
१९३४ ते १९५० पर्यंत नुरजहान, शमशाद, जोहराबाई अंबाला वाली, यांच्याप्रमाणे संगीताच्या क्षेत्रात तिचा एक छोटा प्रदेश होता.
वेगळा आवाज, वेगळ्या गायिका...
- द्वारकानाथ संझगिरी
संगीतातील एकेकाळची राजकुमारी वर्सोवाच्या झोपडपट्टीत राहायची माझा एक मित्र होता त्याचं नाव मुकुंद आचार्य. त्याच्याकडे हजारो रेकॉर्ड्सच कलेक्शन होतं. तो एकदा तिला भेटायला त्या झोपडपट्टीत गेला. तिला त्या झोपडपट्टीतून त्यांनं शोधून काढलं. तिला घरी आणलं आणि तिला तिची गाणी ऐकवली तिच्या डोळ्यातल्या आनंदाश्रूंनी त्याला खूप समाधान दिलं.
शमशाद बेगम यांच्यावरच्या लेखानंतर मला अनेकांनी सांगितलं की त्या काळातल्या इतर गायिका ज्या आज विस्मृतीच्या पडद्याआड गेल्यात त्यांच्याबद्दल का लिहित नाही ? त्यानंतर काही दिवस माझ्या मनात हा विषय रेंगाळत होता.
आज मी त्या विषयाला हात घातला. तुमच्यातले जे चित्रपटसृष्टीबाबत ज्ञानपिपासू आहेत त्यांना छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा माहित असतात. ते सोडले तर हिंदी चित्रपटसृष्टीतली पहिली पार्श्वगायिका कोण हा प्रश्न मी तुम्हाला विचारला तर तुम्ही उत्तर देऊ शकाल ? तुम्ही गुगल न करता उत्तर दिलंत मानला तुम्हाला.
ती होती राजकुमारी शोभना समर्थ. रत्नमाला यांच्यासाठी तिनं पार्श्वगायन केलं. तिनं शास्त्रीय संगीताचे धडे कधी गिरवले नव्हते पण संगीतकारानं तिला काही सांगितलं की ती पटकन आत्मसात करायची. तिने सुरुवात सिनेमाची नायिका म्हणून केली.
मग शरीर वाढायला लागलं आणि ते वाढणं रोखता न आल्याने तिनं फक्त गायचं असं ठरवलं. १९३४ ते १९५० पर्यंत नुरजहान, शमशाद, जोहराबाई अंबाला वाली, यांच्याप्रमाणे संगीताच्या क्षेत्रात तिचा एक छोटा प्रदेश होता. आणि त्या प्रदेशाची ती राणी होती. तिचे सर्वात गाजलेले चित्रपट म्हणजे कोलकात्यात रॉक्सिला तीन वर्षे चाललेला अशोक कुमारचा महल आणि बावरे नैन.
तिच्याबद्दल दोन किस्से सांगण्यासारखे आहेत. ओ. पी. नय्यरनं तिला आसमान या त्याच्या पहिल्या सिनेमासाठी एक गाणं '' जबसे पिया आन बसे '' दिलं. खरंतर हे गाणं आधी ओपी लतादीदींना देणार होता. पण त्या दोघांमध्ये काहीतरी बिनसल.
लतादीदी त्यानंतर ओपींकडे कधीही गायल्या नाहीत. हे गाणं पुढे राजकुमारी गायली. पण गंमत म्हणजे पुढे त्यांनी राजकुमारीला सुद्धा कधी गाणं दिल नाही. त्यानंतर ती जवळपास फिल्म इंडस्ट्रीच्या बाहेर फेकली गेली.
खूप वर्षांनी पाकिजा सिनेमाच्या वेळेला नौशाद यांना ती कोरस मध्ये गाताना दिसली त्याला वाईट वाटलं. तिला एक गाणं पाकिजात, दिलं. ते गाणं होतं,'' नझरियकी मारी, मरी मोरी सय्या '' मग आरडी बर्मन याने तिला किताब या सिनेमात, '' हरी दिन तो बिता शाम
दोन हजारमध्ये त्याच झोपडपट्टीत तिने शेवटचा श्वास घेतला. एकदा एक तेरा वर्षाची मुलगी उत्तर प्रदेशातून मुंबईत आहे आली. (उत्तर प्रदेशातील माणसं मुंबईत कधीपासून येतायत ते पहा) तिने नौशाद यांच्या घराची बेल वाजवली. दार उघडल्यावर तिने नौशाद यांना सांगितल ‘‘ मला चांगलं गाता येतं.
