गुलाब, जॅकेट आणि वचन (डॉ. यशवंत थोरात)

गुलाब, जॅकेट आणि वचन (डॉ. यशवंत थोरात)

शांततेचा भंग करत त्या मुलाच्या डोळ्यांत रोखून पाहत ते म्हणालेः ‘‘कदाचित तुला तुझा शब्द पाळणं खूप कठीण जाईल. काळ तुझी वारंवार परीक्षा पाहील; पण मला एक वचन दे की तू ‘चांगला हिंदू’, ‘चांगला मुस्लिम’, ‘चांगला ब्राह्मण’ किंवा ‘चांगला मराठा’ असं काही न होता एक ‘चांगला भारतीय’ होशील.’’ त्यांचं म्हणणं बरोबर होतं. ‘चांगला भारतीय’ बनणं हे किती कठीण आहे, हे समजेपर्यंत पुढच्या आयुष्यात जीवनानं माझी वारंवार परीक्षा घेतली होती.

आम्ही इनोव्हा गाडीत दाटीवाटीनं बसलो होतो. प्रा. कुलकर्णी ड्रायव्हर शेजारच्या सीटवर, मी व माझी पत्नी उषा मधल्या सीटवर आणि आमच्या बरोबर असलेले तीन विद्यार्थी मागच्या सीटवर बसले होते. एका महाविद्यालयात माझं भाषण होतं आणि आम्ही तिकडंच निघालो होतो. माझ्या मिटींग्ज संपवून मी गाडीत बसलो. प्रवास दूरचा होता आणि सकाळपासूनच्या धावपळीमुळं माझे डोळे मिटत होते. बरोबरच्या प्राध्यापकांशी आणि विद्यार्थ्यांशी गप्पा मारण्याचं काम उषावर सोपवून मी स्वत:ला झोपेच्या आधीन करून टाकलं. गाडीनं वेग घेतला आणि मला चांगलीच डुलकी लागली. अचानक गाडीचा वेग मंदावल्यानं मला जाग आली. थोड्या अंतरावर हातात फलक घेतलेला एक जमाव घोषणा देत उभा असल्याचं मला दिसलं.

‘‘त्यात वावगं काय, हवं तेव्हा निदर्शनं करण्याची मुभा स्वातंत्र्यानं प्रत्येकाला दिली आहे’’ मी मनाशी म्हणालो. तेवढ्यात दोन संतप्त मुलांनी तिथं जवळच पार्किंगमध्ये उभी असलेली एक सरकारी मोटार पेटवून दिली. मी थिजून गेलो. आता काय करायचं, अशा आविर्भावानं आमचा ड्रायव्हर रफीक यानं माझ्याकडं पाहिलं. ‘‘थांबू नकोस, काळजीपूर्वक गाडी चालवत राहा,’’ - मी म्हणालो. आमची कार जसजशी जमावाजवळ आली तसतशी दोन मुलं अचानक गाडीपुढं आली. रफीकनं हॉर्न वाजवला. मुलं बाजूला झाली. कुणालाच इजा झाली नाही. संतप्त मुलांनी आमच्या कारला गराडा घातला आणि काच खाली करायला सांगितली.

‘‘तुम्ही स्वत:ला कोण समजताय? निदर्शनं सुरू आहेत हे तुम्हाला दिसत नाही का?’’ एकजण ओरडला. ‘‘या श्रीमंत कारवाल्यांना एकदा चांगला धडा शिकवला पाहिजे,’’ दुसऱ्यानं पुस्ती जोडली.‘‘त्याला खाली खेचा,’’ तिसरा म्हणाला. संभाव्य धोक्‍याची मला जाणीव झाली.‘‘- माफ करा...आम्ही अधिक काळजी घ्यायला हवी होती’’ - मी म्हणालो. झ्या नातवापेक्षा वयानं थोडाशाच मोठा असलेल्या एका मुलानं रस्त्यावर पचकन थुंकत आणि गरागरा डोळे फिरवत माझ्याकडं पाहिलं. दरडावणीच्या सुरात तो म्हणालाः ‘‘सॉरी, काय सॉरी? कुणाला काही झालं असतं तर काय तुझ्या बापानं भरून दिलं असतं का?’’ त्यानं मला एक थोबाडीत मारली असती तरी मला कदाचित कमी वेदना झाल्या असत्या. संतप्त मुलांचा तो घोळका निघून गेला. पेटवून दिलेली ती मोटार तिथं जवळच जळत होती. जळणाऱ्या टायर्सचा वास सर्वत्र पसरला होता. रफीकनं आमची कार कशीबशी बाहेर काढली. ै आजका हिंदुस्थान और ये है आजकल के नौजवान. इन की अपनी गाडी होती तो क्‍या आग लगाते? ये कैसा देश है साब?’’ तो म्हणाला..

