इन्किलाब झिंदाबाद (डॉ. यशवंत थोरात)

इन्किलाब झिंदाबाद (डॉ. यशवंत थोरात)

मी माझ्या जवळचा तो डबा उघडला. त्यात काही बिया आणि थोडी माती होती. त्या बिया लावल्यावर फुलं येतील की नाही, याची मला शंका होती. बी पेरणं एवढंच आपलं काम. नंतरचं कुणाला माहीत? पाऊस येईल किंवा अजिबात येणार नाही, हे कोण सांगू शकेल?
कदाचित दूरवरच्या हिमनद्या वितळतील आणि त्यामुळं नद्या आपले बांध ओलांडतील...पेरलेलं उगवेल; पण त्याच्यावर कीडही पडू शकते...किंवा चांगल्या प्रकारे उगवलेलं सगळं पुरातही वाहून जाऊ शकतं...किंवा कदाचित सगळंच चांगलंही घडू शकेल. आपण आशा करायची ती चांगलं होईल याचीच.

ती  मला पहिल्यांदा कॉलेजमध्ये भेटली होती. शिडशिडीत, छोट्या चणीची. दिसायला चांगली. स्वभावानं तशी गंभीर. गांधीजी वापरत तसा चष्मा वापरणारी. खादीची चुरगळलेली सलवा-कमीज घालणारी. खांद्यावर नेहमी ‘शांतिनिकेतन’ पद्धतीची कापडी पिशवी. एक बेफिकीर गबाळेपणा हेच तिच्या व्यक्तिमत्त्वाचं वैशिष्ट्य होतं. नंतरच्या काळात शहरी तरुणांची ती एक फॅशनच बनली.

उर्दू काव्य आणि शेरोशायरी ही आमची समान आवड. डाव्या विचारसरणीच्या राजकीय विश्‍लेषकांची भाषणं ऐकणं ही आणखी एक समान आवड. डाव्यांच्या अनेक मोर्चांमध्ये आम्ही बरोबरीनं सहभागी होत होतो. ती एका अतिशय गर्भश्रीमंत कुटुंबातून आलेली होती, असं मला कळलं होतं अन्‌ म्हणूनच आपण अतिगरीब आहोत असं भासवणाऱ्या तिच्या राहणीचं सगळ्यांना आश्‍चर्य वाटायचं. साध्या मैत्रीच्या एक पाऊल पुढं जाऊन तिच्याशी सूत जमवण्याचे माझे सगळे प्रयत्न अपयशी ठरले होते. कॉलेजशिक्षण संपलं आणि आम्ही एकमेकांपासून आणि अर्थातच एकमेकांच्या जीवनातून दूर गेलो. मी नोकरी पत्करली आणि माझं एक वेगळंच आयुष्य सुरू झालं. ती एकदम गायबच झाली. कुठं गेली याचा कुणालाच पत्ता नव्हता.

खूप वर्षांनी, नेमकं सांगायचं तर १९८१ मध्ये, गुवाहाटी विमानतळावर आम्हा दोघांचा एक समान मित्र मला भेटला. त्या दिवशी त्याच्याबरोबर जेवताना कॉलेजच्या त्या सोनेरी दिवसांच्या आठवणींना आम्ही उजाळा देत होतो. चर्चेत सहजच तिचा विषय निघाला. त्यानं मला सांगितलं, की दिल्लीतल्या झोपडपट्टीत काही काळ काम केल्यानंतर ती नक्षलवादी चळवळीत गेली आणि त्यांच्या संघटनेत तिनं बरंच वरचं स्थान मिळवलं होतं. मात्र, एका चकमकीच्या वेळी पोलिसांनी तिला पकडलं. तिला तुरुंगात नेलं जात असताना बाथरूमला जाण्याचं निमित्त करून ती त्यांच्या तावडीतून निसटली. बरोबरचा पोलीस विडी पीत रस्त्यावर थांबला आणि ती थेट जंगलात पळाली. त्या वेळी वर्तमानपत्रांत हे प्रकरण खूप गाजलं; पण नंतर तिच्याविषयी काहीच ऐकायला मिळालं नाही. काहींच्या मते ती परदेशात पळून गेली, तर काहींच्या मते ती चकमकीत ठार झाली. नेमकं खरं काय ते कुणालाच माहीत नव्हतं. हा विषय तिथंच संपला.

