एक उजेड, अनेक दिवे...

कोरोनामुळं दोन गोष्टी घडल्या. माझ्या स्वातंत्र्यावर बंधनं आली. सकाळ-संध्याकाळचं फिरणं बंद झालं. मास्क, सामाजिक अंतर, लस अशा गोष्टी जीवनाचा भाग बनल्या आणि मी बऱ्यापैकी घरातच अडकून पडलो.
एक उजेड, अनेक दिवे...
Summary

कोरोनामुळं दोन गोष्टी घडल्या. माझ्या स्वातंत्र्यावर बंधनं आली. सकाळ-संध्याकाळचं फिरणं बंद झालं. मास्क, सामाजिक अंतर, लस अशा गोष्टी जीवनाचा भाग बनल्या आणि मी बऱ्यापैकी घरातच अडकून पडलो.

कोरोनामुळं दोन गोष्टी घडल्या. माझ्या स्वातंत्र्यावर बंधनं आली. सकाळ-संध्याकाळचं फिरणं बंद झालं. मास्क, सामाजिक अंतर, लस अशा गोष्टी जीवनाचा भाग बनल्या आणि मी बऱ्यापैकी घरातच अडकून पडलो. दुसऱ्या बाजूनं पाहिलं तर निरर्थक बडबडीपासून सुटका झाली. शांतता लाभली.

घरात नवं रुटीन सुरू झालंय. पत्नी उषा ही मूळची समाजप्रिय. त्यामुळे तिचा वेळ कुटुंबातली मंडळी आणि मित्र-मैत्रिणी यांच्याशी ‘झूम कॉल’वर गप्पागोष्टी करण्यात जातो. मी एकांतप्रिय. त्यामुळे लेखन-वाचनात व्यग्र असतो. ‘मोबाईल’ म्हणजे उषाची ‘लाइफ सपोर्ट सिस्टिम.’ मात्र, माझ्यासाठी ती नसती कटकट. येणाऱ्या फोनला उत्तर देणंसुद्धा माझ्या जिवावर येतं. स्वभावाचा भाग म्हणून ही गोष्ट माझ्या मित्रांनी आता - इतक्या वर्षांनंतर - स्वीकारली आहे म्हणा.

काल सायंकाळची गोष्ट. एक फोन आला. तो घेऊ नये अशी माझी पहिली ‘रिॲक्शन’ होती; पण घेतला. कारण, तो गुरूचा होता. चेन्नईत रिझर्व्ह बँकेत असताना गुरू हा माझा सहकारी आणि मित्र. समान आवडीमुळे आम्ही जवळ आलो. शनिवारी ऑफिस सुटल्यावर आम्ही ‘मद्रास साहित्य मंडळा’चं ग्रंथालय गाठायचो. तिथं वाचनात छान वेळ घालवला की संध्याकाळी ‘वूडलॅंड’मध्ये जाऊन इडली-वडा-सांबारवर ताव मारायचो. हा ठरलेला कार्यक्रम. त्याला आता पंचवीस वर्षं झाली होती.

गुरूचा अचानक फोन आल्यावर ‘सगळं ठीक तर असेल ना’ असं सहजच माझ्या मनात येऊन गेलं.

‘गुरू, कसा आहेस? सगळं बरंय ना? मी विचारलं.

‘हो, सर. तुम्ही कसे आहात?’’ त्याच्या आवाजावरून मला जाणवलं की काहीतरी अडचण आहे.

मी पुन्हा विचारलं :‘‘अरे, खरंच सगळं ठीक आहे ना? की काही ...?’’

‘सर, खरं सांगायचं तर काहीच ठीक नाहीय.’’

‘नीट सांग,’’ मी म्हटलं.

विषय त्याची बहीण शांती हिच्याबद्दलचा होता. खूप वर्षांपूर्वीच ती अमेरिकेत स्थायिक झाली आहे. परवा म्हणे तिचा गुरूला फोन आला आणि ‘दादा...’ म्हणून तिनं रडायलाच सुरुवात केली. कसंबसं तिला शांत केल्यावर त्याला हकीकत समजली. शांतीची मुलगी मीना हिनं एके दिवशी अचानकपणे ‘जाहीर’ केलं होतं की ती तिच्या अमेरिकी मित्राशी लग्न करतेय. शांतीच्या रडण्याचं कारण हे होतं.

