कारण, मला शांतता हवी आहे...! (डॉ. यशवंत थोरात)

कारण, मला शांतता हवी आहे...! (डॉ. यशवंत थोरात)

‘‘कितीही दोष असले तरी प्रशासकीय सेवा हाच बदल घडवण्याचा सगळ्यात शक्तिशाली मार्ग आहे. तुमचं म्हणणं मी सार्थ ठरवीन. त्या आदिवासी मुलीच्याही विश्वासाला मी पात्र ठरीन. मी सेवेतच राहीन आणि विजय मिळेपर्यंत लढत राहीन. मी मनोमन अशी प्रतिज्ञा करत आहे...’’

जयश्रीचा ई-मेल पाहून मला थोडं आश्‍चर्यच वाटलं. अध्यापन हे माझं दीर्घकाळचं स्वप्न होतं. ‘नाबार्ड’मधून निवृत्त झाल्यानंतर ते पूर्ण करायचं मी ठरवलं आणि नव्यानं स्थापन झालेल्या एका इन्स्टिट्यूटमध्ये इतिहास आणि तत्त्वज्ञान हे विषय शिकवायला सुरवात केली. निवृत्तीनंतर मी करू शकत असलेली हीच सगळ्यांत चांगली गोष्ट होती. शिकवणं ही माझी सगळ्यात आवडती गोष्ट होती. जयश्री माझी त्या वेळची विद्यार्थिनी. एक शांत आणि अभ्यासू मुलगी. साधी-सरळ, थोडी अलिप्त; पण सामाजिक प्रश्नांबाबत एकदम हळवी. एका गरीब, पापभीरू आणि सर्वसामान्य जीवन जगणाऱ्या शेतकरी कुटुंबातून ती आली होती. मी तिचा मेल वाचला. खूप वर्षांत काही संपर्क न ठेवल्याबद्दल तिनं क्षमायाचना केली होती. पदवीनंतर तिची भारतीय प्रशासकीय सेवेत (आयएएस) निवड झाली. छत्तीसगडमध्ये तिची नेमणूक झाली होती. सुरवातीच्या काळात आयएएसची हवा तिच्या डोक्‍यात होती; पण लवकरच ती निघून गेली आणि आता तर ती व्यक्तिगत आणि व्यावसायिक वाटेवरच्या अशा वळणावर आली होती, की कुठला मार्ग निवडावा, हे तिला कळत नव्हतं. एक शिक्षक म्हणून तिला दोन गोष्टींबाबत माझा सल्ला हवा होता. त्यासाठीच तिनं तो ई-मेल पाठवला होता.

पहिली गोष्ट वैचारिक किंवा थोडी तात्त्विक स्वरूपाची होती. अधिकारपद स्वीकारताना तिनं तिची ग्रामीण मूल्य आणि संदर्भ बरोबर नेले होते. प्रशासकीय अधिकाऱ्याचं काम तसं सरळसोट आहे, नियमांच्या चौकटीत बांधलेलं आणि कायद्याच्या रुळलेल्या वाटेने जाणारं; पण तिच्या शैक्षणिक आणि व्यक्तिगत आयुष्यात ‘प्रत्यक्ष जीवनातले अनुभव वेगळे असतात,’ अशी जाणीव तिला कधी झाली नव्हती. जीवनात कोणतीही गोष्ट पूर्ण बरोबर किंवा पूर्ण चूक असत नाही, हे तिला माहीत नव्हतं. प्रत्यक्ष जीवनात सत्य ही एक संदिग्ध आणि सापेक्ष कल्पना असते, प्रामाणिकपणा हा एक संशयास्पद गुण असतो आणि चूक की बरोबर या जंजाळातून मार्ग काढण्यासाठी नियमांचं पुस्तक अगदीच निरुपयोगी ठरतं, हेही तिला ठाऊक नव्हतं. त्यामुळंच ती गोंधळली होती.