पुढं खूप वर्षांनी कार्यालयीन कामाचा भाग म्हणून मी ईशान्य भारतातल्या एका राज्यातल्या एका शाळेचं उद्‌घाटन करायला गेलो होतो. डोंगर-दऱ्यांमधून जाणाऱ्या त्या रस्त्यालगतचा परिसर अतिशय सुंदर होता. एका नयनरम्य ठिकाणी ही शाळा बांधलेली होती. मुलं उत्साहानं सळसळत होती. सगळा समारंभ सुरळीत पार पडला. मात्र, नंतर व्यासपीठावरून उतरताना मी पाय घसरून खाली पडलो आणि आणि माझा पाय मुरगळला. तिथून सुमारे दोन किलोमीटरवर असलेल्या एका केंद्रात प्राथमिक आरोग्यकेंद्र होतं. काही झोपड्यांच्या कोंडाळ्यात असलेल्या या केंद्रात एक सामाईक सभागृह होतं आणि एका थोड्याशा मोठ्या खोलीत हे आरोग्यकेंद्र होतं. तिथल्या परिचारिकेनं माझा सुजलेला पाय तपासला आणि तातडीनं माझ्या पायावर प्लॅस्टर घातलं. थोड्या वेळात हळूहळू माझ्या वेदना थांबल्या. त्या आरोग्यकेंद्राला मी थोडी आर्थिक मदत करण्याची इच्छा व्यक्त केली. तिनं मला एका छोट्या खोलीत नेलं. तिथं टेबलावर छोटीशी लाकडी पेटी ठेवलेली होती. शेजारी स्वामी रामकृष्णांचा एक फोटो होता. देणगीदाखल मी छोटी रक्कम त्या पेटीत टाकली. मी माझ्या मोटारीकडं जात असताना अचानक कुणीतरी मागून माझ्या नावानं मला हाक मारली. मी वळून मागं बघितलं. चष्मा घातलेली आणि गळ्यात स्टेथास्कोप अडकवलेली एक मध्यमवयीन स्त्री मला बोलावत होती.

ती डॉक्‍टर आहे असं मला वाटलं. ‘‘काय काम आहे?’’ मागं वळत मी विचारलं.
‘‘काहीच नाही,’’ म्हणत ती नुसतंच हसली.
मी बघितलं आणि क्षणार्धात माझ्या डोक्‍यात लख्ख प्रकाश पडला. ती तीच होती.  
आम्ही तिच्या खोलीत गेलो. फारसं सामान नसलेली, अगदी साधी, जवळजवळ रिकामी अशी ती खोली होती. एका कोपऱ्यात प्रायमसचा स्टोव्ह आणि काही भांडी होती. दुसऱ्या कोपऱ्यात शिबिरात असतो तसा एक बिछाना. भिंतीलगत एक ओबडधोबड टेबल. आम्ही तिथं बसलो.
‘‘तू आहेस होय!’’ मी आश्‍चर्यानं उद्गारलो.
‘‘काहीतरी बोलू नकोस...मी दुसरी कुणी कशी असेन?’’ ती म्हणाली.
‘‘नाही...मला तसं म्हणायचं नव्हतं,’’ मी घाईघाईनं म्हणालो ः ‘‘मला एकदम धक्काच बसला म्हणून मी तसं म्हटलं. ते जाऊ दे. एवढी वर्षं तू होतीस तरी कुठं? मला तर वाटलं, की तू मरणच पावलीस!’’
‘‘तसं का बरं?’’
‘‘मला असं समजलं होतं, की तू एका झोपडपट्टीत काम करत होतीस. तिथून तू नक्षलवादी चळवळीत गेलीस. नंतर तू पकडली गेलीस; पण पोलिसांच्या ताब्यातून निसटलीस. नंतर तू गायब झालीस ती कायमचीच...’’
‘‘अज्ञातवासात जाणं म्हणजे मृत्यू नव्हे,’’ ती म्हणाली.
‘‘नेमकं काय घडलं ते मला सांग,’’ मी अधीरतेनं विचारलं.

