टेकडी 170: मेल रोझ (डॉ. यशवंत थोरात)

डॉ. यशवंत थोरात
रविवार, 4 जून 2017

अशा गोष्टींमागं काही अगम्य कार्यकारण भाव असेल यावर व्यक्तिशः माझा विश्वास नाही; पण त्याबाबत मी नेमकं सांगूही शकत नाही. तुम्ही भविष्यकाळात बघून घटनांचा अन्वयार्थ लावू शकत नाही, तसा तो लावता येत नसतो...भूतकाळात बघूनच तुम्हाला त्या घटनांचा अन्वयार्य लावता येतो. ‘भूतकाळातल्या घटनांचे धागेदोरे जुळवले म्हणजे भविष्यातही ते जुळवता येतात, असा समज सुखावह असतो,’ असं म्हणतात. मला माहीत नाही; पण शेवटी तुम्हाला कशावर तरी विश्वास ठेवावाच लागतो!

सप्तरंग ‘‘लायटर मिळेल?’’ शेजारच्या प्रवाशानं मला विचारलं. 
मी शेजारी बघितलं. तो माझ्याच वयाचा एक जपानी प्रवासी होता. त्याच्या हातात न पेटवलेली सिगारेट होती. 
मी लायटर पेटवून त्याच्या सिगारेटपर्यंत नेला. 
आमचं बोलणं सुरू झालं. 
तो संयुक्त राष्ट्रसंघातला एक अधिकारी होता. जीनिव्हाला त्याचं कार्यालय होतं आणि आता तो घराकडं परतत होता. माझं जीनिव्हातल्या विद्यापीठात एक भाषण होतं. 
मी प्रथमच जीनिव्हात जात असल्याचं त्याला जाणवलं असावं. तिथं खायला कुठं, काय चागलं मिळतं, पाहण्यासारखं काय आहे याची माहिती त्यानं मला आपुलकीनं दिली. आम्ही थोडा वेळ अशाच इकडच्या-तिकडच्या गप्पा मारल्या. प्रवासात भेटलेल्या अनोळखी माणसाबरोबर केली जाते, तेवढ्या गोष्टींची देवाण-घेवाण संपल्यानंतर आम्ही नकळत गप्प झालो. 
मी माझ्याजवळचं पुस्तक उघडलं. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रह्मदेशाच्या (आता म्यानमार) आघाडीवर झालेल्या लढाईबद्दलचं फील्डमार्शल विल्यम स्लिम यांचं ते पुस्तक होतं : Defeat into Victory. 
त्यानं त्याच्याजवळचं वर्तमानपत्र उघडलं. बराच वेळ शांततेत गेला. 
थोड्या वेळानं त्यानं मला विचारलं ः ‘‘तुम्ही लष्करी इतिहासाचे प्राध्यापक आहात का?’’ 
‘‘नाही’’ म्हणालो : ‘‘सहज आवड म्हणून वाचतो. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी माझे वडील ब्रह्मदेशाच्या आघाडीवर होते.’’ 
‘‘माझेही,’’ माझ्याकडं बघत तो म्हणाला.