दुसरा प्रश्न हा पहिल्यातूनच निर्माण झाला होता. प्रशिक्षणानंतर तिची आदिवासी आणि माओवाद्यांचं प्राबल्य असलेल्या जिल्ह्यात नेमणूक झाल्यानं तिला खूपच आनंद झाला होता. तिच्यातला सुधारक या नेमणुकीतल्या अडचणींकडं आदिवासींचे प्रश्न सोडवण्याची संधी म्हणून पाहत होता. रुजू होताच तिनं स्वतःला कामात बुडवून घेतलं. प्रवास, बैठका, कार्यक्रम, संबंधितांच्या अडचणी ऐकणं, त्यांच्या प्रश्नांबाबत वरिष्ठांशी चर्चा या सगळ्यात सकाळी नऊपासून रात्रीचे नऊ कधी वाजायचे ते तिला कळायचंही नाही. जीव ओतून ती काम करत होती आणि त्याबद्दल तिची प्रशंसाही होत होती. या सगळ्या गोष्टींबद्दल ती सर्वार्थानं खूष होती.

दुर्दैवानं तिला तिच्या मर्यादा लक्षात आल्या नाहीत. ध्येयानं झपाटलेल्या अवस्थेत ती पुढं पुढंच जात राहिली. तिच्याच जिल्ह्यात एका आदिवासी मुलीवर बलात्कार झाल्याची खबर तिला मिळाली. तिचा संताप अनावर झाला. तिनं तातडीनं चौकशी केली, माहिती जमवली, पुरावे गोळा केले आणि अल्पावधीत एका जंगल-ठेकेदाराला अटक केली. तिथंच तिच्यात आणि जंगल-माफियांमध्ये संघर्षाची ठिणगी पडली. त्याच दिवशी संध्याकाळी एका स्वयंघोषित लोकप्रतिनिधीनं तिची भेट घेतली. त्यानं वरवर तिच्या धाडसाचं कौतुक केलं; पण त्याच वेळी त्यानं तिला काळजी घेण्याचा इशाराही दिला. तिनं त्याचं म्हणणं ऐकून घेतलं. आपल्याजवळचे पुरावे त्याला दाखवले; पण आश्‍चर्य म्हणजे समजूतदारपणा दाखवण्याचा व प्रकरण मिटवण्याचा सल्ला त्यानंच तिला दिला. तिनं क्षणार्धात त्याला नकार दिला. तिच्या या निर्णयावर वेगानं प्रतिक्रिया उमटल्या. त्या संदर्भातल्या बातम्या सगळीकडं छापून आल्या. सहकाऱ्यांनी सबुरीचा सल्ला दिला. सामाजिक संस्थांनी तोंडभरून कौतुक केलं. आपल्याला न्याय मिळेल, या आशेकडं आदिवासी डोळे लावून बसले. या प्रकरणाला एवढी प्रसिद्धी मिळाली, की त्यामुळं प्रस्थापित राजकीय नेते चिडले. तिची अंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली. ‘लोकांची स्मृती अल्प असते,’ असं सांगत तिच्या वरिष्ठांनी तिला रजेवर जाण्याचा सल्ला दिला. तोपर्यंत प्रकरण निवळेल, असं त्यांचं म्हणणं होतं. तिनं रजेवर जायला नकार दिला. गोष्टी विकोपाला गेल्या. तिची अन्यत्र एका प्रभावहीन पदावर बदली करण्याचा तोडगा पुढं आला. ती उद्विग्न झाली. आपला गुन्हा काय, हेच तिला समजत नव्हतं. प्रामाणिकपणे कर्तव्य निभावण्याच्या तिच्या कृतीला भलतंच बक्षीस मिळालं होतं. मनातल्या क्षोभामुळं ती कोसळण्याच्या बेतात होती.

