...और सामने मंझिल आ जाए । (डॉ. यशवंत थोरात)

डॉ. यशवंत थोरात ythorat@gmail.com
रविवार, 26 फेब्रुवारी 2017

‘‘केवळ जन्मामुळं ज्यांच्यात असमानता आहे, त्यांच्यातली शर्यत कधीही न्याय्य असू शकत नाही. त्यांच्या आयुष्यात त्यांच्या वाट्याला न्याय आला आहे, असं मी मानत नाही आणि तरीही ज्याच्या आयुष्याची सुरवात चांगली होत नाही, त्याच्या माथ्यावर पराभवच लिहिलेला असतो, असंही मानायला मी तयार नाही. कारण माणसाला पराभव संपवत नसतो, तर पराभवापासून पळ काढणं हे माणसाला संपवतं, असं मला वाटतं. अयशस्वी झाल्यानं पराभव होत नसतो, तर शर्यत अर्धवट सोडल्यानं तो होत असतो.’’

‘‘केवळ जन्मामुळं ज्यांच्यात असमानता आहे, त्यांच्यातली शर्यत कधीही न्याय्य असू शकत नाही. त्यांच्या आयुष्यात त्यांच्या वाट्याला न्याय आला आहे, असं मी मानत नाही आणि तरीही ज्याच्या आयुष्याची सुरवात चांगली होत नाही, त्याच्या माथ्यावर पराभवच लिहिलेला असतो, असंही मानायला मी तयार नाही. कारण माणसाला पराभव संपवत नसतो, तर पराभवापासून पळ काढणं हे माणसाला संपवतं, असं मला वाटतं. अयशस्वी झाल्यानं पराभव होत नसतो, तर शर्यत अर्धवट सोडल्यानं तो होत असतो.’’

गप्पांच्या ओघात यास्मिननंच विषय काढला.
‘‘सर, एक सैनिक म्हणून किंवा एक योद्धा म्हणून तुमचे वडील तुमच्यापेक्षा अधिक थरारक आयुष्य जगले, असं तुम्हाला नाही का वाटत? म्हणजे युद्ध, सन्मान, कीर्ती किंवा त्या संदर्भात...’’
क्षणभर विचार केला.‘‘हो आणि नाहीपण,’’ मी म्हणालो, ‘‘शौर्य ही फक्त सैनिकांचीच मक्तेदारी आहे किंवा युद्धं ही फक्त रणांगणावरच लढली जातात, असं तू का समजतेस?’’ ‘‘तसा सर्वसाधारण समज आहे,’’ राहुल म्हणाला.

‘‘ते ठीक आहे; पण अगदी तसंच काही नाही,’’ म्हणालो ः ‘‘एखाद्या रुग्णाचा प्राण वाचवण्यासाठी एखादा सर्जन शस्त्रक्रियेच्या टेबलावर जे कौशल्य पणाला लावतो, त्याला तू शौर्य म्हणणार नाहीस? किंवा एखादा शोध लावण्यासाठी आपल्या प्रयोगशाळेत रात्रंदिवस अथक्‌ कष्ट करणाऱ्या शास्त्रज्ञाचे प्रयत्न म्हणजे शौर्य नाही का? किंवा एखाद्या सरकारी अधिकाऱ्यानं किंवा बॅंक कर्मचाऱ्यानं प्रामाणिकपणे आणि निष्ठेनं केलेली लोकसेवा म्हणजे शौर्य नाही का? अशी असंख्य उदाहरणं मला देता येतील. जरा अवतीभवती बघ, तुला असे हजारो शूरवीर दिसतील. आपल्या मुलांचं भवितव्य घडवण्यासाठी न कंटाळता वर्षानुवर्षं तेच काम सलगपणे करणारे कारकून, अडीअडचणीला कामाला यावेत म्हणून आपल्या आवडीनिवडी मारून संसारासाठी पैसा साठवून ठेवत जमेल तिथं काटकसर करणाऱ्या गृहिणी, आपलं वाढलेलं वय आणि आजारपण आनंदानं सहन करणारी वृद्धमंडळी आणि... अगदी तुम्हीसुद्धा! तुमच्यापैकी सगळेच जण काही आर्थिकदृष्ट्या समृद्ध-संपन्न कौटुंबिक पार्श्‍वभूमीचे नसतात... तुमच्यापैकी अनेकांना मी सार्वजनिक बागेत बसून अभ्यास करताना पाहिलंय. आपल्या आई-वडिलांवरचं ओझं हलकं करण्यासाठी पीटर फावल्या वेळात काम करतो, हे मला माहीत आहे...यास्मिन आपल्या आईला घरकामात मदत करते...राहुल त्याच्या धाकट्या भावंडांना शिकवतो...या सगळ्या गोष्टी गौरवास्पद नाहीत काय?’’

