क्रांतिवीर चपाती!

नातवाबद्दलच्या - राघवबद्दलच्या - माझ्या भावना प्रेम आणि त्रागा यांच्या मध्ये हेलकावत असतात.
Chapati
ChapatiSakal

नातवाबद्दलच्या - राघवबद्दलच्या - माझ्या भावना प्रेम आणि त्रागा यांच्या मध्ये हेलकावत असतात. बारीकसारीक गोष्टींवरून मला डिवचण्याच्या आणि मग गंमत बघण्याच्या कलेत तो तरबेज झालाय.

एके दिवशी तो माझ्या खोलीत आला आणि निरागसपणे म्हणाला : ‘आबाजी, खेळ खेळू या का?'

‘कोणता खेळ?’

त्याच्या अशा करामतींना आधीच बळी पडलो असल्यानं सावध होत मी विचारलं.

‘हा खेळ मी स्वतःच शोधलाय!’ विजयी स्वरात तो म्हणाला : ‘फार सोप्पा आहे; अगदी साध्या आणि दररोजच्या एखाद्या गोष्टीबद्दल मी प्रश्न विचारणार; त्याचं मला माहीत नसलेलं उत्तर तुम्ही द्यायचं. त्यात इतिहास आला पाहिजे आणि तरीही त्या गोष्टीचं गूढ संपायला नको, असं उत्तर दिलंत तर तुम्ही जिंकलात!’

‘हा खेळ आहे की मस्करी?’’ मी उद्गारलो.

‘खेळ’’ शांतपणे तो म्हणाला.

‘बरं, जिंकणाऱ्याला काय मिळणार?’’ मी विचारलं.

‘आबाजी, तुम्ही जिंकणार नाहीच; पण चुकून जिंकलातच तर तुम्हाला ‘मॅकडोनाल्ड्स’मध्ये बर्गर, कोल्ड कॉफी आणि आइस्क्रीम मिळेल.’ आधीच खुलासा करावा म्हणून मी म्हणालो : ‘पण त्याचे पैसे मी देणार नाही.’

‘नाही द्यायला लावणार तुम्हाला, प्रॉमिस.’

‘मग ठीक आहे.’

‘चला, आता मी प्रश्न विचारतो - चपातीबद्दल असं काहीतरी सांगा जे मला माहीत नाही आणि त्यात काहीतरी गूढपण असेल.’

‘अचानक चपाती कुठून आली यात?’ गोंधळून मी विचारलं.

‘खेळणार की नाही, सांगा?’’ त्यानं दटावलं. मी मान डोलावली.

‘बरं,’’ मी सुरुवात केली...

‘चपाती आपल्या स्वयंपाकातला मुख्य पदार्थ. आपल्या देशात कोणत्याही वेळचं जेवण चपातीशिवाय पूर्ण होत नाही, ती मूळची पर्शियातली, असं म्हणतात. मुळात मैद्याची असायची; पण अवधच्या राजवटीत तिचं भारतीयीकरण झालं आणि ती गव्हाच्या कणकेपासून तयार केली जाऊ लागली. प्रवाशांची ती कायमची सोबती होती; कारण, भाजी आणि आमटी दोहोंबरोबर ती खाता येऊ शकायची. ब्रिटिशांना तुपाची चपाती आवडायची. ती त्यांना भातापेक्षा हलकी आणि चविष्ट वाटायची.’’

...मी नातवाकडे पाहिलं तर त्याच्या चेहऱ्यावरचे भाव असे होते की, ‘मॅकडोनाल्ड्स’मध्ये बर्गर आणि फ्राईज् संपवून तो कोल्ड कॉफी आणि आइस्क्रीमची वाट पाहत आहे!

‘चालू द्या तुमचं...’ विजय पदरात पडत असल्याच्या समाधानासह तो म्हणाला : ‘‘तुम्ही हरण्याच्या खूप जवळ पोहोचला आहात; कारण, तुम्ही सांगताय ते तर मला आधीच माहीत आहे!’

