खंडित देश आणि उद्‌ध्वस्त मनं (डॉ. यशवंत थोरात)

खंडित देश आणि उद्‌ध्वस्त मनं (डॉ. यशवंत थोरात)

उषा मला समजावत म्हणाली ः ‘‘हे खरं आहे की दोन्ही बाजूंना झालेल्या नरसंहाराच्या मनात दाटलेल्या आठवणी निवळायला अनेक पिढ्या जाव्या लागतील; पण त्याची सुरवात आपल्याला, आपल्या पिढीला करावी लागेल. आपल्याला आपल्या मुलांच्या द्वारे नव्या पिढीला हे सांगावं लागेल, की मनातल्या या प्रक्षुब्ध भावनांमुळं आता पुन्हा जातीय हिंसाचार भडकणार नाही, याची पुरेपूर काळजी आता तुम्हाला घ्यायची आहे. आमच्या आधीची पिढी कदाचित क्षमा करायला तयार नसेल; पण आम्ही आणि आमच्या नव्या पिढीनं क्षमा करायला हवी. तेवढाच एक मार्ग आहे.’’

ता.  १४ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्रीला तीन मिनिटं कमी असताना भारतीय उपखंडाचं विभाजन झालं. एक स्वतंत्र, सार्वभौम राष्ट्र म्हणून पाकिस्तानचा जन्म झाला. त्यानंतर बरोबर पाच मिनिटांनी भारत स्वतंत्र झाला. त्या दिवशी संध्याकाळी ब्रिटनचे राजे सहावे जॉर्ज यांनी त्यांच्या आईला एक पत्र लिहिलं. सर्वसाधारणपणे ते पत्रावर सहीनंतर RI - रेक्‍स इम्परेटर ( किंग एम्परर ऑफ इंडिया -भारताचा सम्राट) असं लिहीत असत. त्या दिवशी मात्र त्यांनी फक्त R एवढं एकच अक्षर लिहिलं. पुढचं I हे अक्षर त्यांनी लिहिलंच नाही. कारण, त्या वेळी ते भारताचे सम्राट नव्हते. भारतावरचं ब्रिटिश-राज्य संपलं होतं.
***

नुकत्याच झालेल्या स्वातंत्र्यदिनी मी माझ्या घराच्या मागच्या बाजूच्या व्हरांड्यात काही वाचत बसलो होतो. एवढ्यात टीव्हीवरच्या समालोचनाचे शब्द माझ्या कानी पडले. मी हातातलं पुस्तक बाजूला ठेवलं. माझी पत्नी उषा स्वातंत्र्यदिनाचा दिल्लीतला कार्यक्रम पाहत असावी.

