मैं नही मानता, मैं नही जानता (डॉ. यशवंत थोरात)

मैं नही मानता, मैं नही जानता (डॉ. यशवंत थोरात)

‘सीमारेषा नकाशावर असतात. त्या लोकांच्या मनावर कधीही उमटू देऊ नयेत. सत्याला धर्म नसतो. ते हिंदू असत नाही आणि मुस्लिमही असत नाही. महापुरुष आणि आदर्श हे सगळ्यांचेच असतात. ते कोणत्याही एका देशाचे किंवा धर्माचे नसतात. त्यांचा आदर करण्यानं आपण आपल्या संस्कृतीत जे जे चांगलं आहे, त्या त्या सगळ्याचाच आदर करत असतो. असं केल्यानंच आपण विश्‍वाचे नागरिक बनू.’

मी कपाट आवरत होतो. कपाट आवरणं हे केवळ निमित्त होतं; पण खरं म्हणजे मी ‘त्यांची’ वाट पाहत होतो. गेल्या काही दिवसांपासून मी तसा काहीसा संत्रस्तच होतो. दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातल्या घटनांच्या पार्श्‍वभूमीवर ‘सरकारचे अधिकार आणि नागरिकांचे हक्क’ या विषयावर स्थानिक विद्यापीठानं एक परिसंवाद आयोजिला होता. त्या परिसंवादात बोलताना मी म्हणालो होतो, की विद्यार्थ्यांचे महाविद्यालयातले आणि विद्यापीठातले दिवस हे ‘घडण्याचे’ दिवस असतात. या काळात विद्यार्थी अनुभव घेत घेत अनेक गोष्टी शिकत असतात. वेगवेगळ्या सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमांत सहभागी होणं, हा त्यांच्या घडण्याचाच एक भाग असतो. हा संदर्भ देऊन अधिकाऱ्यांनी स्थिती हाताळताना अधिक संवेदनशीलता दाखवायला हवी होती, असं मी म्हणालो. अधिकाऱ्यांनी स्थिती थोडी जास्तच कठोरतेनं हाताळली, असं मत दुसऱ्या एका वक्‍त्यानं मांडलं होतं. त्याच्या भाषणावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. अनेक जण संतप्त होऊन तावातावानं बोलायला लागले; पण एवढ्यात एक विद्यार्थी म्हणाला ः ‘‘केवळ बोलण्याव्यतिरिक्त आम्ही काय करू शकतो? अधिकाऱ्यांच्या तुलनेत आम्हाला कसलेच अधिकार नाहीत. अधिकार नसल्यानं आम्ही कुठलीच कृती करू शकत नाही.’’ माझ्या मनाला अस्वस्थ करणारा हा विचार मी बाजूला सारला आणि कपाटातल्या रिझर्व्ह बॅंकेच्या जुन्या डायऱ्यांच्या ढिगाकडं थोडं रागानंच बघितलं आणि ‘या डायऱ्या फेकून दिल्या पाहिजेत’ असं त्रासिकपणे पुटपुटलो. त्या ढिगातली एक डायरी मी सहजच बाहेर काढून पाहिली. तीवरचं वर्ष होतं १९७६. बाप रे! म्हणजे किती वर्षं गेली. जवळजवळ ४०. काळ किती झपाट्यानं गेला. त्या वेळी मी अगदी तरुण होतो. प्रशिक्षण संपवून मी बॅंकेच्या केंद्रीय आस्थापना विभागात रुजू झालो होतो. आठवणींची एक मालिका माझ्या डोळ्यांपुढं तरळून गेली. मी माझ्या मनाशीच हसलो. भलतंच काहीतरी घडलं होतं. एखाद्या सापाला मुंगसाविषयी जेवढ प्रेम वाटावं, तेवढंच प्रेम मला अकाउंट्‌स या विषयाबद्दल होतं! मला जे काम देण्यात