पंजाब-सिंध गुजरात-मराठा...

जो कुणी माणसांचं नशीब लिहितो त्यानं माझ्या वडिलांचं - एका हाडाच्या मराठ्याचं - नशीब पाच नद्यांचं वरदान लाभलेल्या पंजाबच्या मातीशी जोडलं. आणि आम्हीसुद्धा - त्यांची मुलं, त्या भूमीशी आपोआप जोडले गेलो.
Dr Yashwant Thorat writes intercast marraige and family tradition
Dr Yashwant Thorat writes intercast marraige and family tradition sakal
Summary

जो कुणी माणसांचं नशीब लिहितो त्यानं माझ्या वडिलांचं - एका हाडाच्या मराठ्याचं - नशीब पाच नद्यांचं वरदान लाभलेल्या पंजाबच्या मातीशी जोडलं. आणि आम्हीसुद्धा - त्यांची मुलं, त्या भूमीशी आपोआप जोडले गेलो.

जो कुणी माणसांचं नशीब लिहितो त्यानं माझ्या वडिलांचं - एका हाडाच्या मराठ्याचं - नशीब पाच नद्यांचं वरदान लाभलेल्या पंजाबच्या मातीशी जोडलं. आणि आम्हीसुद्धा - त्यांची मुलं, त्या भूमीशी आपोआप जोडले गेलो.

सन १९३१ मध्ये त्यांच्या मित्रानं दिल्लीतल्या ‘लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज’मध्ये शिकणाऱ्या एका पंजाबी मुलीशी त्यांची ओळख करून दिली. भेट निर्णायक ठरली. मराठा प्रेमात पडला! त्यांनी लग्नाची मागणी घातली; पण मुलीऐवजी दोन्हीकडच्या घरच्यांकडून विरोध झाला. पाच वर्षं दोघांनी आपापल्या कुटुंबाचं मन वळवण्याची खटपट केली. शेवटी अडथळे दूर झाले आणि १९३६ मध्ये लग्न झालं. परिणामी आम्हाला - त्यांच्या मुलांना - दोन भिन्न संस्कृतींचा वारसा जन्मजात लाभला. नंतर इतर अनेक परंपरांच्या सान्निध्यात आम्ही वाढलो आणि आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत आपापले जोडीदार निवडले. अमृतसरच्या दिशेनं विमान निघालं तेव्हा ही गोष्ट मी उषाला सांगत होतो. थोड्या वेळानं ती वाचत बसली आणि नंतर पेंगू लागली.

माझं बालपण उत्तरेत गेलं. परिणामतः तिथल्या प्रथा-परंपरा आणि संस्कृती माझ्या मनावर बिंबली. इंग्लिश ही घरातली संपर्कभाषा होती. आई मात्र आम्हा मुलांशी पंजाबीच बोलायची. पंजाबी भाषा आणि तिचा लहजा हे आईकडून मिळालेलं ‘गिफ्ट’. ‘दुहेरी नागरिकत्व’ असल्यामुळे सुटीला आम्ही दोन्हीकडं असायचो. दिवाळीला कोल्हापूरला आणि उन्हाळ्यात कसौली - आता हिमाचल प्रदेशात असलेलं सुंदर हिल स्टेशन - जिथं आजोबांचं ‘समर रेजिडन्स’ होतं, या ठिकाणी आम्ही असायचो. आजोबा हायकोर्टात मोठे वकील होते. उन्हाळ्यात निवांत राहण्यासाठी म्हणून त्यांनी डोंगरासहितच एक घर घेतलं होतं. त्यांचं मूळ घर अमृतसरला होतं. मोठं ऐसपैस. तिथं आम्ही खूपदा जायचो. मी ‘मेयो’ला गेल्यावर ते रम्य दिवस संपले. नंतर आम्ही महाराष्ट्रात आलो. मराठी भाषा आणि संकृतीत वाढलो. या वातावरणाचा इतका खोलवर प्रभाव पडला की बालपणीचे संस्कार आणि आठवणी अंधूक होत गेल्या.

एकदा उषा मुंबईला गेली होती तेव्हा यूट्यूब बघताना एका पंजाबी सिनेमाच्या नावाकडे माझं लक्ष गेलं. लहर म्हणून मी तो लावला. त्या एका कृतीमुळं आयुष्याचा ‘अर्धा भाग’ पुन्हा जागा होईल आणि मला पंजाबला घेऊन जाईल हे ठाऊक नव्हतं.