हुशार मुलगा! पण त्यानं ‘शत्रू’ला कमी लेखलं होतं! आम्ही एकमेकांकडे पाहिलं.

मी पुढं सांगू लागलो...

‘एक वेळ अशी होती...तेव्हा नुसत्या कणकेपासून आणि पाण्यापासून तयार केल्या जाणाऱ्या या चपट्या चपातीनं स्वातंत्र्याच्या पहिल्या युद्धाची झलक दाखवून ब्रिटिश राज्यकर्त्यांची झोप उडवली होती आणि त्यांच्या इतिहासकारांना एका अशा कोड्यात टाकलं होतं, जे आजअखेर सुटलेलं नाही.’

राघवच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले : बर्गरचा आनंद लुटण्यापासून ते बर्गरला पंख फुटून तो खिडकीतून भुर्रकन् उडून जाताना पाहतोय जणू.

‘बरं, पुढं सांगा...’ हळू आवाजात तो म्हणाला.

खेळाची बाजू माझ्याकडे झुकत असल्याचा फायदा

घेत मी म्हणालो : ‘बेटा, बसून घे. कहाणी तशी मोठी आहे.’

...सन १८५७ ला ब्रिटिशांच्या ताब्यात असलेल्या भारतातला तणाव कधी नव्हे इतका टोकाला गेला होता. जाचक अशा ब्रिटिशराजवटीला भारतीय लोक वैतागलेत हे सगळ्यांना ठाऊक होतं; परंतु ते बंडाची योजना आखत असतील याची कल्पना फारच पुसट होती. ता. १० मे १८५७ रोजी मेरठमध्ये उठाव सुरू होण्याच्या तीन महिने आधी डॉ. गिल्बर्ट हॅडो - जे ईस्ट इंडिया कंपनीचे लष्करी सर्जन होते - यांनी ब्रिटनमध्ये असलेल्या आपल्या बहिणीला लिहिलं होतं:

‘सध्या भारतात सगळीकडे काहीतरी गौडबंगाल सुरू आहे. कुणालाच त्याचा उलगडा होत नाहीय. ते प्रकरण कुठं सुरू झालं, कुणी केलं आणि नेमकं कशासाठी याविषयीचा काहीच पत्ता लागत नाहीय. या गोष्टीचा एखाद्या धार्मिक समारंभाशी काही संबंध आहे की कुठल्या छुप्या समूहाशी हेही माहीत नाहीय. याविषयीच्या वेगवेगळ्या कयासांनी भारतीय वृत्तपत्रं भरून गेलीत.’ ‘चपातीचळवळ’ असं या प्रकाराला म्हटलं जात आहे.’

खरोखरच ती घटना भंडावून सोडणारी होती. ज्यांनी तिचा पहिल्यांदा सामना केला त्या अधिकाऱ्यांपैकी मार्क थॉर्नहिल हे एक होते. आग्र्याजवळ मथुरेत ते न्यायाधीश होते. एके दिवशी सकाळी नेहमीप्रमाणं थॉर्नहिल आपल्या ऑफिसमध्ये आले आणि पाहतात तर ‘बिस्किटाच्या आकाराच्या आणि जाडीच्या भरड पिठाच्या चार घाणेरड्या चपात्या’ त्यांच्या टेबलवर पडलेल्या होत्या.

भारतात प्रत्येक घरात रोज भाजल्या जाणाऱ्या चपात्यांसारख्याच त्याही होत्या. त्यांनी त्या निरखून-पारखून बघितल्या; पण कोणताही संदेश वगैरे त्यांना आढळला नाही. अधिक चौकशी केल्यावर समजलं की, एका भारतीय पोलीसठाणेदाराला चौकीदारामार्फत त्या मिळाल्या होत्या. चौकीदारानं सांगितलं, ‘जंगलातून एक माणूस आला आणि चपात्या देऊन गेला.’

थॉर्नहिल यांनी जिल्ह्याच्या इतर भागांतून माहिती मागवली आणि शेवटी निष्कर्ष काढला - ‘कोणत्या तरी गूढ कारणासाठी रात्री-बेरात्री कुणाकडून तरी अशा चपात्या घराघरात आणि पोलिसचौक्यांपर्यंत पोहोचवल्या जात आहेत आणि आणखी चपात्या करून त्या पुढं पाठवाव्यात असं सांगितलं जात आहे.’