आलेलं होतं, त्यात कर्ज मंजूर करणं, आगाऊ रक्कम देणं, कर्मचाऱ्यांचा पगार देणं आणि त्यांची बिलं मंजूर करणं यांचा समावेश होता. शेकडो बिलं असायची. आजारी असलेल्या कर्मचाऱ्यांची किंवा रजा घेतलेल्यांची किंवा परगावी गेलेल्यांची किंवा शहरातच काही कामानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी गेलेल्यांची. बिलांचे अगदी ढीग असायचे! या कामात मला मदत करण्यासाठी कारकुनांचा एक चमू माझ्या दिमतीला देण्यात आला होता. मेकॉलेच्या शिक्षणपद्धतीत पठडीत तयार झालेला चमू. या चमूसाठी ‘फायलींचे ढीग’ हेच जीवन होतं आणि नियम व कायद्याचे अर्थ लावण्यातच त्यांना जीवनाची इतिकर्तव्यता वाटत होती. त्यांची सत्ता अमर्याद होती. एखादी गोष्ट स्वीकारण्यासाठी ते जेवढ्या तर्कसुसंगतपणे कारणं देऊ शकत होते, तेवढ्याच तर्कसुसंगतपणे ते ती गोष्ट फेटाळण्यासाठीही बाजू मांडू शकत होते! ते भ्रष्ट किंवा स्वार्थी नव्हते किंवा ते कुणाच्या दबावाखाली काम करणारेही नव्हते. उलट नियमांवर बोट ठेवून ते नेहमीच अतिशय नैतिक भूमिका घेत असत. अर्ज करणाऱ्यांच्या इच्छा-आकांक्षा काहीही असल्या तरी ते नियमांवर बोट ठेवूनच वागत असत. त्यांच्या या ‘साम्राज्या’त माझ्यासारखा अधिकारी त्याना गैरसोईचा वाटत होता. सुरवातीला त्यांनी केलेल्या काही शिफारशी थोड्या अतिरेकी स्वरूपाच्या वाटल्यामुळं मी त्या सरळसरळ फेटाळल्या. ती प्रकरणं मी फेरविचारासाठी त्याच्याकडं परत पाठवत असे; मात्र थोड्याच दिवसांत पिवळ्या पट्ट्या लावलेल्या फायलींसह ती प्रकरणं पुन्हा माझ्या टेबलावर येत. त्या फायलींमध्ये पूर्वी घडलेल्या तशाच प्रकरणांची उदाहरणं असत. त्याबाबतचे अनेक नियम आणि पूर्वीच्या अधिकाऱ्यांनी
घेतलेल्या निर्णयांची जंत्री दिलेली असे. ती फाइल माझ्यासमोर येताच संबंधित क्‍लार्क अचानक माझ्यापुढं टपकत असे. अत्यंत नम्रपणे ‘एक्‍सक्‍युज मी, सर’ असं म्हणत, मी फाइलवर मारलेल्या शेऱ्याबाबत तो बोलायला सुरवात करत असे. फाइलवर मी मारलेल्या शेऱ्याचं कौतुक करत संभाषणाला सुरवात होई आणि माझ्या निर्णयामुळं अनेकांचा कसा फायदा होणार आहे, ते सांगितलं जाई; मात्र थोड्याच वेळात अनेक जुनी उदाहरणं देत आणि आणलेल्या फाइलमध्ये लावलेल्या पिवळ्या पट्ट्यांच्या खुणांची पानं उलगडत माझा निर्णय स्वीकारला, तर ते कसं चुकीचं ठरेल आणि त्यामुळं संस्थेतला सुसंवाद आणि समतोल कसा बिघडेल, ते मला पटवून दिलं जाई. त्यातून माझं भवितव्यही धोक्‍यात येऊ शकेल, असा इशारा देण्याचाही प्रयत्न त्यात असे. माझ्या शेऱ्यात त्या कारकुनाला हवा तसा बदल मी करीपर्यंत माझी स्तुती करण्याचा किंवा मला भीती दाखवण्याचा हा प्रकार सुरूच राहत असे.

