आमच्यातला "आयुब' ! (डॉ. यशवंत थोरात)

डॉ. यशवंत थोरात
रविवार, 23 एप्रिल 2017

माझ्या मनातल्या ‘आयूब’ला मला नीट समजून घ्यायचंय. ‘चांगलं’, ‘उदात्त’, ‘सर्वसाधारण’ आणि ‘वाईट’ यांतला फरक मला समजून घ्यायचाय. माझ्या मनाचे झालेले तुकडे मी एकाकीपणे वेचून पुन्हा जुळवतो आहे. कधीतरी ते काम नक्कीच पूर्ण होईल.
 

माझ्या मनातल्या ‘आयूब’ला मला नीट समजून घ्यायचंय. ‘चांगलं’, ‘उदात्त’, ‘सर्वसाधारण’ आणि ‘वाईट’ यांतला फरक मला समजून घ्यायचाय. माझ्या मनाचे झालेले तुकडे मी एकाकीपणे वेचून पुन्हा जुळवतो आहे. कधीतरी ते काम नक्कीच पूर्ण होईल.

मला अजूनही स्पष्ट आठवतंय.
त्या दिवशी तारीख होती सात जून.
वर्ष होतं १९६४. पाहता पाहता आभाळ भरून आलं आणि पावसाचा एक जोरदार सडाका आला. त्या काळात पाऊस सात जूनला अगदी यायचा म्हणजे यायचाच. त्या काळी पावसाचा अंदाजही नेमकेपणानं यायचा. माणसाच्या मनांचाही अंदाज त्या काळी जसा नेमका लागायचा अगदी तसाच! त्या दिवशी मी कॉलेजमधून घरी आलो. फाटकाला लावलेल्या पत्रपेटीत एक लिफाफा पडलेला होता. सवयीनं मी तो बाहेर काढला. तीन गोष्टींची माझ्या नजरेनं क्षणार्धात नोंद केली. एक म्हणजे, लिफाफ्याचा उंची कागद आणि क्रीम कलर. दुसरी गोष्ट म्हणजे, तो लिफाफा उघडा होता. न चिकटवलेला. आणि तिसरी लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे, त्या लिफाफ्यावरचं पांढऱ्या गोलातलं हिरव्या पार्श्वभूमीवरचं चाँद-ताऱ्याचं चित्र. पाकिस्तान सरकारचं बोधचिन्ह. ते पत्र माझ्या वडिलांना आलेलं होतं. लेफ्टनंट जनरल एसपीपी थोरात, डीएसओकेसी (निवृत्त). तो लिफाफा पाहून मला थोडं आश्‍चर्यच वाटलं. मी ते पत्र माझ्या वडिलांना नेऊन दिलं. त्यांनी काहीही न बोलता ते पत्र खिशात ठेवून दिलं. याचंही मला आश्‍चर्य वाटलं.
माझी उत्सुकता खूपच ताणली गेली होती. रात्री जेवताना मी कुतूहलानं त्यांना
विचारलं : ‘‘बाबा, कुणाचं पत्र आहे?’’
वडील अत्यंत मितभाषी होते. कमीत कमी शब्दांत बोलणारे. माझ्या प्रश्नाला
त्यांनी एका शब्दाचंच उत्तर दिलं!  ते म्हणाले : ‘‘आयूबचं.’’
-मी उडालोच ! ‘‘म्हणजे आयूब खान? पाकिस्तानचे अध्यक्ष?’’ माझ्या आवाजातून एकाच वेळी आश्‍चर्य, अविश्वास आणि आदर प्रकट झाला होता.
‘‘होय, आयुब खान. पाकिस्तानचे अध्यक्ष महमद आयूब खान!’’ वडिलांनी अगदी  सहजपणे सांगितलं.
‘‘म्हणजे तुम्ही त्यांना ओळखता?’’
‘‘हो’’ वडील थंडपणे म्हणाले.
माझी नात यामिनी त्या वेळी तिथं असती, तर ती ज्या पद्धतीनं माझ्याशी बोलते, त्याच ढंगात ती त्यांना म्हणाली असती : ‘‘व्वा आजोबा ! तुम्ही तर खरे रॉकस्टार आहात. तुमच्यासारखा माणूस मी पाहिला नाही.’’- मी तिच्याएवढा बेधडक नाही. त्यामुळं मी फक्त एवढंच विचारलं : ‘‘कसं काय ओळखता?’’