*** 
जपाननं डिसेंबर १९४१ मध्ये ब्रह्मदेशावर हल्ला केला आणि दुसऱ्या महायुद्धातली ब्रिटनविरुद्धची जमिनीवरची सगळ्यात मोठी आघाडी उघडली. जपानच्या आक्रमणामागं दोन कारणं होती. एक म्हणजे, ब्रह्मदेशाच्या मार्गानं चॅंग कै शेखच्या चिनी राष्ट्रीय लष्कराला होणारा शस्त्रपुरवठा रोखणं आणि त्याद्वारे चीनवर विजय मिळवण्याचा मार्ग सुकर करणं. दुसरं कारण म्हणजे, या चढाईतून त्यांना भारतात येण्याचा मार्ग मोकळा होणार होता. ब्रह्मदेश ताब्यात घेणं म्हणजे भारताच्या उंबरठ्यावर पोचणं होतं. तिथून कलकत्ता (आता कोलकता) फार दूर नव्हतं. यातून भारतात आधीच धगधगत असलेलं ब्रिटिशविरोधी वातावरण पेट घेईल, अशी त्यांची अटकळ होती. थायलंडमार्गे ब्रह्मदेशात प्रवेश करून जपानी फौजांनी १९४२ मध्ये चपळाईने रंगून (आता यंगून) जिंकून घेतलं. त्यांनी चीनला होणारा पुरवठा तोडला आणि असा पुरवठा करणारं एकमेव बंदरही ताब्यात घेतलं. लढायांमागून लढाया जिंकत जपानी फौजांनी ब्रिटिशांना भारतात मागं रेटलं. परिस्थिती बिकट बनली. ब्रिटिश फौजा प्रामुख्यानं युरोपातल्या युद्धात गुंतल्या होत्या. ब्रह्मदेश पुन्हा जिंकून घेण्याइतकं सैन्यदल आणि साधनसामग्री त्यांच्याजवळ नव्हती. पण १९४३ मध्ये परिस्थिती बदलली. नेतृत्वात फेरबदल करण्यात आले. ‘साऊथ ईस्ट एशियन कमांड’मध्ये वेव्हेल यांच्या जागी माऊंटबॅटन यांची नेमणूक झाली. ब्रह्मदेश आघाडीवरच्या युद्धाची सूत्रं एक तडफदार अधिकारी जनरल विल्यम स्लिम यांच्याकडं देण्यात आली. स्लिम यांनी त्याच्या सैनिकांमध्ये नवा जोश निर्माण केला, त्यांचं मनोधैर्य उंचावलं. ब्रिटिश सैन्याच्या या जमवाजमवीची आणि बांधणीची जपान्यांना कल्पना होती; त्यामुळं त्यांनी या आघाडीवरचं युद्ध वेगानं संपवण्यासाठी भारतात मुसंडी मारण्याची आणि ब्रह्मदेशात अराकान भागात हल्ला करण्याची योजना आखली. 

लष्करी इतिहासात विशेषत्वानं नोंद झालेल्या या सगळ्या चकमकींमध्ये माझ्या वडिलांनी एक सैनिक म्हणून भाग घेतला होता. सर्वप्रथम कोहिमामध्ये जपान्यांच्या ताब्यातून नागा टेकड्या मुक्त करण्यासाठी, नंतर इम्फाळमध्ये आणि शेवटी आराकानच्या घनदाट जंगलात. एका अर्थानं नशीबच त्यांना तिथं घेऊन गेलं. १९४३ च्या धुवॉंधार पावसाळ्यात संयुक्त फौजांच्या सर्वोच्च प्रमुखाचं विमान मॅगडॉ इथं उतरलं. ऑल इंडिया ब्रिगेडचं मुख्यालय तिथं होतं. माझ्या वडिलांची रेजिमेंटही याच ब्रिगेडचा एक भाग होती. माऊंटबॅटन यांच्याबरोबर लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल ब्राऊनिंग होते. सॅंडहर्स्टच्या रॉयल मिलिटरी कॉलेजमध्ये ते माझ्या वडिलांचे शिक्षक होते.त्या वेळी माझ्या वडिलांची आणि लेफ्टनंट कर्नल के. एस. थिमय्या व एल. पी. सेन या अन्य दोन अधिकाऱ्यांची माऊंटबॅटन यांच्याबरोबर ओळख करून देण्यात आली. माऊंटबॅटन यांनीही त्यांची चौकशी केली आणि युद्धाच्या अनुभवाबद्दल त्यांच्याकडं विचारणा केली. त्यानंतर ‘कॉन्फरन्स टेंट’मध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर त्यांनी प्रदीर्घ चर्चा केली. बैठकीनंतर बाहेर आल्यावर ब्रिगेड कमांडर रेजी हटन यांना ते म्हणाले ः ‘‘...तर मग ठीकंय रेजी, तुझ्या ऑल इंडियन ब्रिगेडलाच ही कामगिरी पार पाडू दे. खरोखरच ही अतिशय कठीण अशी कामगिरी आहे.’’ नंतर माझे वडील आणि अन्य दोन अधिकाऱ्यांकडं वळून ते म्हणाले : ‘‘जपानी फौजा ब्रह्मदेशाच्या उत्तर भागातून माघार घेत आहेत. जपानी सैनिक दक्षिणेकडं माघार घेत असताना त्यांच्यावर हल्ले करण्याची कामगिरी तुमच्यावर सोपवण्यात येत आहे. तुम्ही आक्‍याबवर हल्ला चढवा, तिथून समुद्रमार्गे मेबॉनला जा, कॅंगाव जिंका, जपान्यांच्या ताब्यात असलेला प्रदेश आपल्या ताब्यात घ्या आणि माघार घेणाऱ्या जपानी सैनिकांची लांडगेतोड करून त्यांची माघारीची योजना उधळून लावा. समजलं?’’ 