‘‘देश ! देश म्हणजे काय?’’ मनात म्हटलं. राष्ट्राच्या कितीतरी व्याख्या आहेत.
स्वातंत्र्य मिळालं तेव्हा एका सर्वसाधारण सांस्कृतिक एकतेबरोबर आम्ही परंपरेनुसार जात-भाषा-धर्म किंवा आमचं संस्थान यांच्या नावानं ओळखले जात होतो. आमच्या नेत्यांनी या विविधतेला अधिकृतपणे मान्यता देऊन प्रत्येकाला त्याचं वेगळेपण जपण्याचं आणि ते व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य दिलं होतं. तो जमाव आणि ती निदर्शनं हे त्याचंच प्रतीक होतं; पण त्यातून रफीकच्या प्रश्नाचं उत्तर कसं काय मिळणार होतं? मालमत्ता जाळून आणि वडिलधाऱ्यांचा अपमान करून नागरिकत्व सिद्ध होत होतं का?
आमच्याबरोबरची एक मुलगी उसळून म्हणाली ः ‘‘ये तो बहुत नाइन्साफी है, रफीकभाई. सब स्टुडंट ऐसे थोडी होते है? हमे देखो, हम तो अच्छे नागरिक है की नही?’’
खूप वर्षांपूर्वीचा एक प्रसंग आठवला. एका छोट्या मुलाला एकदा ‘तीन मूर्ती भवना’त पाठवण्यात आलं होतं.
‘‘ब्रेकफास्टसाठी त्याला पाठवा’’ असं त्याच्या आई-वडिलांना सांगण्यात आलं होतं. त्यानुसार तो मुलगा तिथं पोचला. पांढरी साडी नेसलेली एक स्त्री जिन्यावरून खाली आली.
‘‘ ये’’ असं म्हणत, तिनं हात धरून प्रेमानं त्याला आत नेलं. ‘‘इथल्या आणखी काही मित्रांना भेट,’’ ती म्हणाली. तिची दोन मुलं तिथं बसली होती. त्या दोन मुलांमध्ये एक त्याच्यापेक्षा थोडा मोठा होता. दुसरा थोडासा
लहान. त्यांनी सगळी मुलं करून देतात तशी आपली ओळख करून दिली. शाळा, आवडता खेळ आणि आपलं नाव. ब्रेकफास्टच्या टेबलावर सगळे बसल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं, की तिथली मुख्य खुर्ची रिकामी आहे. तेवढ्यात दरवाजा उघडला गेला आणि ‘ते’ आत आले. चुडीदार पायजमा आणि जॅकेटवर लावलेलं गुलाबाचं फूल.
त्या मुलाची त्यांच्याशी ओळख करून देण्यात आली. ते म्हणाले ः ‘‘मी तुझ्या वडिलांना चांगलं ओळखतो. मला सांग, तुला लापशी आवडते की कॉर्न फ्लेक्‍स?’’
‘‘कॉर्न फ्लेक्‍स,’’ त्या मुलानं उत्तर दिलं.

‘‘नाही,’’ ते म्हणाले,‘‘आपण सगळे लापशीच घेऊ या. ती प्रकृतीला चांगली असते. नंतर तुम्हाला जे आवडतं ते घ्या.’’ ब्रेकफास्ट संपल्यानंतर ते त्या तिघांना बागेत घेऊन गेले. ते त्यांच्याशी बोलत होते, प्रश्न विचारत होते, काहीतरी सांगत होते, हसत होते. बागेत ते फिरत असतानाच समोरून एक कर्मचारी येताना त्यांना दिसला. त्यांच्या चेहऱ्यावर नाराजीचे भाव उमटले. त्यांनी थोड्या नाखुशीनंच‘‘काय काम आहे?’’ असं त्याला विचारलं.‘‘एक महत्त्वाचं पत्र तुमच्यासाठी आलंय,’’ तो कर्मचारी म्हणाला. क्षणभर त्यांच्या चेहऱ्यावरचे त्रासिक भाव दाट झाले; पण क्षणातच त्यांची जागा दु:खानं घेतली.