वडील शांतपणे सांगायला लागले : ‘‘मी त्यांना प्रथम औरंगाबादमध्ये भेटलो. तिथं ते माझ्या बटालियनमध्ये सेकंड लेफ्टनंट म्हणून रुजू झाले होते. माझ्याप्रमाणेच आयूबही ‘सॅंडहर्स्ट’च्या रॉयल मिलिटरी कॉलेजमधून पासआउट झाले होते. त्यांनाही ‘किंग्ज कमिशन ऑफिसर’ म्हणून कमिशन मिळालं होतं. आमच्या युनिटमध्ये आम्ही पाच भारतीय अधिकारी होतो. आयूब मला कनिष्ठ होते. अतिशय देखणं व्यक्तिमत्त्व लाभलेले आयूब हाजरा इथले राहणारे होते आणि अलीगढ मुस्लिम विद्यापीठातून त्यांनी पदवी घेतली होती. त्या वेळी ते साहजिकच अगदी तरुण होते आणि पुढं एवढं मोठं पद मिळवतील, असं त्या वेळी त्यांच्याकडं पाहून वाटत नव्हतं.

‘‘एवढीच तुमची ओळख होती का?’’- मी  विचारलं.‘‘नाही. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी आम्ही एकत्र लढलो आणि ब्रह्मदेशातल्या (म्यानमार) अराकन व कांगाव इथल्या लढाईच्या वेळी ते माझ्या कंपनीचे उपप्रमुख होते,’’ बाबांनी सांगितलं.
बाबा पुढं सांगू लागले ः ‘‘युद्धानंतर आम्ही भारतात परत आलो. त्या वेळी स्वातंत्र्य अगदी उंबरठ्यावर आलं होतं. त्यावेळी लष्करात हिंदू आणि मुस्लिम अधिकाऱ्यांमध्ये बंधुभावाचं नातं होतं. ‘भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचं लष्कर एकच असलं पाहिजे,’ असे आदर्शवादी विचार हे अधिकारी बोलून दाखवत होते. या अधिकाऱ्यांमध्ये आयूब यांचाही समावेश होता; पण फाळणी झाली आणि सगळे संदर्भच बदलले. अचानकपणे ही भाषा बदलली. दोन्ही देश धर्माच्या मुद्द्यावर वेगळे झाले होते. या दोन्ही देशाचं परराष्ट्रधोरण अणि पर्यायानं लष्कर एक असणं शक्‍य नव्हतं. त्यामुळं दोन्ही देशांनी ही कल्पना धुडकावून लावली आणि लष्करासह दोन्ही देशांच्या मालमत्तेची व साधनसामग्रीची वाटणी झाली. पंजाबमधल्या मुस्लिमांना पाकिस्तानच्या लष्करात जाणं बंधनकारक करण्यात आलं; पण देशाच्या इतर भागांतल्या सैनिकांना कोणत्याही देशाच्या लष्करात जाण्याची मुभा देण्यात आली.

आयूब हे पंजाबमधले असल्यामुळं त्यांना अर्थातच पाकिस्तानी लष्करात जावं लागलं. त्याच वेळी काश्‍मीरमध्ये चकमकी सुरू झाल्या. जनरल थिमय्या यांच्याकडं काश्‍मीरची, तर माझ्याकडं पूर्व पंजाबची जबाबदारी सोपवण्यात आली होती. सीमावर्ती भागात तातडीनं स्थिती सुरळीत करण्याची मोठी जबाबदारी लष्करावर होती. सीमावर्ती भागातल्या शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करून त्यांना शेतीच्या कामासाठी पुन्हा उद्युक्त केलं तरच हे घडणार होतं; पण फाळणीनंतर हिंसेचा आगडोंब उसळल्यामुळं ते घाबरले होते आणि पाकिस्तानी टोळीवाले आपल्याला त्रास देतील, या भीतीमुळं ते तसं करायला धजावत नव्हते. हा अणि इतर प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं चर्चा करण्यासाठी मला वारंवार लाहोरला जावं लागे; पण पाकिस्तानी सैन्याचे प्रमुख जनरल सर डग्लस ग्रेसी हे ‘सॅंडहर्स्ट’मधले माझे पालक होते. माझ्याच बटालियनमधले मेजर जनरल आयूब खान हे माझे पाकिस्तानातले निमंत्रक आणि समकक्ष अधिकारी होते.
त्यामुळे माझं काम तसं सोपं होतं.’’
‘‘तुम्हाला अशी सारखी सीमा ओलांडण्याची परवानगी होती का? आणि सुरक्षेच्या दृष्टीनं तसं करणं योग्य होतं का ? तुमचा पाकिस्तान्यांवर विश्वास होता का?’’- मी बाबांवर प्रश्नांचा भडिमार केला.

