हिंदी है हम वतन है हिंदोस्तां हमारा... (डॉ. यशवंत थोरात)

डॉ. यशवंत थोरात ythorat@gmail.com
रविवार, 26 मार्च 2017

‘‘तुम्हाला असं वाटतं का, की आम्ही कुणाला आमच्यात फूट पाडू देऊ? आणि असं कुणी करताना आम्ही नुसतं बघत राहू का? आम्ही लहान आहोत; पण आमच्याजवळ आमचं स्वतःचं मन आहे. आम्हाला अजिबात कमी लेखू नका. आजूबाजूला काय घडतंय याची आम्हाला जाणीव आहे. आम्ही शांत आहोत याचा अर्थ आम्ही आमची वेळ येण्याची वाट पाहत आहोत. योग्य आणि अयोग्य यातला फरक आम्हाला कळतो...’’

‘‘तुम्हाला असं वाटतं का, की आम्ही कुणाला आमच्यात फूट पाडू देऊ? आणि असं कुणी करताना आम्ही नुसतं बघत राहू का? आम्ही लहान आहोत; पण आमच्याजवळ आमचं स्वतःचं मन आहे. आम्हाला अजिबात कमी लेखू नका. आजूबाजूला काय घडतंय याची आम्हाला जाणीव आहे. आम्ही शांत आहोत याचा अर्थ आम्ही आमची वेळ येण्याची वाट पाहत आहोत. योग्य आणि अयोग्य यातला फरक आम्हाला कळतो...’’

आम्हा मित्रमंडळींचा एक छोटासा ग्रुप आहे. आम्ही सगळे एकमेकांना खूप वर्षांपासून ओळखतो. आम्ही वेगवेगळ्या व्यवसायात, वेगवेगळ्या ठिकाणी स्थिरावलेलो असलो, तरी एकमेकांशी संपर्क ठेवून असतो आणि वर्षातून किमान एकदातरी भेटतोच. आम्ही सगळेच जण आता उतारवयाकडं झुकलो आहोत. आमच्यामध्ये एक माजी सैनिक आहेत...शिवाजी. नितीन आणि हिरा हे माजी सनदी अधिकारी आहेत. हिमांशू, रेखा आणि सौरभ हे उद्योगजगतातले आहेत. शंतनू आणि गोपाळ हे निवृत्त शिक्षणतज्ज्ञ आहेत. सुषमा या जागतिक बॅंकेतल्या माजी अधिकारी आहेत. उमा या कादंबरीकार आहेत. या सगळ्यांच्या बरोबर आहोत आम्ही दोघं, म्हणजे मी, माझी पत्नी उषा. आमच्यामध्ये आता कुणी लपवाछपवी करत नाही. आम्ही सगळे एकमेकांना ओळखून आहोत. सगळ्यांचे मुखवटे एकमेकांना माहीत आहेत. सगळ्यांनीच सगळ्यांना ‘जसे आहेत तसे’ स्वीकारलेलं आहे आणि आम्हीही हे जग जसं आहे तसं स्वीकारलं आहे.
आजूबाजूला घडणाऱ्या राजकीय आणि सामाजिक घडामोडींमुळं आणि त्यातल्या मूल्यविषयक प्रश्‍नांच्या संवेदनांमुळे आम्ही एकत्र आलो; पण तसं पाहिलं तर आमच्यातला प्रत्येकजण अगदी वेगळ्या विचारांचा आहे. अगदी लोणी आणि चुना यात असावी एवढी भिन्नता आमच्यात आहे. नितीन आणि सुषमा उदारमतवादी आहेत. रेखा आणि गोपाळ यांची कुटुंबं फाळणीनंतरच्या दंगलीत होरपळली होती. ते कट्टर उजव्या विचारसणीचे आहेत. हीरा आणि उषा राज्यघटनेतल्या मूल्यांच्या निकषावर आपली भूमिका ठरवत असतात. उमा समाजवादी विचारसरणीची आहे, तर हिमांशू भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा नोंदणीकृत सदस्य होता. शिवाजी हा कडक शिस्त आणि कार्यक्षम प्रशासन यांचा समर्थक आहे. सौरभ आणि शंतनू संघाचे निष्ठावान स्वयंसेवक आहेत. या सगळ्यांपेक्षा मी थोडा वेगळा आहे. बंडखोर वृत्तीचा, लोकशाहीवादी, धर्मनिरपेक्ष विचारांचा, शंकेखोर आणि थोडा निराशाग्रस्त. (उषाचा मात्र या ‘निराशाग्रस्त’ शब्दाला आक्षेप आहे. स्वप्नाळू आदर्शवाद लपवण्याचा हा माझा प्रयत्न आहे, असं तिला वाटतं). या सगळ्या चर्चेचा मी सर्वमान्य निमंत्रक आणि सूत्रधार आहे.