‘‘हो, आहेत...पण त्यांचा काय उपयोग?’’ प्रदीप म्हणाला ः ‘‘आमच्यापैकी बहुतेकजणांसाठी आयुष्य म्हणजे अतिशय कष्टाचा, कंटाळवाणा प्रवास आहे. आमचा रस्ता खाचखळग्यांचा आहे. एखादा सपाट, चांगला रस्ता एकदा तरी आमच्या वाट्याला येईल, असं तुम्हाला वाटतं का? ज्यांच्याकडं सत्ता आणि संपत्ती आहे किंवा ज्यांच्याकडं दिखाऊ चमचमाट आहे, तेच गुणवंतांवर बाजी मारून जातात. सर, तुमचं म्हणणं खोटं आहे, असं मला म्हणायचं नाही; पण ते वास्तवापासून खूप दूर, खूपसं काल्पनिक आहे, असं वाटतं. खरी गोष्ट अशी आहे, की तुम्ही ‘आहे रे’ गटातले असता किंवा ‘नाही रे’ गटातले असता आणि जेव्हा तुम्ही दुसऱ्या गटातले असता, तेव्हा तुम्हाला काहीच किंमत नसते. तुमचा काहीच उपयोग नसतो.’’ प्रदीपच्या आवाजात नैराश्‍य भरलेलं होतं आणि ते जणू इतरांच्या डोळ्यांतूनही प्रतिबिंबित होत होतं. माझ्या मनाला ते खूपच लागलं. त्यांना दिलासा देणारं, त्यांच्या मनात नवी आशा निर्माण करणारं काहीतरी बोललं पाहिजे, असं मला प्रकर्षानं वाटून गेलं. काहीतरी थातुरमातुर बोलून भागणार नव्हतं. अतिशय गंभीरपणे मी त्यांना म्हणालो ः‘‘तुमच्या भावनांमागचा सल मला नाकारायचा नाही किंवा तुमच्या बोलण्यातला आवेश वरवरचा आहे, असंही मला म्हणायचं नाही. मी संपन्न घरातून आलेला असल्यानं संघर्षाची धग मी कधी अनुभवली नाही. मला माफ करा.‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ या दोन्ही गटांपुढची आव्हानं आणि त्यांना तोंड देण्यासाठी असलेली साधनसामग्री सारखी नसते, हे मला मान्य आहे. केवळ जन्मामुळं ज्यांच्यात असमानता आहे, त्यांच्यातली शर्यत कधीही न्याय्य असू शकत नाही. त्यांच्या आयुष्यात त्यांच्या वाट्याला न्याय आला आहे, असं मी मानत नाही आणि तरीही ज्याच्या आयुष्याची सुरवात चांगली होत नाही, त्याच्या माथ्यावर पराभवच लिहिलेला असतो, असंही मानायला मी तयार नाही. कारण, माणसाला पराभव संपवत नसतो, तर पराभवापासून पळ काढणं हे माणसाला संपवतं असं मला वाटतं. अयशस्वी झाल्यानं पराभव होत नसतो, तर शर्यत अर्धवट सोडल्यानं तो होत असतो.’’