ते क्षणभर हसले आणि म्हणाले : ‘‘तू त्यांच्याकडं आजच्या संदर्भातून बघत आहेस. आज आपण परस्परांचे शत्रू म्हणून एकमेकांसमोर उभे आहोत; पण नेहमीच असं वातावरण नसतं. तुला खरं वाटणार नाही, पण मी जेव्हा जेव्हा लाहोरला जात असे, तेव्हा तेव्हा मला वाघा सीमेवर लष्करी सलामी दिली जात असे. आमच्या अधिकृत बैठकी खूपच वादळी आणि प्रसंगी अत्यंत कडवट स्वरूपाच्या होत; पण संध्याकाळी आयूब मला म्हणत असत, की ‘जनरल, आपण तात्पुरती युद्धबंदी लागू करायची का? कारण, तुमचे सहकारी तुमची वाट पाहत आहेत, हे मला माहीत आहे. ‘१/१४ पंजाब-शेरदिल्स’या माझ्या मूळ बटालियनमधल्या माझ्या सैनिकांना व अधिकाऱ्यांना
उद्देशून आयूब हे म्हणत असत. आयूब यांच्या या वक्तव्यानंतर सगळं वातावरणच एकदम बदलून जाई. हे सगळे सैनिक आणि अधिकारी फाळणीनंतर पाकिस्तानात गेले असले, तरी एका अर्थानं माझे मित्रच होते. मी त्यांच्यासमवेत हास्यविनोदात संध्याकाळ घालवायचो. तसं पाहिलं तर ही अतिशय विचित्र अशी स्थिती होती. काश्‍मीरच्या मुद्द्यावरून आम्ही एकमेकांशी लढत होतो; पण संध्याकाळी मेसमध्ये मात्र, आम्ही पूर्वी एकत्र काढलेल्या दिवसांच्या आठवणींमध्ये रंगून जात असू. एकत्र असताना आम्ही एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून लढलो होतो. शांततेच्या काळात सख्ख्या भावासारखे एकत्र नांदलो होतो.’’ हे सगळं संभाषण माझी आई शांतपणे बसून ऐकत होती. मध्येच आमचा संवाद तोडत ती म्हणाली : ‘‘यशवंत, तूसुद्धा आयूब खान यांचं एका गोष्टीसाठी देणं लागतोस.’’

-‘‘मी,’’ मी चमकून ‘विचारलं. ‘‘होय’’ वडिलांकडं पाहत आणि किंचित लाजत आई म्हणाली : ‘‘दोन मुलींनंतर आम्हा दोघांनाही मुलगा हवा होता; पण माझ्या अशक्त प्रकृतीमुळं डॉक्‍टरांना काळजी वाटत होती. यामुळं मी थोडी अस्वस्थ आणि निराश झाले होते. त्या वेळी आयूब खान एकदा घरी आले असताना त्यांनी मला अजमेर शरीफबद्दल विचारलं. अजमेरला ख्वाजा गरीबनवाझ मोईनुद्दीन चिस्ती यांचा दर्गा आहे. ‘‘तुम्हाला माहीत आहे का हे, भाभी,’’ आयूब खान यांनी मला हे विचारलं आणि ते पुढं सांगू लागले ः ‘‘- मुलगा व्हावा यासाठी सम्राट अकबर या दर्ग्याच्या दर्शनासाठी पायी चालत गेला होता. मी नुकताच दर्ग्याला जाऊन प्रार्थना करून आलोय. ख्वाजासाहेबांच्या आशीर्वादानं तुम्हाला नक्की पुत्ररत्न प्राप्त होईल. तुम्हाला मुलगा होईल तेव्हा मी दर्ग्यात मिठाई वाटीन आणि दर्ग्यावर चादर चढवीन असा नवस बोलून मी आलो आहे.’’ काही दिवसांनी माझा जन्म झाला; पण तोपर्यंत फाळणी होऊन देशाचे दोन तुकडे झाले होते.
‘‘मग त्यांनी आपला नवस पूर्ण केला की नाही?’’ - मी कुतूहलानं विचारलं.‘‘केला ना... अनेक अडचणी असतानाही त्यांनी आपला नवस पूर्ण केला’’ आई म्हणाली.