पण एकदा वेगळंच घडलं. ते प्रकरण पूर्णपणे फेटाळण्याजोगं होतं. एका कर्मचाऱ्यानं सुटीत कुटुंबीयांसह श्रीनगरला त्याच्यासाठी मंजूर असलेल्या विशिष्ट वर्गानं जाण्यासाठी आगाऊ रक्कम घेतली होती. तो जाऊन परत आला; पण ‘परतीच्या प्रवासात सगळं सामान चोरीला गेलं,’ असं कारण देऊन त्यानं तिकीट किंवा अन्य कुठलाही पुरावा न देता बिल सादर केलं. खालच्या स्तरावरच्या अधिकाऱ्यांनी या कृत्यावर आक्षेप घेणारे वेगवेगळ्या पद्धतीचे शेरे त्याच्या फाइलवर मारले आणि त्याच्याकडून आगाऊ घेतलेली ती रक्कम वसूल करण्याची व पैशांचा गैरवापर केल्याबद्दल त्याला शिक्षा करण्याची शिफारस केली. माझ्या एका सहीनं ते प्रकरण संपलं असतं; पण त्या फाइलवर मारलेल्या शेऱ्यांमुळं मी वैतागलो. ‘त्या संबंधित कर्मचाऱ्याला मला भेटायला सांगावे’, असा शेरा लिहून ती फाइल मी परत पाठवली. ‘सर, ही अगदी ‘ओपन अँड शट’ केस आहे...तुम्हाला इतरही कामं आहेत’, असं सांगत संबंधित कारकुनानं माझं मन वळवण्याचा बराच प्रयत्न केला; पण मी ठाम राहिलो.
थोड्याच वेळात तो कर्मचारी माझ्यासमोर आला.

‘‘हा काय मूर्खपणा आहे?’’ असं मी त्याला विचारलं; पण ‘‘हे अगदी खरं आहे,’’ असं त्यानं आईची शपथ घेऊन सांगितलं. तो कर्मचारी प्रामाणिक वाटला. मी आणखी विरघळेन अशी भीती वाटल्यानं त्या क्‍लार्कनं मला १३ (बी बी) (१) हा नियम दाखवला. तो गालातल्या गालात हसत होता. मी पेन घेतलं आणि ‘सगळ्यात कमी दर्जाचं प्रवासभाडं मंजूर करावं,’ असा शेरा मारला. तो कारकून घाबरला. ती फाइल पुढं पाठवली गेली आणि अपेक्षेप्रमाणे फेटाळली गेली. अंतिम आदेशासाठी ती फाइल पुन्हा माझ्यापुढं आली. त्या कर्मचाऱ्याला भेटायला पाठवण्याचा निरोप मी पुन्हा दिला. एव्हाना तो कारकून तर खूपच चिडला
होता. तो कर्मचारी पुन्हा आला.
‘‘तू काश्‍मीरला गेल्याचा काही पुरावा तुझ्याकडं नाही का?’’ विचारलं.
‘‘नाही सर, सगळं चोरीला गेलं,’’ तो हताशपणे म्हणाला.
तो परत जायला निघाला तेव्हा ‘‘एखादा फोटो तरी आहे ?’’ असं मी त्याला
विचारलं. त्याचा चेहरा एकदम उजळला. त्याच्याबरोबर माझाही! ‘‘उद्या फोटो घेऊन ये,’’-मी त्याला फर्मावलं.
तो आला.

माझं सगळं कौशल्य वापरून मी त्याला योग्य असा अर्ज लिहून दिला. त्यानं आणलेले फोटो त्या अर्जाला जोडले. माझ्या अनुकूल शिफारशीसह मी तो अर्ज मुख्य कार्यालयात पाठवून दिला. आश्‍चर्य म्हणजे, महिनाभरात तो अर्ज मंजूर होऊन आला. त्याच्याव्यतिरिक्त कुटुंबातल्या अन्य सगळ्यांचं प्रवासभाडं मंजूर झालं; फक्त त्याचं झालं नाही. कारण, तो एकाही फोटोमध्ये नव्हता! हा प्रसंग आठवून मला हसायला आलं. माझा मूडही बदलला. एवढ्यात माझी पत्नी उषा तिथं आली. ‘‘एकाच वेळी उभं राहण्याची, हसण्याची आणि झोपण्याची कला तुम्हाला अवगत आहे तर...!’’ ती म्हणाली.

‘‘झोपलो नाहीय; पण मी हसतोय,’’ - म्हणालो आणि मी तिला तो किस्सा सांगितला.
‘‘तुम्ही अतिशयोक्ती करत आहात,’’ ती म्हणाली ः ‘‘आपलं मन असं कुणामुळं बदलता कामा नये. आपण किती ठाम राहतो त्यावर ते अवलंबून असतं...’’ ‘‘बरोबरंय, तुला ते शक्‍य आहे. कारण तू या ग्रहावरची नाहीसंच!’’ मी म्हणालो. तेवढ्यात कसली तरी चाहूल आली... आम्ही वळून पाहतोय तर मुलांचा नेहमीचा चमू आत येत होता. ‘‘तुमचे चाहते आले आहेत...आज त्यांना कोणतं प्रवचन देणार?’’ उषानं मला उपरोधानं विचारलं.