आम्ही सगळेजण धर्मनिरपेक्षतेवरची एक सभा ऐकून परतलो होतो. महात्मा गांधी एकदा म्हणाले होते ः ‘‘आपल्या देशात एकच धर्म असावा, असं मला वाटत नाही. इथं सगळे केवळ हिंदू किंवा केवळ ख्रिश्‍चन किंवा केवळ मुस्लिम असावेत असं नाही; पण इथले सगळेजण सहिष्णू असावेत आणि सगळे धर्म इथं गुण्यागोविंदानं नांदावेत, एवढीच माझी अपेक्षा आहे.’
आम्ही घरी येऊन स्थिरावलो. एवढ्यात हीरा म्हणाली ः ‘‘कुणी काहीही म्हणो, पण गांधीजींचंच म्हणणं बरोबर होतं.’’

‘‘मुळीच नाही,’’ तिला थांबवत रेखा म्हणाली ः ‘‘गांधीजींनी एखादं वाक्‍य उच्चारलं म्हणजे ते खरंच आहे असं नाही. त्यांचा प्रत्येक शब्द हा जणू वेदवाक्‍य आहे, असं मानणं बरोबर नाही. तुम्हाला सगळ्यांनाच हे माहीत आहे, की अनेक विषयांवर ते अगदी विचित्र आणि अनाकलनीय कल्पना मांडत असत. तुमचा निकष लावायचा, तर मग त्यांचं प्रत्येक वाक्‍य राष्ट्रीय धोरण म्हणून का स्वीकारत नाही?’’
‘‘मित्रांनो, सॉक्रेटिससारख्या विचारी तत्त्ववेत्त्यानं म्हटलंय, की निरर्थक आणि कडवट चर्चा टाळण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आपण कशावर चर्चा करतोय ते नेमकं माहीत असणं. चर्चेचा विषय आधी ठरवा, एवढंच त्यांचं म्हणणं होतं,’’ मी म्हणालो.
‘‘आपण आपल्या देशातल्या धर्मनिरपेक्षतेबद्दल बोलतोय हे स्पष्टच आहे,’’ उषा म्हणाली.

‘‘हे वरवर खरं आहे; पण इथल्या राजकीय क्षेत्रात विभिन्न धर्मांचे लोक समानतेनं नांदतात का, हा खरा प्रश्‍न आहे,’’ हिमांशू म्हणाला.
‘‘मान्य आहे,’’ उमा म्हणाली ः ‘‘हाच मुख्य प्रश्‍न आहे. कारण, स्वतःला सर्वसमावेशक म्हणविणारे धर्मही शिताफीनं अनेकांना वगळून माणसामाणसांमध्ये भिंती निर्माण करतात, असंच बऱ्याच वेळा दिसतं.’’
‘‘थोरात सर, तुम्हाला काय वाटतं?’’ शंतनूनं विचारलं.
‘‘धर्म या भिंती निर्माण करतात की मानवी स्वभावच त्याला कारणीभूत आहेत, हे मला नक्की सांगता यायचं नाही. शेवटी धर्म ही माणसाची निर्मिती आहे. आणि काही वेळा त्यात मानवी मनात खोलवर दडलेली काळी बाजू प्रत्ययाला येते,’’ मी म्हणालो.
एखाद्याचं म्हणणं पुरेसं स्पष्ट नसलं, तर उषाला धीर धरवत नाही. ती त्याच्यावर तुटून पडते. माझ्याकडं पाहत उपहासानं ती म्हणाली ः ‘‘अगदी सोपा विषयही कमालीचा क्‍लिष्ट करण्याची अनोखी कला माझ्या नवऱ्याकडं आहे. कोणत्याही विषयाला ते तत्त्वज्ञानाची अशी काही डूब देतात, की मग चर्चा शेवटापर्यंत जात नाही आणि कुठलाच उपायही सापडत नाही. त्यांच्याकडं दुर्लक्ष करून आपण वस्तुस्थितीवर बोलू. आपण धर्मनिरपेक्ष आहोत. कारण, आपली राज्यघटना तसं सांगते. ‘वुई द पीपल ऑफ इंडिया’ असं घटनेत म्हटलेलं आहे आणि आपण ते मान्य केलंय. त्यामुळं आपल्याला आता त्या बाजूनं उभं राहिलं पाहिजे.’’ ‘‘बरोबर आहे,’’ शिवाजी म्हणाला ः ‘‘पण देशाची घटना हा काही ‘मृत मसुदा’ नाही. ते लोकांच्या बदलत्या आशा-आकांक्षांचं जितंजागतं प्रतीक आहे. बंदिस्त, अपरिवर्तनीय घटना काही काळानंतर कालबाह्य होईल.’’