परस्पर विरोधी भूमिका असतांनाही आयूब खान आणि माझे वडील यांनी परस्परांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवले होते, हेही मला यातून लक्षात आलं. त्यांचा परस्परांशी संपर्क होता. त्यांचा एकमेकांशी पत्रव्यवहार होता. त्यात राजकीय किंवा धोरणात्मक चर्चा नसे; पण ‘मुलं आजकाल कसं ऐकत नाहीत... मुली कशा थोड्या जास्तच आधुनिक बनल्या आहेत... भाववाढ कशी आणि किती झालीय... हल्ली सांधे बरेच दुखायला लागलेत...’ अशा व्यक्तिगत, सामाजिक आणि कौटुंबिक बाबी त्या पत्रांमध्ये असत. दोघेही एकमेकांना खुलं पत्र - म्हणजे लिफाफा न चिकटवता - पत्र पाठवत असत. उगाच तपासणी अधिकाऱ्यांना पत्र उघडण्याचे कष्ट कशाला द्या! 

शेवटी, तपासणी अधिकारी ते उघडणारच आहेत! मग तेवढाच त्यांचा त्रास कमी, अशी भूमिका त्यामागे असे. महंमद आयुब खान यांचं हे चित्र अनेक दिवस माझ्या मनावर चांगलच ठसलं होतं. निवृत्तीनंतर भारतीय उपखंडाचा मी विस्तारानं अभ्यास सुरू केला. इतिहास आणि संस्कृती यांनी परस्परांशी बांधलेल्या दोन समुदायांमध्ये एवढा द्वेष कसा निर्माण झाला, याचा अभ्यास मला करायचा होता. पाकिस्तानात नागरी आणि लष्करी सत्ता आलटून-पालटून का असते, हेही मला शोधायचं होतं. परंपरागत मुस्लिम धर्मसत्ता आणि लोकशाही यांच्यातलं नातं नेमकं काय आहे, ते मला अभ्यासायचं होतं. पाकिस्तानातलं सार्वजनिक जीवन आणि सामाजिक सुसंवाद हा धर्म आणि धार्मिक पक्ष यांच्या प्रभावाखाली का आहे, याचा शोध मला घ्यायचा होता. जर भारतीय आणि पाकिस्तानी लोकांचं मूळ एक असेल, त्यांचा डीएनए समान असेल, तर मग दोन्ही देशांत शांतता व परस्परविश्वासाची प्रक्रिया सुरू का झाली नाही आणि सुरू झाली असेल तर टिकली का नाही? खोलवरच्या अविश्वासामुळं ती खंडित झाली का, असा प्रश्न मला पडला होता. शांततापूर्ण सहजीवनाची दोन्ही बाजूंना काही आशा उरलीय का, हेही मला पाहायचं होतं.