‘‘मला हा प्रश्न अपेक्षितच होता. मी त्याची वाटच बघत होते; पण तुला ते कशासाठी जाणून घ्यायचंय? तुला जितकं कमी समजेल तेवढं चांगलं आहे. आपलं दोघांचंही जग आता वेगळं आहे. तुझं जग तू खूप वर्षांपूर्वीच निवडलंस आणि इतरांच्या दृष्टीनं तुझं बरं चाललंय; पण तुझं कॉलेजमधलं जहाल रूप माझ्या आठवणीत आहे. तुझं सध्याचं जगणं त्याच्याशी जुळत नाही. तुझ्या निवडीबद्दल तू खरंच सुखी आहेस का?’’ तिनं विचारलं. माझी नजर झुकली. ‘‘म्हणावा तेवढा नाही,’’ मी चाचरत म्हणालो ः ‘‘पण तुलाही मी हाच प्रश्न विचारला तर तुझं काय उत्तर आहे?’’
‘‘मी अतिशय सुखी आहे,’’ ती म्हणाली.
‘‘खरं खरं सांग,’’ मी म्हणालो.
ती नुसतंच हसली. म्हणाली ः ‘‘सत्य असं काही नसतंच, यशवंत. ते सापेक्ष असतं. म्हणजे आपण पाहू तसं. एखादं चित्र पाहणं आणि त्या चित्राचा भाग असणं या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मी सध्या काय करते आणि त्या वेळी मी काय करत होते, या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. सत्य एकच असतं. फक्त त्याच्यापर्यंत पोचायची साधनं वेगवेगळी असतात.’’
‘‘काहीतरीच काय म्हणतेस?’’ मी माझ्या स्वभावाप्रमाणे उसळून तिला अडवत विचारलं ः ‘‘सरकारविरुद्धचा सशस्त्र लढा आणि रुग्णांची सेवा यात काहीच फरक नाही, असं तुला म्हणायचंय का?’’
‘‘तुम्ही त्याच्याकडं कसं पाहता, यावर ते अवलंबून आहे,’’ ती म्हणाली.
‘‘वर्ग आणि जात यांमुळं निर्माण झालेली विषमता ही शरीरातल्या कॅन्सरसारखी वाढत आहे. त्यासाठी आयुर्वेदिक औषध उपयोगाचं नाही. त्यासाठी एखाद्या शल्यविशारदाचा चाकूच हवा.’’
‘‘तो मूर्खपणाचा विचार आहे,’’ मी त्वेषानं म्हणालो. माझा राग माझ्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत असावा.
‘‘सन १९६७ ते १९७५ या काळात जेव्हा नक्षलवादी चळवळ ऐन भरात होती, तेव्हा देशात झालेल्या १० हजार हत्यांसाठीचं तुझं हे समर्थन आहे का? आणि माओवाद्यांकडून सध्या केल्या जाणाऱ्या हत्या त्यामुळं समर्थनीय ठरतात का?’’
‘‘समाजाचा विकास नेहमीच काही एखाद्या सरळ रेषेसारखा होत नसतो,’’ ती शांतपणे म्हणाली.
‘‘ते खरंय; पण मोठे सामाजिक बदल हे शांततेच्या मार्गानंच होत असतात. हिंसाचाराच्या आणि कत्तलींच्या मार्गानं नव्हे,’’ मी माझा मुद्दा सोडत नव्हतो.
‘‘आणि तुझंच बरोबर आहे किंवा होतं, असं म्हणण्याचा उद्धट अधिकार तुला कुणी दिला? तुझ्या विचारांवर तुझी श्रद्धा आहे आणि ते विचार कृतीत आणण्याची हिंमत तुझ्यात आहे म्हणून कॉलेजमध्ये असताना मी तुझं कौतुक करायचो; पण आज हिंसाचाराचं समर्थन करून तू मला निराश केलं आहेस,’’ मी म्हणालो.
या संवादात पुढं वाढवण्यासारखं काहीच नव्हतं.
‘‘माझं एक काम करशील?’’ तिनं विचारलं.
‘‘नक्की,’’ मी म्हणालो.
पलंगाखालून तिनं एक जुनाट सूटकेस ओढून बाहेर काढली. त्यातला एक गंजलेला छोटा डबा काढून ती भावुकतेनं म्हणाली ः ‘‘यात काही बिया आहेत. त्या नक्षलबाडीमध्ये नेऊन तिथं लावशील? कदाचित त्यांपैकी काही नक्की रुजतील आणि त्यांच्या वेलींना फुलंही येतील.’’
क्षणभर कुणीच काही बोललं नाही. निःशब्द शांततेचा भंग करत ती म्हणाली ः ‘‘तुला ती कविता आठवते?’’
चराग-ए-बज्म-ए-सितम है, हमारा हाल ना पूछ
जले थे शाम से पहले, बुझेंगे सहर के बाद
(माझी ख्यालीखुशाली विचारू नकोस...मी एक असा दिवा आहे, की जो अंधारात प्रकाश देण्यासाठी जळतो. मी सायंकाळपूर्वी तेजाळलो; पण सकाळ होताच मी मालवला जाणार आहे). क्षणार्धात सगळा भूतकाळ माझ्या मनात दाटून आला. उत्तरादाखल मी नकळत बोलून गेलो ः
वही जुबाँ, वही बातें मगर है कितना फर्क
तुम्हारे नाम से पहले, तुम्हारे नाम के बाद!
(तू तीच आहेस, तुझी भाषाही तीच आहे; पण आता अर्थ किती वेगळा आहे. तेव्हा तुझं नाव होतं अन्‌ आता तू अनाम आहेस...)
‘‘बहोत खूब!’’ अशी दिलखुलास दाद देत ती म्हणाली ः ‘‘कदाचित आपण पुन्हा भेटणार नाही. गुड बाय. माझी आठवण ठेव.’’
मी तिला पुन्हा कधी बघितलं नाही किंवा तिच्याविषयी कधी काही ऐकलंही नाही. काही वर्षांनी मी त्या शाळेविषयी आणि तिथल्या वैद्यकीय केंद्राविषयी चौकशी केली. ती शाळा तिथं होती; पण ते केंद्र बंद पडलं होतं. तिनं दिलेला तो डबा माझ्याजवळ अनेक वर्षं तसाच होता. त्यानंतर मी पश्‍चिम बंगालमध्ये गेलो नाही असं नाही; पण दरवेळी मी तो डबा हेतुतः घरी विसरत होतो. हा प्रकार माझी पत्नी उषा हिच्या नजरेतून सुटला नाही.  
‘‘हे बघ, तो डबा हे जर तिच्या आठवणींचं प्रतीक असेल, तर तो नीट शोकेसमध्ये ठेव; पण तसं नसेल तर तिनं सांगितल्याप्रमाणं कर,’’ उषानं मला स्वच्छपणे सांगितलं.
पुढच्या वेळी मी तो डबा आठवणीनं बरोबर घेऊन गेलो.
सिलिगुडीपासूनचा पुढचा प्रवास अतिशय निसर्गरम्य प्रदेशातून होता. रस्त्यातल्या चहाच्या मळ्यात बायका चहाची पानं तोडताना दिसत होत्या. मुलं मळ्यामध्ये बागडत होती आणि पुरुष त्यांच्या दैनंदिन कामात गुंतलेले होते. हाच शांत परिसर एकेकाळी सगळ्या देशाचं लक्ष वेधणाऱ्या किसानांच्या पुनरुत्थानाच्या चळवळीचं मुख्य केंद्र होतं, हे कुणाच्या गावीही नव्हतं. तो सगळा इतिहास माझ्या डोळ्यांपुढं तरळत होता. मी ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगितलं. त्यानं गाडी रस्त्याच्या बाजूला घेतली.