तिच्या पत्रात तिनं आरोपाचं एक बोट माझ्यावर - म्हणजे ती ज्याला आदर्श मानत होती त्याच्यावरही - रोखलं होतं. मीच तिला प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नैतिकतेबद्दल, त्यांच्या निष्ठेबद्दल आणि अन्यायाविरुद्ध निधड्या छातीनं उभं राहण्याबद्दल प्रवचनं दिली होती. आज तिच्या दृष्टीनं ती केवळ तोंडाची वाफ ठरली होती. माझा प्रत्येक शब्द वेदवाक्‍यासारखा मानून ती त्याप्रमाणं वागत होती; पण त्यामुळं तिचं करिअर आणि व्यक्तिगत आयुष्य दोन्ही अडचणीत आलं होतं.
‘‘सर, एवढच सांगा, की मी आता काय करू,’’ असा काळजात घुसणारा प्रश्न तिनं त्या ई-मेलमधून मला विचारला होता.  
जयश्रीच्या पत्राचं प्रिंटआउट हातात झरून मी कितीतरी वेळ सुन्न होऊन बसलो होतो. व्यवहारतः तिचं बोलणं योग्यच होतं. हजारो अधिकाऱ्यांना हे रोज भोगावं लागत होतं. त्या त्या प्रसंगाची कथा वेगळी असेल कदाचित; पण समस्या मात्र तीच होती. बदलत्या मूल्यांच्या काळात आपल्या निष्ठा कशा सांभाळायच्या, हाच त्या सगळ्यांपुढचा खरा प्रश्न होता.

इतरांनी दिलं तसं थातुरमातुर उत्तर मी तिला देऊ शकत नव्हतो. ‘तू अधिक समजूतदार हो,’ असं ना मी धड सांगू शकत होतो, ना तिला उपदेशाचे डोस पाजू शकत होतो, की बाई गं, या जगात जगण्याला लायक असतात तेच जगतात किंवा खरं यश प्रामाणिकपणातून नव्हे; तर तत्त्वांशी बेमालूम तडजोड केल्यानंच मिळत असतं.
बराच वेळ मी विचार करत बसलो होतो. अखेर एक कल्पना मला सुचली. ‘एका परिषदेसाठी रायपूरला येतोय. परतताना एक-दोन दिवस तुझ्याकडं येऊ शकतो’ असा मेल मी तिला पाठवला. यातलं रायपूरच्या परिषदेचं निमित्त तद्दन खोटं होतं. दहा मिनिटांत तिचं उत्तर आलं ः ‘सर, ग्रेट ! कधी येताय ते कळवा. मी वाट बघतेय...’
ठरलेल्या दिवशी मी सायंकाळच्या सुमारास तिच्याकडं पोचलो. व्हरांड्यात बसून ती फायली हाताळत होती. मला पाहताच तिचे डोळे लकाकले.

‘वेलकम’ म्हणत तिनं परंपरागत पद्धतीनं माझ्या पायांना हात लावून मला नमस्कार केला. ‘‘यशवंत हो’’ असा मी तिला तोंडभरून आशीर्वाद दिला. ती कसनुसं हसली. ‘‘अगदी तोच आशीर्वाद,’’ ती म्हणाली.
‘‘हो, बिबट्याला आपल्या अंगावरचे ठिपके पुसता नाही येत,’’ विनोदाचा प्रयत्न करत मी म्हणालो, ‘‘जंगलातून इकडं येतानाचा प्रवास कमालीचा सुखकर वाटला...’’ वातावरण हलकं करायचं होतं.
‘‘तुम्ही जर जंगलांच्या आतल्या भागात जाऊन तिथल्या लोकांची दुःखं पाहिली नाहीत तर प्रवास सुखकरच वाटतो,’’ थोड्या कडवटपणानं ती म्हणाली. ‘‘या, सर’’ असं म्हणत ती आत वळली. तिच्या आवाजात अधिकारपदाची सहजपणे येणारी  एक वेगळीच हुकमत होती. ‘‘तुम्ही थकला असाल, आंघोळ करून घ्या, मग आपण बोलू,’’ ती म्हणाली.
***