पुढं मी म्हणालो ः ‘‘मघाशी तुम्ही तोफा आणि कीर्ती यांविषयी बोलत होता. होय ना? चीननं १९६२ मध्ये जेव्हा आपल्यावर आक्रमण केलं, तेव्हा आपण बेसावध होतो. त्यांचं आक्रमण अत्यंत नियोजनबद्ध होतं. आपली मात्र काहीच तयारी नव्हती. आपले जवान खूप शौर्यानं लढले; पण ते संख्येनं कमी होते. त्यांच्याकडं पुरेशी शस्त्रास्त्रं नव्हती. त्यांना रसदपुरवठाही नीट होत नव्हता. आघाडीच्या चौकीवरून आपल्या मुख्य तळाकडं माघार घेताना आपल्या जवानांची एक तुकडी बर्फात हरवली. एक तरुण अधिकारी तिचं नेतृत्व करत होता. त्यांच्याजवळचं अन्न संपलं होतं. स्थिती झपाट्यानं हाताबाहेर जात होती; पण त्या अधिकाऱ्यानं त्यांचं मनोधैर्य कसंबसं टिकवून धरलं होतं. शेवटी एक दिवस त्यांचं त्राण संपलं. कडाक्‍याच्या थंडीत जखमांच्या वेदना सहन करत त्यांना एक पाऊलही पुढं जाणं शक्‍य नव्हतं. जिथं आहोत तिथंच मृत्यूला सामोरं जाण्याचं त्यांनी ठरवलं. त्यांच्यात जगण्याची आशा निर्माण करण्याचा त्या अधिकाऱ्यानं अखेरचा प्रयत्न केला. शेवटी, एका टेकडीकडं बोट दाखवून तो म्हणाला ः‘आपला तळ त्या टेकडीच्या पलीकडं आहे. मी एकटा जातो आणि काही मदत मिळतेय का ते पाहतो; पण एक लक्षात घ्या. जोपर्यंत तुमचं मन हार मानत नाही, तोपर्यंत तुमचं शरीर प्राण सोडत नाही.' तो निर्धारानं गेला. आश्‍चर्य म्हणजे, त्या टेकडीच्या मागंच भारतीय सैन्याचा तळ होता. त्याला मदत मिळाली आणि सगळ्यांचे प्राण वाचले!’ ’’

‘‘आश्‍चर्यच आहे,’’ पीटर म्हणाला.
‘‘होय, आश्‍चर्य आहे खरं,’’ मी म्हणालो ः ‘‘मात्र, यातलं तात्पर्य हे आहे, की जरी सधन आणि प्रभावी लोकांची सुरवातीला सरशी झाली, तरी विजयावर फक्त त्यांचीच मक्तेदारी असत नाही. माणसाचं मन हा यातला निर्णायक घटक असतो. प्रयत्न सोडले नाहीत तर अपयश कधीच येत नाही. पराभव हा आधी आपल्या मनात होत असतो. ध्येयावर निष्ठा असेल तर कुठलाच अडथळा आपल्याला अडवू शकत नाही. पण या मंत्राची आणखीही एक बाजू आहे. यशासाठी मनाचा कणखरपणा तर हवाच; पण तेवढाच पुरेसा नाही. तुम्ही फक्त मनानं खंबीर असून चालत नाही, तर तुम्ही तेवढेच चलाख आणि चपळही असायला हवं. लढाया आणि युद्धं आधी मनात योजिली जातात. त्यांची जमिनीवरची अंमलबजावणी हा फक्त तपशिलाचा भाग असतो.’’
‘‘सर, थोडं आणखी स्पष्ट करा ना,’’ यास्मिन म्हणाली.
‘‘सांगतो. तुम्ही ब्रॅडमनचं नाव ऐकलंय?’’
‘‘अर्थातच हो,’’ ते एका सुरात ओरडले.