‘‘हे बघ, तू असाच पुढं जा आणि पुढच्या गावापाशी थांब. मी चालत येतो. मला थोडा वेळ एकटं राहायचं आहे,’’ मी त्याला सांगितलं. मी तो डबा केवळ भावनेपोटी माझ्याजवळ ठेवलेला नव्हता. त्या दिवशी तिच्या बोलण्यातलं सत्य जाणवून मी कमालीचा अस्वस्थ झालो होतो. सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी लोकशाहीमार्ग हा एकच पर्याय आहे, हा माझा बचाव तिनं काहीही न बोलता उधळून लावला होता. लठ्ठ पगार मिळवणाऱ्या एका सरकारी अधिकाऱ्याचं सत्य हे गरीब शेतकऱ्याच्या सत्यापेक्षा वेगळं असतं, हे तिनं मला जाणवून दिलं होतं. त्या दिवशी त्या वैद्यकीय केंद्रात मी हिंसाचाराचा प्रतिवाद करत होतो; पण तरीही तिच्या शब्दांनी माझ्या मनात संशयाचं बीज पेरलं होतं. मी जर एखादा गरीब, कर्जबाजारी शेतकरी असलो असतो किंवा एखादा वेठबिगार कामगार असलो असतो, तर माझी वृत्ती अशीच राहिली असती का, हा विचार मला सतावत होता. पोट भरल्यानंतर मद्याचे घुटके घेतानाचं तत्त्वज्ञान ठीक आहे; पण नेहमी उपाशीपोटी राहणाऱ्या शेतकऱ्याला ते लागू पडतं का, हा खरा प्रश्न होता. भूक म्हणजे काय असते, हे प्रत्यक्ष अनुभवल्याशिवाय समजणं शक्‍य आहे का किंवा बहिष्कृत जातीत असण्याचं दुःख काय असतं, हे प्रत्यक्ष त्या जातीत असल्याशिवाय कळू शकतं का, हे प्रश्न मला सतावत होते. म्हणजे माझा दृष्टिकोन सर्व सुखं उपभोगणाऱ्या दांभिक माणसासारखा होता का, याचं उत्तर शोधणं अतिशय कठीण होतं. कितीतरी वेळ मी तसाच चालत राहिलो.

