सुवर्णकाळातली गाणी...

आजच्या सिनेमातल्या गाण्याचं स्थान लिपस्टिकएवढंच आहे. कधीतरी हिरो-हिरॉइनचं प्रेम, आयटेम साँग वगैरेसाठी दोन-तीन गाणी असतात.
Dwarkanath Sanjhgiri Golden Age Songs cinema movie music
Dwarkanath Sanjhgiri Golden Age Songs cinema movie musicsakal
Summary

आजच्या सिनेमातल्या गाण्याचं स्थान लिपस्टिकएवढंच आहे. कधीतरी हिरो-हिरॉइनचं प्रेम, आयटेम साँग वगैरेसाठी दोन-तीन गाणी असतात.

आजच्या सिनेमातल्या गाण्याचं स्थान लिपस्टिकएवढंच आहे. कधीतरी हिरो-हिरॉइनचं प्रेम, आयटेम साँग वगैरेसाठी दोन-तीन गाणी असतात. प्रेमकथा असेल तर दोन जास्त. गायक अरिजितसिंगची काही गाणी चांगलीसुद्धा वाटतात.

मध्यंतरी एका सिनेमात चांगला पियानोही मी ऐकला; पण पूर्वीच्या सिनेमातल्या गाण्याची त्याला सर नाही. माझ्या मागच्या दोन पिढ्यांपर्यंतचे सर्वच हे मान्य करतील. आजची गाणी डीजेवर नाचायला बरी असतात; पण गाण्याचा अर्थ, भावना, शब्दांचं सौंदर्य, मेलडी, कर्कश नसलेला ठेका आणि काही वेळेला गाण्याचं टेकिंग याबाबतीत सुवर्णकाळातील गाणी अजरामर आहेत.

सिनेमात गाण्याचं टेकिंग फार महत्त्वाचं असतं. ते चांगलं गाणं अधिक खुलवतं, नाहीतर गाणं कितीही चांगलं असेल; पण गाण्याचं टेकिंग वाईट असेल, तर एरव्ही कानाला गोड लागणारं गाणंही पडद्यावर मार खातं. उदा. ‘देख कबिरा रोया’मधलं ‘हमसे आया न गया, तुमसे बुलाया न गया.’

प्रेमभंग झाल्यावर अनेकदा मी हे गाणं गुणगुणत असे, लग्न होईपर्यंत. असे प्रसंग अनेक असत. ते गाणं मी सिनेमात पडद्यावर पहिलं आणि कबिरा का रडला ते कळलं. त्या वेळी प्रेमभंग न होताही मी रडलो.

शुभा खोटे तिचं नवं प्रसवलेलं गाणं लिहून आणते आणि कवी आहे असा समज असलेल्या आपल्या प्रियकराला दाखवते. तो खरा गायक असतो, तो गायला लागतो. त्यात हा हिरो अनुपकुमार, त्यामुळे गाण्याचं फार सुंदर वाटोळं होतं.

ते गाणं राज कपूर, गुरुदत्त, किंवा विजय आनंदने सोनेरी करून टाकलं असतं. हे तिघेजण सर्वच बाबतीत, विशेषतः गाण्याच्या टेकिंगमधले बाप होते. ‘प्यार हुआ इकरार हुवा’ गाण्याचं टेकिंग आठवा.

प्रेम व्यक्त करत एका छत्रीतून भिजत जाणारे राज - नर्गीस, तो चहावाला, नर्गीसची अडकलेली शिंक, ती राजची बासरी आणि तीन लहान मुलांना पाहून, ‘हम न रहेंगे, तुम न रहोगे, फिर भी रहेंगी निशानियाँ’ म्हणणारी नर्गीस.

गाण्याचं चित्रीकरण गाण्यातली प्रत्येक ओळ जिवंत करतं. प्रतिभा असलेल्या दिग्दर्शकाला गाणं वाचल्याबरोबर डोळ्यांसमोर दिसायला लागतं. हे गाणं रेकॉर्ड होत असताना राज कपूरला हे गाणं डोळ्यांसमोर दिसलं. नर्गीस होती बरोबर. त्याने छत्री मागवली आणि तो स्टुडिओत तिला घेऊन नाचला.

‘आवारा’चं स्वप्नगीत, ते त्याच्या मनात कधीच तयार होतं. म्हणून एम. आर. आचरेकर या आर्ट डिरेक्टरला घेण्यासाठी त्याने जंग जंग पछाडलं. जेव्हा अतिसामान्य माणूस स्वप्न पाहतो, तेव्हा तो फार भव्य पाहतो, अशी त्याची धारणा होती.

गुरुदत्त गाणं हा अडथळा समजायचा. ज्या काळात गाणं हा हिंदी सिनेमाचा आत्मा होता, तेव्हा बी. आर. चोप्राचा ‘कानून’ नावाचा सिनेमा आला होता, त्यात एकही गाणं नव्हतं. वहिदा सांगते की, गुरुदत्त गाणं नसलेल्या सिनेमाच्या यशाने प्रभावित झाला होता.

त्याला गाणं हा कधी कधी अडथळा वाटायचा. तोच गुरुदत्त गाण्याचं टेकिंग उत्तम करायचा. पण, गाण्याचा कथा पुढे न्यायला उपयोग करायचा. गाणं त्याच्या सिनेमात ठिगळ नसायचं, तलम कपड्याची नक्षी बनायचं. ‘आरपार’ सिनेमात ‘हूं अभी मै जवान’ हे गाणं आहे.

