कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं हमारी (डॉ. यशवंत थोरात)

कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं हमारी (डॉ. यशवंत थोरात)

तिच्या किंचित पाणावलेल्या डोळ्यांत एक वेगळाच निर्धार आणि आई-वडिलांविषयीचा प्रचंड आदर मला दिसत होता. माझ्या विमानाची घोषणा झाली.‘‘देवयानी, बेस्ट लक,’’ असं म्हणत मी उठलो. त्यावर ‘‘मी नशीब मानत नाही. जर संधी माझा दरवाजा ठोठावणार नसेल, तर मी स्वतः जाऊन माझ्यासाठी दरवाजा उभा करीन,’’ ती मला म्हणाली.

तु  म्हाला गोष्ट ऐकायचीय?
पण ही गोष्ट काही राजकारण, इतिहास, उद्योग यांच्याशी संबंधित नाही किंवा जगाच्या रंगमंचावर अल्प काळ आपली भूमिका वठवून निघून जाणाऱ्या कुठल्या नायकाचीही नाही. तरीपण तुम्हाला ही गोष्ट ऐकायचीच आहे?
मग ऐका तर...

आमची चेन्नईहून नुकतीच बदली झाली होती. आम्हाला घरकामासाठी कुणीतरी हवं होतं. आमची मोठी मुलगी तिच्या किशोरवयात होती आणि धाकटी ‘आपल्याला आता सगळं समजतंय’ असं वाटण्याच्या वयात होती! आम्ही दोघंही नोकरी करणारे होतो आणि घरकामासाठी आणि एकूणच घरी लक्ष देण्यासाठी कुणीतरी असणं गरजेचं होतं. तसे दोघं-तिघं आमच्याकडं येऊन गेले होते; पण त्यातला एकजण मटकाबहाद्दर होता. दुसरा भुताखेतांना मानणारा होता; शिवाय तो मधूनच अचानक गायबही होत असे आणि तिसरा होता अतिश्रद्धाळू. अशा वेळी सुषमा आमच्या घरात अवतरली. ती आता पन्नाशीत आहे; पण त्या वेळी ती तरुण होती. थोडीफार शिकलेली. पदरात तीन मुली घालून तिचा नवरा गायब झाला होता; पण सुषमा परिस्थितीला शरण गेली नाही. तिचा निर्धार कायम होता. तिचे आई-वडील कोकणात होते. त्यांची थोडी शेती होती. लष्करातून निवृत्त झाल्यावर वडील त्याच गावात स्थाईक झाले होते. शेती आणि पेन्शन यावर त्यांचा गुजारा होत होता. आमच्या बॅंकेतल्याच कुणीतरी आम्हाला तिचं नाव सुचवलं. त्यामुळं तिच्या पूर्वेतिहासाबद्दल आम्हाला तशी माहिती होती. प्रश्न तिच्या मुलींचा होता; पण ती निर्णयाची पक्की आणि भवितव्याचा विचार करणारी होती. तिनं तिच्या दोन मोठ्या मुलींना एका वसतिगृहात ठेवलं आणि धाकटीला आई-वडिलांकडं पाठवून दिलं आणि ती आमच्याकडं राहायला लागली. हळूहळू आमच्या घरात ती मिळून-मिसळून गेली. काळ पुढं सरकत होता. तसा तो कधी थांबलाय? दरम्यानच्या काळात आमच्या गरजा वाढल्या आणि त्यामुळं साहजिकच सुषमाच्या जबाबदाऱ्याही वाढल्या. माझी दिल्लीला बदली झाली. माझी पत्नी उषा आता घर आणि ऑफिस यांत पुरती बांधली गेली. दोन्ही गोष्टी सांभाळण्यात तिची तारेवरची कसरत सुरू झाली. सुषमावरही आमचं आणि तिचं स्वतःचं घर अशी दुहेरी जबाबदारी होती. तिचं वैशिष्ट्य म्हणजे ती अतिशय विचारी होती आणि आपल्या मुलींचं भवितव्य घडवण्याचा तिचा निर्धार पक्का होता. त्यासाठी ती जमेल तेवढी बचतही करत होती. आमच्या सल्ल्यानं तिनं मुलींना चांगल्या शाळेत घातलं होतं. त्यांनाही तिच्या कष्टांची जाणीव होती. पुढं काय करायचं, याचा त्यांनी नीट विचार केला होता आणि आलेल्या संधीचा फायदा घेत त्यांची वाटचाल सुरू होती. त्यांच्या प्रत्येक गोष्टीला सुषमाचा पाठिंबा होता आणि आर्थिक ओढाताण होत असतानाही ती त्यांना सर्वतोपरी मदत करत होती. असमान स्पर्धेच्या काळातही त्या मुलींनी चांगलं यश मिळवलं. त्यांच्यापैकी एकजण नर्स झाली, दुसरीला एका बॅंकेत नोकरी मिळाली, तर तिसरी एका मोठ्या बॅंकेत अधिकारी झाली. सुषमानं उपनगरात एक छोटसं घर घेतलं, मुलींची लग्नं लावून दिली आणि ती यथावकाश आजीही झाली. या सगळ्या प्रवासात सभोवतीचं सामाजिक-राजकीय वातावरण समजून घेण्याचा ती सातत्यानं प्रयत्न करत असे. ती रोजचं मराठी वर्तमानपत्र अगदी अथपासून इतिपर्यंत वाचत असे आणि राजकीय, आर्थिक आणि बॅंकेच्या संदर्भात आम्हाला प्रश्नही विचारत असे. एकदा मी तिला रणजित देसाई यांचं ‘श्रीमान योगी’ हे पुस्तक वाचायला दिलं. तिनं ते अधाशासारखं वाचून काढलं आणि आणखी पुस्तकांची मागणी केली. मी तिला ‘ययाती’, ‘मृत्युंजय’, ‘व्यक्ती आणि वल्ली’ अशी काही पुस्तकं दिली. ती वाचताना ती अक्षरशः त्यांत गुंगून जात असे. ती आता केवळ एक घरकाम करणारी स्त्री नव्हती, तर एक सुशिक्षित, हुशार आणि स्वतंत्र विचारांची महिला होती. स्वतःच स्वतःच्या आयुष्याला आकार देणारी, आपलं आयुष्य घडवणारी. इतर चारचौघींसारखीच नव्या भारतातली नवी, सक्षम महिला!
***