‘‘खरंय. म्हणून तर धर्मनिरपेक्षतेचं तत्त्व सकृद्दर्शनी मान्य करूनही गांधीजींचं विधान वस्तुस्थितीला कितपत धरून आहे, असा माझा प्रश्‍न आहे. आपण खरोखर धर्मनिरपेक्ष आहोत का आणि त्याहीपेक्षा आपला देश खराखुरा धर्मनिरपेक्ष असू शकतो का, हा माझा प्रश्‍न आहे. वास्तवात ज्या देशात एवढे धर्म आणि पंथ आहेत, तो देश खऱ्या अर्थानं धर्मनिरपेक्ष असूच शकत नाही, असं मला वाटतं. आपली धर्मनिरपेक्षता ही वरवरची आहे. स्वातंत्र्यानंतरची गेली ७० वर्षं आपण तो मुखवटा घातला आहे. कारण, राजकीयदृष्ट्या तो फायद्याचा होता आणि सामाजिकदृष्ट्या उच्चभ्रू लोकांमध्ये ती एक फॅशन बनली होती. आता तशी गरज नसल्यामुळं कुत्र्याचं शेपूट आता पुन्हा पहिल्यासारखे वाकडे झाले आहे,’’ सौरभच्या या विधानामुळं काही काळ एकदम शांतता पसरली.

त्या शांततेचा भंग करत शिवाजी म्हणाला ः ‘सौरभ, तुला तुझ्या राजकीय मतांचीच पुंगी वाजवायची असेल तर माझी काही हरकत नाही; पण काही अर्थपूर्ण संवाद करायचा असेल तर एक लक्षात ठेव, की कोणत्याही निष्कर्षाला येण्यापूर्वी वस्तुस्थिती एकदा नीट तपासली पाहिजे.’’

संवादाचा हाच धागा उषानं बरोबर पकडला. ती म्हणाली ः ‘‘हे सगळ्यांना माहीतच आहे, की स्वातंत्र्यलढ्याच्या काळात धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वाचा खूप प्रभाव होता. मात्र, फाळणीनं देशाचे तुकडे झाले. सर्वत्र जातीय दंगली भडकल्या आणि गांधीजींची हत्या झाल्यानंतर उद्‌भवलेल्या परिस्थितीत आपल्या थकलेल्या देशानं धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वाला घटनात्मक दर्जा दिला.’’

‘‘इतिहासाबद्दलचा तो अगदी खास काँग्रेसी दृष्टिकोन आहे,’’ शंतनू म्हणाला. ‘‘वस्तुस्थिती खरंच तशी होती का? धर्माच्या आधारावर देशाचे दोन तुकडे करायला त्याही वेळी एका मोठ्या समुदायाचा विरोध नव्हता का? जसं सांगितलं जातं, त्याप्रमाणे गांधीजींची तत्त्वं जगानं खरोखरच स्वीकारली आहेत का? आपण धर्मनिरपेक्षता स्वीकारली ती लोकांना हवी होती म्हणून की देशाची धार्मिक आणि सांस्कृतिक विविधता टिकवण्याचा हाच एकमेव मार्ग आहे, असं त्या काळातल्या काही प्रभावी नेत्यांनी वारंवार मांडलं म्हणून?’’
‘‘थांबा,’’ हिरा कडाडली. म्हणाली ः ‘‘पहिल्या पिढीचे नेते थोर देशभक्त होते आणि त्यांची देशावरची निष्ठा वादातीत होती. त्यांनी लोकांच्या इच्छेविरुद्ध देशावर धर्मनिरपेक्षता लादली असा आरोप करणं चुकीचं आहे.’’

