अमरत्वाचा पट्टा! 

Immortality
Immortality

‘रोहितने समोर पडलेल्या आपल्या प्राणहीन शरीराकडे एक सेकंद बघितले, पण दुसऱ्याच क्षणी त्याने आपल्या भावना आवरल्या, कारण पुढे बरीच कामे होती. शरीराची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था आधीच झालेली होती. त्याप्रमाणे स्थानिक संस्थेची स्वयंचलित व्हॅन येऊन ते शरीर घेऊन जाणार होती. शरीराकडे एक शेवटची नजर टाकून तो परत आपल्या कामासाठी घरातल्याच त्याच्या कार्यालयाकडे वळला.’’

हा विज्ञान काल्पनिकेतला भाग वाटतो ना? पण खरोखरच हे पुढच्या तीस वर्षांत घडण्याची शक्यता आहे. माणसाचं आयुष्यमान वाढवण्याची किंबहुना अमरत्व मिळविण्याची इच्छा माणूस वर्षानुवर्षे बाळगून आहे. आपल्या मुलाकडून त्याचं तारुण्य घेणारा ययाती, अमरत्व मिळालेले सप्तचिरंजीव आपल्याला माहीत आहेतच. या कल्पना आता प्रत्यक्षात उतरणे शक्य आहे. साधारण पुढील २५ वर्षांत म्हणजे २०४५ पासून मृत्यू हा ऐच्छिक असेल, असे मानले जाते. आज विशीत असणारे तरुण २०५० मध्ये पन्नाशीत असतील आणि त्यांना अमरत्व मिळविणे कदाचित शक्य झाले असेल. 

यात अशक्य काही नाही. आपण जर याआधीचा इतिहास बघितला तर, माणसाची आयुर्मर्यादा गेल्या काही वर्षांत वाढतच गेल्याचे दिसेल. अमेरिकेत १९२० मध्ये सर्वसाधारण आयुर्मर्यादा ५३ च्या आसपास होती, २०२० मध्ये ती ७९ झाली. भारतात हेच आकडे २७ व ६९ आहेत. म्हणजे आपल्या देशात गेल्या शंभर वर्षांत आयुर्मर्यादा ५० वर्षांनी वाढली. यामागचे सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातली प्रचंड प्रगती. 

१९२० मध्ये प्रतिजैविके माहितीही नव्हती. १९४० पासून प्रतिजैविके बाजारात आल्यानंतर संसर्गजन्य आजारांमुळं होणाऱ्या मृत्यूत प्रचंड घट झाल्यानं आयुष्य वाढलं. संसर्गजन्य रोगांऐवजी हृदयरोग, पक्षाघात ही मृत्यूची प्रमुख कारणे झाली. कर्करोग, मधुमेह यामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाणही लक्षणीय आहे. परंतु, जैवतंत्रज्ञान आणि जैववैद्यकीय शास्त्र यांच्या जोडीलाच संगणक विज्ञान आणि रोबोटिक्समधील प्रगतीमुळं या आजारांवरही विजय मिळवून आयुष्यमान वाढविणं शक्य होणार आहे. 
भविष्यात स्वतःच्या अवयवाच्या आकाराचे आणि स्वत:च्याच पेशी असलेले नवे अवयव आपल्याला उपलब्ध होतील. जवळपास सर्वच अवयव प्रयोगशाळेत गरजेनुसार तयार करून शरीरात लावता येतील.

मूळ पेशींद्वारे क्रांती 
मूळ पेशी हा आपल्याला मिळालेला एक क्रांतिकारक मार्ग आहे. नाळेतील रक्त किंवा शरीराच्या इतर भागातून मूळ पेशी वेगळ्या करुन, त्यांचे रूपांतर इतर पेशींमध्ये करण्याचे शास्त्र झपाट्याने विकसित होत आहे. त्याच्या जोडीनेच त्रिमितीमध्ये छपाई करण्याचे तंत्रज्ञानही विकसित होत आहे. आतापर्यंत शास्त्रज्ञांनी हाडे, आणि कानासारखे अवयव प्रयोगशाळेत या तंत्रज्ञानाने तयार केले आहेत. हृदय, फुप्फुसे, स्नायू तयार करण्याचे तंत्रज्ञान विकसित होत आहे. त्रिमितीय छपाईच्या तंत्रज्ञानाने अवयवांचा सांगाडा तयार करून त्यामध्ये रुग्णाच्याच मूळ पेशी वाढवून नवा अवयव तयार करणे भविष्यात शक्य होईल. हा नवा अवयव परका नसून आपलाच असेल. 

मूळ पेशींवर प्रयोग 
अशा अभ्यासाचा एक भाग म्हणजे मेंदूच्या पेशी प्रयोगशाळेत वाढवणे. प्रयोगशाळेत अशा मूळ पेशी वाढवून त्यांचे मेंदूच्या पेशींत रूपांतर करणे शक्य झाले आहे. तिळाच्या आकाराच्या या समूहांना ऑर्गनॉईड म्हणतात, मराठीत आपण त्याला अवयवस्वरुप म्हणू शकतो. अशाच प्रयोगशाळेत वाढणाऱ्या मेंदूच्या अवयवस्वरुपांमध्ये गर्भात असणाऱ्या बाळाच्या मेंदूत दिसतात तशा विद्युत लहरी शास्त्रज्ञांना दिसल्याने खळबळ उडाली. अशा लहरी म्हणजे चेतना किंवा स्वत्वाची जाणीव असू शकते का? नसल्यास ती प्रयोगशाळेत निर्मित करण्यापासून आपण किती दूर आहोत?,केवळ विद्युत प्रवाह व चेतना यातील सीमारेषा कोणती?, अशा प्रयोगांची नैतिकता, यावर चर्चा सुरू झाली आहे. याचीच दुसरी बाजू म्हणजे एखाद्याच्या मूळ पेशी घेऊन त्याचा चेतना असलेला मेंदू, ज्याला स्वत्वाची जाणीव आहे, असा प्रयोगशाळेत वाढवणे भविष्यात शक्य होईल. 