मित्रांनो, अलीकडच्या काळात सर्वसाधारणपणे सगळीकडं प्रत्ययाला येणारी ही गोष्ट आहे. इतिहासकाळात महिलांची स्थिती काय होती, महिलांची स्वतःकडं पाहण्याची दृष्टी कशी होती, समाजाची त्यांच्याकडं पाहण्याची दृष्टी कशी होती, त्यांना समाजात कितपत महत्त्व होतं, त्यांचं कुटुंबातलं स्थान काय होतं, कुटुंबाला त्या काय देत होत्या आणि कुटुंबाकडून त्याना काय मिळत होतं हे प्रश्न आजही वेदनादायक आहेत. त्यातून मला आपली पितृप्रधान संस्कृती, लिंगाधारित कामांची विभागणी, उत्पन्न, अधिकार आणि संपत्तीची वाटणी यांबाबतचा पक्षपात याच गोष्टी जाणवतात. यामुळं स्त्री ही केवळ मुलांचं संगोपन आणि घरकाम यातच जखडली गेली. पुरुषांना मात्र निर्णयाचे असमान अधिकार प्राप्त झाले. हे मला अमान्य नाही आणि पूर्णपणे मान्यही नाही. समाजानं स्त्रीला दीर्घ काळ जखडून ठेवलं, असं इतिहास सांगत असला तरी आणि प्रतिकूल परिस्थिती आणि कमीत कमी संधी या गोष्टी त्यांच्या पाचवीला पूजलेल्या असल्या तरी त्यांच्यातली ऊर्जा एवढी प्रखर होती, की समाजानं घातलेल्या बंधनांना वेळोवेळी आव्हान देत त्यांनी ती बंधनं झुगारून दिली. मी काही केवळ राणी लक्ष्मीबाई, चाँदबिबी, ताराराणी अशा राजघराण्यातल्या स्त्रियांचीच उदाहरणं देत नाही, तर अगदी सामान्य स्त्रियांविषयी मी बोलतोय.