तिचा रुद्रावतार पाहून शंतनूनं निमूटपणे माघार घेतली. तो म्हणाला ः‘‘मला तुझं म्हणणं पटतं. त्या वेळच्या नेत्यांनी धर्मनिरपेक्षता लोकांवर लादली नाही; पण त्यांनी त्यांच्या कर्तृत्वानं आणि वक्तृत्वानं लोकांना मोहिनी घातली होती.’’
‘‘तसं असेल किंवा नसेलही; पण स्वातंत्र्योत्तर भारतात सामाजिक अभिसरण खूप गुंतागुंतीचं बनलं. हे खरं आहे, की धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वानं एक विशिष्ट उंची गाठली; पण सरकारी यंत्रणा आणि नोकरशाही त्या अर्थानं धर्मनिरपेक्ष बनली नाही. काँग्रेसची जी सरकारं पूर्वी धर्मनिरपेक्ष होती, त्या सरकारांमध्येही अनेकजण असे होते, की जे धर्मनिरपेक्षतेपासून खूप दूर होते. त्यामुळं निर्माण झालेली विचित्र सामाजिक स्थिती आजही तशीच आहे. अनेकांचा मुखवटा धर्मनिरपेक्षतेचा असला तरी अंतरंग वेगळंच आहे.’’

सन १९७० आणि १९८० च्या दशकात धर्मनिरपेक्षतेवर गंभीर हल्ला झाल्याचं हेच तर कारण नाही ना?’’ मी विचारलं.
‘‘नक्की सांगता येणार नाही; पण ‘मंडल’ पर्वानंतर वरच्या आणि खालच्या जातींमध्ये संघर्ष सुरू झाला,’’ उमा म्हणाली ः ‘‘बहुसंख्याकांच्या जिवावर अल्पसंख्याकांचे लाड होत असल्याचं लोक उघडपणे बोलायला लागले. ‘अल्पसंख्याकांना दिलेले विशेष अधिकार काढून घेतले पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली.’’ ‘‘उमा बरोबर सांगतेय,’’ रेखा म्हणाली ः ‘‘मी त्या वेळी जिल्हाधिकारी होते आणि मला पक्कं आठवतंय, की धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वज्ञानाला, बहुविध संस्कृतीला आणि सर्वसमावेशक राष्ट्रवादाला तात्त्विक पातळीवर विरोध करणाऱ्या उजव्या विचारसरणीच्या संघटनांमध्ये याच काळात वाढ झाली. मात्र, बाबरी मशीद प्रकरणानंतर तर समाजातल्या एका वर्गानं देशाच्या इतिहासात आणि संस्कृतीत असलेला अल्पसंख्याकांचा सहभागही नाकारायला सुरवात केली. यातून देशभर हिंसाचार माजला आणि त्यातून हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही समाजांत असलेली दरी मात्र बटबटीतपणे समोर आली.’’
‘‘परिस्थिती निवळत असतानाच २००२ मध्ये गुजरातमध्ये दंगल झाली,’’ हिमांशू म्हणाला ः ‘‘आणि घडलेल्या घटनांमध्ये सरकारचा हात असल्याचा आरोप पहिल्यांदाच केला गेला. त्या वेळी हिंदुराष्ट्राचा उद्‌घोष पुन्हा करण्यात आला.’’
त्याच्या बोलण्यावर सौरभ चांगलाच संतापला. म्हणाला ः ‘‘‘माफ कर, हिमांशू; पण तुझी बोलण्याची पद्धत आणि बोलण्याचा रोख बरोबर नाही. हिंदुराष्ट्राची कल्पना अनैतिक आहे, असंच तुला म्हणायचंय, असं तुझ्या बोलण्यावरून वाटतंय. त्याबद्दल बोलण्यात काय चूक आहे? हक्क काय फक्त अल्पसंख्याकांनाच आहेत का? लोकांना वाटलं तर ते सर्वसमावेशकतेच्या तत्त्वाविरुद्ध बोलू शकत नाहीत का? तुला फक्त हिंदूच दिसतात का? धर्मनिरपेक्ष भारताला फक्त हिंदूंकडूनच धोका आहे, असं तू का मानतोस? ‘मतपेढीच्या राजकारणामुळं अल्पसंख्याकांचे अतिलाड चाललेत आणि धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली सरकार धर्मांध शक्तींचं लांगुलचालन करत आहे,’ असं कुणी म्हटलं तर तू एवढा अस्वस्थ का होतोस?’’