विमान उतरत असल्याची घोषणा झाली. मी खिडकीतून बाहेर पाहिलं...हिरवा, पिवळा, निळा, तपकिरी अशी नाना रंगांची सगळीकडे उधळण. गव्हाचे हिरवेगार वाफे, मोहरीचे पिवळे. निळ्याशार वाहणाऱ्या नद्या. आणि, तपकिरी रंगातली अध्येमध्ये वसलेली गावं...विमानातून उतरून टॅक्सीत बसलो. हॉटेलवर पोहोचेपर्यंत ड्रायव्हरशी गप्पा मारल्या. छान जुळलं.

अमृतसरला असेपर्यंत याच ड्रायव्हरच्या टॅक्सीतून फिरायचं असं झटक्यासरशी ठरवून टाकलं.

हुकूम दव हुजूर, की देखना है?’ त्यानं विचारलं.

‘‘दरबारसाहिब,’’ मी उत्तरलो.

‘‘वाह! की गल कित्ती. दिल जीत लया साब.’’

थोड्या वेळानं प्रश्नांकित नजरेनं त्यानं माझ्याकडे पाहिलं. एका बिगरपंजाबी माणसाला ‘दरबारसाहिब’मध्ये जाण्याची एवढी घाई का झालीय असा त्याच्या मनात प्रश्न असावा; पण तसं थेट न दाखवता त्यानं विचारलं : ‘‘किद्रो आये हो?’’

‘‘महाराष्ट्र,’’ मी म्हणालो. विचार करून तो पुन्हा उद्गारला : ‘‘गल कुछ समझ नई आई.’’

अस्सल पंजाबीत मी उत्तर दिलं : ‘‘माझी आई पंजाबी होती. तिला भेटायला, तिची आठवण जागवायला आणि स्वतःचा शोध घ्यायला आलोय.’’

त्याचा चेहरा उजळला.

‘‘बादशाओ, चलो. हुणे चलो,’’ तो म्हणाला.

डोक्याला कापड गुंडाळून आम्ही आत जातो. संध्याकाळच्या सोनेरी सूर्यप्रकाशात न्हाऊन निघालेलं मंदिर अतिशय सुंदर दिसत असतं. अवतीभवती बसलेले, प्रार्थना करणारे असंख्य यात्रेकरू - काही शीख, तर काही हिंदू - तमिळी, मराठी, बंगाली, आसामी... हर तऱ्हेचे. गर्दी असूनही सगळीकडे शांतता. कदाचित् शेकडो वर्षांच्या प्रार्थनेनं मंदिर इतकं भारून गेलंय की तिथं येणाऱ्या प्रत्येकाचं मन आपोआप स्थिरतेकडे आणि शांततेकडे ओढलं जातं. राजकारणाचा भाग सोडला तर, आपण सगळे वेगळे असूनही एक आहोत. एकमेकांसोबत राहून आपापली प्रगती करणारे, जीवनाचा उत्सव साजरा करणारे. समोरची इमारत हे मंदिर आहे, चर्च आहे की गुरुद्वारा आहे, याची पर्वा न करणारे...

तिथल्या शांततेत जादू आहे. गुरू नानकांच्या गुरुवाणीचा नाद हवेत दुमदुमतो आहे आणि एका श्वासात मन स्वर्गात पोहोचतं. हृदयातल्या वेदना विरतात.

पाचशे वर्षांपूर्वी गौतम बुद्धांप्रमाणेच गुरू नानकही सांगून गेले : ‘नानक दुखिया सब संसार’ - जीवन दुःखमय आहे. आणि ते पुढे म्हणाले : ‘ नानक नाम जहाज है - नामस्मरण हाच तारणारा राजमार्ग आहे.’

लहानपणी आई सांगायची, ‘जगात चागलं-वाईट, सुख-दुःख, श्रीमंती-दारिद्र्य यांचा बरोबर ताळमेळ आहे. आपल्याकडून जे काढून घेतलं जातं ते विश्वाचा समतोल राखण्यासाठी आणि पदरात पडतं ते तुमच्या आवश्यक गरजा भागवण्यासाठी.’

अचानक माझी नजर भिंतीवरच्या गोळ्यांच्या खुणांकडे जाते. सन १९८४ ला याच पवित्र स्थळी लष्करी कारवाई झाली होती. त्याची दुःखद आठवण करून देणाऱ्या त्या खुणा. क्षणभर त्या आठवणीतून मन मागं फिरतं. ‘ऑपरेशन ब्लू स्टार’चा अटळपणा समजू शकतो; पण त्यामुळे शांत आणि सुखी शीख समाजाला किती वेदना झाल्या असतील या विचारानं हृदय पिळवटतं. थोडा वेळ आम्ही शांत बसतो. सत्यात न येणारी आदर्श स्थिती आणि असह्य होत असलेलं वास्तव, यातली दरी मिटणार कशी असा विचार माझ्या मनात येतो.

फ़र्श से मुतमइन नहीं, पस्त है ना- पसंद है

अर्श बहुत बुलंद है, ज़ौक़-ए-नज़र को क्या करूँ?