शकिला ते म्हणते. तिने एकदा सांगितलं, ‘‘मी त्या गाण्याच्या शूटिंगला गेले, तेव्हा खोलीत फक्त काही खोके होते. मला कळेना काय गाणं चित्रित होणार ते; पण त्याने गाण्याचं चित्रीकरण असं केलं की, मी ते गाणं बघताना चक्रावून गेले. मी त्याच्या प्रतिभेवर लुब्ध झाले.’’

गुरुदत्त याची माझी दोन आवडती गाणी, चित्रीकरणाच्या दृष्टीने ती म्हणजे, ‘जिन्हे नाझ है हिंद पर वो कहा है’ आणि ‘वक्त ने किया क्या हसी सितम’ काय गाणी घेतली आहेत. पहिलं गाणं ही साहिरची फार पूर्वी लिहिलेली कविता, त्या वेळी लाहोरच्या हिरा मंडी वेश्यावस्तीतून फिरताना सुचलेली.

गुरुदत्त याने असं चित्रीकरण केलं, की तो त्या वेश्यांच्या वस्तीतून जातोय आणि दृश्य पाहून त्याला पुढच्या ओळी सुचतात. गाणं पुन्हा पहा मी काय म्हणतो ते कळेल. त्याला खोकला ऐकू येतो, तो म्हणतो,

‘ ये बेरुख कमरेमे खासी की ठनठन’ किंवा सौदेबाजी करणारं गिऱ्हाईक पाहून म्हणतो, ‘ये इसमत के सौदे और सौदे पे तक्रार’ वगैरे. ‘वक्त ने किया क्या हसी सितम’ गाणं कैफी आझमीने लिहून ठेवलं होतं. गुरुदत्तला जागा सापडत नव्हती, जेव्हा सापडली तेव्हा काय घेतलं गाणं... तो दिव्य प्रकाश, ते आत्म्याचं मिलन वगैरे.

गुरुदत्तला दैवी देणगी होती. विजय आनंदच्या प्रत्येक गाण्याची सौंदर्यमीमांसा मी करू शकतो. विहीर, गवताची गंजी यावर त्याने, ‘आंखो में क्या जी रुपहेला बादल’ सजवलं, एका बाथटबावर त्याने ‘आजा पंच्छी अकेला है’ चित्रित केलं,

‘दिलका भॅवर करे पुकार’मध्ये देव, नूतन कुतुबमिनारच्या पायऱ्या चढत वर जातात आणि वरून उतरताना प्रेमाच्या पायऱ्या चढत गाणं म्हणतात. देव गातो, नूतन डोळे आणि चेहऱ्याने गाते. ‘तेरे घर के सामने’ गाण्यातली नूतन चक्क देवच्या व्हिस्कीतून गाते, बर्फ टाकला की थरथरते. देवने टिचकी मारल्यावर नाकाला हात लावते... अफाट कल्पनाशक्ती.

‘आज फिर जिने की तमन्ना है, आज फिर मरने का इरादा है’ गाण्यात ती डोक्यावरून मडकी घेऊन चाललेल्या महिलांच्या डोक्यावरचं मडकं फोडते. का ठाऊक आहे? माणूस मेल्यावर मडकं फोडतात. तिने घेतलेला नवीन बिनधास्त जन्म त्याने दाखवला आहे.

आधीच्या सरलेल्या जन्मासाठी मडकं फोडलंय. ‘जॉनी’तल्या त्या खिडक्या, काय काय सांगू...! ‘गाइड’मध्ये ‘तेरे मेरे सपने’ गाणं त्याला पहाटेच्या प्रकाशात घ्यायचं होतं, कारण त्या दोघांच्या प्रेमाची ती पहाट होती. त्यांना फक्त अर्धा तास मिळत होता.

विजय आनंदने प्रत्येक मूव्हमेंट मार्क केली. कोण कुठून येणार, मिठी कधी वगैरे. गाणं नीट पहा. एका कडव्यात देव आपलं घड्याळ पाहतो, वेळेवर चाललंय की नाही ते पाहायला. हे सगळं चवीने पाहिलेल्या माझ्यासारख्या माणसाला आजच्या सिनेमातली गाणी ठिगळच वाटणार. आजच्या काळात खूप चांगले सिनेमे काढतात; पूर्वीपेक्षा वेगळे, कथा वेगळ्या असतात. पण गाणं म्हटलं की, मी त्या जुन्या सुवर्णकाळामध्येच रमतो.

‘संगम’मध्ये ‘हर दिल जो प्यार करेगा’ या गाण्याच्या वेळी, त्याने प्रेमाचा त्रिकोण ते गाणं घेताना तयार केला. त्रिकोणातल्या प्रत्येकाला एक कडवं आहे. तो त्याचं प्रेम व्यक्त करतो. वैजयंतीमाला प्रेम व्यक्त करायला राजेंद्र कुमारकडे जाते.

तिचं त्याच्यावर प्रेम असतं, त्याचंही तिच्यावर असतं; पण आपल्या मित्राचं, राजचं प्रेम तिच्यावर आहे म्हणून तो राजकडे सरकतो. राज ती आपल्यावर प्रेम करते म्हणून स्वतःवर खूष असतो. गाण्याच्या टेकिंगमधून राज सर्व गोष्टी फार सुंदर दाखवतो...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com