-माझं आवरल्यावर आम्ही चहाचे घुटके घेत गप्पा मारत बसलो.
‘‘सर, तुमच्या येण्यानं मी भारावून गेलेय. माझ्यासाठी ते विशेषच आहे; पण तुमच्या इथल्या परिषदेबाबत बोलताना तुम्ही थोडं गडबडलात. त्याचं कारण मला कळलं नाही,’’ ती माझ्याकडं रोखून बघत म्हणाली. कदाचित मी मारलेली थाप तिच्या लक्षात आल्याचं तिला मला जाणवून द्यायचं होतं. त्याच वेळी माझी चोरी पकडल्याचं एक मिश्‍कील हसू तिच्या चेहऱ्यावर होतं. मीही हसून तिला दाद दिली आणि विषय बदलण्यासाठी विचारलं, की तू कशी आहेस आणि नेमकं काय घडलं?
तिच्या उत्तरात कुठलीही लपववाछपवी नव्हती. ‘‘काही दिवस वाईट गेले; पण मी आता ठीक आहे,’’ ती म्हणाली ः ‘‘मेल लिहून तुम्हाला त्रास दिला याबद्दल माफ करा; पण भावनेच्या भरात मी ते सगळं लिहिलं. तुम्ही ते आता विसरून जा. तुम्हाला इथला परिसर दाखवण्यासाठी मी दोन दिवसांची रजा घेतली आहे. इथून जवळच एक जुनं गोंड देवालय आहे. तुम्हाला ते नक्की आवडेल. उद्या सकाळी न्याहारी झाली, की आपण तिकडं जायचं का?’’ तिनं विचारलं. तिच्या स्वरातला कोरडेपणा लपत नव्हता.
‘‘चांगली कल्पना आहे; पण मी काही ते देऊळ बघायला इथं आलो नाही. मी तुला भेटायला आलोय,’’ म्हणालो.

त्यावर ती एकदम शांत बसली. बराच वेळ ती तशीच बसून होती. ‘‘ठीकंय, काय घडलंय हे तुम्हाला जाणून घ्यायचंच असेल, तर मी सांगायला तयार आहे; पण आता सगळं संपलंय, असं मला वाटतंय आणि मी राजीनामा द्यायचं ठरवलंय. मी केलेली कारवाई योग्य होती, याबद्दल मला जरासुद्धा संशय नाही. पुन्हा असं घडलं तर मी असंच वागेन,’’ ती ठामपणे म्हणाली. ‘‘पण मग राजीनामा देणं म्हणजे आपल्या चुकीची कबुली देण्यासारखं आहे, असं तुला वाटत नाही का?’’  म्हणालो.
‘‘तसं असेलही. मला आठवतंय की, तुम्हीच आम्हाला शिकवलं होतं, की शर्यत हरणं म्हणजे पराभव नव्हे; तर शर्यत अर्धवट सोडणं, हा खरा पराभव आहे. पण सर, तुम्हाला या व्यवस्थेची माहिती नाही. ही जर विटांची भिंत असली असती, तर मी तिच्यावर माझं डोकं आपटलं असतं. इतक्‍या वेळा की एकतर भिंत पडली असती किंवा माझं डोकं तरी फुटलं असतं; पण ही व्यवस्था म्हणजे एक मोठा फुगा आहे. कितीही डोकं आपटलं तरी ना त्याला काही होत, ना डोक्‍याला. डोकं आपटणारा माणूस मात्र थकून जातो. सत्य हे आहे, की मी ही व्यवस्था स्वीकारू शकत नाही. मी ती बदलूही शकत नाही. मला गाजावाजा करायचा नाही किंवा फुकटचा बडेजावही मिरवायचा नाही. त्यामुळं मी चुपचाप जायचं ठरवलंय. बस्स, एवढंच. चला, आता आपण जेवणासाठी उठायचं का?’’ ती म्हणाली.

कुणीच काही बोलण्याच्या मनःस्थितीत नव्हतं. ‘‘सकाळी फिरायला जाण्यासाठी किती वाजता बाहेर पडायचं?’’ - विचारलं.
‘‘सहा वाजता,’’ ती म्हणाली.
‘‘नाही, पाच वाजता,’’ म्हणालो.
‘ठीकंय’ म्हणत तिनं मान्य केलं.
बोलणं झालं ते तेवढंच. जेवत असताना आम्ही एक शब्दही बोललो नाही. ‘‘या सगळ्या प्रकरणावर सॉक्रेटिसचं काय म्हणणं आहे?’’ सकाळी आम्ही फाटकाच्या बाहेर पडत असताना तिनं थेट विषयालाच हात घातला.
‘‘काहीच नाही’’ अपराधीपणाच्या भावनेनं मी म्हणालो ः ‘‘रात्रभर नीट झोपू शकलो नाही मी. तू ज्या परिस्थितीत सापडली आहेस, त्याला मीच जबाबदार आहे, असं मला सारखं वाटतंय. माझ्यामुळंच तुझ्यावर आज ही वेळ आली आहे. आता अखेरपर्यंत तुझ्या बाजूनं ठामपणे उभं राहणं एवढंच मी करू शकतो.’’
तिनं कृतज्ञतेनं माझा हात हातात घेतला. श्रद्धेचा, विश्वासाचा एक भावपूर्ण स्पर्श मला त्यात जाणवला.