कॉलेजमध्ये असताना गरीब आणि श्रीमंत यांच्यातल्या विषमतेवर किंवा जातीजातीतल्या असमानतेवर आणि ती कशी दूर करता येईल, यावर आम्ही तासन्‌तास वाद घालायचो. सगळी सामाजिक बंधनं झुगारून दिली पाहिजेत आणि जमीन, श्रम आणि भांडवल यांची काही थोड्या लोकांच्या हातात एकवटलेली मालकी काढून घेऊन ती सगळ्यांच्या हातात दिली पाहिजे, असं आम्हाला प्रकर्षानं वाटायचं.   एकप्रकारे ते एक सुंदर स्वप्न होतं. स्वप्नच; कारण गरिबी आणि सर्वस्व हरवणं म्हणजे काय याचा अनुभव घेण्याची आमची इच्छा कधीच नव्हती. मात्र, पश्‍चिम बंगालमधल्या दूर अंतरावरच्या नक्षलबाडीत हे स्वप्न साकार होत होतं. १९६७ च्या मार्च महिन्यात शेतकऱ्यांच्या एका गटानं जमिनीच्या एका तुकड्यावर लाल झेंडे लावून सीमारेषा आखली आणि तिथं पेरणी केली. दोन महिन्यांनी त्या शेतकऱ्यांपैकी एक असलेला बिगुल किसान-नांगर घेऊन तिथं आला तेव्हा स्थानिक जमीनदाराच्या सशस्त्र गुंडांनी त्याला बेदम मारहाण केली. सुस्त सरकारी यंत्रणेनं काहीच कारवाई केली नाही. दरम्यानच्या काळात कम्युनिस्ट विचारांनी भारलेल्या काही निष्ठावान कार्यकर्त्यांनी अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना संघटित करून त्यांची चळवळ उभी केली. शेतकऱ्यांच्या नेत्यांना पकडण्यासाठी पोलिसांची एक तुकडी पाठवण्यात आली. त्या तुकडीला प्रचंड विरोध झाला. त्या वेळी झालेल्या चकमकीत एक इन्पेक्‍टर मृत्युमुखी पडला. पोलिसांनी गोळीबार केला. अनेक लोक ठार झाले. सगळीकडं भयग्रस्त वातावरण निर्माण झालं. त्या वेळी चालू झालेला सशस्त्र लढा आजतागायत सुरू आहे.
आज माओवाद्यांचा संघर्ष ज्या भागात सुरू आहे तो ‘रेड कॉरिडॉर’ या नावानं ओळखला जाणारा पट्टा नेपाळच्या सीमेपासून केरळच्या उत्तर सीमेपर्यंत पसरलेला आहे. यात देशातल्या काही अतिगरीब भागांचा समावेश होतो. त्यात दलित आणि आदिवासींची संख्या मोठ्या  आहे. २० राज्यांतले सुमारे २०० जिल्हे या चळवळीनं ग्रासलेले आहेत.
***