‘‘ ‘भारताच्या भवितव्या’बरोबर व्यतीत करण्यासाठी तुम्ही मला अर्ध्या तासाचाही वेळ देणार नाही का?’’ त्यांनी त्राग्यानं विचारलं. नंतर त्या मुलांकडं वळून ते म्हणाले ः ‘‘ठीक आहे. काम महत्त्वाचं. तुम्हाला हवं तेवढा वेळ तुम्ही खेळा.’’
तो मुलगा अधीरपणे पुढं झाला.‘‘काय हवंय?’’ त्यांनी त्याला विचारलं.
‘‘तुम्ही स्वाक्षरी द्याल का?’’ त्यांनी क्षणभर विचार केला. त्या मुलाच्या उंचीशी मिळवून घेण्यासाठी ते एका गुडग्यावर बसले आणि म्हणाले ः‘‘ देईन; पण पुढील जीवनाविषयी तू मला काही वचन दिलंस तर!’’ काही क्षण शांततेत गेले. त्या शांततेचा भंग करत त्या मुलाच्या डोळ्यात रोखून पाहत ते म्हणालेः ‘‘कदाचित तुला तुझा शब्द पाळणं खूप कठीण जाईल. काळ तुझी वारंवार परीक्षा पाहील; पण मला एक वचन दे की तू ‘चांगला हिंदू’, ‘चांगला मुस्लिम’, ‘चांगला ब्राह्मण’ किंवा ‘चांगला मराठा’ असं काही न होता एक ‘चांगला भारतीय’ होशील.’’ त्यांचं म्हणणं बरोबर होतं. ‘चांगला भारतीय’ बनणं हे किती कठीण आहे, हे समजेपर्यंत जीवनानं माझी वारंवार परीक्षा घेतली होती.

उदाहरणार्थः -मी एका दलित उमेदवाराला सर्वप्रथम नोकरीची संधी दिली तेव्हा. तो सगळ्यात चांगला उमेदवार होता म्हणून नव्हे; पण ‘तुम्ही उच्चवर्णीय ना आम्हाला कधीच संधी देणार नाही,’ असा भाव त्याच्या नजरेत होता. त्याच्यातली कुठलीतरी गोष्ट मला स्पर्शून गेली. पराभवाविरुद्धचं ते बंड होतं की आणखी काहीतरी मला माहीत नाही. मी त्याची बाजू का लावून धरली, हे आजसुद्धा मला सांगता येणार नाही. योग्य उमेदवाराच्या चेहऱ्यावर त्या वेळी उमटलेला भाव आजही मी विसरू शकलेलो नाही. माझ्या मनात कायम एक खंत आहे. मी केलं ते योग्य की अयोग्य?
एका पात्र मुलाला संधी नाकारून मी माझा उच्चवर्णीय अभिनिवेश शमवत नव्हतो ना? नेहमीप्रमाणेच मी उषाचा सल्ला घेतला. नेहमीप्रमाणेच तिनं स्पष्टपणे मत मांडलं.;