यातूनच मला त्या माणसाची काळी बाजू दिसायला लागली. एका पातळीवर तो आपलं पद आणि प्रतिष्ठा आपल्या मित्रत्वाच्या आड येऊ देत नव्हता. त्याच्या भाभीला मुलगा व्हावा म्हणून ज्यानं नवस बोलला होता आणि तो पूर्णही केला होता, जो पत्रात अगदी सामान्य गोष्टींची चर्चा करत होता आणि दुसऱ्या बाजूला तो एक हुकूमशहा होता, ज्यानं पाकिस्तानातली राजकीय लोकशाही खंडित केली होती, ज्यानं त्यांच्या देशात पहिल्यांदा लष्करी कायदा लागू केला होता, लोकशाही चिरडून टाकली होती, भांडवलशाही जोपासली होती, पूर्व पाकिस्तानातल्या बंगाल्यांचा वांशिक राष्ट्रवाद पायदळी तुडवून लोकांच्या हक्कांवर गदा आणली होती, भारतावर १९६५ चं युद्ध लादलं होतं आणि १९७१ च्या युद्धातल्या पाकिस्तानच्या दारुण पराभवाची जणू नांदीच म्हणून ठेवली होती, त्या माणसाचं व्यक्तिमत्त्व मला जाणून घ्यायचं होतं. याच माणसामुळं पाकिस्तानी लष्कराला पहिल्यांदा सत्तेची चव चाखायला मिळाली आणि त्यातूनच पाकिस्तानातली लोकशाही धोक्‍यात आली. गेल्या  ६५ वर्षांत भारत आणि पाकिस्तानला आपलं वैर मिटवून परस्परांशी संबंध सुधारण्यात अपयश आलं असेल, तर त्याचा सर्वाधिक दोष आयूब खान आणि त्याच्या प्रभावळीतल्या माणसांना द्यायला हवा. त्यांनी असं केलं नसतं तर दोन्ही देशांत विकासानं गती घेतली असती आणि गरिबीविरुद्धचं युद्ध दोन्ही देशांनी जिंकलं असतं. तसं झालं असतं तर दोन्ही देशांतल्या वैराचा-शत्रुत्वाचा गैरफायदा दहशतवाद्यांना घेता आला नसता. जगाच्या एक षष्ठांश लोकसंख्येला कायम अणुबाँबच्या भीतीच्या सावटाखाली राहावं लागलं नसतं. मात्र, पाकिस्तानातल्या प्रत्येक लष्करी आणि नागरी हुकूमशहाच्या विरुद्ध तिथले कवी-साहित्यिक उभे राहिले आहेत. पाकिस्तानातल्या पहिल्या लष्करी हुकूमशहानं जेव्हा तिथल्या लोकशाहीचा गळा घोटला, तेव्हा कवी हबीब जालिब यांचा आवाज सर्वत्र घुमला. लष्करी सत्तेला आव्हान देत आणि सत्तेकडून होणारे फायदे धुडकावून लावत त्यांनी हुकूमशाहीला आपल्या काव्याद्वारे आणि चळवळीद्वारे कडाडून विरोध केला. सन १९६२ मध्ये पाकिस्तानवर नवी घटना लादण्यात आली. ही घटना पाकिस्तानच्या इतिहासाला कलाटणी देणारी ठरली. या घटनेनं पाकिस्तानातली संसदीय लोकशाही संपवली आणि तिथं अध्यक्षीय राजवटीची परंपरा सुरू झाली. त्याच वर्षी हबीब यांनी त्यांची ‘दस्तूर’ ही कविता लिहिली. ‘दस्तूर’ याचा अर्थ घटना (संविधान) असा होतो. या कवितेचं पहिलं कडवं असं आहे :
दीप जिसका महल्लातही में जले
चंद लोगों की खुशीयों को लेकर चले
वो जो साये में हर मसलहत के पले
ऐसे दस्तूर को, सुबह-ए-बेनूर को
मैं नहीं मानता, मैं नहीं जानता !

या कवितेनं सगळा पाकिस्तान ढवळून निघाला. निराश लोक एकत्र आले. त्यांच्या मनात नवी आशा निर्माण झाली. केवळ त्या काळ्या दिवसांपुरतीच नव्हे, तर भविष्यात जेव्हा जेव्हा शेजारीदेश युद्ध पुकारतील, दोन्हीकडचे सैनिक धारातीर्थी पडतील, त्यांच्या मातांचा शोक अनावर होईल, त्यांची मुले निराधार होतील तेव्हा तेव्हा
विवेकाची ही धगधगती मशाल त्यांना नक्कीच प्रकाश दाखवील. मला त्या वेळी कळलं नाही; पण सात जून १९६५ ला माझा एक प्रवास सुरू झाला. त्या वाटेवर मी अजूनही चालतोच आहे. माझ्या मनातल्या आयूबला मला नीट समजून घ्यायचंय. ‘चांगलं’, ‘उदात्त’, ‘सर्वसाधारण’ आणि ‘वाईट’ यांतला फरक मला समजून घ्यायचाय. माझ्या मनाचे झालेले तुकडे मी एकाकीपणे वेचून पुन्हा जुळवतो आहे. कधीतरी ते काम नक्कीच पूर्ण होईल. सत्य हेच आहे, की आपल्या प्रत्येकाच्या मनात एक ‘आयूब’ असतो नि एक ‘जालिब’ही असतो. एक पापी, तर एक संत! त्या दोघांनाही एकत्र आणणं हे आपलं काम.  

सात जून १९६५ पासून मी ते करतोय.मला आठवतंय की त्या दिवशीची तारीख सात जूनच होती. कारण, त्या दिवशी पाऊस पडला होता. पावसाचा अंदाज त्या काळी आधी येत होता.

Web Title: dr. yashwanta thorat writes about aayub khan