*** 
शेजारी बसलेला माझा जपानी सहप्रवासी ही कहाणी अगदी एकाग्रतेनं ऐकत होता. थोडं पुढं झुकत त्यानं विचारलं : ‘‘तुमचे वडील ऑल इंडियन ब्रिगेडमध्ये होते?’’ 
मी होकारार्थी मान डोलवली. 
आमचं संभाषण थोडं थांबलं. कदाचित तो कुठलातरी विचार करत असावा. एवढ्यात वेटरनं कॉफी आणि नाष्टा आणून दिला. कॉफीचे घुटके घेत मघाच्या संभाषणाचा धागा पकडून त्यानं विचारलं : ‘‘तुमचे वडील त्या वेळी कनिष्ठ अधिकारी होते का?’’ 
‘‘नाही, ते बटालियनचे कमांडर होते,’’ मी म्हणालो. 
दीर्घ सुस्कारा सोडत त्यानं विचारलं : ‘‘कुठली रेजिमेंट?’’ ‘‘पंजाब रेजिमेंट,’’ मी म्हणालो. 
ते ऐकताच त्याचा चेहरा बदलला. तो छाया-प्रकाशाचा खेळ असेल किंवा मला तसा भास झाला असेल; पण त्याला चक्कर येतेय की काय, असं मला क्षणभर वाटलं. 
‘‘तुम्ही ठीक आहात ना?’’ मी काळजीनं विचारलं. 
स्वतःला सावरत तो म्हणाला ः ‘‘ठीक आहे. पुढं सांगा.’’ ब्रह्मदेशातल्या त्या प्रतिकूल प्रदेशातून मार्ग काढत इंडियन ब्रिगेड मेबॉनला पोचली. या टप्प्यात त्यांना फारसा विरोध झाला नाही. ती ब्रिगेड तिथून कॅंगावला गेली. अवघ्या ४८ तासांत आपल्याला एका घनघोर युद्धाला सामोरं जावं लागणार आहे आणि हे युद्ध १५ दिवस चालेल आणि त्यात सुमारे तीन हजार सैनिक मृत्युमुखी पडतील याची त्यांना त्या वेळी कल्पनाही नव्हती. 
माऊंटबॅटन म्हणाले होते ते खरंच होतं. जपानी सैनिकांचा परतीचा मार्ग मेलरोझ डोंगररांगांनी व्यापलेला होता. या मार्गावर जपानचं प्रभुत्व होतं आणि उंचावर असल्याचा त्यांना लष्करीदृष्ट्या प्रचंड फायदा होत होता. आणखी वाईट म्हणजे, ‘त्या परिसरात जपानी सैन्याच्या दोन ब्रिगेड्‌स आहेत,’ अशी माहिती गुप्तहेरांनी दिली होती. भारतीयांची तिथं फक्त एकच ब्रिगेड होती. जर जपान्यांचा परतीचा मार्ग रोखायचा तर या ‘हिल १७०’ टेकड्या जिंकणं अनिवार्य आहे, हे ब्रिगेडिअर हटन यांच्या लक्षात आलं. त्यात फार मोठ्या संख्येनं जवान मृत्युमुखी पडण्याची शक्‍यता होती. त्यांनी विचार केला आणि धोका पत्करायचं ठरवलं. हैदराबादी पलटणीनं थिमय्या यांच्या नेतृत्वाखाली पहिला हल्ला चढवला. त्यांनी त्वेषानं हल्ला केला; पण त्यात त्यांना यश आलं नाही. सेन यांच्या नेतृत्वाखाली बलूच पलटणीनं केलेल्या हल्ल्याचीही अशीच गत झाली. दोन्ही हल्ले निकामी ठरल्याचं पाहून रेजीनं पंजाब पलटणीला अखेरचा प्रयत्न करण्याचे आदेश दिले. तोफखाना आणि हवाई दलाची