मला संधी द्या. संधी नाही दिलीत तर समोरच्या समुद्रात उडी टाकून मी जीव देइन.’’ नौशाद यांनी तिची ऑडिशन घेतली. आणि १९४६ मधल्या ‘आझरा’ नावाच्या सिनेमात गायची संधी दिली. मग तिनं ए. आर. कारदार यांच्याशी करार केला. त्यांनी तिला दर्द सिनेमासाठी पार्श्वगायिका म्हणून घेतलं. संगीतकार अर्थातच नौशाद होते.
त्या सिनेमात तिने मुनावर सुलतानसाठी तीन गाणी म्हटली. एक सुरय्याबरोबर द्वंद्व गीत म्हटलं. पण तिचं सर्वात गाजलं दर्द चित्रपटातलं गाणं ‘अफसाना लिख रही हू, दिले बेकरार का''. त्या गायिकेच नाव होतं उमादेवी खत्री. तिला नंतर जग टुणटूण म्हणून ओळखायला लागलं. त्या गाण्याचा परिणाम असा झाला की दिल्लीचा एक तरुण तिच्या प्रेमात पडला. तिच्याबरोबर मुंबईत राहिला. तिच्याशी लग्न केलं त्याचं नाव मोहन दर्द.
नंतर तिला मेहबूब खानचा ‘अनोखी अदा’ हा सिनेमा मिळाला. त्यात तिने दोन गाणी म्हटली. मग एस. एस. वासनचा चित्रलेखा मिळाला. त्यात तिची सात गाणी होती. तेच तिचं शिखर होतं. तिथून ती घसरली.
कारण एक तर लता मंगेशकर यांचा तोपर्यंत उदय झाला आणि दुसरं म्हणजे तिच्या आवाजावर मर्यादा होत्या. तिच्या गाण्याची टिपिकल जुनी शैली ती बदलू शकली नाही. ती उत्साही होती. बबली होती. विनोदाचं तिला अंग होत. नौशाद यांनी दिलीपकुमारला सांगितलं, " तिला बाबुल या सिनेमात एखादी भूमिका दे" दिलीपकुमारने तिचं नाव टूणटूण ठेवलं.
जे तिला शेवटपर्यंत चिकटल. गोलमटोल शरीर हेच तिचं भांडवल नव्हतं तर तिला विनोदाचा सेन्स चांगला होता, म्हणून तर गुरुदत्तसारखा दिग्दर्शक तिच्याकडे भूमिका सोपवायचा. म्हणून ती यशस्वी झाली. सर्वसाधारण सिनेरसिक तिला टूणटूण म्हणून ओळखतो. पण कानसेन मात्र तिला उमादेवी म्हणूनच ओळखतो.
हिंदी चित्रपटातल्या ठुमरी स्टाईल गाण्याच्या काळामध्ये एक गायिका तुफान गाजत होती, तिचं नाव होतं जोहराबाई अंबालावाली अर्थातच गणिकांच्या घराण्यातून ती आली होती. तिनं १९४१ ते १९५० हा काळ तुफान गाजवला.
तिचा आवाज दाणेदार होता. गाण्याला टिपिकल असा मुस्लिम ढंग होता. तसा तो असंस्कारित आवाज होता. म्हणजे आवाजावर संस्कार झालेला नव्हता. त्यात गुळगुळीत सफाई नव्हती. त्या आवाजाचं पातळ किंवा जाड असं वर्णन करणं कठीण होतं. पण तिनं शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतले होते. तिच्या काळात तिने जवळपास पंधराशे गाणी गायली, यावरून तिचा झपाटा आणि लोकप्रियता कळेल.
कारण त्या काळात ७०- ८० च्या दशकाएवढे सिनेमा तयार होत नव्हते. ती खऱ्या अर्थाने स्टार झाली ‘रतन’ सिनेमा आल्यानंतर. ‘रतन’ सिनेमा हा एक सांगितिक मैलाचा दगड होता. त्यात बारा गाणी होती आणि ती बाराच्या बारा गाणी, तुफान गाजली. त्यात स्वर्णलता नावाची नटी होती. त्या काळात संपूर्ण भारतातून २०० मुलीं घरदार सोडून सिनेमात आल्या. कारण त्यांना स्वर्णलता व्हायचं होतं.