पुरावा चक्रावून टाकणारा होता. थॉर्नहिल यांच्या एवढंच लक्षात आलं की, घडत असलेली घटना तुरळक किंवा सुटी सुटी नसून ती एका व्यापक आणि फिरत्या ‘अन्नसाखळी’सारखी आहे. घटनेच्या परिणामांची चिंता वाटल्यानं त्यांनी वरिष्ठांना कल्पना दिली. त्यांच्या संशयाला तपासाअंती दुजोरा मिळाला.

असं दिसून आलं की हजारो चपात्या, अतिशय रहस्यमय पद्धतीनं, नर्मदेपासून नेपाळपर्यंत एका रात्रीला तीनशे किलोमीटरच्या वेगानं - ब्रिटिशांच्या डाकसेवेपेक्षाही जास्त वेगानं -नेऊन वितरित केल्या जात होत्या - एवढा उलगडा झाला...परंतु कशासाठी? त्यामागचा उद्देश मात्र स्पष्ट होत नव्हता.

बहुतेक भारतीयांनी या घटनेचा संबंध एका भविष्यवाणीशी जोडला : ‘देशाच्या मोठ्या भागावर जवळपास शंभर वर्षं राज्य करणाऱ्या ब्रिटिशांना शतकाच्या अखेरीस सत्ता सोडावी लागणार. दुसरीकडे, स्थानिक लोकांमधल्या अनाकलनीय संवादाकडे ब्रिटीश लोक अतिशय संशयानं बघत होते. सेरामपूरमधून (पश्चिम बंगाल) प्रसिद्ध होणाऱ्या ‘द फ्रेंड ऑफ इंडिया’ या इंग्लिश वृत्तपत्रानं ता. पाच मार्च १८५७ च्या अंकात एक बातमी दिली: ‘ब्रिटिश अधिकाऱ्यांमध्ये मोठी घबराट पसरली आहे.

याचं कारण, भागातील प्रत्येक पोलिस ठाण्यात चपात्या घुसल्या असून अंदाजे ९० हजार पोलिस या कामात सहभागी आहेत. हा प्रकार रोखण्यासाठी किंवा त्यात सक्रिय असणाऱ्यांना अटक करण्यासाठी त्यांच्याकडे कसलाही कायदेशीर आधार नाही; कारण, त्या चपात्यांवर एकही शब्द किंवा खूण आढळलेली नाही.’

चपात्यांनी निर्माण केलेली भीती त्या प्रदेशात मोठ्या संख्येनं राहत असलेल्या ब्रिटिश कुटुंबांमुळे - ज्यात बायका-मुलांचा समावेश होता - आणखी गडद झाली. कॅप्टन रिचर्ड बार्टर यांनी आपल्या डायरीत तशी नोंद केली: ‘असंख्य चपात्या हातोहात पोहोचत्या केल्या जात आहेत. कसली तरी गूढ चिन्हं आणि सोबत ‘सब लाल हो जाएगा’ अशा अशुभ घोषणा भिंतींवर लिहिल्या जात आहेत.’

सर्वसामान्यांची भावना अशी होती की, चपात्या म्हणजे वसाहतवादी राजवटीविरुद्ध बंड पुकारण्यासाठीचा गुप्त संदेश आहे; पण साम्राज्य हा ब्रिटिशांसाठी जीवन-मरणाचा प्रश्न होता. तरीसुद्धा वास्तवाचं चांगलं भान असल्यामुळे ते जाणून होते की, भारतीय उपखंड आणि पंचवीस कोटी जनता यांच्यावरचं सगळं नियंत्रण पन्नास हजारांहून कमी ब्रिटिश सैनिकांच्या हातात आहे.