मदत घेण्यात आली. हल्ल्यासाठी २९ जानेवारी १९४४ हा दिवस आणि सकाळी सातची वेळ निश्‍चित करण्यात आली. त्या दिवशी आघाडीच्या पथकांनी पहाटेच आगेकूच केली. त्या वेळी जपानी सैनिकांनी मशिनगनचा भडिमार केला. भारतीय तोफांनी आघाडीवरच्या पथकांना संरक्षण दिलं. त्यांनी आघाडीवर धुराचा पडदा उभा केला. त्याचा फायदा घेत पंजाब पलटणीनं टेकडीची चढण चढायला सुरवात केली. आपल्या बंकरमध्ये सुरक्षित जागी दबा धरून बसलेल्या जपान्यांनी जोरदार गोळीबार करत त्यांच्यावर आग ओकली. उंचावर असलेल्या जपान्यांना वर चढणाऱ्या भारतीय जवानांना टिपणं सहज शक्‍य होतं. धारातीर्थी पडणाऱ्या भारतीय जवानांची संख्या वेगानं वाढायला लागली. हवाई संरक्षणावर या योजनेची मुख्य मदार होती. पण वाईट हवामानामुळं आणि कदाचित वाईट नशिबामुळं ती योजना फसली. भारतीय कमांडरनं विचारपूर्वक धोका पत्करायचं ठरवलं. त्यानं आगेकूच सुरूच ठेवली. भारतीय जवान आता शिखरापासून अवघ्या १०० मीटर अंतरापर्यंत पोचले होते. जपानी सैनिकांनी हाती येईल त्या शस्त्रानं भारतीय जवानांवर गोळीबार केला. हल्ला करणाऱ्यांची चाल मंदावली. शेजारच्या जवानांना न पाहता अशा वेळी पुढं जायचं की थांबायचं, असा प्रश्न निर्माण झाला. कमांडरसाठी हा निर्वाणीचा क्षण असतो. लढायचं की माघार घ्यायची? बंकरमधल्या मशीनगनच्या माऱ्यात आपले जवान टिपले जात आहेत, हे त्याला दिसत होतं. कसंही करून ती मशिनगन बंद पाडणं आवश्‍यक होतं.

 अचानक एक कल्पना त्याच्या मनात तरळून गेली. सर्वसाधारणपणे बटालियन कमांडर युद्धआघाडीवर मागं राहून सैन्याचं नेतृत्व करत असतात; पण त्या निर्णायक क्षणी आघाडीवर लढणाऱ्या आपल्या जवानांबरोबर आपणही असलं पाहिजे, असं त्याला वाटलं. ‘आपला कमांडर आपल्यासोबत आहे,’ ही भावनाच आघाडीवर लढणाऱ्या जवानांना बळ देणारी असते. त्या कमांडरनं ते जाणलं आणि बंदुकीला बायोनेट लावून तो त्यांच्यात मिसळला. त्याला पाहताच त्या जवानांना वेगळंच स्फुरण चढलं. त्या सगळ्यांनी वरून गोळीबार करणाऱ्या जपानी सैनिकांवर एल्गार केला. 
हातघाईची लढाई सुरू झाली. सैनिकांच्या किंकाळ्या परिसरात घुमल्या. कुणीच मागं हटायला तयार नव्हतं. जपानी सैनिकांच्या प्रतिहल्ल्याच्या लाटा एकावर एक धडकत होत्या; पण भारतीय जवान भक्कमपणे पाय रोवून उभे होते. जपानी सैनिक एखाद्या चवताळलेल्या वाघासारखे लढत होते. अखेरीस शेवटची गोळी झाडली गेली आणि मग सगळं शांत झालं. 