एकदा तरुणपणी ब्रॅडमन नेटमध्ये एका खेळाडूला गोलंदाजी करत होते. त्यांचे सगळे चेंडू नीट स्टम्पवर पडत असतानाही तो खेळाडू अगदी सहजपणे खेळत होता. ते पाहून त्याचे प्रशिक्षक त्याच्याजवळ आले आणि म्हणाले ः ‘तू नेमका कुठं चेंडू टाकतोयस?’
‘‘स्टम्पवर,’’ ब्रॅडमन म्हणाले.

‘‘तिथंच तू चुकतोयस,’’ प्रशिक्षक म्हणाले ः ‘‘तू चेंडू स्टम्पवर टाकू नकोस. तू त्या फलंदाजाचा अभ्यास कर. त्याचा कमकुवतपणा काय आहे ते जाणून घे आणि मग चेंडू टाक. तू त्याच्या कमकुवतपणावर हल्ला कर. नुसतं चेंडू टाकून तो बाद होणार नाही. त्याला कसं बाद करायचं हे तू आधी मनात ठरव. मग योग्य पद्धतीनं चेंडू टाकणं ही त्या विचाराची केवळ तांत्रिक पूर्तता ठरते.’’
हे उदाहरण ऐकून ‘‘वॉव...’’ असं उद्‌गारत राहुल म्हणाला ः ‘‘हे आश्‍चर्यच आहे; पण असं कधी प्रत्यक्षात घडल्याचं तुम्ही पाहिलंय?’’
‘‘होय. १९६० च्या दशकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात कानपूर इथं कसोटी सामना सुरू होता. पाकिस्तानचा ख्यातनाम फलंदाज हनीफ महमद सगळ्या भारतीय गोलंदाजांना फोडून काढत चौफेर टोलेबाजी करत होता. तो बाद होण्याचं कुठलंच चिन्ह दिसत नव्हतं. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून कर्णधार रामसिंगनं बापू नाडकर्णींना पॅव्हेलियनच्या बाजूनं गोलंदाजी करण्यासाठी आणलं. बापू नाडकर्णी हे त्या वेळचे आणि कदाचित आतापर्यंतच्या इतिहासातले सगळ्यात कमी धावा देणारे गोलंदाज होते. त्यांची कामगिरी ‘३१ षटकं, २८ निर्धाव, ११ धावा आणि १ बळी’ अशी अफलातून असे. बापूंनी त्या दिवशी गुड लेंथ स्पॉटवर षटकांमागून षटकं टाकून हनीफ महमदसारख्या चतुरस्र फलंदाजालाही जखडून ठेवलं. षटकांमागून षटकं निर्धाव जायला लागली. हे असंच सुरू राहणार, असं वाटून भडक डोक्‍याचा हनीफ खवळला. क्रीझच्या बाहेर येत त्यानं बापूंना एक सणसणीत षटकार खेचला. त्यापाठोपाठ आणखी एक षटकार आणि पुढच्या चेंडूवर कव्हर्समधून चौकार. बापू चौथा चेंडू टाकण्याच्या तयारीत असताना हनीफ त्यांच्याकडं पाहून तुच्छतेनं हसला. बापूंनी पुढचा चेंडू टाकला तेव्हा गुड लेंथ स्पॉटच्या दिशेनं पुढं सरकत हनीफनं स्विपचा परंपरागत फटका मारला; पण चाणाक्ष असलेल्या बापूंनी हनीफची सवय ओळखून चेंडूची उंची खूपच कमी ठेवली होती. हनीफनं अंधपणे बॅटचा पट्टा फिरवला; पण बॅटखालून गेलेला चेंडू थेट स्टम्पवर जाऊन आदळला. त्या वेळी हनीफचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. रागारागानं त्यानं बॅट जमिनीवर इतक्‍या जोरात आपटली, की तिचे दोन तुकडे झाले. भारतानं तो सामना जिंकला की बरोबरीत राखला, ते आता मला आठवत नाही.’’

‘‘हे खेळाच्या मैदानावरचं झालं; पण प्रत्यक्षात तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्ध्याला कधी असं बाद केलंय का?’’ कुणीतरी विचारलं.