म्हणजे, जमिनीवरची ऐहिकता मंजूर नाही अन् आकाशीची भव्यता लाभत नाही...अरे देवा, अशा स्थितीत मी काय करू?

दुसऱ्या दिवशीची सकाळ. घरी न्याहारी करण्याच्या ड्रायव्हरच्या आग्रहाला मान देऊन आम्ही जालियनवाला बागेकडे चालत जातो. एक ‘गाईड’ दिमतीला हजर होतो. अरुंद अशा ऐतिहासिक गल्लीतून तो आम्हाला घेऊन जातो. याच गल्लीतून डायरनं आपल्या तोफा आणि फौजा नेल्या होत्या - १३ एप्रिल १९१९ ला ‘बैसाखी मेळ्या’च्या दिवशी जालियनवाला बागेत जमलेल्या निरपराध लोकांवर बेछूट गोळीबार करण्यासाठी.

‘‘इथून बाहेर पडायला मार्गच नव्हता,’’ गाईड सांगतो, ‘‘पार घाबरून गेलेले बिचारे लोक जीव वाचवण्यासाठी भिंतीवर चढले, तर काहींनी इथल्या विहिरीत उड्या घेतल्या.’’

गोळीबाराच्या खुणांनी भरलेल्या भिंतीजवळ आम्ही पोहोचतो. डायरच्या भयंकर क्रूरतेचाच तो पुरावा. खरंच असं घडलं होतं यावर विश्वास बसत नाही. एखाद्या माणसानं इतक्या थंड डोक्यानं आणि पद्धतशीरपणे निःशस्त्र लोकांच्या जमावावर गोळ्यांचा बेछूट वर्षाव करावा आणि नंतर ‘हंटर कमिशन’समोर, आपण केलं त्यात गैर काहीच नाही, असं बिनदिक्कतपणे सांगावं? आणि असल्या अधिकाऱ्याला सैन्यातून काढून टाकल्यावर दहा हजार पाउंडांचं बक्षीस देऊन त्याच्या देशानं त्याचा गौरव करावा? हे सगळं समजण्याच्या पलीकडचं आहे.

बागेतून चालताना मनात भावनांचा कल्लोळ...कसला तरी भीतिदायक विचित्रपणा इथल्या वातावरणात भरून राहिल्याचं जाणवतं. अंगात हुडहुडी भरते. मी शाल घट्ट गुंडाळतो.

‘‘काय होतंय?’’ उषाचा प्रश्न.

‘‘काही नाही,’’ मी उत्तर देतो.

या बागेनं देशाच्या स्मृतीला आणि भूतकाळाला एक वेगळाच आकार दिला. अधिकाऱ्यांच्या आणि पुढाऱ्यांच्या दृष्टीनं १३ एप्रिल म्हणजे, स्वातंत्र्यसैनिकांना औपचारिक वंदन करण्याचा आणि एका मोठ्या राजकीय घटनेला कोरडा उजाळा देण्याचा दिवस. अमृतसरच्या लोकांसाठी मात्र तो क्षण म्हणजे मनात सतत ठसठसणाऱ्या वेदनेचं उगमस्थान. त्या वेळचे लोकांचे अनुभव आणि इतिहासात नोंदल्या गेलेल्या गोष्टी यांतलं अंतर मोजण्याची आता वेळ आलीय...ज्या कुटुंबांनी तो दुर्दैवी दिवस पाहिला किंवा ज्यांनी नंतरही छळ सोसला त्यांच्या व्यथा ऐकून घेण्याची वेळ आता आलीय...गोळीबारानंतर सहा आठवडे लष्करी कायदा लागू झाला तेव्हा, भारतीयांना कसं वेठीला धरलं गेलं, तुरुंगात डांबलं गेलं, चाबकानं फोडलं गेलं आणि रांगायला-सरपटायला भाग पाडलं गेलं याची साक्ष मी स्वतः देऊ शकतो...

एके दिवशी आजोबा कोर्टातून घरी येत होते. आमच्या गल्लीच्या कोपऱ्यावर ते येताच त्यांची गाडी अडवली गेली. तिथून आमच्या दारापर्यंत त्यांना रांगायला भाग पाडलं गेलं...बंदुकीचा धाक दाखवून.

हे मी कसं विसरू? आणि त्यांना माफ तरी कसं करू?