‘‘तू भावनेच्या आधारावर निर्णय घेतलास, यशवंत,’’ ती म्हणाली. एका बाजूला कितीही विरोधाभास वाटला तरी तू नकळत काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करत होतास; पण तू जे काही केलंस ते योग्य नाही असंच मला वाटतं. तू एका सार्वजनिक संस्थेत काम करतोयस. ही काही तुझ्या मालकीची संस्था नाही.’’
नंतर तिनं मला मार्गही दाखवला. म्हणाली ः‘‘ मला माहीतंय की तू व्यथित झाला आहेस; पण त्यासाठी या विषयावर वाचन-चिंतन कर. त्यातूनच तुला मार्ग सापडेल.’’ त्यानंतर तिनं अगदी सहजच विचारलं ः ‘‘जे केलंस त्याबद्दल तुला वाईट वाटतंय का?
‘‘नाही...वाईट वाटत नाही; पण अपराधी वाटतय,’’ मी म्हणालो.
सगळ्यात तळाशी असलेल्यांना सामाजिक न्याय आणि सन्मान मिळावा, यासाठी राखीव जागांचा पर्याय धोरण म्हणून स्वीकारण्यात आला. या दिशेनं बरेच प्रयत्न झाले; पण उद्दिष्ट त्यापेक्षाही मोठं होतं. यासंदर्भात कितीतरी प्रश्‍न अजून अनुत्तरित होते. भारतीय लोकशाहीमुळं मिळालेला सामाजिक न्याय म्हणजे नेमकं काय? जातिव्यवस्थेमुळं निर्माण झालेल्या असह्य प्रश्नांची संख्या कमी झाली की फक्त ते प्रश्न थोडे सौम्य झाले? दलितांचे प्रश्न मांडणाऱ्या राजकीय पक्षांना राजकारणात किती महत्त्व आहे? सत्ताधाऱ्यांनी  घेतलेल्या आर्थिक निर्णयाचे दलितांना आणि अन्य मागासवर्गीयांना समान फायदे मिळाले का? तळागाळातल्यांना सामाजिक न्याय देण्यासाठीचा लढा यशस्वी झाला की वर्षानुवर्षांच्या सामाजिक असमानतेमुळे दलितांबाबतचा त्यांचा दृष्टिकोन नकारात्मक झाला?
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, मी त्यासाठी काही कृती केली की फक्त पुस्तकं वाचली आणि भाषणं दिली? प्रश्न सोडवण्याच्या बाबतीत सुरवातीला दलितांच्या जवळ जाण्याचा मी प्रयत्न केला; पण मला माझ्या प्रयत्नातली व्यर्थता लवकरच जाणवली. कारण, ज्यांना सामाजिक बहिष्कार अनुभवावा लागला त्यांच्या वेदनांचा एक शतांश भागही सहन करणं मला जमलं नसतं. त्यातूनच मला माझ्या त्या अभिनिवेशातला फोलपणा लक्षात आला. त्या दांभिक मार्गावर पुन्हा जाण्याची माझी इच्छा नव्हती. त्यामुळं ‘सात वर्षांचं आरक्षण दिल्यानं शेकडो वर्षांचा अन्याय दूर होतो,’ असं मानणाऱ्या लोकांशी बोलण्याचं मी ठरवलं. लाल गुलाब धारण करणाऱ्या त्या माणसानं माझ्या या प्रयत्नांची दखल घेतली असेल का? घेतली असेल किंवा नसेलही! पण मी प्रयत्नच केले नाहीत, असं ते म्हणणार नाहीत
आणि त्याबाबत मला जाबही विचारणार नाहीत, याची मला खात्री आहे.
***

या वेळपर्यंत आमच्या गाडीत असलेल्या दोन मुली आणि रफीक यांच्यात चांगलंच शाब्दिक युद्ध भडकलं होतं. मी उषाकडं पाहिलं. ‘हा वाद त्यांनाच सोडवू द्या,’ असं ती मला खुणेनंच म्हणाली.
उदाहरणार्थ ः मुस्लिमांच्या भारतावरील निष्ठेबद्दल मी जाहीरपणे विश्वास व्यक्त केला, तेव्हाही मला असंच परीक्षेला सामोरं जावं लागलं. आमच्या कॉलेजच्या कॅंटीनमध्ये या चर्चेला सुरुवात झाली आणि तिचा शेवट ‘फाटलेला शर्ट, तुटलेला दात आणि अंग काळं-निळं होईपर्यंतची मारहाण’ यात झाला. कॅंटीनमध्ये आमची क्रिकेटवर चर्चा सुरू होती.
‘‘इथल्या मुस्लिमांना भारताशी काय घेणं-देणं? ते फक्त पाकिस्तानलाच
प्रोत्साहन देणार’’ गिरीश रागारागानं म्हणाला.‘‘घेणं-देणं का असू नये?’’ मी म्हणालो. जेव्हा क्षेत्ररक्षण करणारा संघ फलंदाजाच्या एखाद्या चांगल्या फटक्‍याला दाद देतो तोच क्रिकेटमधला सर्वोच्च आनंदाचा क्षण असतो. गोलंदाज दात-ओठ खात धावतो किंवा हवेत हात उंचावत अपील करतो तो क्षण नव्हे. चल जाऊ दे, आपण
क्रिकेटविषयी बोलतोय. रोमन योद्‌ध्यांच्या लढाईबद्दल नव्हे,’’ मी समजावणीच्या सुरात म्हणालो.
‘‘तुझा स्वप्नाळूपणा तुझ्याजवळच ठेव, यशवंत’’ गिरीश तावातावानं म्हणाला ः ‘‘विश्वास ठेव, हे सगळेजण राष्ट्रविरोधी अतिरेकी आहेत.’’
एवढ निमित्त पुरेसं होतं. त्यातूनच गोंधळाला सुरवात झाली. प्रकरण हातघाईवर आलं. त्या वेळची मारामारी हा एक मूर्खपणा होता; पण आयुष्यात पुढं आलेलं
आव्हान गंभीर होतं. धर्मनिरपेक्षता ही एक फॅशन बनली होती; पण त्यामागंही ‘अल्पसंख्याकांविरुद्धचा
पूर्वग्रह’ हेच कारण होतं. माझ्या अवतीभोवतीचे अनेकजण हेच म्हणत होते, की ‘इस्लाम हा ‘आग आणि तलवार’ यांचा धर्म आहे.‘‘तुम्ही कुराण वाचलंय का?’’ असं मी त्यांना विचारत असे. त्यांनी ते वाचलेलं नसायचं. मीही ते वाचलेलं नव्हतं; पण मी ते वाचलं आणि ते कालातीत आहे असं मला वाटलं. ‘जागतिक दहशतवाद हा मुस्लिमांनीच पसरवलेला आहे आणि मुस्लिमांच्या रक्तातच हिंसाचार आहे,’ असं बोललं जात होतं. इस्लामी अतिरेक्‍यांचा जागतिक दहशतवाद्यांशी संबंध होता यात शंकाच नव्हती; पण एक समाज म्हणून मुस्लिम हे आपल्याइतकेच शांत किंवा आक्रमक असल्याचं मला जाणवलं.