त्याचबरोबर भारताची जाण असलेल्या, भारतीय भाषा बोलणाऱ्या किंवा भारतीय लोकांबद्दल सहानुभूती बाळगणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांची संख्या कमी होत चालली होती. एकूण काय, मोठ्या प्रमाणात बंड जर उसळलं तर ब्रिटिशवसाहतीची उतरंड बघता बघता कोसळणार होती. ‘चपातीचळवळी’नं ब्रिटिश साम्राज्याला हादरवून सोडलं आणि अफवांमुळे देशभरात अस्वस्थता निर्माण झाली.

अफवा कितीही निराधार असल्या तरी त्यांचे गंभीर परिणाम होऊ शकतात हे प्रशासनाला चांगलंच ठाऊक होतं. तरीदेखील होणारा मानसिक आघात त्यांना रोखता आला नाही. चपातीसंबंधीच्या अनेक धोकादायक कहाण्या लोकांमध्ये फिरत होत्या. काहीजण म्हणत होते की, औषधांत ब्रिटिशांची थुंकी मिसळलेली गेलीय...

इतिहासकार हीना अन्सारी सांगतात : ‘लखनौमधील ‘तिलिस्म-ए- लखनौ’ या स्थानिक उर्दू वृत्तपत्रात बातमी छापून आली की - ‘ब्रिटिश अधिकारी औषधांवर थुंकला आहे, अशी अफवा पसरल्यामुळे तिथल्या दवाखान्यातील रुग्णांनी औषध खाण्यास नकार दिला.’

काहींचा आरोप होता की, ‘ब्रिटिश लोक चपातीच्या पिठात विशिष्ट प्राण्यांच्या हाडांचा चुरा मिसळून ते भारतीयांना बाटवत होते. परिणामी, त्यांच्या धर्मबांधवांकडून ते धिक्कारले गेले की त्यांना ख्रिश्चन धर्मात आणणं सोपं होणार होतं.’

एकंदरीत या सगळ्या कहाण्यांमुळं लोकांचा असा समज झाला की ब्रिटिश लोक आपल्या देशवासीयाचं धर्मांतर करण्याच्या बेतात आहेत.

ब्रिटिश सैन्याच्या मेरठ रेजिमेंटमधील भारतीय शिपायांमध्ये पसरलेली अफवा वेगळ्या प्रकारची होती. युद्धात लढण्यासाठी म्हणून त्यांना नवीन एन्फील्ड रायफल्स पुरवण्यात आल्या होत्या; परंतु त्यासोबत दिलेल्या काडतुसांना विशिष्ट प्राण्यांची चरबी लावलेली आहे असा त्यांना संशय होता.

अजून अडचणीची गोष्ट म्हणजे, ती काडतुसं वापरण्याच्या वेळी त्यांच्यावरचं आवरण हिंदू आणि मुस्लिम शिपायांना आपल्या दातांनी काढावं लागत होतं. यामुळे मोठा पेचप्रसंग निर्माण झाला होता. आपल्या धर्माला आणि जातीला धोका असल्याचं लक्षात येऊन या शिपायांनी ती काडतुसंच वापरायला नकार दिला. यातूनच असंतोषाची ठिणगी पडून १८५७ मध्ये मेरठच्या छावणीत मोठा उद्रेक झाला.

तो उठाव म्हणजे ब्रिटिश साम्राज्याच्या इतिहासातील एक निर्णायक घटना होती. ब्रिटिशांसाठी अमेरिकी वसाहती गमावण्यापेक्षा तो मोठा धक्का होता. त्यामुळे साम्राज्यातल्या इतर ठिकाणी बंडखोर जनतेवर लादलेल्या शिक्षांपेक्षाही जास्त उन्मादी आणि घृणास्पद शिक्षा ते भारतीयांवर लादू लागले. उत्तर भारतातील लोकांवर कंपनीच्या सैन्यानं केलेले अत्याचार भयंकर आणि अमानुष होते.

बंडानंतरच्या त्या उन्मादात हजारो निर्दोष भारतीय सापडले. त्यांना चाबकाचे फटके मारण्यात आले किंवा तोफेच्या तोंडी देण्यात आलं किंवा रक्तानं माखलेले दगड जिभेनं चाटायला भाग पाडून - कोणतीही सुनावणी न करताच - त्यांना फासावर लटकवलं गेलं.