देशाच्या फाळणीनंतर पंजाबमध्ये जी कत्तल झाली त्याचीदेखील मी साक्ष देऊ शकतो...धर्माच्या आधारावर भारताचे तुकडे झाले. बेफिकीरपणे सीमारेषा आखल्या गेल्या. का? दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिश साम्राज्य दिवाळखोरीत निघालं म्हणून? ब्रिटिशांना परतीची घाई झाली होती म्हणून? कोण मरणार, कुणाला किती किंमत चुकवावी लागणार याची त्यांना पर्वा नव्हती. सुमारे साडेचौदा कोटी लोकांचं बळजबरीनं स्थलांतर झालं. वीस लाख निरपराध लोक, स्त्रिया आणि मुलं मारली गेली. सबंध उपखंडाच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम झाला. विस्थापितांच्या वेदनादायी आठवणी आणि सग्या-सोयऱ्यांची झालेली कत्तल यांमुळे मनावर झालेले ते घाव आजही भरलेले नाहीत.

हे मी कसं विसरू? आणि त्यांना माफ तरी कसं करू?

या वेदनादायी आठवणींमुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात शत्रुत्वाचं नातं निर्माण झालं. काश्मीरमधून आणि हिमालयातून वाहणाऱ्या नद्यांच्या पाणीवाटपाचा प्रश्न सोडवणं कठीण झालंय. खरं सांगायचं तर, फाळणीचा क्षण निर्णायक होता. कशाची सुरुवात नव्हे, कशाचा शेवट नव्हे. दक्षिण आशियातील देश आणि तिथली जनता भूत-भविष्य-वर्तमानाकडे कसं पाहील यावर त्याचा प्रभाव पडतच राहणार.

परतीच्या प्रवासासाठी विमानतळाकडे निघताना उषा शांत होती. कशातच नसल्यासारखी. उसना उत्साह आणण्यासाठी तिनं विचारलं : ‘‘मराठा आणि पंजाबी असल्याबद्दल तुला कसं वाटतंय? टू इन वन आइस्क्रीमसारखं?’’

प्रश्न कठीण आहे.

माझ्यातल्या मराठ्याला पक्की जाणीव आहे - तो कुठून आला, तो कुठं निघाला आहे, त्याच्या श्रद्धा कोणत्या...पण माझ्यातल्या दुसऱ्या अर्ध्या भागाचं काय? त्याच्याविषयीही मी तितकाच ठाम आहे का? एक पंजाबी म्हणून मी तितक्याच नीटपणे स्वतःला ओळखू शकतो का? आणि माझी ही ओळख त्या ओळखीशी सुसंगत आहे का?

अचानक मला जाणवतं की, माझ्यातल्या या दोन भागांचं नातं आपल्या समाजातील विविधतेसारखंच आहे. त्या विविधतेचं मी प्रतिबिंब आहे. माझे वडील आणि आई नव्वद वर्षांपूर्वी एकत्र आले, म्हणून मी एक मराठा आहे आणि पंजाबीसुद्धा. मात्र, माझ्यात असणाऱ्या इतर वंशांसंबंधीची मला जाणीव आहे का? त्या अर्थानं, आपल्या सगळ्यांमध्ये असलेल्या वंशपरंपरांची तरी आपल्याला कुठं जाणीव आहे? शेवटी, माझं मराठा असणं महत्त्वाचं आहे की पंजाबी असणं महत्त्वाचं आहे, की माणूस असणं महत्त्वाचं आहे?

इतिहासाच्या सुरुवातीपासूनच आपल्या सामाजिक रचनेतही वेगवेगळे प्रवाह वाहत आलेले आहेत. आपण अनेक असून एक आहोत, हे समाजाच्या स्तरावर जर स्वीकारलं तर एकमेकांना अधिक उदार मनानं समजून घेण्याच्या दिशेनं आपण पुढं जाणार नाही का? यासाठीच आपल्या राज्यघटनेनं नागरिकत्वाला देशाच्या एकतेचा आणि अखंडतेचा पाया मानलेला आहे. आपण या भूमीत जन्मलो, म्हणून भारतीय आहोत - कोणत्या विशिष्ट जातीत, पंथात किंवा धर्मात जन्मलो म्हणून नव्हे.

आणि अचानक जे उत्तर मी शोधत होतो ते मला सापडलं.

मी उषाला म्हणालो : ‘‘तुझ्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे आहे. हे बघ, मी दक्खनचा मराठा आहे. पंचगंगा, गोदावरी, कृष्णा माझ्यातून वाहतात. तशाच रावी, सतलज आणि ब्यासही. पिठलं-भाकरी माझ्या रक्तात मिसळलेली आहे, अगदी तसाच मोहरीचा साग आणि मक्याची भाकरीही... ‘हर हर महादेव’च्या जयघोषानं माझं रक्त सळसळतं तसंच ‘बोले सो निहाल’ ऐकून होतं. उषा, शेवटी मला इतकंच कळलंय की मी भारतीय आहे. हीच माझी खरी ओळख आहे. या जन्मात आणि पुढंही.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com