‘मुस्लिमांची राजवट हे भारतासाठी एक ‘अंधारयुग’ होतं’, असं बोललं गेलं;’ पण इतिहासकारांच्या नोंदी ते तसं नसल्याचं सांगत होत्या. सुरवातीच्या काळात अत्याचार आणि लुटालूट झाली, याबद्दल सगळ्यांचंच एकमत होतं; पण  एकोणिसावाया शतकाच्या सुरवातीला दोन्ही समाज  ३०० वर्षांचा क्‍लेशदायक इतिहास विसरून परस्परसामंजस्यानं व एकोप्यानं नांदायला तयार झाल्याचं चित्र दिसत होतं. मला अभिमानानं सांगावसं वाटतं, की पहिल्या स्वातंत्र्ययुद्धाच्या काळात दोन्ही समाजांत जातीय वा धार्मिक संघर्षाचं एकही उदाहरण नाही. यामुळंच १८५७ चं स्वातंत्र्यसमर हे ‘राष्ट्रीय’ होतं; ते ‘धार्मिक’ युद्ध नव्हतं. ते ‘हिंदू विरुद्ध मुस्लिम’ असंही नव्हतं, तर ‘भारतीय विरुद्ध ब्रिटिश’ असं होतं; पण मला हे वाचून लाज वाटली, की या युद्धानंतर अवघ्या चार-पाच दशकांतच बंगालच्या फाळणीमुळं जातीय विद्वेष उफाळून आला. त्यातून भारतीय राष्ट्रीयत्वाला धक्का पोचला आणि त्याची परिणती धर्माच्या आधारावर झालेल्या रक्तरंजित फाळणीत झाली.