‘...पण मग ती टीव्हीचा आवाज कमी का नाही ठेवत?’ असं मी थोड्या त्राग्यानं मनाशीच पुटपुटलो. काही वेळानं मी दिवाणखान्यात गेलो. त्या वेळी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला जात असतानाची दृश्‍यं टीव्हीवर दाखवली जात होती. त्यानंतर क्षणभर शांतता आणि पाठोपाठ राष्ट्रगीताचे प्रेरणादायी सूर. लष्कराच्या वाद्यवृंदावर ती राष्ट्रगीताची धून ऐकताना माझ्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. सहसा असं होत नाही; पण त्या वेळी झालं. राष्ट्रगीत संपलं. माझे पाणावलेले डोळे उषाच्या नजरेला पडू नयेत म्हणून मी चेहरा वळवला. ‘‘तुमचे पाणावलेले डोळे माझ्या नजरेतून सुटले, असं समजू नका. शेवटी, तुम्ही त्याच ‘भावनाप्रधान’ जमातीतले आहात,’’ उषा म्हणाली. माझ्याकडं रोखून बघत माझ्या मनात काय चाललंय ते शोधण्याची उषाची ही नेहमीचीच सवय आहे. मी तिकडं सोईस्कर दुर्लक्ष केलं. मी पुन्हा परसातल्या व्हरांड्यात आलो. एव्हाना पाऊस सुरू झाला होता. मी पुस्तक हाती घेतलं आणि काही पानं चाळण्याचा प्रयत्न केला; पण वाचनात माझं मन रमेना. माझ्या मनात काहीतरी खदखदत होतं. कदाचित मी माझ्यावरच चिडलो होतो; पण कारण मला कळत नव्हतं. स्वातंत्र्यदिनाला आता एखाद्या औपचारिक कार्यक्रमाचं स्वरूप आलं आहे. ज्यांच्या त्यागामुळं स्वातंत्र्य मिळालं, त्यांच्या आठवणी स्वातंत्र्यदिनी गायल्या जाणाऱ्या एखाद्या गीतापुरत्या मर्यादित झाल्या आहेत. त्या दिवशी माझ्या मोबाईलचा इनबॉक्‍स आणि व्हॉट्‌स ॲप स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छासंदेशांनी भरून गेला होता. मित्रांनो, आभार... पण हे एवढे संदेश कशासाठी? त्यांचे आभार मानण्यासाठी, की ज्यांनी तुमच्या-आमच्या भविष्यासाठी त्यांच्या वर्तमानाची आहुती दिली? किंवा त्यांच्याबद्दल दुःख व्यक्त करण्यासाठी, की ज्या लाखो जणांचा फाळणीनंतरच्या इकडच्या आणि तिकडच्या अर्थहीन हिंसाचारात हकनाक बळी गेला? सत्य हेच होतं की अतिशय भयानक असं त्या वेळी घडलं होतं.

१५ ऑगस्ट १९४७ नंतरच्या आठ महिन्यांत सुमारे १६ दशलक्ष भारतीय निर्वासित बनले होते. जे सीमा ओलांडून आले किंवा ज्यांना सीमा ओलांडायला भाग पाडलं गेलं, त्यांच्यापैकी १० लाखांहून अधिक जण मरण पावले. त्याव्यतिरिक्त अनेकजणांची क्रूरपणे कत्तल करण्यात आली. दोन्ही बाजूंच्या असंख्य महिलांवर बलात्कार झाले...अनेकींचं अपहरण झालं. सांगितला जाणारा १० लाख हा आकडा खोटा आहे; त्यामुळं त्या वेळच्या संहाराची आणि भीतीच्या सावटाची कल्पना येत नाही. धार्मिक उन्मादानं वेड्या झालेल्या लोकांनी त्या वेळी द्वेषाची आणि अत्याचाराची परिसीमा गाठली होती. विजय मिळवण्यासाठी चाललेलं हे दोन देशांतलं युद्ध नव्हतं, तर एकमेकांच्या रक्ताचा घोट घेण्यासाठी चाललेली ती एक क्रूर स्पर्धा होती. त्यात इकडचे लोक जसे बळी पडत होते तसे तिकडचेही. त्या धुमसत्या दिवसांत माझे वडील पूर्व पंजाबचे एरिया कमांडर होते. ‘माझी शिपाईगिरी’ या त्यांच्या आत्मचरित्रात त्यांनी त्या भयानक दिवसांचं वर्णन पुढील शब्दात केलेलं आहे ः - ‘‘फाळणीनंतरच्या स्थलांतरामध्ये लाखो पुरुष, महिला आणि लहान मुलांचा समावेश होता. आपल्याकडची भांडीकुंडी आणि पाळीव जनावरं घेऊन ते जीव मुठीत धरून निघाले होते. सुरवातीला हे स्थलांतर सुरळीतपणे सुरू होतं; पण थोड्याच दिवसांत त्याचं भीषण स्वरूप दिसायला लागलं. रेल्वेगाड्यांवर हल्ले झाले, रस्त्याच्या मार्गानं जाणारे निर्वासितांचे लोंढे लुटले गेले. या हल्ल्यांमध्ये हजारो जण मारले गेले. जातीयवादाचा राक्षस जणू बेभान झाला होता. केवळ पुरुषांचीच नव्हे तर स्त्रिया, लहान मुलं आणि अर्भकांचीही कत्तल केली गेली. कारण फक्त एकच, की ते वेगळ्या धर्माचे होते. मृत्यू आणि विनाशाच्या या तांडवात मुस्लिम आणि गैरमुस्लिम समाजातले सुशिक्षित आणि श्रीमंत लोकही अहमहमिकेनं सहभागी झाले होते. ग्रामीण भागात तर या हिंसाचारानं अधिकच थैमान घातलं होतं.