*** 
खूप वर्षांनी माऊंटबॅटन यांनी त्यांच्या पुस्तकात या मोहिमेचं वर्णन ‘आराकान क्षेत्रातली सगळ्यात घनघोर लढाई’ असं केलं. त्यांचं म्हणणं अगदी बरोबर होतं. दोन्ही बाजूंना या लढाईची फार मोठी किंमत मोजावी लागली. ३००० जपानी सैनिक आणि ८०० भारतीय जवान. एका चकमकीत धारातीर्थी पडलेल्यांची ही संख्या! ५० अधिकाऱ्यांना आणि जवानांना या लढाईतल्या असीम शौर्याबद्दल पदकं मिळाली. कर्तव्यावरची अविचल निष्ठा आणि असामान्य व्यक्तिगत शौर्याबद्दल बटालियनच्या कमांडरला DSO (Distinguished Service Order ) हा शौर्यसन्मान देऊन गौरवण्यात आलं; पण हे सगळं भविष्यात घडलं. 

लढाईच्या त्या दिवशी चकमक थांबल्यावर कमांडर भारतीय सैन्यानं ताब्यात घेतलेल्या जपानी युद्धकैद्यांचं निरीक्षण करत होते. पकडल्या गेलेल्या सगळ्या सैनिकांना युद्धाच्या नियमाप्रमाणे त्यांच्यासमोर हजर करण्यात आलं होतं. कमांडर समोर आले. भारतीय सैन्याच्या कर्नलना पाहताच पकडलेल्या सैनिकांच्या कमांडरनं त्याच्या सैनिकांना ‘अटेन्शन’ची ऑर्डर दिली. तो दोन पावलं पुढं आला आणि त्यानं भारतीय कमांडरला कडकडीत सॅल्युट ठोकला. कमरेला लटकलेली तलवार त्यानं काढली आणि ती दोन्ही हातांत समोर धरून तो पुढं झुकून उभा राहिला. त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहत असल्याचं पाहून भारतीय कमांडरना आश्‍चर्य वाटलं. पराभवाचं शल्य काय असतं, हे ते जाणून होते...पण अश्रू ? शेवटी हे युद्ध होतं. कोणती तरी एक बाजू त्यात जिंकणार होती अन्‌ दुसरी हरणार होती; पण ते अश्रू दुःखाचे नव्हते; तर शरमेचे होते, हे तो कसं सांगू शकणार होता? कधीही शरणागती न पत्करणारा ‘सामुराई’ म्हणजे काय असतो, हे तो भारतीय कमांडरना कसं दाखवून देणार होता? त्याला निवडीचं स्वातंत्र्य दिलं असतं, तर त्यानं शरण जाण्यापेक्षा हाराकिरीचा पर्याय नक्कीच स्वीकारला असता; पण नशिबानं त्याच्यासमोर वेगळंच ताट वाढून ठेवलं होतं. त्याच्या हातातली ती तलवार त्याच्या पूर्वजांकडून आलेली होती. जपानमध्ये अशा तलवारीला ‘कटाना’ असं म्हणतात आणि ती घराण्याच्या सन्मानाचं प्रतीक समजली जाते. त्याच्या पूर्वजांनी सन्मानानं सांभाळलेली ती तलवार आज त्याला अशा रीतीनं शत्रूच्या अधिकाऱ्यापुढं नतमस्तक होऊन त्याच्या पायावर ठेवावी लागणार होती. त्याचं खरं दुःख ते होतं; पण भारतीय कमांडरला ते कसं समजणार? पूर्णपणे वेगळ्या संस्कृतीतून आलेल्या त्याच्या मनात काय खळबळ माजली आहे, हे कसं कळणार होतं? पण तरीही त्या अधिकाऱ्याच्या हालचाली आणि त्याच्या चेहऱ्यावरच्या भावांवरून भारतीय कमांडरला मनात खोलवर काहीतरी जाणवलं. त्याचं दुःख त्याच्या मनाला स्पर्शून गेलं. जपानी कमांडरच्या दृष्टीनं ही अतिशय व्यक्तिगत आणि काळजाला भिडणारी घटना आहे, हे त्यांनी जाणलं. एक सैनिकच दुसऱ्या सैनिकाच्या भावना समजू शकतो. त्यांनी ती तलवार स्वीकारली; पण पुढच्याच क्षणी थोडसं पुढं झुकून ते स्पष्ट आणि मोठ्या आवाजात म्हणालेः ‘‘कर्नल, मी तुमची ही तलवार स्वीकारतो; पण पराभवाचं प्रतीक म्हणून नव्हे, तर एका सैनिकानं दुसऱ्याला दिलेली भेट म्हणून!’’ 