गुरूला सुरुवातीला वाटलं की, मिनू तिकडच्याच एखाद्या भारतीय तरुणाच्या प्रेमात पडली असेल. फार तर तो मुलगा दुसऱ्या समाजाचा किंवा जातीचा असेल म्हणून गुरू तिला म्हणाला : ‘‘मग त्यात काय वाईट आहे?’’

‘दादा, तुला कळतंय का?’’ हुंदके देत शांती म्हणाली :‘‘मुलगा अमेरिकी आहे. ख्रिश्चन! आम्ही तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केला; पण सारं व्यर्थ! ती आपला हट्ट म्हणून सोडायला तयार नाही.’’

‘मिनू कुठंय?’’गुरूनं विचारलं.

‘वरच्या खोलीत’’ शांती म्हणाली : ‘‘सामान भरतेय. तिचं नाही ऐकलं तर घर सोडून जाईन असं म्हणतेय ती. या प्रसंगानं तुझ्या भाऊजींच्या- मीनूच्या वडिलांच्या - छातीत परत एकदा कळ आलीय. (लग्नाच्या पहिल्या दिवशी वासुदेवभाऊजींना अशीच एक सोईस्कर कळ आली होती. नंतर घरची सगळी जबाबदारी गुरूच्या बहिणीनंच सांभाळली; मग काय, भाऊजी ‘खूश’!). जरा आराम मिळावा म्हणून ते बिछान्यावर पडून आहेत. दादा, कुठल्या कर्माचं फळ म्हणायचं हे? आयुष्यभर आम्ही एवढं सत्त्वानं आणि सत्यानं जगलो, मग आमच्याच वाट्याला हे असं का यावं? अरे, सांग की, मी काय करू ?’’ शांतीनं कळवळून विचारलं आणि म्हणाली :‘‘वेड लागायची पाळी आलीय. मला तर काहीच सुचत नाही. आता तूच काही तरी कर. मीनूशी एकदा बोलून बघ.’’

गुरूलाही काही सुचेना.

‘‘बोलतो’’ म्हणून त्यानं फोन ठेवला.

मीनू ही गुरूची लाडकी भाची होती. तो तिच्याशी बोलला. तिनं सगळं काही उलगडून सांगितलं : ‘‘मामा, माझा होणारा नवरा मार्टिन हा ख्रिश्चन आहे याचा आई-बाबांना त्रास होतोय. ते मी समजू शकते; पण गेली तीन वर्षं आम्ही एकमेकांना ओळखतोय आणि आम्ही दोघं आमच्या निर्णयावर ठाम आहोत. आम्ही लग्न करणार हे नक्की. आपण एकविसाव्या शतकात राहतोय मामा!!

आजकाल वेगवेगळ्या जाती-धर्माची शेकडो माणसं लग्न करून सुखानं जगताहेत; पण आई-बाबा मात्र अजूनही मध्ययुगीन काळातच अडकून पडलेत. ‘जागे व्हा’ म्हणावं त्यांना...बरं, मी निघतेय, मामा. मार्टिनचा फोन येतोय. बाय.’’

‘ठीकंय. मी पुन्हा बोलतो तुझ्याशी,’’ असं म्हणून गुरूनं फोन ठेवला.

दुसऱ्या दिवशी गुरूच्या बहिणीनं त्याला चारदा फोन केला. त्यामुळं त्याचंही डोकं चालेनासं झालं होतं, म्हणून त्यानं मला फोन केला होता.

गुरूची हकीकत मी ऐकली आणि माझं मन भूतकाळात गेलं. खूप वर्षांपूर्वीची ती पावसाळी दुपार. माझी मुलगी अदिती ऑक्सफर्डमधलं उच्च शिक्षण पूर्ण करून परत आली होती. आल्या आल्या तिनं एका ‘एनजीओ’त थोड्या काळासाठी काम केलं. नंतर राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांची विशेष कार्यकारी अधिकारी (ओएसडी) म्हणून डेप्युटेशनवर रुजू झाली.