वातावरण चांगलंच तापल्यामुळं मी मध्ये पडलो. म्हणालो ः ‘‘‘सौरभ. तुझं म्हणणं बरोबर आहे. प्रत्येक गोष्टीवर चर्चा करण्याचा अधिकार लोकशाही आपल्याला देते. मग १३ कोटी मुस्लिमांनी पाकिस्तानात जायच्या ऐवजी भारतात राहायचं ठरवलं, या गोष्टीला काही अर्थ आहे की नाही? बाकी काही असो; पण या एका गोष्टीमुळंच देशाचे ते खरे नागरिक आहेत, हे सिद्ध होत नाही का? मला वाटतं, की सगळ्यांना समान संधी मिळायला हवी; पण अशी समान संधी काही फक्त कायदा करून मिळत नाही. त्यासाठी संसदेत केलेले कायदे पूर्ण संवेदनशीलतेनं राबवले गेले पाहिजेत. आजही बहुसंख्य मुस्लिमांची आर्थिक व सामाजिक स्थिती अन्य समाजातल्या लोकांपेक्षा वाईट आहे, ही वस्तुस्थिती तू नाकारू शकतोस का?’’

‘‘मुस्लिमांच्या होणाऱ्या तथाकथित अतिलाडामधून अदूरदर्शी सरकारांच्या स्वयंघोषित अशा धार्मिक व राजकीय अल्पसंख्य नेत्यांनी केलेली हीन तडजोडच दिसून येते. असे नेते अल्पसंख्याकांच्या खऱ्या स्थितीकडं दुर्लक्षच करत असतात,’’ मी म्हणालो. ‘‘थोरात यांचं म्हणणं अगदी बरोबर आहे,’’ सुषमा म्हणाली ः ‘‘लोकशाही ही जनतेच्या आवाजावर अवलंबून असते, तर धर्म हा परमेश्‍वराच्या शब्दावर अवलंबून असतो. कोणत्याही राजकीय वा न्याययंत्रणेनं परमेश्‍वरी इच्छा निर्णायक मानली, की मग जनतेच्या इच्छेला आपोआपच दुय्यम स्थान प्राप्त होतं. धर्मनिरपेक्षतेचं मूल्य यासाठी जास्त, की बुद्धीच्या आधारावर तिची भूमिका ठरते. ती समाजामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाधिष्ठित वातावरण निर्माण करते. त्यातूनच आधुनिक जगाचा पाया निर्माण होत असतो. त्यामुळं तिला स्वाभाविकपणे बुद्धिवादाचीच कास धरावी लागते. तिला समाजातल्या हितसंबंधी गटांकडून विरोध होतो. इतिहास असं सांगतो, की एकसंध समाजातले अल्पसंख्य व दडपलेले लोक नेहमी धर्मनिरपेक्षतेला पाठिंबा देतात. कारण, अशा वातावरणात त्यांना त्यांचा राजकीय हक्क मिळवण्यासाठी चर्चा करण्याची एक उदार मुभा असते. इतिहास असंही सांगतो, की अशा लढ्यांना प्रतिक्रियावादी शक्तींकडून विरोधच होत असतो. कारण, आकांक्षांच्या अभिव्यक्तीतून त्यांच्या अस्तित्वालाच धोका निर्माण होऊ शकतो. गांधीजींचंच उदाहरण देण्याचा धोका पत्करून मी तुम्हाला पुन्हा त्यांच्याच शब्दांची आठवण करू देते. त्यांनी म्हटलं होतं, ‘माझा धर्म मला प्रिय आहे. त्यासाठी मी मरणही पत्करीन; पण तो माझा व्यक्तिगत मुद्दा आहे. सरकारचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. सरकारनं लोककल्याण, आरोग्य, दळणवळण, परराष्ट्र व्यवहार, चलन आणि तत्सम अन्य गोष्टींकडून धर्मनिरपेक्ष भूमिकेतूनच पाहिलं पाहिजे. मात्र, धर्माकडं बघण्याची सरकारला गरज नाही. धर्म ही प्रत्येकाची खासगी बाब आहे.’ माझ्या मते सध्याच्या राजकारणातल्या धर्मनिरपेक्षतेचं समर्थन करण्याचा किंवा ती टिकवण्याचा प्रश्‍न महत्त्वाचा नाही, तर एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र उभं करणं महत्त्वाचं आहे.’’

