. शांताराम यांचं "शांताराम टच' दिग्दर्शन आणि कलाकारांच्या अप्रतिम अभिनयानं "कुंकू' यशस्वी ठरला. "श्‍यामची आई' ही कादंबरी म्हणून "अजरामर' कलाकृती. "मातृप्रेमाचं महामंगल स्तोत्र' असणारी ही साहित्यकृती साने गुरुजींच्या भावनिक स्पर्शानं खुलली, तसंच "श्‍यामची आई' चित्रकृती ही आचार्य अत्रे यांच्या दिग्दर्शन कौशल्यामुळं खुलली. उत्कृष्ट भारतीय चित्रपट म्हणून राष्ट्रपतींच्या पहिल्या सुवर्णकमळानं या चित्रपटाला गौरवण्यात आलं.

"बनगरवाडी' ही अभिजात कादंबरी. व्यंकटेश माडगूळकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेली ही कादंबरी बनगरवाडी या गावाचं जीवनवास्तव रेखाटते. तिथल्या रुढी-परंपरा, जीवनपद्धती, श्रद्धा-अंधश्रद्धा यांचं दर्शन घडवतं. ज्येष्ठ दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी या कादंबरीचं नेमकं आशयसूत्र घेऊन "बनगरवाडी' याच नावाने तिचं चित्रपटात माध्यमांतर केलं.

गो. नी. दांडेकर या प्रतिभावान साहित्यिकाची "जैत रे जैत' ही कादंबरी ठाकर या आदिवासी जमातीची जीवनशैली अधोरेखित करणारी. डॉ. जब्बार पटेल यांनी मूळ आशयाला "संगीतमय' करून त्यातला आशय आणखी अधोरेखित केला. दर्जेदार कादंबरीवरचा दर्जेदार चित्रपट म्हणजेच "जैत रे जैत.' अण्णा भाऊ साठे यांची "वैजयंता' ही कादंबरी तमाशा कलावंताचं विदारक जीवन रेखाटते. सामान्य जीवनात त्यांचं स्थान शून्य असल्याचं ती अधोरेखित करते. दिग्दर्शक गजानन जहागिरदार यांनी हे आशयसूत्र "वैजयंता' चित्रपटातून मांडलं. जयश्री गडकर यांनी साकारलेली "वैजयंता' रसिकांच्या मनाचा ठाव घेते. शांता गोखले यांच्या "रिटा वेलिणकर' या कादंबरीतून बंडखोर रिटाचं दर्शन घडतं. पुरुषी अहंकारी व्यवस्थेविरूद्धच्या आशयसूत्राला केंद्रवर्ती ठेऊन दिग्दर्शिका रेणुका शहाणे यांनी अप्रतिम चित्रपट तयार केला आहे. "रिटा' कादंबरी आणि चित्रपटातून स्त्री-जगताच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या व्यापकत्वाची आवश्‍यकता कशी अधोरेखित केली आहे, याचं विवेचन डॉ. राजेंद्र थोरात यांनी नेमकेपणानं केलं आहे.

माणसाचं माणूसपण अधोरेखित करणारा "जोगवा' हा चित्रपट राजन गवस यांच्या "भंडारभोग', "चौंडकं' या कादंबऱ्यांवर; तसंच चारुता सागर यांच्या "दर्शन' कथेवर आधारित. राजीव पाटील यांचं दिग्दर्शक म्हणून असणारं मोठेपण आणि उपेंद्र लिमये, मुक्ता बर्वे, किशोर कदम यांच्या दर्जेदार अभिनयाविषयीचं वर्णन थोरात यांच्या पुस्तकातून आलं आहे. आनंद यादव यांच्या "नटरंग' कादंबरीवरचा रवी जाधव यांचा "नटरंग' चित्रपट अफाट लोकप्रिय झाला. यादव यांच्या कादंबरीचं महानत्व लेखकानं विशद केलं आहे. अजय-अतुल यांचं संगीत, अतुल कुलकर्णी यांचा दर्जेदार अभिनय यांचंही वर्णन थोरात यांनी केलं आहे. सुहास शिरवळकर यांच्या "दुनियादारी' या लोकप्रिय कादंबरीवर आधारित असलेला, संजय जाधव दिग्दर्शित "दुनियादारी' हा मराठीतला लोकप्रिय चित्रपट. जाधव यांच्या स्वप्नातली "दुनियादारी' थोरात यांनी आस्वादक स्वरूपात विशद केली आहे.

साहित्य आणि चित्रपटांच्या रसिकांबरोबरच अभ्यासक, संशोधक आणि वाचकांना हे पुस्तक नक्कीच आवडेल. मराठी कादंबरीवर आधारित मराठी चित्रपटांच्या अभ्यासाची पायवाट "कुंकू ते दुनियादारी' या पुस्तकानं निर्माण केली आहे, असं म्हणता येईल.

पुस्तकाचं नाव : कुंकू ते दुनियादारी
लेखक : डॉ राजेंद्र थोरात
प्रकाशक : चपराक प्रकाशन, पुणे (7057292092)
पानं : 128, किंमत : 130 रुपये


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dr vijay keskar write book review in saptarang