तुमचा विश्वास नाही ना बसत? मग ऐका ः
मुगल साम्राज्यात शाहजहानच्या काळातली ही गोष्ट. मातीची भांडी तयार करणारा एक माणूस मुलतानमध्ये चिनाब नदीच्या काठी राहत असे. त्याचं नाव होतं पुल्ला. त्याला सोहिनी नावाची एक मुलगी होती. कोणत्याही प्रेमकथेतल्या नायिकेप्रमाणे सोहिनी अत्यंत सुस्वरूप होती. शब्दांत व्यक्त करता येणार नाही, अशी एक वेगळीच नजाकत तिच्यात होती. पुल्ला आणि सोहिनी असे दोघं मिळून माठ आणि मातीची इतर भांडी बनवायचे. भांडी भट्टीत भाजून नंतर ते ती भांडी बाजारात विकायचे. अतिशय शांत असं जीवन ते जगत होते. त्यांच्या जीवनात वेगळं असं काही घडत नव्हतं. एकदा पर्वतांच्या पलीकडं असलेल्या बुखारी गावातून इज्जत बेग नावाचा एक फिरता व्यापारी त्यांच्या गावी आला. त्यानं सोहिनीला पाहिलं. तिनंही त्याला पाहिलं आणि पाहता क्षणी ते दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. इज्जत बेगनं तिथंच भाड्यानं एक छोटं घर घेतलं आणि तो रोज पुल्लाच्या दुकानात यायला लागला. तो सोहिनीच्या प्रेमाबरोबरच पुल्लाच्या कलाकारीच्याही प्रेमात पडला होता. रोज दुकानात येण्याचं काही निमित्त हवं म्हणून तो पुल्लाच्या दुकानातून रोज काही ना काही खरेदी करत असे. त्यामुळं त्याच्या जवळचा भांड्यांचा साठा वाढायला लागला; पण त्याच्या जवळचा पैशाचा साठा साहजिकच कमी कमी व्हायला लागला. शेवटी एक दिवस तो कफल्लक झाला. घरमालकानं त्याला घराबाहेर काढलं आणि नाइलाजानं तो आश्रयासाठी पुल्लाकडं आला. पुल्लानंही उदारतेनं त्याला आश्रय दिला आणि त्याला त्याच्याकडची गुरं सांभाळण्याचं काम दिलं. यातूनच ‘महिवाल’ म्हणजे ‘म्हशी सांभाळणारा’ हे नाव त्याला मिळालं. इज्जत बेगला ही एक आयतीच संधी मिळाली होती. तो आणि सोहिनी एकमेकांना चोरून भेटायला लागले; पण थोड्याच दिवसांत ही बाब पुल्लाच्या नजरेस आली. तो हुशार होता. त्यानं तातडीनं सोहिनीचं लग्न नदीच्या पलीकडं राहणाऱ्या दम नावाच्या तरुणाशी लावून दिलं. महिवाल फकीरवृत्तीचा होता, तर सोहिनी अतिशय कणखर मनाची होती. तिच्या प्रेमावर तिची निष्ठा होती. एका मोठ्या माठाचा तरंगण्यासाठी वापर करून ती रोज रात्री नदीचं पात्र ओलांडून महिवालला भेटायला जात असे व पहाटे परत येत असे. भाजलेल्या माठाचा वापर करत ती तरंगत नदी पार करत असे. मात्र, एकदा तिच्या भावजयीच्या लक्षात ही गोष्ट आली. तिनं कपटानं भाजलेल्या माठाच्या जागी कच्चा माठ ठेवला. त्या रात्री तो कच्चा माठ पाण्याच्या प्रवाहात जाताच फुटला. तिला वाचवण्यासाठी महिवालनं पाण्यात उडी मारली; पण दुर्दैवानं दोघंही बुडून मरण पावले.