‘‘आज मी कोणत्या विषयावर बोलीन, असा तुझा अंदाज आहे? आज मी त्यांना आपलीच गोष्ट सांगणार आहे. आपण कसे भेटलो, कोणती आव्हानं आपल्याला स्वीकारावी लागली... आपण कसे अडखळलो, कसे पडलो आणि पुन्हा गरुडासारखी उंच झेप कशी घेतली, हे मी त्यांना सांगणार आहे.’’ मी तिला म्हणालो.
‘‘काही तरीच काय? बघा हं, तसं केलंत तर मी तुमच्याशी बोलणार नाही,’’ ती म्हणाली. ‘‘तथास्तु! असंच घडो...परमेश्‍वरानं एवढं ऐकलं पाहिजे’’ - मी म्हणालो.
‘‘तो तुमचं अजिबात ऐकणार नाही आणि मी आजूबाजूला असेपर्यंत तर मुळीच नाही,’’ ती म्हणाली आणि तडक आत निघून गेली. मुलं बसली. कॉफी आली. मी कॉफीचा घोट घेणार एवढ्यात त्यांच्यातला कलाकार असलेला मुलगा म्हणाला ः ‘‘सर, आज तुम्ही थोडे संत्रस्त दिसत आहात. काही घडलंय का?’’
चमूला माहिती दिली. त्या परिसंवादात कसा खूप वाद झाला, ते सांगितलं.
मुलांच्या गटात दोन तट पडले. ‘देशविरोधी भावना भडकावणं हे कधीही मान्य केलं जाणार नाही; मग ते कुणीही असोत,’ असं एका गटाचं म्हणणं, तर
दुसऱ्या गटाचं म्हणणं होतं ः ‘‘तो विषय व्यक्तिस्वातंत्र्यापुरताच मर्यादित होता.’’ दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद सुरू होते. एवढ्यात यास्मिननं सगळ्यांवर पाणी ओतलं. ‘‘आपण ही चर्चा कशाला करतोय? तिचा काय उपयोग आहे? शेवटी सत्तेच्या विरुद्ध कोण लढू शकतो आणि लढायचं कशानं? तर फक्त शब्दांनी!’’ असा मुद्दा मांडून ती म्हणाली ः ‘‘एकदा एका मोर्चात मी लाठीचा प्रसाद खाल्ला आहे. तो परत खाण्याची माझी इच्छा नाही. हे असले उद्योग करण्यापेक्षा आपण अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं हे बरं.’’

‘‘मला हे आजिबात मान्य नाही,’’ प्रदीप म्हणाला ः ‘‘स्वातंत्र्यासाठी कायम दक्ष राहिलं पाहिजे. अन्यायापुढं आपण कधीही गप्प बसायला नको.’’
‘‘नुसतं बोलणं सोपंय, काही तरी करून दाखवा,’’ राहुल म्हणाला ः ‘‘या खोलीत सुरक्षित ठिकाणी बसून बोलण्याऐवजी बाहेर पडा आणि काही तरी करून दाखवा. माझ्या वडिलांना आणीबाणीत अटक झाली होती. एकदा घरी या आणि त्यांच्याशी बोला... काय सर, तुम्हाला काय वाटतं?’’
- मी म्हणालो ः ‘‘मला माहीत नाही, मी काही ‘हीरो’ नाही; पण हा मुद्दा स्पष्ट करणारी विख्यात कवी फैज अहमद फैज यांची एक कविता मी तुम्हाला ऐकवतो. ती ऐकल्यावर नेमकं काय केलं पाहिजे, ते तुम्हाला आपोआपच कळेल; पण त्याआधी त्या कवितेमागची एक कथा तुम्हाला सांगायला हवी...’’