‘‘एक गोष्ट लक्षात ठेवा,’’ मी म्हणालो ः‘‘सर्वसाधारणपणे धर्मनिरपेक्ष राष्ट्रासाठी हिंदू तत्त्वज्ञान अधिक अनुकूल आहे. कारण, त्यात विरोध व्यक्त करण्याची किंवा सहिष्णुतेची दीर्घ परंपरा आहे. आपला दुबळेपणा म्हणून नव्हे, तर आपली शक्ती म्हणून ही बाब आपण जगासमोर आणली पाहिजे. त्यामुळं आपण विविधतेचा आदर करायला शिकलं पाहिजे. कारण, त्यातच लोकशाहीचा आत्मा आहे आणि एक राष्ट्र म्हणून दीर्घकाळ टिकण्याची हमी त्यात आहे.’’

‘‘थोरात यांचं बोलणं रास्त आहे,’’ शिवाजी म्हणाला ः ‘‘आपण दडपशाहीतून आलेल्या ऐक्‍यापेक्षा नागरिकांचे हक्क आणि कायद्याचे राज्य यातून निर्माण होणाऱ्या लोकशाहीच्या ऐक्‍यासाठी झगडलं पाहिजे. आपला इतिहास आणि संस्कृती इतरांना सामावून घेणारी आहे. आणि म्हणून ‘हिंदी है हम, वतन है...हिंदोस्ता हमारा!’ आम्ही बोलण्यात एवढे गढून गेलो होतो, की ती मुलं कधी आली ते आम्हाला समजलंही नाही. ती मुलं येऊन शांतपणे व्हरांड्यात बसली होती. किती वेळापासून ती मुलं आमचं बोलणं ऐकत होती कोण जाणे. प्राची सगळ्यांच्या वतीनं म्हणाली ः ‘‘मी जन्मानं हिंदू आहे; पण मला मुस्लिम, ख्रिश्‍चन, ज्यू, बौद्ध, शीख असण्याचा अभिमान आहे. या सगळ्या परंपरांचं रक्त गेल्या कित्येक शतकांपासून माझ्या धमन्यांमधून वाहत आहे. त्यांनीच माझं पालन-पोषण केलं आहे. त्यांनीच मला समृद्ध केलं आहे. त्यांनीच माझी मूल्यं, श्रद्धा, विचार आणि कृती यांना आकार दिला आहे. मिर्झा गालिब यांच्या गझला मला जेवढ्या भावतात, तेवढ्याच महादेवी वर्मा यांच्या कविताही. सूफी संगीत मला जसं स्पर्शून जातं, तशाच मराठी संतांच्या अभंगरचनाही मला आवडतात आणि लॅटिन भाषेतली कॅथॉलिक वचनं. ते म्हणजे मी, मी म्हणजे ते आणि आम्ही म्हणजे भारत! तुमचा विश्‍वास बसणार नाही; पण सलीम, पीटर किंवा राहुल यांच्यात फरक करावा, अशी कल्पनाही माझ्या किंवा त्यांच्या मनाला कधी शिवली नाही. तुम्ही ज्याची चर्चा करत आहात, त्या विषयांना आमच्यापैकी कुणीही कधी फारसं महत्त्व दिलं नाही, हे खरं आहे. आम्हाला अल्पसंख्य किंवा बहुसंख्याकांमध्ये विभागण्याचा कुणाला काय अधिकार आहे? तुम्हाला माहीत आहे का, की ज्यांनी या देशाचं ऐक्‍य अभंग राखण्यासाठी प्राणांचं बलिदान केले, ते भारतीय होत; हिंदू किंवा मुसलमान नव्हे. अब्दुल हमीद खेमकरणमध्ये हुतात्मा झाला, तेव्हा तो काय पाकिस्तानचा विचार करत होता का? त्याची इस्लामवर श्रद्धा होती म्हणून पाकिस्तानी सैनिकांच्या गोळ्यांनी त्याला मारलं नाही, असं झालं का? कर्नल तारापोर यांचा सन्मान झाला तेव्हा परमवीरचक्र पारशी व्यक्तीला दिलं गेलं की भारतीय व्यक्तीला? केलोर बंधूंनी भारतीय नभांगणात शत्रूची विमानं उद्‌ध्वस्त केली, तेव्हा ते कुणाचं रक्षण करत होते? ख्रिश्‍चनांचं? तुम्ही सगळी वयस्कर मंडळी तुमच्या मनात जो भारत आहे, त्याविषयीच बोलत आहात. आमची तुम्हाला एवढीही खात्री नाही? तुम्हाला असं वाटतं का, की आम्ही कुणाला आमच्यात फूट पाडू देऊ आणि असं कुणी करताना आम्ही नुसतं बघत राहू? आम्ही लहान आहोत; पण आमच्याजवळ आमचं स्वतःचं मन आहे. आम्हाला अजिबात कमी लेखू नका. आजूबाजूला काय घडतंय, याची आम्हाला जाणीव आहे. आम्ही शांत आहोत याचा अर्थ आम्ही आमची वेळ येण्याची वाट पाहत आहोत. योग्य आणि अयोग्य यातला फरक आम्हाला कळतो. योग्य गोष्टींसाठी आमच्यावर विश्‍वास टाका आणि पाहा, आम्ही त्या करून दाखवू. तुम्ही ज्या भारताला आकार दिलात, तो भारत काही तुमचा एकट्याचा नाही, तो आमचाही आहे आणि कुणीही तो आमच्यापासून हिरावून घेऊ शकणार नाही.’’ प्राची एवढं बोलली आणि ती एकदम रडायलाच लागली.