धार्मिक राष्ट्रवादावर पाकिस्तानची निर्मिती झाली. तिथल्या हिंदूंवर अनन्वित अत्याचार झाले; पण तीव्र चिथावणीनंतरही आपण मानवतेच्या तत्त्वांना धरून राहिलो. स्वातंत्र्यानंतरच्या काळात आपण अल्पसंख्याकांशी ज्या पद्धतीनं वागलो, त्यातून मला धर्मनिरपेक्षता समजली आणि अल्पसंख्याकांच्या हक्कांची आणि लोकशाहीच्या नात्याची कल्पना आली. लोकशाहीत सरकार चालवण्यासाठी
बहुमताची गरज असते, यात शंका नाही; पण बहुधार्मिक, बहुभाषक समाजात या साध्या नियमावर बऱ्याच मर्यादा येतात. अशा स्थितीत ‘लोकशाही म्हणजे फक्त बहुमतानं चाललेली सत्ता’ असं समीकरण मानता येत नाही. अशा लोकशाहीत बहुमतानं निवडून आलेल्या सत्तधाऱ्यांवर अल्पसंख्याकांच्या हक्कांची आणि सुरक्षेची मोठी जबाबदारी असते. आपल्या नेत्यांनी हे वारंवार सांगितलं आहे. जाकिटावर गुलाबाचं फूल लावणाऱ्या त्या माणसानं याचा पुरस्कार करताना म्हटलं होतं, की संकुचित मनामुळं संकुचित राष्ट्रवाद निर्माण होतो. त्याचं म्हणणं खरं होतं. इतिहासानं हे वारंवार दाखवून दिलंय, की ‘आपण म्हणजेच देश’ असं बहुसंख्याक लोक जेव्हा जेव्हा समजायला लागतात, तेव्हा तेव्हा त्या देशातली लोकशाही धोक्‍यात येते. त्यापेक्षा एक पाऊल पुढं जाऊन हे बहुसंख्याक जेव्हा अल्पसंख्याकांना गिळायचा प्रयत्न करतात, तेव्हा ते दहशतवादाच्या झेंड्याखाली संघटित होतात.
सत्य हे आहे की राष्ट्रवादाचा वारंवार आणि अतिरेकी पुरस्कार केल्यानं संघर्ष निर्माण होतो. त्यामुळं आपल्यासारख्या बहुविध समाजाला बहुधार्मिक राष्ट्राखेरीज अन्य पर्याय नाही. तसं असलं तरी आणि आपण सगळ्यांनी प्रयत्न करूनही धर्म हा आपल्या देशात चिंतेचा विषय बनला आहे. ‘हिंदू राष्ट्रवाद’ आज भारतीय राजकारणातला एक शक्तिशाली आवाज बनला आहे. यातून दहशतवाद वाढणार, असं बऱ्याचशा लोकांना वाटतं; पण माझं असं मत आहे, की तसं होणार नाही. सरकार चालवण्यातल्या अडचणींमुळं हिंदू राष्ट्रवाद सौम्य होईल; जसा १९९८ ते २००४ यादरम्यान भारतीय जनता पक्षाच्या राजवटीत तो झाला होता; पण कोणत्याही कारणानं जर  अल्पसंख्याकांच्या हक्कांवर हल्ले झाले, तर त्यातून फक्त दंगली भडकणार नाहीत; पण दहशतवाद फोफावेल.
***