‘माओवाद्यांची चळवळ ही नवी आहे,’ हा सार्वत्रिक समज बरोबर नाही. तिची मुळं इतिहासात खूप खोलवर दडलेली आहेत. अगदीर्‌ ंत तिची मुळं आपल्याला आढळतील. त्या वेळच्या राजवटीनं जेव्हा शेतीची फेररचना करायला सुरवात केली, तेव्हापासून ही चळवळ सुरू झाली. ब्रिटिश राजवटीत या फेररचनेला जोर आला. ब्रिटिशांनी काही स्थानिक श्रीमंतांना हाताशी धरून परंपरागत उच्च जातीच्या धनिकांच्या हातात शेतकऱ्यांच्या जमिनी दिल्या. हे श्रीमंत जमीनदार शेतसाऱ्याच्या रूपानं सरकारी खजिने भरत होते. त्याबदल्यात त्यांना त्यांच्या शेतीत पिकलेल्या धान्याचा काही भाग दिला जात असे. बळाच्या जोरावर ही पद्धत राबवली जात होती. उच्च जातीच्या जमीनमालकांनी तिला कायदेशीर स्वरूप दिलं. त्यांच्या नव्या पिढीला शेतीचं ज्ञान नव्हतं किंवा शेतीचा विकास करण्याची त्यांची इच्छाही नव्हती. त्यांच्या लहरी मागण्यांमुळं ते कर्जबाजारी झाले आणि त्यांनी गावकऱ्यांना लुटायला सुरवात केली. या सरंजामशाही पद्धतीच्या मालकीमुळं शेतीच्या विकासाला खीळ बसली. शेतीउत्पादन एका स्तरावर थांबलं. शेतकरी त्यांच्याच शेतात वेठबिगार झाले. इसवीसन १७८३ ते १९०० या काळात शेतकऱ्यांची ११० हिंसक आंदोलनं झाल्याची नोंद अधिकृत कागदपत्रांत मिळते. स्वातंत्र्यचळवळीत शेतीसुधारणा आणि जमिनीचं फेरवाटप याबाबत मागणी करण्यात आली होती; पण इच्छा आणि तिची पूर्तता यांत नेहमीच फरक असतो. सरकारनं हा विषय उचलून धरला; पण राजकीय आणि प्रशासकीय स्तरावरची प्रबळ इच्छाशक्ती त्यामागं नव्हती. कायदा करणारे आणि त्याची अंमलबजावणी करणारे यांच्यात एक जातीय समीकरण असल्यानं विषमता तशीच राहिली. नैतिक आणि आदर्शवादी अशी भूदान चळवळ राबवणारे आचार्य विनोबा भावे यांनाही मर्यादित आणि विखुरलेलं यश मिळालं.