दुपारी सहज गप्पा मारत असताना ती म्हणाली : ‘‘बाबा, माझ्या एका मित्राला भेटायला तुम्हाला नक्की आवडेल. तुमच्याइतकंच त्यालाही इतिहासाचं आणि हिंदुस्थानी संगीताचं वेड आहे.’’

‘कुठं काम करतो?’’ मी विचारलं.

राष्ट्रीय कलाकेंद्रात सल्लागार आहे,’’ ती उत्तरली.

‘ठीकंय,’’ मी म्हटलं.

नंतर दुसऱ्या कोणत्या तरी विषयावर आमचं बोलणं सुरू राहिलं. चहाचा कप उचलताना ती अचानक म्हणाली : ‘‘बाबा...समजा, मी मुसलमान किंवा ख्रिश्चन मुलाशी लग्न केलं तर तुमची प्रतिक्रिया काय असेल?’’

मी न ऐकल्यासारखं केलं आणि तिनंही आपला मुद्दा लावून धरला नाही. नंतर डायरीत नोंद करताना मी म्हटलं : ‘‘उद्या ‘टाटा केमिकल्स’ची बोर्ड-मीटिंग आहे. त्यानंतर आपण चहाला भेटू ‘ताज’वर.’’

दुसऱ्या दिवशी मी कॉफीशॉपमध्ये बसलो होतो. ठरल्यानुसार ते दोघं आले. त्यांच्याकडे पाहताच माझ्या लक्षात आलं की, अदितीबरोबरचा तो परदेशी मुलगा तिचा नुसता ‘मित्र’ नव्हता. ओळख करून देत आदिती म्हणाली : ‘‘बाबा, हा ओवन...माझा मित्र.’’ त्या अवघड प्रसंगी मी जास्त अस्वस्थ होतो की ते दोघं जास्त अस्वस्थ होते हे सांगता नाही येणार; पण मी वेळ

मारून नेली.

रात्री उषाशी बोललो. तिची प्रतिक्रिया वेगळीच होती. ती म्हणाली : ‘‘हे बघ, यशवंत, आभा-अदितीला

ऑक्सफर्ड- केम्ब्रिजमध्ये तूच शिकायला पाठवलं होतंस ना? मग तुझी भेट घालून देण्यासाठी ती तिच्या परदेशी मित्राला घेऊन आली तर बिघडलं कुठं? कित्येक वर्षांपूर्वी तू नव्हतास का नागपूरहून माझ्या बाबांना भेटायला आलास? त्याहून वेगळं काय आहे यात?’’

‘अगं, मुद्दा तो नाही,’’ मी म्हणालो :‘‘काही झालं तरी आपण दोघं एकाच धर्माचे होतो.’’

‘एकाच धर्माचे खरं; पण आपल्यात आर्थिक-सामाजिक अंतर होतंच ना? तू जनरल थोरातांचा मुलगा आणि मी एका तमिळ ब्राह्मण कुटुंबातली मुलगी.’’

‘वाटेल ते बोलू नकोस. तुझे वडीलसुद्धा कस्टम्समध्ये वरिष्ठ अधिकारी होते,’’ मी म्हणालो.

‘होते हे खरं आहे; पण त्या वेळी घडलेलं महाभारत आठवतंय ना?’’

‘हो. चांगलंच आठवतंय. तुझे आजोबा तर स्पष्टपणे म्हणाले होते की, ‘असल्या’ लग्नाला शास्त्राची मान्यताच नाही! आणि तुझ्या वडिलांना मी भेटलो तेव्हा त्यांनीही स्पष्टपणे म्हटलं होतं की, कौटुंबिक पार्श्वभूमी वेगळी असल्यामुळे हे लग्न झाल्यास भविष्यात अडचणी निर्माण होतील. ‘तुम्ही योद्धे आणि आम्ही विद्यासंपन्न तमिळ ब्राह्मण,’ हे त्यांचं वाक्य माझ्या जिव्हारी लागलं होतं. मग मीही त्यांना सुनावलं होतं, ‘केंद्रीय लोकसेवा परीक्षेत दोघंही - तुमची मुलगी आणि मी - उत्तीर्ण झालो असलो तरी या शेतकऱ्याच्या आणि लष्करातील जवानाच्या मुलाचा नंबर तुमच्या मुलीच्या वरती होता!’ तेव्हा त्यांनी हसून मान डोलावल्याचं मला अजूनही

आठवतंय.’’