कारण, कायदा-सुव्यवस्थेचं रक्षण करण्यासाठी तिथं कुणी नव्हतंच. जे होते त्यांनी आपलं कर्तव्य बजावायला साफ नकार दिला होता. जसजसा हिंसाचार सर्वत्र पसरायला लागला, तसतसं स्थलांतरितांचं प्रमाण आणि वेग वाढायला लागला. लोकांमध्ये घबराट निर्माण झाल्यामुळं परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती. लोक बैलगाड्यांतून अथवा मिळेल त्या वाहनानं आणि प्रसंगी पायी चालत एका देशातून दुसऱ्या देशात स्थलांतर करत होते. या लोंढ्यांची लांबी काही वेळा तर २० ते ३० मैलांपर्यंत असायची. या लोंढ्यांवर अनेक वेळा हल्ले झाले आणि ते वारंवार लुटले गेले. भूक, तहान आणि आजारानं लोक तडफडून मरत होते आणि जिथं जिथं या तांड्यांवर हल्ले होत होते, तिथं तिथं मृतदेहांचा आणि जखमी माणसांचा खच पडत होता. असं वाटत होतं की जणू माणसं वेडी झाली आहेत. ‘माणूस मूलतः चांगला असतो, फक्त काही प्रसंगी तो वाईट वागतो,’ या माझ्या समजाला त्या वेळी मुळातूनच धक्का बसला. ‘माणूस हा मूलतः वाईटच असतो, फक्त कधी कधी आणि विशिष्ट प्रसंगातच तो चांगला वागतो,’ असं मला वाटायला लागलं. माझा याच्यावर विश्वास नव्हता; पण प्रत्यक्ष स्थिती मी माझ्या डोळ्यांनी बघितली होती. भारत आणि पाकिस्तानात मी पाहिलेले अत्याचार मानवतेवरचा कलंक म्हणून कायम माझ्या स्मरणात राहतील. युद्धात मी मृत्यूचं तांडव बघितलं आहे, हातघाईच्या लढाईत माणसं माणसांना मारताना आणि त्या बाबीचा गौरव होतानाही मी बघितलं आहे; पण फाळणीच्या वेळी झालेल्या निर्दय नरसंहारामध्ये गुंतलेले लोक मला सगळ्यात मोठे गुन्हेगार वाटतात. हे मृत्यूचं तांडव आणि हिंसाचाराचं थैमान परमेश्वरानं का घडू दिलं, हे कोडं आज इतक्‍या वर्षांनंतरही मला सुटलेलं नाही.’’
***

काही दिवसांपूर्वी एका संध्याकाळी मी फिरण्याचा व्यायाम करत असताना आमच्याच परिसरात राहणारी एक महिला मला भेटली. फाळणीच्या वेळी तिचे कुटुंबीय सगळं घरदार सोडून लाहोरहून भारतात पायी चालत आले होते. फाळणी विषयी बोलताना ‘-मला या विषयावर बोलण्याची इच्छा नाही, मी ते कधीही विसरणार नाही आणि कुणाला क्षमाही करणार नाही. सगळं सुरळीत झाल्याचा आव आणून ते सगळं विसरायचा मी आयुष्यभर प्रयत्न करतेय; पण ते अत्याचार मी कधीही विसरू शकणार नाही. आपण दुसऱ्या कुठल्या तरी विषयावर बोलू या,’ असं ती म्हणाली. ब्रिटिश साम्राज्याचा अंत हा असा व्हायचा होता का? शिक्षणतज्ज्ञ असलेल्या थॉमस बॅबिंग्टन मेकॉलेनं भारतात येण्यासाठी फाळणीपूर्वी सुमारे १०० वर्षांपूर्वी ब्रिटिश पार्लमेंटच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. याच मेकॉलेनं भारतीय दंडसंहिता (इंडियन पीनल कोड) लिहिली आणि १८३५ मध्ये सादर केलेल्या आपल्या ‘मिनिट’ या अहवालात आधुनिक भारतीय शिक्षणव्यवस्थेचा पाया घातला. ता. १० जुलै १९३३ रोजी ‘हाऊस ऑफ कॉमन्स’मध्ये केलेल्या भाषणात तो म्हणाला होता ः ‘जर भारतानं भविष्यात कधी स्वातंत्र्य मिळवलं, तर ब्रिटिशांच्या इतिहासातली ती सगळ्यात अभिमानास्पद गोष्ट असेल.’ मेकॉलेनं जे वक्तव्य केलं होतं, त्यापेक्षा प्रत्यक्ष स्थिती एवढी वेगळी का होती?