सन १८५७ च्या घटनांमुळे भारतातल्या एकूण ब्रिटिशराजवटीचीच फेरमांडणी झाली. त्यानंतर सबंध देशभरात ब्रिटिशांनी देखरेखीचं जाळं वेगानं वाढवलं. सन १८७८ चा व्हर्नाक्युलर प्रेस अॅक्ट - जो ‘गॅगिंग अॅक्ट’ म्हणूनही ओळखला जातो - यांसारखे कायदे करून पुढच्या संभाव्य उठावांविरुद्ध स्वत:ला सज्ज केलं. भारतीय भाषांत प्रकाशित होणाऱ्या वृत्तपत्रांना ब्रिटिश धोरणांवर टीका करण्यापासून रोखणं हा त्यामागचा उद्देश होता आणि तो कायदा फक्त स्थानिक भारतीय प्रसारमाध्यमांनाच लागू होता.

बंड थंड होईपर्यंत चपातीचळवळीला भयंकर स्वरूप प्राप्त झालं होतं. चपात्यांचं वितरण म्हणजे येणाऱ्या संकटाचा इशारा असून बंडाच्या कित्येक महिने आधीपासूनच कोणत्या तरी चाणाक्ष गटानं नियोजनबद्ध रीतीनं चपातीचळवळीच्या माध्यमातून त्याची तयारी सुरू केली असावी असं साधारणपणे मानलं जात होतं. एकामागोमाग अनेक छावण्यांमध्ये उद्रेक होऊन बहुतांश उत्तर आणि मध्य भारतात ब्रिटिशराजवटीविरुद्ध मोठा उठाव झाला. त्यामुळेच ते बंड उत्स्फूर्त होतं यावर विश्वास ठेवणं अशक्य झालं (जे खरंच तसं होतं). त्यामुळेच चळवळीचा घटनाक्रम मांडून त्या विचित्र चपात्यांच्या प्रसाराचा मागोवा घेण्याचा बराच खटाटोप केला गेला.

याबाबतीत सर्वात जास्त संभवणारा खुलासा असा की - एकतर सुरुवातीच्या टप्प्यातच चपातीवितरणाचा मूळ उद्देश हरवला गेला आणि तिच्या प्रसाराची साखळी तोडण्याचे भयंकर परिणाम मात्र मागं राहिले. आधुनिक तज्ज्ञांच्या मते, लोकांनी ज्या ज्या कल्पना केल्या तो तो अर्थ त्या चपात्यांना येत गेला. ती चळवळ म्हणजे बेफाम पसरलेल्या अफवेचीच कहाणी होती; पण त्या चपात्यांमुळे भारतीयांना नव्या पहाटेची चाहूल लागली आणि आपल्या साम्राज्यावरचा सूर्य मावळू शकतो अशी भीती ब्रिटिशांच्या मनात निर्माण झाली. तरी पण याबाबतीत अजूनही एकमत नाही. ते गूढ तसंच कायम आहे...

आपण हरू, याची राघवला अपेक्षा नव्हती; पण आपला पराभव त्यानं शांतपणे मान्य केला. आम्ही ‘मॅकडोनाल्ड्स’ला गेलो. त्या सायंकाळी जेवणाचा जितका आनंद मी घेतला तितका क्वचितच कधी घेतला असेल. बिल आल्यावर राघवनं वॉशरूमला जायचं निमित्त केलं. त्याचे असले डावपेच आधीच माहीत असल्यानं तो परत येण्याची मी वाट पाहत बसलो. शेवटी, परत आल्यावर त्यानं बिलावर नजर फिरवली आणि माझ्या गळ्यात अलगद हात टाकत म्हणाला :

‘जगातले सर्वोत्तम आजोबा माझेच आहेत.’

मी बिल दिलं.

अनुवाद : डॉ. रघुनाथ कडाकणे

(raghunathkadakane@gmail.com)

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com