‘‘तसा प्रतिस्पर्धी शोधण्यापेक्षा तशी परिस्थिती शोधणं मला सोपं वाटलं,’’ मी म्हणालो आणि माझं मन सुमारे तीन दशकं मागं गेलं. त्या वेळी अचानक घडलेला तो प्रसंग मला आठवला. त्या वेळी १९७९-८० मध्ये मी आणि माझी पत्नी असं आम्हा दोघांचंही पोस्टिंग गुवाहाटीला होतं. त्या वेळी आसाममध्ये प्रचंड अशांतता होती. बांगलादेशातून आसामात बेकायदा येणाऱ्या घुसखोरांचा प्रश्न ज्वलंत बनला होता. या घुसखोरांमुळं आसाममधला लोकसंख्येचा आणि पर्यायानं राजकीय समतोल पूर्णपणे ढासळण्याच्या मार्गावर होता. ‘ऑल आसाम स्टुडंट्‌स युनियन’ (आसू) ही विद्यार्थ्यांची संघटना या घुसखोरांच्या विरोधातल्या आंदोलनाचं नेतृत्व करत होती. जनतेची सहानुभूती स्वाभाविकपणे या संघटनेलाच होती. आंदोलनामुळं टेकीला आलेल्या सरकारनं कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी निमलष्करी दलांकडं सोपवली होती. आसाममध्ये नागरिकांपेक्षा सशस्त्र जवान संख्येनं जास्त आहेत, असं त्या वेळी बोललं जात होतं. त्या वेळी इंदिरा गांधी आसामला भेट देणार होत्या; पण त्या विमानतळावर उतरण्यापूर्वीच केंद्र सरकारनं केलेल्या बळाच्या वापराच्या निषेधार्थ तिथल्या प्रत्येक घरातल्या लोकांनी दिवे बंद करून टाकले. आसाममधल्या सर्व संस्थाही बंद ठेवण्यात आल्या होत्या. सरकारचं कामकाज पुरतं ठप्प झालं होतं. जे कुणी कार्यालयात आले होते, ते धोका पत्करून, स्वतःच्या जबाबदारीवर आले होते. या गोष्टी घडत असतानाच एके दिवशी दुपारी पोलिसांची एक जीप माझ्या घरासमोर येऊन थांबली. त्या जीपमधून उतरलेल्या दोन अधिकाऱ्यांनी माझ्या हातात एक वॉरंट दिलं. ‘राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली तुम्हाला अटक करण्यात आली असून ताबडतोब आमच्याबरोबर चला,’ असं त्यांनी मला फर्मावलं. रिझर्व्ह बॅंकेच्या कार्यालयात नेण्यात आलं. तिथं माझ्या आधीच माझ्या पाच वरिष्ठांना आणलं होतं. ‘आपले व्यवस्थापक कुठं आहेत?’ असं विचारता ‘ते दौऱ्यावर गेलेत; किंबहुना ते कोलकत्याला पळून गेले आहेत,’ असं सांगण्यात आलं. याचा अर्थ असा, की इथं आम्हाला आमच्या प्रमुखांच्या अनुपस्थितीत रिझर्व्ह बॅंकेच्या कार्यालयात अटक करून ठेवण्यात आलं होतं. आम्ही आमची तिजोरी उघडून ‘एका राष्ट्रीयीकृत बॅंकेला पैसे काढून द्यावेत,’ असं आम्हाला फर्मावण्यात आलं. ‘पैसे जर बॅंकेत पोचले नाहीत तर तुम्हाला अशा ड्युटीवर पाठवलं जाईल, की तिथून तुम्ही परत येऊ शकणार नाही,’ अशा धमक्‍या आम्हाला देण्यात येत होत्या. आम्ही या धक्‍क्‍यातून कसेबसे सावरत होतो, तोच ‘आसू’मार्फत एक संदेश आमच्यापर्यंत पोचवण्यात