वरवर पाहता ही एका अयशस्वी प्रेमाची कहाणी वाटेल. सूफी संतांनीही या कथेच्या माध्यमातून ‘प्रेम म्हणजे ईश्वराला आळवणारी आत्म्याची हाक’ असं म्हटलं आहे. अनेक वर्षं मला हा अन्वयार्थ पटत होता; पण तो कितीही नीटनेटका बेतलेला असला तरी हल्ली मला तो पटत नाही. या प्रेमकथेचं मूळ मला आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीत दिसतं. अशा गोष्टींशी दैवी संदर्भ जोडला जातो. कारण, एखादी स्त्री सामाजिक आणि नैतिक बंधनं झुगारून देऊ शकते, हे वास्तव स्वीकारण्याचं धाडस आपल्यात नाही. याचं कारण म्हणजे स्त्रियांचे आदर्श गुण सांगणं पुरुषांसाठी सोपं आहे; पण स्त्रीच्या भावनांचं वास्तव स्वीकारणं त्यांच्यासाठी कठीण आहे. त्यामुळंच सोहिनीच्या बंडामुळं आपण अस्वस्थ होतो.

असं म्हटलं जातं, की सोहिनीचे छुट्टो नावाचे एक गुरू होते. ‘महिवालला परत भेटणार नाही,’ असं वचन त्यांनी तिच्याकडून तिच्या लग्नाच्या आदल्या रात्री घेतलं होतं. एकदा ती महिवालला भेटायला जात असताना अचानक तिच्या गुरूंना ती दिसली.
‘तू मला दिलेलं वचन मोडणार आहेस कां?’ असं त्यांनी तिला विचारलं. त्यावर ‘-महिवालच्या म्हशींचा आवाज ऐकण्यासाठी मी तुम्हालाच काय; पण देवाला दिलेलं वचनसुद्धा मोडेन’ असं ती त्यांना म्हणाली.

आता गुरू आणि देव यांचा प्रचंड पगडा असलेल्या समाजात या प्रकारची बंडखोरी किंवा नास्तिकता चालू शकेल का? किंवा दुसऱ्या कथेतलं उदाहरण पाहा. हीरचं ते प्रसिद्ध वाक्‍य आहे ना...ती तिच्या आईला म्हणते ः ‘रांझा (हीरचा प्रियकर) याला शोधताना मला परमेश्वराची अनुभूती आली; पण त्या परमेश्वराची रांझाबरोबर तुलनाही होऊ शकत नाही.’
सोहिनी आणि हीर यांच्या कथा जशा या मातीतल्या, अतिशय वास्तव आहेत, तशा त्या प्रेमाला दैवी किंवा आत्मिक ठरवण्याच्या प्रयत्नांना आव्हान देणाऱ्याही आहेत. सोहिनी किंवा हीर या काही राजपरिवारातल्या राण्या नव्हत्या. त्या अगदी सामान्य स्त्रिया होत्या; पण सामाजिक बंधनं झुगारण्याची हिंमत त्यांच्यात होती. पावित्र्याच्या नावाखाली आनंदरहित अशा सुखाच्या चौकटीत जखडून घेण्यात त्यांना स्वारस्य नव्हतं. त्या अशा महिला होत्या, की ज्या एका निष्ठेनं प्रेमाच्या वाटेवरून चालत होत्या. त्यात सफल होण्याची कुठलीही खात्री त्यांना नव्हती. त्यामुळंच त्यांचा आवाज दडपल्याबद्दल त्या त्या समाजाला त्यांच्या मृत्यूनंतर दोषी ठरवलं गेलं. सोहिनी आणि हीर यांची कथा तुम्ही ऐकलीत. आता सुषमानं जे काही यश मिळवलं, ते आमच्यामुळं मिळवलं असं तुम्हाला वाटतं का? मग मी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो.
***

परदेशातलं एक काम संपल्यावर भारतात येण्यासाठी ॲम्स्टरडॅम इथल्या विमानतळावर मी माझ्या परतीच्या विमानाची वाट पाहत होतो. अचानक ‘एक्‍सक्‍यूज मी, प्लीज’ असे शब्द माझ्या कानावर आले. पुस्तकातली नजर काढून मी समोर बघितलं. जीन्स आणि जॅकेट घातलेली, पूर्णपणे आशियाई दिसणारी एक तरुण मुलगी माझ्यासमोर उभी होती.
‘‘माझ्या तिकिटाचा काहीतरी गोंधळ झालाय आणि इथले अधिकारी अजिबात मदत करत नाहीयत. एक ज्येष्ठ नागरिक म्हणून तुम्ही चौकशी केलीत, तर ते नक्की काहीतरी सांगतील,’’ असं ती मला म्हणाली. तिच्या धाडसाचं मला कौतुक वाटलं आणि मी तिला यथाशक्‍य मदत करण्याची तयारी दर्शवली. ‘एक असहाय्य वृद्ध माणूस’ म्हणून स्वतःची प्रतिमा निर्माण करण्याची कला मी अनेक वर्षांपासून अंगी बाणवली होती, तिचा या वेळी उपयोग झाला! काउंटरवरच्या महिलेचं मन माझ्याकडं पाहून द्रवलं असावं. तिनं मार्ग काढला आणि त्या मुलीचा प्रश्न सुटला. मी माझ्या जागेवर येऊन पुन्हा पुस्तक उघडून बसलो. थोड्या वेळानं ती मुलगीही माझ्या शेजारी येऊन बसली. मी साधी चौकशीही केली नाही, असं तिला वाटू नये म्हणून ‘तू इथं ॲम्स्टरडॅममध्ये काय करतेस?’ असं मी तिला सहज विचारलं.