‘‘तुम्हाला आदिवासींबाबत कितपत माहिती आहे?’’ तिनं अचानक विचारलं. ‘‘फारशी नाही; पण एवढंच माहीत आहेत, की हिंदूंची बहुसंख्या होण्यापूर्वी तेच भारताच्या एकसंध वनवासी समाजाचं प्रतिनिधित्व करत होते. त्यांची संख्या एकूण लोकसंख्येच्या आठ टक्के आहे म्हणजे देशात एकूण ८४ लाख आदिवासी असावेत. हे सगळे आदिवासी प्रामुख्याने दुर्गम भागात राहतात,’’ मी सांगितलं.
ती हसली. आदिवासींची किती पिळवणूक होते, त्याची कारणं काय आहेत, राज्यांची भूमिका काय असते, आदिवासी आणि माओवादी यांच्यातले संबंध याविषयी तुम्हाला काय माहिती आहे?’’ तिनं विचारलं.
- ‘‘फारशी नाही, पण तू सांग,’’ मी म्हणालो.
दूरवर, क्षितिजाकडं बघत ती म्हणाली ः ‘‘हा भाग सरकारच्या माओवादी बंडखोरांबरोबरच्या संघर्षाचं केंद्र आहे. आदिवासी आणि अन्य मागासवर्गीय जातींचं लोकसंख्येत वर्चस्व आहे. हे सगळे लोक ज्या जंगलात राहतात, त्या जंगलांनी अर्धं राज्य व्यापलं आहे. इथं समांतर सरकार चालत असतं. एक सरकार आमचं असतं, जे काटेरी तारा, हेलिकॉप्टर, रस्ते, निमलष्करी दलं आणि तथाकथित जनतेचं सरकार (जनथाना सरकार) यांचं असतं, ज्याचं जमिनीवर अस्तित्व जाणवत नाही. एक सरकार वॉकीटॉकी आणि बिनतारी फोनद्वारे संपर्क साधतं, तर दुसरं जंगलाच्या सर्किटमधून संदेश पाठवतं. ‘आम्ही जनतेचं प्रतिनिधित्व करतो’, असं दोन्ही सरकारं म्हणत असतात.

‘‘ते ठीक आहे, पण लोकांचं काय? त्यांचं काय म्हणणं आहे?’’- मी विचारलं.
त्यावर ती बराच वेळ काहीच बोलली नाही. नंतर भावनिक होत म्हणाली ः ‘‘मी एक सामान्य व्यक्ती आहे. शांतता, जीव आणि संपत्ती यांची सुरक्षा, शिक्षण, आरोग्य यांबाबत किमान सोई, आपला धर्म आणि श्रद्धा जोपासण्याचं स्वातंत्र्य आणि आवडीच्या ठिकाणी सुटीवर जाण्याचं स्वातंत्र्य, एवढ्याच माझ्या अपेक्षा आहेत. स्वातंत्र्यानंतरच्या ७० वर्षांनंतर या अपेक्षा ठेवणं हे काही खूप जास्त आहे का?’’ ं बिनतोड सवाल केला.
‘‘होय, या मागण्या काही फार जास्त नाहीत. पण माओवाद्यांनी १९८०च्या दशकातच बस्तरमध्ये बस्तान बसवलं होतं का?’’ मी विचारलं.
‘‘होय,’’ ती म्हणाली, ‘‘त्या काळात नक्षलवादी चळवळीचं केंद्र तेलंगणात होतं. माओवाद्यांनी आश्रयासाठी बस्तरचं जंगल निवडलं. सुरवातीच्या काळात त्यांनी जिथं सरकारचा वावर कमी असतो, अशा सीमावर्ती भागात आश्रय घेतला. नंतर ते जंगलांच्या आतल्या भागात गेले. त्या वेळी वनाधिकारी आदिवासींचं शोषण करत असल्याचं त्यांना आढळलं. हे अधिकारी आणि व्यापारी तेंदूची पानं आणि आणि अन्य वस्तूंबाबत हे शोषण करतात, असं त्यांना आढळलं. अनेकदा त्यांचा हस्तक्षेप लोकशाहीपद्धतीचा नसायचा; पण त्या हस्तक्षेपामुळं किमती वाढायच्या आणि रोजची ओढाताण कमी व्हायची.’’