आला. ‘रिझर्व्ह बॅंकेतून एक रुपया जरी बाहेर गेला तरी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना गुवाहाटी सोडून जाता येणार नाही,’ असं त्या संदेशात म्हटलं होतं. हे ऐकून एका अधिकाऱ्याच्या छातीत कळ आली. ‘काय करायचं ते मला सुचत नाहीय,’ असं दुसरा म्हणाला. त्यात आणखी भर म्हणजे, ‘आपण पैसे नेण्यास तयार आहोत,’ असं आपण सरकारला कळवलं असल्याचं त्या बॅंकेच्या सरव्यवस्थापकांनी आम्हाला सांगून चेंडू आमच्या कोर्टात ढकलला होता. आम्ही चांगलेच कोंडीत सापडलो होतो. ‘इकडं आड, तिकडं विहीर’ अशी आमची स्थिती झाली होती. पैसे दिले तर विद्यार्थ्यांनी आम्हाला मारलं असतं, पैसे दिले नाहीत तर सरकारनं आम्हाला अशा ठिकाणी पाठवलं असतं की जिथून आम्ही परत येण्याची शक्‍यताच नव्हती. प्रसंग बाका होता! मात्र, अशा वेळीच दडलेलं नेतृत्व उफाळून बाहेर येतं. कसं ते मला समजलं नाही; पण मी सूत्रं माझ्या हातात घेतली. इतरांनीही मला तसं करू दिलं. एकूण स्थिती पाहून माझ्या हे लक्षात आलं होतं, की आम्हाला आणि त्या बॅंकेला सरकार आणि विद्यार्थ्यांकडून असलेला धोका हा एकसारखाच होता. आम्हाला जशी तिजोरी उघडण्याची भीती होती, तशी ती रक्कम आमच्याकडून घेऊन जाण्याची त्या स्थानिक बॅंकेच्या अधिकाऱ्यांनाही भीती वाटत असावी. याचा अर्थ, ‘आपण रक्कम नेण्यास तयार आहोत,’ असा जो आव त्या बॅंकेच्या सरव्यवस्थापकांनी आणला होता, तो तद्दन खोटा होता. रिझर्व्ह बॅंकेचे अधिकारी तिजोरी उघडण्याची हिंमतच करणार नाहीत, या गृहीतकावर त्यांची फुशारकी आधारलेली होती. त्यामुळंच ते खोटा आव आणत असल्याचं माझ्या लक्षात आलं. आता आम्ही त्याहून अधिक चांगला ‘आव’ आणण्याची गरज होती! त्या वेळी मी सरकारला कळवलं की ‘आम्ही रक्कम तयार ठेवली आहे; फक्त ती घेऊन जाण्याची संबंधित बॅंकेला सूचना द्या.’
विशेष म्हणजे हा निरोप दिला तेव्हा मी माझ्या खुर्चीवरून साधं उठलोही नव्हतो किंवा तिजोरीपर्यंतही गेलो नव्हतो. आम्ही निरोप पाठवला आणि श्वास रोखून आम्ही वाट पाहायला लागलो. एकेक क्षण आम्हाला केवढा तरी मोठा वाटत होता. साधारणतः एक तास असाच दडपणाखाली गेला. पैसे घेऊन जायला कुणीच फिरकलं नाही. आपला बाण बरोबर लागला आहे, हे माझ्या लक्षात आलं. काहीही न करता आम्ही जिंकलो होतो. त्या वेळच्या डेप्युटी गव्हर्नरांनी मला दिलेलं माझ्या गुणांचं आणि धाडसाचं कौतुक करणारं प्रशस्तिपत्र आजही माझ्याजवळ आहे; अशा गुणांचं की जे गुण माझ्याजवळ नव्हतेच! यश हे केवळ बुद्धीवरच अवलंबून नसतं, तर शरीर आणि बुद्धी यांना एकत्र चालना देणाऱ्या मनावर ते अवलंबून असतं, हे त्यांना माहीत नव्हतं.’’