एका संरक्षण उत्पादनविषयक बहुराष्ट्रीय कंपनीत सॉफ्टवेअरमध्ये झालेला बिघाड दुरुस्त करण्यासाठी आलेल्या इंजिनिअर्सच्या टीमचं ती नेतृत्व करत असल्याची माहिती तिच्या उत्तरातून मला मिळाली. मला तिचं कौतुक वाटलं. ‘‘तुझं काम पूर्ण झालं?’ -मी विचारलं. ‘‘हो. नुकतंच झालं आणि आता मी भारतात परत चाललेय,’’ ती म्हणाली. -मी तिच्याकडं पाहतच राहिलो. छोट्या चणीची, सावळ्या रंगाची, चष्मा घातलेली, अतिशय साधी अशी ती मुलगी होती. ‘‘मीही भारतातच चाललोय,’’ असं मी तिला सांगितलं आणि मग आम्ही मोकळेपणानं खूप गप्पा मारल्या. त्या बोलण्यातून तिचं नाव देवयानी असल्याचं मला समजलं आणि ती एका खेड्यातून आलेली आहे, हीही माहिती मला मिळाली. ‘‘तुझे आई-वडील काय करतात?’’ मी सहजच विचारलं. त्यावर ती क्षणभर थांबली. सांगावं की नाही असं तिला कदाचित वाटलं असावं; पण पुढच्याच क्षणी ती निर्धारानं म्हणाली ः ‘‘माझे वडील सायकलरिक्षा चालवतात आणि माझी आई मोलकरीण आहे.’’ -मी तिच्याकडं बघतच  राहिलो. तिच्या किंचित पाणावलेल्या डोळ्यांत एक वेगळाच निर्धार आणि आई-वडिलांविषयीचा प्रचंड आदर मला दिसत होता. माझ्या विमानाची घोषणा झाली.‘‘देवयानी, बेस्ट लक,’’असं म्हणत मी उठलो.
त्यावर ‘‘मी नशीब मानत नाही. जर संधी माझा दरवाजा ठोठावणार नसेल, तर मी स्वतः जाऊन माझ्यासाठी दरवाजा उभा करीन,’’ ती मला म्हणाली.
***

सोहिनी आणि हीर या अपवाद होत्या, असं मानलं तर सुषमा आणि देवयानी आता नियम ठरत आहेत; पण पुरुषप्रधान संस्कृतीपासून होणारा हा बदल अतिशय संथ गतीनं होत आला होता. मात्र, १९९० च्या आर्थिक उदारीकरणानंतर या प्रक्रियेला गती आली आहे. कुठल्याही व्यक्तीशी वा घटनांशी याचा संबंध नव्हता, तर दैनंदिन घडामोडींतून हे घडत होतं. हा बदल इतका सूक्ष्म होता, की विशेष लक्ष दिलं तरच तो समजेल अन्यथा तुमच्या नजरेतून सुटेल; पण या बदलाचा आपल्या सामाजिक-आर्थिक-राजकीय जीवनावर किती परिणाम झाला आहे, ते आता २५ वर्षांनी आपल्या लक्षात येतंय. या बदलात स्त्री-पुरुष समानतेतून शहरी आणि निमशहरी भागात विविध क्षेत्रांत साधला जाणारा समतोल खूपच आनंददायी आहे.