‘‘मग काय झालं?’’ मी विचारलं.
मग आर्थिक उदारीकरणाचं युग आलं. जागतिकीकरणाचे वारे भारतात वाहायला लागले. सन २००५ मध्ये हा भाग पुन्हा सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्यात आला. याच भागातून देशाच्या एकूण खनिजांपैकी २० टक्के खनिज, लोखंड, कोळसा, बॉक्‍साईट, सिमेंट, क्वार्टझ, संगमरवर आणि हिरे मिळत होते. विकास आणि प्रगती हे फक्त शोभेचे शब्द बनले होते. जागतिक व्यापारी, त्यांचे भारतीय प्रतिनिधी, राज्याच्या कंपन्या या सगळ्यांना फक्त त्यांचा वाटा हवा होता; पण जमीन आदिवासींच्या मालकीची होती आणि त्यांची संमती मिळाली, तरच तिचा व्यापारी-वापर करणं शक्‍य होणार होतं. त्यासाठी त्यांचं अन्यत्र पुनर्वसन होणं आवश्‍यक होतं. त्यासाठीचं पहिलं पाऊल म्हणून ‘सलवा जुडूम’ ही बनावट चळवळ उभी केली गेली. वरवर जरी ही चळवळ आदिवासींसाठी आहे, असं भासवलं जात असलं, तरी प्रत्यक्षात ती आदिवासींच्या जमिनी बळजबरीनं ताब्यात घेऊन त्यांना सरकारी नियंत्रणाखाली असलेल्या छावण्यांमध्ये हलवण्याचा तो डाव होता. सरकारशी लढण्याची क्षमता नसलेल्या आदिवासींना माओवाद्यांच्या तावडीत ढकलण्यात आलं. सन २००९ पासून नागरिकांचे आकस्मिक मृत्यू, बलात्कार आणि अटकेचं प्रमाण एकदम वाढलं. त्याचबरोबर जवान आणि माओवादी कार्यकर्त्यांच्या मृत्यूचंही प्रमाण वाढलं.

‘‘सरकार योजत असलेल्या उपायांबद्दल तू थोडी जास्तच टीका करत नाहीस ना?’’ मी जयश्रीला विचारत म्हटलं ः ‘‘कारण, जमीन ताब्यात घेणं किंवा बंडखोरांवरची कारवाई याबाबत लोकशाही आणि हुकूमशाहीत खूपच फरक असतो. कारण लोकशाहीत नोकरशाही, राजकीय पक्ष, मानवी हक्क संघटना, न्याययंत्रणा आणि प्रसारमाध्यमं यांचं अशा गोष्टींकडं लक्ष असतं. मी कदाचित चुकत असेन; पण आपली लोकशाही ही चांगल्या पायावर आधारित असताना महत्त्वाची नियंत्रणं अयशस्वी ठरली, असं कसं म्हणता येईल? ती सरकारची अधिकृत भूमिका होती का?’’
‘‘मुळीच नाही,’’ ती म्हणाली, ‘‘डाव्यां दहशतवाद्यांच्या संदर्भातली सरकारची भूमिका अगदी स्पष्ट आहे. माओवादी आपल्या स्वार्थासाठी आदिवासींचा वापर करून घेतात, असं सरकारला वाटतं. सरकारच्या मते माओवादी बंडखोरांनी आदिवासींसाठी काहीही केलं नाही. उलट, परिणामांची भीती घालत त्यांनी तिथं विकासासाठी गेलेल्या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना धमक्‍या देऊन त्यांच्याकडून खंडणी वसूल केली.’’
‘‘मग नेमकं खरं काय आहे?’’ मी विचारलं.