भारतीय कम्युनिस्ट पक्षाची १९२० मध्ये परदेशात स्थापना झाली. या पक्षानं जुन्या हैदराबाद संस्थानातल्या तेलंगण या अतिमागासलेल्या भागात आपला जम बसवला. गरीब आणि मागासलेल्यांना संघटित करून त्यांनी चळवळ उभी केली. त्यांच्यावरच्या अन्यायामुळं तिथली परिस्थिती स्फोटक बनली होती. १९४६ मधलं शेतकऱ्यांचं आंदोलन हिंसक बनलं. त्या वेळी जमीनमालकांना पळवून लावलं गेलं, जमिनीचं फेरवाटप करण्यात आलं. वेठबिगारीतून शेतकऱ्यांची मुक्तता झाली. किमान वेतन लागू करण्यात आलं. शेतकऱ्यांची एक सशस्त्र संघटना निर्माण करण्यात आली. सामान्य लोकांमधून एक लढाऊ गट निर्माण करताना या वेळी प्रथमच माओ झेडाँगचं तत्त्वज्ञान आणि चीनमधल्या हिंसक चळवळीचे धडे प्रथमच भारतात गिरवले गेले. स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचा या भागातल्या जवळजवळ तीन हजार गावांवर कब्जा होता. १९४८ मध्ये हैदराबाद संस्थान भारतात विलीन करण्यात आलं. लष्करानं शस्त्र खाली ठेवण्यासाठी आंदोलकांचं मन वळवलं; पण अनेक सशस्त्र बंडखोर जंगलात पळाले आणि त्यांनी नव्यानं स्वतंत्र झालेल्या भारताला आपला विरोध सुरूच ठेवला. ‘भारतीय कम्युनिस्टांनी आपली शस्त्रं खाली ठेवावीत,’ असं आवाहन करण्याची पंतप्रधान पंडित नेहरूंची विनंती मान्य करून रशियाचे अध्यक्ष स्टॅलिन यांनी तसं आवाहन केलं, तेव्हाच ती सशस्त्र चळवळ थांबली. त्यानंतर कम्युनिस्ट पक्षानं लोकशाहीप्रक्रियेत भाग घेण्यास सुरवात केली; पण तरीही वेळोवेळी मूलतत्त्ववादी शक्तींबरोबर हातमिळवणी सुरूच ठेवली. ती आजतागायत सुरू आहे. आजही ‘रेड कॉरिडॉर’मध्ये त्यांच्याकडून सशस्त्र संघर्षाचा मार्ग अवलंबला जातो.
***

मी बराच वेळ चालत होतो. समोरचं गाव आता दृष्टिपथात यायला लागलं. रस्त्यावर पडलेल्या एका मैलाच्या दगडावर मी थोडा वेळ बसलो. स्वातंत्र्यानंतर ७० वर्षांनी माओवादी चळवळीचं आव्हान आणि यश समजून घेण्याचा मी प्रयत्न करत होतो. भारतातल्या माओवादी चळवळीच्या वाढीचं कारण सामाजिक आणि आर्थिक स्वरूपाचं म्हणजे विषमता, बेरोजगारी, जमिनीचं असमान वाटप, पक्षपात किंवा आर्थिक व सामाजिक शोषण यात दडलेलं होतं की ते भारतातलं वाईट प्रशासन, नोकरशाहीची अकार्यक्षमता आणि भ्रष्टाचार हे होतं की ते कायदा आणि सुव्यवस्था बळाच्या मार्गानं राबवण्याच्या कार्यपद्धतीत होतं?