‘आम्ही एवढा वेळ वाद घालतोय; पण तुम्ही गप्प आहात. तुमचं त्यावर काय मत आहे?’ असा एकच गिल्ला सगळ्यांनी केला आणि मी भानावर आलो.
‘‘वादाचा विषय काय आहे?’’ मी विचारलं. ‘‘ ‘भारतातली लोकशाही यशस्वी की अयशस्वी’ हा आमच्या वादाचा विषय आहे,’’ ते म्हणाले. जो विचार करत होतो, त्या सगळ्या गोष्टी पुन्हा माझ्या नजरेसमोर तरळून गेल्या. ‘तीन मूर्ती मार्गा’वरचा तो बंगला, ती जळती मोटार, अल्पसंख्याकांच्या हक्कांचं समर्थन करताना फाटलेला माझा शर्ट आणि तुटलेला दात...माझ्याबरोबर गाडीत असलेल्या दोन मुली आणि एका मुलाकडं मी बघितलं. त्यांच्या तरुण, सळसळत्या नजरेत आशा आणि निर्धार यांचं एक तेज मला जाणवलं. भविष्यातली आव्हानं स्वीकारण्याची ताकद त्या नजरेत होती.
‘‘तुम्हाला काय वाटतं?’’ मी प्रतिप्रश्न केला.
‘‘आम्हाला माहित नाही,’’ त्यांचं साचेबद्ध उत्तर आलं ः ‘‘आम्ही खूप गोंधळून गेलो आहोत!’’
‘‘गोंधळून जाण्याची गरज नाही’’ मी म्हणालो ः‘‘भारतानं जेव्हा लोकशाही स्वीकारली, तेव्हा ती अयशस्वी ठरेल, असं भाकीत जवळपास सर्व विद्वानांनी वर्तवलं होतं. या लोकशाहीच्या चौकटीत राष्ट्रीय ऐक्‍य कायम राखणं, तळागाळातल्यांना न्याय मिळवून देणं आणि गरिबी नष्ट करणं ही आपली राष्ट्रीय उद्दिष्टं होती. ही उद्दिष्टं काही जगावेगळी नव्हती. ती साध्य करण्यासाठी आपण जो मार्ग निवडला तो वेगळा होता. त्यासाठी आपण दाखवलेलं धैर्य वेगळं होतं. दुसऱ्या महायुद्धानंतर वसाहतीच्या जोखडातून मुक्त झालेल्या अनेक देशांत लोकशाहीची सुरवात साधारणपणे सारखीच झाली होती. बहुतेक देशांनी मतदानाचा हक्क आणि अन्य स्वातंत्र्यं लोकांना बहाल केली; पण त्यांच्यासाठी लोकशाही हे वचन किंवा व्रत नव्हतं. परिणामत: आपल्याबरोबरच स्वतंत्र झालेल्या अनेक देशांत १९६० पर्यंत लोकशाहीचा अस्त झाला. याउलट, १९७५ ते १९७७ दरम्यानच्या काळात आणीबाणीचा काळ वगळता आपल्या देशात लोकशाही अबाधित राहिली. राष्ट्रीय आणि राज्यांच्या कितीतरी निवडणुका आतापर्यंत पार पडल्या आहेत. आपली लोकशाही कोसळण्याची आता मुळीच शक्‍यता नाही. भारतीय राजकारणात लोकशाही आता संस्थात्मकदृष्ट्या रुजली आहे. सत्तेवर येण्याच्या दुसऱ्या कुठल्या मार्गाचा आता कुणी विचारही करत नाही. जगाच्या इतिहासात प्रथमच एका गरीब देशात  सात दशकं एवढा प्रदीर्घ काळ लोकशाही अबाधित राहिली आहे. लोकशाही यशस्वी झाली की नाही, हा आजचा प्रश्रन नाही, तर तिनं राष्ट्रीय ऐक्‍य, सामाजिक समता, न्याय आणि गरिबीनिर्मूलन यात किती यश मिळवलं हा आहे.

‘‘मग तुमचा निष्कर्ष काय आहे?’’ कुणीतरी विचारलं. क्षणभर शांतता पसरली. एकेक शब्द काळजीपूर्वक उच्चारत मी म्हणालो,‘‘आपण एक तरुण देश आहोत; पण आपली संस्कृती अतिशय प्राचीन आहे. संकटांनी अगदी सुरवातीपासून आपली परीक्षा घेतली आहे. आपण अनेक लढाया लढलो. काही जिंकलो, काही हरलो; पण आपण संघर्ष कधी सोडला नाही. प्रत्येक पिढीनं आपलं संचित पुढच्या पिढीला दिलं’’
‘‘तरुणांना तुमचा काय संदेश आहे?’’ त्यांनी एका आवाजात विचारलं.
‘‘इक्‍बालनं त्याच्या ‘तराना-ए-हिंद’ या कवितेत जे म्हटलं आहे, त्यावर माझा पूर्ण विश्वास आहे.
युनान-ओ-मिस्र-ओ-रोमा सब मिट गए जहाँ से
अबतक मगर है बाकी नामो निशाँ हमारा
इतिहासात अनेक संस्कृती उदयाला आल्या आणि नष्ट झाल्या; पण आम्ही मात्र
अजून टिकून आहोत.
‘‘ते कशामुळं?’’गंभीर दिसणाऱ्या मुलीनं विचारलं.
‘‘त्याचं कारण म्हणजे, आपल्यात कितीही दोष असले, कितीही कमतरता असली तरी आपल्याकडचा सामान्य माणूस हा अतिशय प्रामाणिक आहे. त्याच्या असामान्य शक्तीमुळं आपण संकटांवर वेळोवेळी मात करत आलो आहोत!’’
त्या मुलीनं क्षणभर माझ्याकडं पाहिलं.
‘‘सर, तुमच्या भाषणानंतर आपली भेट होणार नाही, तेव्हा कृपया मला तुमची स्वाक्षरी द्याल का?’’ तिनं विचारलं.
माझ्या जाकिटाच्या बटणाला काही गुलाबाचं फूल लावलेलं नव्हतं; पण तिच्याकडं वळत मी तिला म्हणालो ः Yes, But would you first like to hear a story and then promise me something for life?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com