‘तुझ्या त्या मुद्द्यामुळेच नव्हे तर, आपण दोघांनीही ठामपणे आपली बाजू लावून धरल्यामुळे, ते आपल्या लग्नाला तयार झाले होते.’’

‘बरोबर आहे,’’ मी म्हणालो : ‘‘पण मागं वळून पाहताना असं वाटतं की, तुझ्या वडिलांनी दिलेला इशारा योग्य होता. नोकरीच्या सुरुवातीच्या काळात आपण दोघंही आपापली राज्यं सोडून तिसरीकडेच राहत होतो. तेव्हा कसं सगळं छान आणि मस्त होतं; पण नंतर जेव्हा आपली चेन्नईला बदली झाली तेव्हा मला कळलं की कोल्हापूर आणि चेन्नई यांच्यात केवढा फरक आहे. आपलं खाणं-पिणं, चाली-रीती, जीवनाकडं बघण्याचा दृष्टिकोन आणि एकूण संस्कृती, हे सारं निराळंच आहे. आमचा ‘तांबडा-पांढरा रस्सा’ कुठं आणि तुमचा ते ‘सांबर...रस्सम’ कुठं!’’

‘ते सोड. अदितीविषयी बोलू या. क्षणभर स्वतःचं मत बाजूला ठेव आणि विचार कर की, हे लग्न कोण करणार आहे - तू की तुझी मुलगी?’’ उषानं विचारलं.

उषाच्या म्हणण्याला अर्थ होता; पण माझं मन तयार होत नव्हतं. मला चांगलंच माहीत होतं की, निव्वळ प्रेमावर लग्न आणि संसार उभा करता येत नाही. त्यासाठी हवा असणारा समंजसपणा आणि परस्परांविषयीचा आदर त्या दोघांत होता का? दोन दूरच्या देशांतल्या आणि वेगवेगळ्या धर्मांतल्या लोकांनी लग्न करणं म्हणजे एक प्रकारची अग्निपरीक्षाच होती. जिगर मुरादाबादी यांचा तो शेर आहे ना, तो बरोबरच आहे -

ये इश्क नहीं आसाँ इतना ही समझ लीजे

इक आग का दरिया है और डूब के जाना है

तेव्हा, थोडं थांबावं आणि पाहावं असं मी ठरवलं.

मात्र, जसजसा काळ गेला तसतसं त्या दोघांच्या नात्यातलं गहिरेपण मला जाणवलं. ओवन हा एक चांगला मुलगा होता यात शंका नव्हती. तो संस्कारी आणि वडीलधाऱ्यांचा मान ठेवणारा होता. विशेष म्हणजे, आमच्याकडच्या चाली-रीतींची आणि संस्कृतीची त्याला उत्तम जाण होती. जोडीदार म्हणून तो अदितीची योग्य ती काळजी घेणारा आणि तिचं हवं-नको ते सारं बघणारा होता. तिच्या विचारांचा आदर करणारा आणि मुख्य म्हणजे, तिच्यावर जीव ओवाळून टाकणारा होता. हे सारं होतं; पण कुठं तरी मनात हुरहूर होती. मी स्वतःलाच प्रश्न केला ‘यशवंत...समज, तो मुलगा हिंदू असता तर या नात्याला तू ‘हो’ म्हणाला असतास ना?’’ पटकन उत्तर आला ‘निश्चित’.