ती पुन्हा हसली. ‘‘असाच प्रश्न मी तुम्हाला एकदा वर्गात विचारला होता, त्या वेळी ‘सत्य हेच आहे, की ज्यांना परिणाम भोगावा लागत नाही त्यांनाच सगळ्या सुखसोई मिळतात’ असं उत्तर तुम्ही दिलं होतंत. यापेक्षा अधिक खरं असं दुसरं काही असू शकत नाही. बस्तर ही अनेक सत्यांची भूमी आहे. तिथं प्रत्येकाचं सत्य वेगळं असतं. सरकारचं सत्य एक असतं, तर माओवाद्यांचं सत्य दुसरंच असतं. मानवी हक्क संघटना, अन्य अशासकीय संघटना आणि खुद्द आदिवासी या प्रत्येकाचं सत्य निराळं असतं. मी कदाचित आदिवासींची बाजू घेणारी असेन; पण मी तुम्हाला खात्रीनं सांगते, की अगदी छोट्या छोट्या कारणांवरून आदिवासींची अडवणूक होत असते. पुरुषांना रोजच मारहाण होते आणि महिलांना शारीरिक अत्याचारांना सामोरं जावं लागतं; पण परिणामांच्या भीतीनं फारच थोडे लोक पोलिसांकडं तक्रार नोंदवतात. कधी कधी ते पोलिसांकडं तक्रार करतात; पण तिथं त्याना अशी यंत्रणा भेटते, की जी त्यांच्यावरच्या अत्याचारांची दखलच घेत नाही. छत्तीसगडमध्ये आज खरी गरज आहे ती अन्न, पाणी, दवाखाने, शाळा, शिक्षक यांची. हजारो जवानांची नव्हे,’’ ती म्हणाली.
‘‘मी गोंड खेडं पाहिलेलं नाही. ज्या गावात बलात्काराची घटना घडली, त्या गावाला आपल्याला भेट देता येईल का? की ते गाव खूप दूर आहे?’’ मी विचारलं.
‘‘मी बरोबर असेन तर नाही,’’ ती म्हणाली ः ‘‘पण तुम्हाला त्या गावात का जायचंय?’’
‘‘तसं काही विशेष कारण नाही; पण मला जायचं आहे,’’--मी म्हणालो.

आमच्यापाठोपाठ येणाऱ्या सुरक्षारक्षकांची गाडी तिनं बोलावली आणि आम्ही त्या गावाकडं निघालो. आम्ही गावाजवळ पोचताना ती मला म्हणाली ः ‘‘आता आपण जातोच आहोत तर मी माझी या गावाची निरोपाची भेटही उरकून घेते.’’
धुरळा उडवत आमची जीप एका वळणावरून पुढं गेली आणि आठ-दहा झोपड्यांच्या एका पाड्यासमोर उभी राहिली. तिथले पुरुष कामासाठी बाहेर गेले होते; पण तिथल्या बायकांनी मात्र जयश्रीभोवती एकदम कोंडाळंच केलं. त्या बायका काही बोलत नव्हत्या; पण त्यांनी तिचे हात घट्ट धरून ठेवले होते. तिनं त्यांना काहीतरी सांगितलं आणि त्यांच्या गर्दीतून वाट काढत आम्ही एका झोपडीत गेलो. तिथं बाहेरच एक बाई बसली होती. ती तिची आजी किंवा आई असावी. तिच्या शेजारी मला एक सुकलेली, दिसायला चांगली; पण कमालीची अशक्त मुलगी दिसली. निस्तेज डोळ्यांची. तिच्या डोळ्यांत सरकारी अधिकाऱ्यांवरच्या विश्वासाची एक धूसर आशा काय ती तेवत होती. आम्ही तिथं बसलो आणि त्यांच्याशी थोड्या गप्पा मारल्या. निघतांना जयश्रीनं तिला जवळ घेतलं आणि तिच्या कानात काहीतरी सांगितलं. तिनं ते ऐकलं आणि ती एकदम गप्प झाली. ‘‘तू तिला कानात काय सांगितलंस?’’ परतीच्या वाटेवर जयश्रीला विचारलं.