१९७७ मध्ये जनरल झिया-उल्‌-हक यांनी सत्ता बळकावली आणि पाकिस्तानमधलं राजकारण अगदी रसातळाला गेलं. सर्वप्रथम झुल्फिकार अली भुट्टो यांना फासावर लटकावण्यात आलं. नंतरची नऊ वर्ष इस्लामिक कायद्यांची कठोर अंमलबजावणी करून आणि संकुचित विचारांचा अवलंब करून पाकिस्तानचा राजकीय ढाचा बदलण्याचा प्रयत्न करण्यात आला. पाकिस्तानातल्या धर्मनिरपेक्ष इस्लामच्या जागी धर्मांध इस्लाम आणण्याचाच हा प्रयत्न होता. पुढं पुढं झियांच्या राजवटीत दडपशाही खूपच वाढली.

पाकिस्तानला एक संकुचित इस्लामी राष्ट्र बनवण्यासाठी त्यांनी अनेक योजना राबवल्या. ‘‘मग तिथल्या प्रत्येकानं झियांचं म्हणणं मान्य केलं का?’’ पीटरनं विचारलं. ‘‘मुळीच नाही. प्रत्येक जणच काही धर्मांध नसतो. पाकिस्तानी जनतेतला धर्मनिरपेक्ष गट यामुळं अस्वस्थ झाला. कारण, जे घडत होतं ते लोकशाहीला धरून नव्हतं आणि त्याला कुराणाची मान्यताही नव्हती; पण भीतीमुळं प्रत्येक जण गप्प होता; मात्र पाकिस्तानातले विख्यात कवी कवी फैज अहमद फैज यांनी झिया यांना तीव्र विरोध केला. फैज यांनी ‘हम देखेंगे’ ही कविता लिहिली. ‘तुम्ही काय करता, ते बघूच’, असा तिचा अर्थ. फैज यांनी पाकिस्तानच्या निर्मितीपासून अनेक राजवटी पाहिल्या होत्या. कवितेला राजकीय आणि सामाजिक अर्थ देऊन तिला क्रांती आणि त्यागाशी जोडण्याचं काम त्यांच्या कवितेनं केलं. ‘हम देखेंगे’ ही फैज यांनी व्यक्त केलेली झिया यांच्या हुकूमशाहीविरुद्धची प्रतिक्रिया होती. या कवितेवर बंदी घालण्यात आली. फैज यांना अटक करून तुरुंगात डांबण्यात आलं. सत्ताधाऱ्यांचा जुलूम तसाच सुरू राहिला. पाकिस्तानी महिलांना साडी नेसण्यास मज्जाव करण्यात आला, त्यावर बंदी घालण्यात आली. निषेधाचे सगळे आवाज बंद झाले, तेव्हा इक्‍बाल बानो या गायिकेचा एक आवाज उमटला. साडी परिधान करून त्या एका सार्वजनिक कार्यक्रमात आल्या आणि त्यांनी ‘हम देखेंगे’ ही फैज यांची भावपूर्ण कविता गायली. फैज यांच्या अटकेचा निषेध करण्यासाठी लाहोर स्टेडियममध्ये त्या वेळी ५० हजार लोक जमले होते. कायदा मोडल्याबद्दल इक्‍बाल बानो यांना अटक होईल, असंच सगळ्यांना वाटत होतं; पण एव्हाना बानो ही काही केवळ ‘एक व्यक्ती’ राहिली नव्हती, तर जनतेच्या मनातल्या प्रक्षोभाचं त्या ‘प्रतीक’ बनल्या होत्या. सरकारला नाइलाजानं त्यांच्यापुढं म्हणजेच एका व्यक्तीपुढं झुकावं लागलं. राष्ट्रगीतापेक्षाही अधिक प्रभावी ठरलेल्या या कवितेच्या कॅसेट नंतर पाकिस्तानभर वाटण्यात आल्या. एखाद्या कवितेच्या-गाण्याच्या वेळी लोकांनी घोषणा दिलेलं आणि ध्वनिमुद्रणात त्या घोषणांचा आवाज उमटलेलं मला व्यक्तिशः अजिबात आवडत नाही; पण ‘जब ताज उछाले जाएंगे। जब तख्त गिराए जाएंगे... हम देखेंगे...’ या ओळी बानो गात असताना 50 हजार हृदयांमधून येणारा ‘इन्कलाब झिंदाबाद’ हा अत्यंत पवित्र आणि सामर्थ्यशाली स्वर फासावर लटकलेल्या वीरांची आणि जनतेनं त्यांच्यासाठी
ढाळलेल्या अश्रूंची आठवण मला करून देत होता. दुर्दैवानं यानंतर फैज यांचं लवकरच निधन झालं.