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांत स्वातंत्र्याची पहाट हिंसाचार आणि रक्तपातानंच उजाडली होती. मात्र, त्याच वेळी दूर जर्मनीमध्ये न्युरेम्बर्ग इथं दुसऱ्या महायुद्धातल्या नाझी युद्धगुन्हेगारांवर खटला सुरू होता, याची फारशी कुणाला माहितीही नव्हती. हा खटला बरीच वर्षं सुरू होता. मानवतेविरुद्ध गुन्हा केल्याचा आरोप नाझी सैनिकांवर आणि त्याचबरोबर अनेक सरकारी अधिकारी, न्यायाधीश आणि अगदी डॉक्‍टरांवरही ठेवण्यात आला होता. ब्रिटनममधल्या लष्करी आणि राजकीय घटनांचे अभ्यासक-इतिहासकार वॉल्टर रीड यांनी त्यांच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या Keeping the jewel in the Crown या पुस्तकात म्हटलं आहे, ‘जरी फाळणीनंतरच्या घटना आणि ज्यूंवरील अत्याचार यांचं प्रमाण आणि भयानकता यासंदर्भात तुलना होऊ शकत नसली, तरी फाळणीनंतरचा संहार आणि अत्याचार हे ब्रिटिश सरकार खंडित भारतीय उपखंडाविषयीची जबाबदारी ज्या प्रकारे हाताळत होतं, त्याचेच परिणाम होते आणि आहेत.’ रीड यांच्या मते ब्रिटिशांनी १९४७ मध्ये भारत ज्या स्थितीत सोडला आणि त्यानंतर जो रक्तपात झाला, त्यामागं ब्रिटिश राज्यकर्त्यांमधले मतभेद आणि त्यांची कट-कारस्थानं हेच मुख्य कारण होतं. त्यांनी पुढं म्हटलं आहे ः ‘असं घडावं हा जरी त्यामागचा नेमका उद्देश नसला, तरी राजकीय प्रगतीची प्रक्रिया टाळण्याचा किंवा पुढं ढकलण्याचाच त्यांचा प्रयत्न होता. जेव्हा ते प्रत्यक्षात घडलं, तेव्हा खंबीरपणे उभं राहून शांतता आणि स्थैर्य निर्माण करण्याऐवजी ब्रिटिश राज्यकर्ते पळून गेले. भांडवलशाहीचे समर्थक असलेल्या विन्स्टन चर्चिल यांनीसुद्धा या प्रकारावर ‘निर्लज्ज पलायन’ अशा शब्दांत टीका केली.’’
***

नव्यानं पुढं आलेल्या पुराव्यानुसार आता असं प्रकाशात येत आहे, की भारताचं भलं करण्यात ब्रिटिशांना फारच थोडा रस होता; किंबहुना ब्रिटिश राजवटीच्या शेवटच्या तीन दशकांचा इतिहास हा तर त्यांच्या दुतोंडीपणाचं आणि त्यांच्याकडून होणाऱ्या विश्वासघाताचं प्रतीक आहे. ब्रिटिश-इतिहासातली ही बाब ब्रिटनला अभिमान वाटावा, अशी नक्कीच नाही.