त्या जपानी अधिकाऱ्याला हे अनपेक्षितच होतं. तो एकदम गोंधळला. अश्रूंनी डबडबलेल्या त्याच्या डोळ्यात एकदम एक वेगळीच चमक झळकली. एका निःशब्द कृतज्ञतेच्या भावनेनं त्याचा चेहरा ओथंबला. भारतीय कमांडरनं मनापासून व्यक्त केलेली ती भावना त्याच्या सैनिकांच्या मनाला स्पर्शून गेली. त्या एका वाक्‍यानं त्या सैनिकांच्या आणि त्याच्याही सन्मानाचं रक्षण केलं होतं. भारतीय कमांडरभोवती उभ्या असलेल्या पंजाबी, हिंदू, मुस्लिम अशा सगळ्याच सैनिकांनी त्या वाक्‍यावर पसंतीची मोहोर उमटवली. शेवटी लढाई ही लढाई असते, ती जेव्हा सुरू होती तेव्हा ते एकमेकांविरुद्ध प्राणपणानं लढत होते; पण आता लढाई संपल्यावर कुठल्याच व्यक्तिगत किंवा राष्ट्रीय द्वेषाची भावना उरली नव्हती. कदाचित परमेश्वर या सैनिकांच्या मनात वेगळेच बंध निर्माण करत असेल. सामान्यांपेक्षा वेगळे. हे सैनिक कोणत्याही ध्वजाखाली लढत असले, तरी एक वेगळाच समजूतदारपणा आणि परस्परांविषयीची एक सन्मानाची भावना त्यांच्या मनात निर्माण करणारे. 
शरणागतीचा कार्यक्रम संपला. भारतीय कमांडरनी सिग्नल ऑफिसरला खूण केली. लाल रंगाचे तीन प्रकाशझोत आकाशात झेपावले. खाली जंगलात आपल्या छावणीत असलेल्या ब्रिगेडिअर रेजी हटन यांच्या चेहऱ्यावर समाधानाची लकेर झळकली. त्यांनी नंतर सांगितलं की त्या दिवशी केवळ त्या लढाईचं केवळ भवितव्यच पणाला लागलं नव्हतं, तर भारतीय अधिकारी युद्धात सैन्याचं नेतृत्व करू शकतात की नाही, हा प्रश्नही पणाला लागला होता. भारतीय तुकडीवर विश्वास ठेवल्याबद्दल अनेकजण त्यांना बोल लावत होते; पण या सैनिकांनी त्यांचा विश्वास सार्थ ठरवला होता. दूरवर दिसणारी मेलरोझ टेकडी याची साक्ष होती. त्या टेकडीकडं बघताना नकळत एक मंद स्मित त्यांच्या चेहऱ्यावर उमटलं. 
*** 
खिडकीतून दूरवर कुठंतरी पाहत होतो. माझ्याच विचारात मी गढून गेलो होतो. एवढ्यात मला शेजारून एक अस्पष्टसा हुंदका ऐकू आला. चमकून मी पाहिलं. माझा सहप्रवासी अस्फुटपणे रडत होता. त्याचे डोळे बंद होते; पण त्याला अश्रू आवरत नव्हते. भावविवश होऊन दोन्ही बाजूंना मान वळवत तो ‘कर्मा, कर्मा’ असं काहीतरी पुटपुटत होता. त्याच्या भाषेत तो स्वतःशीच काही बोलत असावा. काही वेळानं माझे होन्ही हात हातात घेऊन तो गदगदलेल्या आवाजात म्हणाला ः ‘‘तुमच्या वडिलांशी मेलरोझवर लढलेले ते जपानी कर्नल म्हणजे माझे वडील होते. त्यांनीच तुमच्या वडिलांपुढं शरणागती पत्करली होती. त्यांच्या मनातली त्या वेळची भावना तुमच्या वडिलांनी जाणून घेतली नसती, तर कदाचित परत आल्यानंतर शरमेनं खचून जाऊन त्यांचा जीव गेला असता; पण आमच्या पूर्वजांकडून सन्मानाचं प्रतीक म्हणून आलेली तलवार तुमच्या वडिलांनी ज्या पद्धतीनं स्वीकारली, त्यामुळं आमच्या घराण्याचा, माझ्या वडिलांचा आणि पर्यायाने माझाही सन्मान राखला गेला. एका अर्थानं आपण आता एकमेकांचे भाऊ झालो आहोत.’’ 