सत्य हे होतं की ज्या भागात सरकार सुरक्षा देण्याच्या किंवा किमान गरजा भागवण्याच्या किंवा सामाजिक अभिसरणाच्या आपल्या जबाबदारीत कमी पडलं होतं, तिथं उच्चवर्णीय जमीनदार, भांडवलदार, सावकार यांचंच वर्चस्व कायम होतं. तिथं हा वर्ग ग्रामीण जनतेच्या शोषणातून सगळे फायदे मिळवत होता. या स्थितीमुळं माओवाद्यांचा लोकसंख्येच्या एका मोठ्या भागावर प्रभाव होता आणि तो अजूनही आहे. या गटांनी समांतर सत्ता स्थापन केली आहे आणि सरकारच्या सार्वभौमत्वाला आव्हान देण्यासाठी या गटांकडून नेहमीच पोलिस, सरकारी अधिकारी, सरकारचे हस्तक आणि सरकारी संस्था यांवर हल्ले होत असतात. सरकारच्या बळाच्या वापराला नेहमीच आव्हान दिलं जातं. मी चालत असतानाच गावातला एक भिकारी माझ्याजवळ आला. त्यानं माझ्यापुढं हात पसरला. मी खिशातून एक नाणं काढून त्याला दिलं. तेवढ्यात भीक मागणाऱ्या अनेक छोट्या मुलांनी मला घेरलं.  कदाचित कायदा व सुव्यवस्थेची स्थिती कायम राखण्याला आतापर्यंत पहिलं प्राधान्य आणि आर्थिक-सामाजिक कारणांना दुय्यम स्थान दिलं जात असावं. सरकारचं वर्चस्व प्रस्थापित झालं, तरच विकासाच्या योजना प्रभावीपणे राबवता येतील, असं सरकारी अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. मात्र, हळूहळू स्थलांतरण, अन्याय्य वनधोरण, बेरोजगारी यांसारख्या मूळ कारणांवर उपाय शोधणं सुरू आहे आणि त्याला यशही मिळत आहे. त्यादृष्टीनं राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कायदा (२००५), अनुसूचित जमाती आणि अन्य परंपरागत वन्यसमुदाय यांच्याविषयीचा वनाधिकार कायदा (२००६) आणि राष्ट्रीय पुनर्वसन धोरण (२००७) हे सगळं लागू करण्यात आलं आहे; पण या सगळ्याची अंमलबजावणी नीट चालली आहे किंवा नाही याबाबत शंका आहे.

मी माझ्याजवळचा तो डबा उघडला. त्यात काही बिया आणि थोडी माती होती. त्या बिया लावल्यावर फुलं येतील की नाही, याची मला शंका होती. जमिनीची मशागत करून बी पेरणं एवढंच शेतकऱ्यांचं काम. नंतरचं कुणाला माहीत? पाऊस येईल किंवा अजिबात येणार नाही ते कोण सांगू शकेल? कदाचित दूरवरच्या हिमनद्या वितळतील आणि त्यामुळं नद्या आपले बांध ओलांडतील आणि शेतकऱ्याचे कष्ट पुरात वाहून जातील...किडीमुळं पीक नष्ट होईल किंवा कदाचित सगळं चांगलंही घडेल. आपण फक्त चांगल्याची आशा करायची.

मी बाजूच्या एका शेतात गेलो. जमिनीत एक छोटासा खड्डा केला. जमीन थोडी ओली होती. मी त्या बिया तिथं पेरल्या, त्यांवर माती टाकली आणि जवळचं थोडं पाणी त्यांवर ओतलं. एखादा मृतदेह पुरताना आपण प्रार्थना करतो, मग बियांचं रोपण करतांना प्रार्थना का करू नये? जमिनीकडं पाहत मी हात जोडले तेव्हा मी लहानपणी शिकलेला एक श्‍लोक आपोआप माझ्या ओठांतून बाहेर पडला...  
सर्वेशां स्वस्तिर्भवतु
सर्वेशां शांतिर्भवतु
सर्वेशां पूर्णंभवतु
सर्वेशां मंगलम्‌ भवतु.

सगळं चांगलं घडू दे, सगळीकडं प्रेम असू दे, सगळीकडं संपन्नता असू दे, सगळ्यांचं कुशल घडू दे.
त्या बिया जिथं लावल्या होत्या तिथं मी तो डबा त्या बियांच्या रक्षणासाठी ठेवला. तिनंही असंच केलं असतं, याची मला पूर्ण खात्री होती!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com