भारतीय इतिहासाचे अभ्यासक आणि कॅलिफोर्निया विद्यापीठातले इतिहासाचे प्रोफेसर स्टॅन्ले वोल्पर्ट यांनी यासंदर्भात अधिक विस्तारानं विवेचन केलं आहे. त्या वेळचे ब्रिटिश गव्हर्नर जनरल लॉर्ड माऊंटबॅटन हे अधिक परिपक्वतेनं, दूरदर्शीपणे आणि चातुर्यानं वागले असते, तर हा अनर्थ टळला असता किंवा त्याची तीव्रता तरी कमी झाली असती, असं त्यांना वाटतं. ब्रिटनच्या महाराजांचे चुलतभाऊ असलेले अत्युत्साही माऊंटबॅटन यांनी अनियंत्रित वेगानं स्थिती हाताळली. पंजाब आणि बंगाल या दोन्ही प्रांतांच्या मध्यातून विभाजनाची रेषा नेणं ही त्यांची घोडचूक होती, असंही वोल्पोर्ट यांनी म्हटलं आहे. वास्तविक, ‘पंजाब आणि बंगाल या प्रांतांचं विभाजन झाल्यास प्रचंड हिंसाचार उसळेल आणि त्यावर कुणाचंच नियंत्रण राहणार नाही,’ असा इशारा या घटनांशी संबंधित असलेल्या प्रत्येकानं माऊंटबॅटन यांना दिला होता. ***का रागावलो, ते आता माझ्या अचानक लक्षात आलं. ‘यशवंत को गुस्सा क्‍यूं आता है?’ या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं. मला राग येण्याचं खरं कारण हे होतं, की मला आणि माझ्या पिढीतल्या विद्यार्थ्यांना शालेय आणि महाविद्यालयीन इतिहासात हे कधी कुणी शिकवलं नव्हतं. इतिहास शिकताना आम्ही आमच्या पातळीवर शोध घेण्याचा प्रयत्न करत होतो; पण या गोष्टी आम्हाला कधी कुणी सांगितल्याच नाहीत. त्या वेळी सर्वसाधारण समज असाच होता, की सत्तेचं हस्तांतर सहजपणे व्हावं, यासाठी ब्रिटिश राज्यकर्ते अनेक दशकं प्रामाणिकपणे प्रयत्न करत होते आणि हे सत्तांतर झालं ते नियोजनबद्ध प्रयत्नांतून; अचानकपणे नव्हे. ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभारात काहीही त्रुटी असोत, एकदा ब्रिटिश सरकारनं सूत्रं हाती घेतल्यानंतर स्थिती हळूहळू सुधारली. गोऱ्या साहेबाच्या अनेक पिढ्या स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतरही अनेक वर्षं हाच समज बाळगून होत्या. त्यामुळंच भारत सोडताना किंवा खरं म्हणजे भारतातून पळून जात असतांनासुद्धा ब्रिटिश स्वतःचं कौतुक करत आपली पाठ थोपटून घेत होते.

अनेक क्‍लब्जमध्ये आणि लष्करी छावण्यांच्या मेसमध्ये पार्ट्या झोडल्या जात होत्या. त्यांच्या मते, जगात केवळ ब्रिटिशांनाच लाभलेल्या ‘न्याय्य आणि निःपक्ष’ - मनोवृत्तीचं भरभरून कौतुक होत होतं! यातलं सार एकच की काही थोड्या किरकोळ गोष्टी सोडल्या तर ब्रिटिश हे अतिशय चांगले मित्र होते आणि त्यांची राजवट सगळ्यांसाठी कल्याणकारीच ठरली; पण आपण सगळ्यांनी हा सगळा खोटेपणा इतक्‍या सहजपणे का स्वीकारला, हा माझ्यापुढचा मुख्य प्रश्न होता. आपण याबाबत प्रश्न का विचारले नाहीत? आक्षेप का घेतले नाहीत? या कपोलकल्पित प्रचारात आपण का सामील झालो? प्रश्नांची मालिका संपत नव्हती. वऱ्हांड्यासमोरच्या फरशीवर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा थाडथाड आवाज येतच होता...
***