भारतातली स्त्रीचळवळ ही प्रामुख्यानं सतीची प्रथा, हुंडापद्धत, ऑनर किलिंग, मुलगा होण्यासाठीचा अट्टहास, ‘तीन तलाक’ अशा मुद्द्यांवरच काम करत आहे. या गोष्टी सामाजिक श्रद्धा आणि रूढींमुळं वाढल्या आहेत. एका पाहणीत असं आढळून आलं आहे, की शिक्षण किंवा अन्य कामांत महिलांच्या सहभागाला फारसा विरोध होत नसला, तरी घरगुती संबंध अजूनही रूढींच्या बंधनात जखडलेले आहेत. महिला आणि पुरुषांना समान वेतन, संतती-नियमनाचा हक्क, गरोदर राहिल्यानंतर महिलांना नोकरीवरून काढून टाकलं जाणं यांसारख्या प्रकारांत स्त्रीशिक्षणामुळं आणि सरकारनं केलेल्या कायद्यांमुळं बराच फरक पडला आहे. वाढत्या शैक्षणिक संधींमुळं कौशल्य प्राप्त केलेल्या महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्याचे अधिक अवसर प्राप्त होत आहेत. आर्थिक सुबत्ता आणि तांत्रिक प्रगती यांचाही बराच फायदा झाला आहे. परिणामी, आजची नवयुवती हुशार, तरतरीत, आत्मविश्वास असलेली, महत्त्वाकांक्षी आणि अनेक कौशल्यं असलेली आहे. या पाहणीतून असं स्पष्ट झालं आहे, की सध्याची भारतीय तरुणी पुढारलेल्या समाजातल्या तरुणींपेक्षा आणि गेल्या पिढीतल्या महिलांपेक्षा वेगळी आहे. त्यांना सक्षम कुटुंबव्यवस्था हवी आहे आणि यादृष्टीनं ही तरुणी पुढारलेल्या औद्योगिक देशांतल्या तरुणीपेक्षा वेगळी आहे. त्याच वेळी ती इच्छा आणि अपेक्षांच्या संदर्भात त्यांच्या आजीपासून वेगळी आहे.
***

मी जेव्हा सुषमाला पुस्तक वाचताना पाहतो, तेव्हा मला नक्कीच अभिमान वाटतो; पण त्या अभिमानाबरोबरच एक खंतही माझ्या मनात आहे. सुषमा अशा ग्रामीण भागाची प्रतिनिधी आहे, की जिथं शिक्षणाच्या पुरेशा सोई अद्याप पोचलेल्याच नाहीत. तिथल्या शिक्षणाचा दर्जाही तेवढा चांगला नाही. स्त्रियांची प्रगती हा विषय सर्वसाधारणपणे भारतात शहरी भागापुरता मर्यादित राहिला आहे. शहरातल्या महिला शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर तर उभ्या राहतीलच; पण त्या ग्रामीण भागातल्या महिलांच्या मुक्तीसाठीही प्रयत्न करतील अशी अपेक्षा होती. दुर्दैवानं शहरी महिला ही जबाबदारी विसरल्या आहेत, असं म्हणावं लागतं. केवळ सुरक्षित नोकऱ्या मिळवून आपल्या कुटुंबासाठी दुप्पट उत्पन्न मिळवणं हेच त्यांचं उद्दिष्ट बनलं आहे. -महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या दोन महाविद्यालयांत शिकवण्याची संधी मला आयुष्याच्या सायंकाळी मिळाली. ग्रामीण महिलाही लवकरच शहरी महिलांप्रमाणे पुढं येतील, अशी खात्री मला दरवेळी तिथून परतल्यानंतर वाटते. त्या त्यांचं स्थान नक्की परत मिळवतील. कारण विख्यात कवी अल्लामा इक्‍बाल यांनी म्हटलंच आहे ः
वो चिंगारी खस-ओ-खाशाक से किस तरह दब जाए
जिसे हक ने किया हो नीस्ताँ के वास्ते पैदा

प्रज्वलित राहण्यासाठी, उजळत राहण्यासाठी स्वतः परमेश्वरानंच ज्या ठिणगीची निर्मिती केली आहे, ती ठिणगी पाल्या-पाचोळ्याखाली दबून जाईलच कशी?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com