मग सत्य काय होतं? सत्य हे होतं की मला माझीच अवस्था समजत नव्हती. या लग्नाबद्दल समाज काय म्हणेल म्हणून मी तयार होत नव्हतो की मानसिकतेनं मी हिंदू-ख्रिश्चन या लग्नाच्या विरुद्ध होतो? की ‘नाबार्ड’चा अध्यक्ष म्हणून मला या गोष्टीचा त्रास होत होता? की या सगळ्यात माझा अहंकार आड येत होता?

मला तत्त्वज्ञान हा विषय शिकवणारे दीक्षित गुरुजी हयात असते तर म्हणाले असते: ‘यशवंत, जगातल्या सगळ्या धर्मांना दोन अंगं आहेत. बाह्यांगाकडं बघितलं तर त्यांच्या त्यांच्या रूढी-परंपरांचा एक सामाजिक इतिहास दिसतो आणि अंतरंगाचा विचार केला तर कोणत्याही धर्मात जन्माला आलेल्या जिवाचा तो एक आत्मिक प्रवास असतो. अंतिम सत्य फक्त आपल्याच धर्मात आहे असं जगातल्या प्रत्येक धर्माला वाटतं असतं. आणि त्याहून वेगळं जर कुणी सांगितलं तर ते त्यांना खपत नाही...पण असं कसं चालेल? खरा धर्म ही काही कुण्या एकाची मक्तेदारी नाही. धर्म म्हणजे या विश्वाच्या अफाट पसाऱ्यातून आणि घडणाऱ्या अतर्क्य घटनांच्या जंजाळातून ‘चिरंतन’ अर्थ शोधण्याचा अखंड प्रयत्न आहे. त्यामुळे तुला खरोखरच तुझ्या प्रश्नाचं उत्तर शोधायचं असेल तर संघटित धर्मांच्या आणि त्यांच्या बंदिस्त धारणांच्या पलीकडे जा आणि स्वतःमध्ये डोकावून बघ...

अरे बाळा...प्रार्थना, अर्चना किंवा नमाज यांच्यासाठी जुळलेले हात - गोरे असोत की काळे - एकाच आभाळाकडे निर्देश करतात ना? या विश्वाला कुठं आहे मिती, वंश आणि सांस्कृतिक भेदाभेद, सांग बरं? मुळात, मानवता एक असेल, माणसाच्या अंतरंगात असणारं चैतन्य एक असेल, प्रत्येकात एक समान तत्त्व असेल, तर मग हे सारे भेदाभेद खरे कसे असतील याचा तू विचार कर. जीवनाचं ध्येय दुसऱ्याला नाडण्यात नव्हे, तर आपल्यात सामावून घेण्यात असतं. माझं ऐक. दिव्य प्रकाशाच्या दिशेनं निघालेल्या त्या दोन जिवांना अगदी खुलेपणानं, उदार अंतःकरणानं आशीर्वाद दे.’

मग कुठं तरी माझ्या शंका मिटल्या आणि चित्त थाऱ्यावर आलं. मी शांत झालो.

मला तेव्हा जशा प्रसंगाला सामोरं जावं लागलं होतं, तशाच प्रसंगाला आता गुरूलाही सामोरं जावं लागत होतं. तत्त्वज्ञान सांगण्यापेक्षा मी त्याला माझी कहाणी सांगितली. विषय संपला.

एके दिवशी दारावरची घंटी वाजली.

‘कोण आहे जरा बघशील का?’’ उषा म्हणाली.

मी दार उघडलं, तर समोर एक तरुण उभा.

‘नमस्कार. मी मार्टिन. मीनू गाडी पार्क करतेय. इकडच्या आप्तांचे, स्नेहीजनांचे आशीर्वाद घ्यावेत म्हणून आम्ही भारतात आलोय. ‘चेन्नईला येण्यापूर्वी थोरात कुटुंबीयांचे आशीर्वाद घेऊन या,’ असा मीनूच्या मामाचा आम्हा दोघांना ‘आदेश’ आहे.’’

असं म्हणून मार्टिननं मला वाकून नमस्कार केला...चक्क भारतीय पद्धतीनं!

(अनुवाद : डॉ. रघुनाथ कडाकणे)

(raghunathkadakane@gmail.com)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com