मी पुढं सांगू लागलो ः ‘‘मी रजेवर घरी आलो तेव्हा माझ्या आवडत्या दीक्षित सरांना भेटायला गेलो. त्यांना मी हा प्रसंग सांगितला. ते थोडं हसले; पण लगेच गंभीर होऊन म्हणाले ः ‘यशवंत, प्रगती हा निसर्गाचा नियम आहे. तू एका अत्यंत कठीण अशा बाह्य संकटावर मात केली आहेस. भविष्यात तुझ्या मनात कधीकाळी असंच द्वंद्व निर्माण होऊ शकतं. ते द्वंद्व राग, लोभ, मत्सर, संपत्तीची हाव किंवा एखादी महत्त्वाकांक्षा अशा कशामुळंही निर्माण होऊ शकतं. कदाचित असा प्रसंग येईल, तेव्हा मी तिथं असणारही नाही; पण असा प्रसंग येईल तेव्हा आजिबात घाबरू नकोस. तितक्‍याच निर्धारानं आणि समयसूचकतेनं त्या परिस्थितीचा सामना कर. आपण दुबळे आहोत हे समजण्याचं सामर्थ्य तुला मिळो आणि त्या दुबळेपणाशी लढण्याइतकं शौर्य तुझ्यात निर्माण होवो. भगवान बुद्धांची एक शिकवण कायम लक्षात ठेव. ते म्हणाले होते ः ‘हजारो युद्धं जिंकण्यापेक्षा स्वतःवर विजय मिळवणं अधिक महत्त्वाचं आहे; कारण प्रत्यक्ष परमेश्वरसुद्धा असा विजय आपल्यापासून हिरावून घेऊ शकत नाही.’ ’’

‘‘असा प्रसंग मग कधी आला का?’’ कुणीतरी विचारलं.
‘‘हो. खूपदा. पण जेव्हा जेव्हा असा प्रसंग येई, तेव्हा तेव्हा मला सरांचे शब्द आठवत. ते शब्द माझ्या मनातलं वादळ शांत करून मला प्रकाशाच्या दिशेने पुढं नेत,’’ मी म्हणालो.
‘‘मग, शेवटी संदेश काय आहे?’’ माझी पत्नी उषा हिनं विचारलं. आमचं बोलणं सुरू असतानाच ती शांतपणे आत आली होती.
‘‘संदेश काय ते मला माहीत नाही. मी केवळ गोष्टी सांगणारा आहे, उपदेश करणारा नव्हे’’ मी म्हणालो ः ‘‘यातून या मुलांनीच काय तो निष्कर्ष काढायचा आहे. फार तर मी एवढंच म्हणेन ः
ऐ जज्बा-ए-दिल, गर मै चाहूं, हर चीज मुकाबिल आ जाए। मंझिल के लिए दो गाम चलूं, और सामने मंझिल आ जाए।
(माझ्या निश्‍चयात इतकी शक्ती येवो, की मी जी इच्छा करीन ती पूर्ण होवो. मी माझ्या ध्येयाच्या दिशेनं दोन पावलं जर पुढं गेलो, तर ध्येयच माझ्याकडं चालत यायला हवं.)
‘‘व्वा, खूप छान; पण यातला शेवटचा शेर अधिक योग्य आहे,’’ ती म्हणाली ः
ऐ बर्क-ए-तज्जली क्‍या तूने मुझको भी मूसा समझा है?
मै तूर नही जो जल जाऊं, जो चाहे मुकाबिल आ जाए।
(हे परमेश्वरा, तू काय मला मोझेस समजलास काय, की वीज कोसळल्यानं मी जळून जाईन? वीज कोसळली म्हणून जळून जायला मी काही गवताचा भारा नव्हे!)
उषाचं हे म्हणणं बरोबर होतं...कारण, प्रत्येक संभाषणात उषाचा शब्द नेहमीच शेवटचा असतो!

Web Title: dr yashwant thorat's article in saptarang