‘‘सत्य!’’ जयश्री म्हणाली ः‘‘तिला सांगितलं की मी परत चाललेय, परिस्थितीला, व्यवस्थेला शरण जाऊन मी पळून चाललेय.’’
त्यानंतर बोलण्यासारखं काही उरलंच नव्हतं.
आम्ही गोंडच्या त्या मंदिरात गेलोच नाही. गेलो असतो तरी जे मला मागायचं होतं, ते तिथला देव देऊ शकणार नाही, याची मला खात्री होती.
दुसऱ्या दिवशी मी निघणार होतो. जयश्रीनं स्टेशनवर पोचवायला येण्याचा हट्टच धरला. जाण्यापूर्वी त्या गावात पुन्हा एकदा जाऊन यावं, असं मला वाटलं. मी जयश्रीला तसं सांगितलं.
‘‘कशासाठी?’’ तिनं विचारलं.
ते मलाच ठाऊक नव्हतं. खरोखरच मला माहीत नव्हतं.
आम्ही त्या गावात गेलो. तोच रस्ता, तोच आठ-दहा झोपड्यांचा पाडा, तीच झोपडी. बऱ्याच बायका तिथं जमल्या होत्या.
आम्ही गाडीतून खाली उतरलो. काहीतरी वेगळं घडल्याचं मला जाणवलं. वातावरणात एक वेगळाच सन्नाटा होता. जयश्री पुढं जाऊन कुणाशी तरी बोलली.
जे ऐकलं त्यामुळं ती एकदम थिजून गेल्यासारखी मला वाटली. जणू काही तिच्यावर फार मोठा आघात झाला होता.
‘‘काय झालं?’’ काळजीनं विचारलं.
‘‘ती गेली,’’ सर्वस्व गमावल्यासारख्या आवाजात ती म्हणाली ः ‘‘ती माओवाद्यांकडं गेली. तिचा माझ्यावर खूप विश्वास होता; पण मी तिचा विश्वास राखू शकले नाही. मी तिला न्याय देऊ शकले नाही. मग स्वतःच तो मिळवण्यासाठी ती माओवाद्यांच्या गोटात गेली.’’

परतीच्या वाटेवर आम्ही कुणीच काही बोललो नाही. तिच्या जाण्यानं जयश्रीला फार मोठा धक्का बसला होता. आम्ही स्टेशनवर पोचलो. गाडी आली. माझं सामान गाडीत ठेवलं गेलं. निःशब्द वातावरणात हे सगळं यांत्रिकपणे घडत होतं.
आणि अचानक, गाढ झोपेतून जागं झाल्यासारखं ती म्हणाली ः ‘‘नाही सर, मी इथून निघून जाऊ शकत नाही. मी जाणार नाही.’’
तिच्या आवाजात एक वेगळाच निर्धार होता. ती म्हणाली ः ‘‘जे घडलं ते घडलं. ते पुन्हा घडू द्यायचं नसेल, तर मला या व्यवस्थेत राहूनच माझी जबाबदारी पूर्ण केली पाहिजे. माझ्यासाठी जगण्याचा तोच एक मार्ग आहे. मी राजीनामा देणार नाही...’’
‘‘सर, तुम्ही म्हणत होता तेच खरं आहे. कितीही दोष असले तरी प्रशासकीय सेवा हाच बदल घडवण्याचा सगळ्यात शक्तिशाली मार्ग आहे. तुमचं म्हणणं मी सार्थ ठरवीन. तिच्याही विश्वासाला मी पात्र ठरीन. मी सेवेतच राहीन आणि विजय मिळेपर्यंत लढत राहीन. मी मनोमन अशी प्रतिज्ञा करत आहे...’’ तिच्याकडं विस्मयानं पाहतच राहिलो. गाडी सुटण्याच्या बेतात होती. तिला जवळ घेऊन तिच्या डोक्‍यावर हात ठेवत मी म्हणालो ः ‘‘यशवंत हो! आणि हे मात्र कधीच विसरू नकोस, की आपल्याला लढत राहिलं पाहिजे. कारण, आपल्याला युद्ध नको, तर शांतता हवी आहे.’’
अन्‌ पुढच्याच क्षणी मी गाडीत चढलो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com