चष्मा पुसण्याच्या निमित्तानं मी माझ्या डोळ्यातले अश्रू पुसले. मी बघितलं तेव्हा इतरही तेच करत होते. गेल्या काही दिवसांतल्या घटनांमुळे आम्ही सगळेच जण थोडे अस्वस्थ झालो होतो. येणाऱ्या काळात विघटनवादी शक्ती बळावतील का, अशी मला भीती वाटत होती. फैज अहमद फैज यांनी ‘सुबह-ए-आजादी’ या त्यांच्या कवितेत नेमकं हेच म्हटलंय. एका पिढीची व्यथा व्यक्त करताना त्यांनी त्यांच्या देशाला सांगितलंय ः
ये दागदाग उजाला, ये शबगजीदा सहर
वो इन्तजार था जिसका, ये वो सहर तो नही।

प्राचीनं माझी भीती पूर्णपणे घालवली नाही; पण आजूबाजूला घडणाऱ्या घडामोडींकडं योग्य पद्धतीनं पाहण्याची दृष्टी मला दिली. ‘तात्त्विक मतभेद मनाला फार लावून घेऊ नका; कारण ते लोकशाहीतल्या चर्चा करण्याच्या आणि विरोध व्यक्त करण्याच्या प्रक्रियेचे एक घटक आहेत आणि भविष्यात कितीही जरी संकटं आली, तरी आपला देश योग्य मार्गावरच असेल याची खात्री बाळगा,’ असं ती मला हळुवारपणे सांगत होती. तरुण भारतीयांच्या सद्‌बुद्धीचा आणि कुठल्याही परिस्थितीत हार न मानण्याच्या त्यांच्या विजिगीषू वृत्तीचाच सरतेशेवटी विजय होईल, असाही विश्‍वास तिनं मला दिला.

Web Title: dr yashwant thorat's article in saptarang