‘क्रिस्पर कास’ 
जनुक उपचार पद्धतीचाही विकास वेगाने होत आहे. कर्करोग आणि इतर अनेक आनुवंशिक आजार हे जनुकीय बदलांमुळे होतात. अशा बदलांविषयी आज बरीच माहिती आहे. भविष्यात ती परिपूर्ण होईल आणि अचूक निदानामुळे हे बिघडलेले जनुक बदलता येणे शक्य होईल. असे बदल अचूक घडविण्याचे तंत्र ‘क्रिस्पर कास’मुळे उपलब्ध आहे. त्यामुळे वरवरच्या उपायांऐवजी मुळालाच हात घातल्याने रोगांचे नियंत्रण आणि जीवनही सुलभ होईल. त्याचबरोबर दुसरीकडे शरीरातील पेशींचे आयुष्य वाढविणेही शक्य होईल. शरीरातल्या पेशींचे वय जसे वाढत जाते, तसे त्यांच्यातल्या गुणसूत्रांची टोके ज्यांना ‘टिलोमिर’ म्हणले जाते, ती झिजून त्यांची लांबी कमी व्हायला लागते. त्यांची लांबी कायम ठेवण्यावर किंवा वाढविण्यावर बरेच संशोधन सुरू आहे. चेतना म्हणजे काय, हे मेंदूतल्या पेशींतून समजून घेऊन संगणकात ती आणता येईल का? अशा संगणकाकडून यंत्रमानवाला संदेश देऊन त्याच्या हालचाली करता येतील का, यावरही संशोधन चालू आहे. सध्या प्रयोगशाळेत वाढविलेल्या मेंदूच्या पेशींकडून उंदराच्या मज्जारज्जूला संदेश पाठवून हाता-पायांच्या हालचाली करण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे.

जर मूळ पेशींपासून संपूर्ण भावना, संवेदना, चेतना, जाणिवा असलेल्या मेंदूची निर्मिती करून अशा मेंदूपासून यंत्रमानवाला सूचना देऊन त्याच्या हालचाली करता आल्या तर, आपण अमरत्वापाशी पोचलो असे म्हणता येईल. म्हणजे हा मेंदू अमर असेल, त्याच्याकडून एकापेक्षा जास्त यंत्रमानवांना संदेश देता येईल. त्यामुळे एकाऐवजी अनेक रोहित जगात असू शकतात. पुन्हा हा यंत्रमानव आपल्याला पाहिजे तसा दिसू शकेल. त्यामुळे एकच रोहित हा सिद्धार्थ मल्होत्रा, विकी कौशल, टायगर श्रॉफ, कार्तिक आर्यन अशा पाच रुपात एकाच वेळी दिसू शकेल. या यांत्रिक जीवांना अन्नाची व प्राणवायूची गरज राहणार नाही. त्यामुळे इतर ग्रहांवरही ते राहू शकतील. फक्त इंधनाचा पुरवठा त्यांना करावा लागेल. 

याचा व्यावसायिक फायदा घेण्यासाठी परदेशात बऱ्याच कंपन्या उभ्या आहेत. क्रेग व्हेंटरच्या ‘लाँजिव्हिटी’ या कंपनीने मानवाच्या जनुकांचा क्रम तपासून तो दीर्घायुष्याच्या अभ्यासासाठी उपलब्ध करून दिला आहे. दीर्घ आणि निरोगी आयुष्य कसे जगता येईल यावर क्रेग बेलीची ‘जुवेनसन्स’ ही कंपनी संशोधन करत आहे. अशा संशोधनाबरोबरच शास्त्रीय आधार नसलेले काही उपायही प्रचलित आहेत. मूळ पेशींचा निरर्थक वापर किंवा तरुण व्यक्तींचा प्लाझ्मा घेणे अशी काही उदाहरणे घेता येतील. तरुण व्यक्तींचा प्लाझ्मा घेतल्याने उतार वयातल्या अनेक आजारांपासून दूर राहता येते या गैरसमजामुळे असा प्लाझ्मा अमेरिकेत एका लिटरला ५५०० डॉलर या भावात उपलब्ध आहे. 

थोडक्यात, औषधशास्त्र, जैवतंत्रज्ञान व जैववैद्यकीय तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे भविष्यात आयुष्यमान वाढून १०० च्या पुढेही निरोगी आणि परिपूर्ण जीवन जगणे सहज शक्य होईल. अचानक आलेल्या कोरोनासारख्या संसर्गजन्य आजाराने मृत्यूंचे प्रमाण तेवढ्यापुरते वाढले तरी, त्यावर उपायही वेगाने शोधता येतात हे आपण पाहतच आहोत. त्याहीपुढे जाऊन संगणक व यंत्रमानव शास्त्रातल्या प्रगतीमुळे अमरत्व मिळण्याची शक्यताही निश्चित आहे. पण याचे सामाजिक / नैतिक परिणाम काय होतील यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. 

(लेखक हे पुण्यातील राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंद्रात सन्माननीय वैज्ञानिक आहेत)

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com