‘‘तुमच्याकडं ते रेकॉर्डिंग आहे का?’’ कुणीतरी विचारलं. ती ध्वनिमुद्रिका लावली. त्या कवितेचा परिणाम होत असलेला क्षणार्धात जाणवला. गांधीजी जे म्हणत असत, त्याचा अर्थ काहीही न बोलता, कसल्याही चर्चेशिवाय चमूला समजला होता.
गांधीजी म्हणत ः ‘मी जेव्हा निराश होतो, तेव्हा एक गोष्ट मला जाणवते व ती म्हणजे, इतिहासात वेळोवेळी सत्य आणि प्रेम यांचा नेहमीच विजय झाला आहे. तिथं खुनी आणि हल्लेखोर अनेक आहेत...अनेक वेळा त्यांचीच चलती झालेली असल्याचं दिसतं; पण अखेरीस त्यांचा पराभव होतोच, हे प्रत्येकानं नेहमीच लक्षात ठेवलं पाहिजे.’ चमूला हे समजलं, की अन्याय कोणत्याही प्रकारचा असला तरी पडेल ती किंमत देऊन त्याला विरोध हा केलाच पाहिजे. भयापुढं झुकण्यापेक्षा ते जाणून घेणं हाच असहिष्णुता आणि अन्यायाविरुद्ध लढण्याचा एकमेव मार्ग आहे.

कविता-गाणं संपलं तेव्हा मृदुला म्हणाली ः ‘‘सर, धन्यवाद. आमचं शंकानिरसन झालं. आपल्याला लोकशाही, धर्मनिरपेक्षता, भारतीय म्हणून असलेली आपली ओळख टिकवायची असेल, तर आपल्याला या मूल्यांसाठी झगडलंच पाहिजे.’’
तिचाच मुद्दा पुढे नेत पीटर म्हणाला ः ‘‘प्रचंड दडपशाहीतही परिणामांची कल्पना असताना निर्भीडपणे लेखन करणारे महान कवी फैज अहमद फैज यांना मी अभिवादन करतो. त्याचबरोबर फैज यांच्या भावनांना ‘आवाज’ देणाऱ्या गायिका इक्‍बाल बानो यांनाही माझं अभिवादन. इक्‍बाल बानो यांचं साहसही तितकंच महत्त्वाचं होतं.’’
त्याच वेळी उषा शांतपणे आत आली आणि म्हणाली ः ‘‘सीमारेषा नकाशावर असतात...त्या लोकांच्या मनावर कधीही उमटू देऊ नयेत. सत्याला धर्म नसतो. ते हिंदू असत नाही आणि मुस्लिमही असत नाही. महापुरुष आणि आदर्श हे सगळ्यांचेच आसतात. ते कोणत्याही एका देशाचे किंवा धर्माचे असत नाहीत. त्यांचा आदर करण्यानं आपण आपल्या संस्कृतीत जे जे चांगलं आहे, त्या त्या सगळ्यांचाच आदर करत असतो. असं केल्यानंच आपण विश्‍वाचे नागरिक बनू.’’ उषाचे डोळे भरून आले होते. मी आणखी एक अनुरूप कविता म्हणावी, असं तिनं मला आर्जव केलं.
त्या वेळी हबीब जालिब यांच्या ओळी मला आठवल्या.
दीप जिसका महल्लात ही मे जले
चंद लोगों की खुशियों को लेकर चले
वो जो साए मे हर मसलहत के पले
ऐसे दस्तूर को सुबह-ए-बेनूर को
मैं नही मानता, मैं नही जानता.

यास्मिननं या ओळींचं मर्म उलगडून दाखवलं...
ज्या राजवटीत फक्त महालातच दिवे लागतात, ज्या राजवटीत फक्त काही जणांनाच सुख मिळतं. अशा समाजव्यवस्थेला, अशा अंधकारमय पहाटेला
मी मानतही नाही आणि...ओळखतही नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com