गाडी धीमेपणानं जीनिव्हा स्टेशनात शिरली. आम्ही खाली उतरलो. जे काय बोलायचं होतं ते बोलून झालं होतं. किंचित खाली झुकून त्यानं माझा निरोप घेतला. ‘पुन्हा भेटू’ असं तो म्हणत होता. 

‘‘ती तलवार तुमच्या कुटुंबीयांना मी परत द्यावी, असं तुम्हाला वाटतंय का?’’  मी विचारलं. 
तो हसला. माझ्याकडं रोखून बघत म्हणाला : ‘‘मुळीच नाही. ती तलवार एका ‘सामुराई’च्याच घरात आहे. तिथंच ती राहू द्या.’’
त्याला भेटण्याची माझी ती शेवटची वेळ. त्यानंतर मी त्याला परत कधीच पाहिलं नाही. 
*** 
पत्नी उषा हिच्या म्हणण्यानुसार, अशा भेटीची शक्‍यता गणितात कुठंच बसत नाही. तिनं अर्थशास्त्राचा आणि संख्याशास्त्राचा अभ्यास केलेला असल्यामुळं ती नेमकेपणानं सांगू शकेल; पण जागतिक महायुद्ध सुरू होतं. माझे वडील भारतीय सैन्यात होते, तर त्याचे वडील जपानी सैन्यात. योगायोगानं एकाच आघाडीवर आणि एकाच लढाईत ते समोरासमोर लढले. इथपर्यंत आपण समजू शकतो. युद्ध संपलं. ते आपापल्या कुटुंबात परत गेले, हेही ठीक; पण दोन वेगवेगळ्या देशांत वाढलेली त्यांची मुलं बर्नसारख्या ठिकाणी अचानक भेटतात...एकाच रेल्वेनं प्रवास करतात...शेजारशेजारच्या आसनांवर बसून कॉफी-सिगारेट पितात...त्यांच्या गप्पांमध्ये चार दशकांपूर्वीच्या आठवणी निघतात आणि त्यातून दोघांचेही वडील एकाच युद्धात एकमेकांविरुद्ध लढले, हे त्यांना त्या गप्पातून कळतं...याला योगायोग नाही तर काय म्हणायचं ? 
*** 
अशा गोष्टींमागं काही अगम्य कार्यकारण भाव असेल यावर व्यक्तिशः माझा विश्वास नाही; पण त्याबाबत मी नेमकं सांगूही शकत नाही. तुम्ही भविष्यकाळात बघून घटनांचा अन्वयार्थ लावू शकत नाही, तसा तो लावता येत नसतो...भूतकाळात बघूनच तुम्हाला त्या घटनांचा अन्वयार्य लावता येतो. ‘भूतकाळातल्या घटनांचे धागेदोरे जुळवले म्हणजे भविष्यातही ते जुळवता येतात, असा समज सुखावह असतो,’ असं म्हणतात. मला माहीत नाही; पण शेवटी तुम्हाला कशावर तरी विश्वास ठेवावाच लागतो. 
त्या तलवारीला आमच्या घरात अतिशय सन्मानाचं स्थान आहे. जेव्हा जेव्हा मी ती तलवार पाहतो, तेव्हा तेव्हा माझं मन त्या आराकानच्या जंगलात जातं, जिथं युद्धाच्या उन्मादातही दोन सैनिकांनी शाश्वत मानवतेचा आदर्श त्यांच्या सहकाऱ्यांसमोर घालून दिला!

Web Title: Dr.yashwant thorat article