कुणीतरी पाठवलेल्या जिलब्या आणि टीव्हीवरची देशभक्तिपर सुरेल गीतं यापलीकडं मला तरी आनंद वाटण्यासारखं काही दिसत नव्हतं. ठरवलेल्या गोष्टींपेक्षा परिणाम इतके वेगळे असण्याचा इतिहासात अन्य दुसरा कुठला प्रसंग नसेल. ‘भारताला स्वातंत्र्य मिळेल तो दिवस ब्रिटिशांच्या इतिहासातला सगळ्यात अभिमानाचा दिवस असेल,’ असं मेकॉले म्हणाला होता. खरंच तसं होतं का? १५ ऑगस्ट १९४७ हा दिवस खरंच तसा होता? एका साम्राज्यानं आपली जबाबदारी योग्य तऱ्हेनं निभावल्याचा हा सन्माननीय परिणाम होता? धीम्या आणि जबाबदार नियोजनातून हे घडलं होतं? की चालढकल आणि फसवणुकीवर आधारलेल्या एका कहाणीचा हा चीड आणणारा शेवट होता? असा शेवट की जो घबराटीतून ठरवला गेला आणि नैराश्‍यातून अमलात आणला गेला! उषाला कदाचित माझ्या मनःस्थितीचा अंदाज आला असावा. ती बाहेर आली आणि माझ्या शेजारी बसली.‘‘वाईट नको वाटून घेऊ, यशवंत,’’ - मला समजावत ती म्हणाली ः ‘‘स्वतःबाबत आणि त्यांच्याही बाबत एवढा कठोर होऊ नकोस. ‘शोकोनाशयते धैर्यं’ म्हणजे ‘दुःखामुळं धीर खचतो’ हे लक्षात ठेव. जे झालं ते झालं. ती कहाणी संपली. हे खरं आहे की दोन्ही बाजूंना झालेल्या नरसंहाराच्या मनात दाटलेल्या आठवणी निवळायला अनेक पिढ्या जाव्या लागतील; पण त्याची सुरवात आपल्याला, आपल्या पिढीला करावी लागेल. आपल्याला आपल्या मुलांच्या द्वारे नव्या पिढीला हे सांगावं लागेल, की मनातल्या या प्रक्षुब्ध भावनांमुळं आता पुन्हा जातीय हिंसाचार भडकणार नाही, याची पुरेपूर काळजी आता तुम्हाला घ्यायची आहे. आमच्या आधीची पिढी कदाचित क्षमा करायला तयार नसेल; पण आम्ही आणि आमच्या नव्या पिढीनं क्षमा करायला हवी. तेवढाच एक मार्ग आहे. तुला आठवतंय का, की सुमारे ३० वर्षांपूर्वी बॅंक ऑफ इंग्लंडमध्ये तू प्रशिक्षणासाठी गेलेला असताना तुला घरची खूपच आठवण यायची. त्या वेळी एकदा तू मला लिहिलं होतंस  ः
गुर्बत में हो अगर हम, रहता है दिल वतन में
समझो वहीं हमें भी, दिल है जहाँ हमारा...


(परदेशात असतानाही माझं मन माझ्या देशातच वावरत असतं. मग जर तू माझा शोध घेऊ इच्छित असशील, तर माझं मन कुठं आहे ते आधी शोध). तुझ्याबाबतीत ते जर खरं असेल, यशवंत, तर आपण हेही मानलं पाहिजे, की सीमेपलीकडच्यांच्या बाबतीतही ते तसंच असेल. सीमा या माणसानं पृथ्वीवर काढलेल्या रेषा आहेत; ज्यानं मानवासाठी ही नितांतसुंदर पृथ्वी निर्माण केली, त्यानं त्या निर्माण केलेल्या नाहीत. त्यामुळं ‘श्रीमान भावुकमहाशय’, एक लक्षात ठेवा की सगळं जग हे एक कुटुंब आहे...वसुधैवकुटुंबकम्‌...!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com