या सिनेमाच्या संगीतातून स्वतः एस. डी. बर्मन एक धडा शिकले. बर्मन दादा तोपर्यंत बंगालमधले नामवंत गायक आणि संगीतकार होते पण हिंदी सिनेमात त्यांचे बस्तान बसलेलं नव्हते. त्यांच संगीत चांगलं होतं पण ते लोकप्रिय होत नव्हतं.
बर्मनदादांचा नोकर एक दिवशी या ‘रतन’ सिनेमातल्या गाणं गुणगुणत होता. बर्मनदादांना आधी खूप राग आला. आपला नोकर, पैसे आपल्याकडून घेतो आणि गाणी नौशादची गुणगुणत असतो ? पण नंतर त्यांच्या लक्षात आलं की जर सामान्य माणसाने गाणं गुणगुणत राहायला हवं तर ते गाणं, गाण्याच्या चाली सोप्या असायला हव्यात. त्यांनी रतनच्या गाण्याकडून हा धडा घेतला.
या सिनेमातल्या गाण्यांची आणखी एक गंमत सांगण्यासारखी आहे. रतनचे संगीतकार अर्थातच नौशाद होते. ज्यावेळेला ‘रतन’ थिएटरला लागला आणि गाणी गाजायला लागली त्यावेळेला नौशाद यांचं लग्न ठरलं होतं. लग्न अर्थातच दूर उत्तरप्रदेशला होतं. नौशाद यांच्या सासरच्या मंडळींनी ज्या वेळेला त्यांच्या आई-वडिलांना विचारलं, ‘‘मुलगा काय करतो ?
’’ त्यावेळी आई-वडिलांना मुलगा सिनेमात आहे आणि सिनेमाला संगीत देतो हे सांगण्याची हिम्मत झाली नाही. कारण सिनेमा क्षेत्रात असणं हे फारसं चांगलं दर्जेदार सुसंस्कृत आयुष्य त्याकाळात मानलं जात नसे. त्या उलट शिंपी काम जास्त दर्जेदार, जास्त उच्चभ्रू मानलं जातं होतं. त्यामुळे त्यांनी मुलीच्या आई - वडिलांना सांगून टाकलं की मुलाचं मुंबईत टेलरिंग शॉप आहे.
नौशाद लग्न करायला ज्या वेळेला आपल्या गावी गेले त्यावेळी त्यांची मोठी वरात निघाली. त्या वरातीत बँड होता आणि बँड वर कुठलं गाणं वाजत असेल? "अखिया मिला के जिया घबराये" नौशाद यांच्या ‘रतन’ सिनेमा मधलंच गाणं. नौशाद यांनी सासरच्या माणसांना विचारलं की हे कुठल्या सिनेमातलं गाणं आहे,?
त्यावेळी त्यांनी सांगितले की हे रतन मधले गाण. पण ते गाणं तयार करणारा माणूस घोड्यावर बसलाय आणि त्याची वरात निघाली आहे याची त्याना कल्पना नव्हती. पुढं जेव्हा नौशादच्या सासऱ्यांना कळलं की आपला जावई सिनेमात आहे,
त्यावेळी ते भयंकर चिडले पण पुढं नौशाद यांनी मुंबईत नाव कमावलं, पैसा कमावला आणि कार्टर रोडवर प्रशस्त असा बंगला बांधला. सर्व सुख त्या बंगल्यात नांदायला लागली त्यावेळी मात्र सासरे प्रचंड खुश झाले. मग सासरे कधीही मुंबई झाले की ते फक्त नौशाद यांच्याकडे उतरत. पैसा हा नेहमीच प्रतिष्ठा देऊन जातो. जोहराबाई गाताना अभिनय खूप सुंदर करायचा. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे हेच गाणं ‘अखिया मिलाके''.
तिच्या आवाजांनुसार नौशाद यांनी द्रुत लयीतली गाणी दिली. तशा गाण्यांमध्ये शब्द फार महत्त्वाचे असतात आणि ती अत्यंत स्पष्ट आणि चांगले शब्द उच्चार करत असे. १९५० नंतर लता मंगेशकर, आशा भोसले, गीता दत्त यांचे राज्य सुरू झालं. सिनेमातल्या अभिनेत्री सुद्धा तरुण कोवळ्या होत्या. त्यांना लतादीदींचा आवाज जास्त योग्य वाटत होता.
ठुमरी स्टाईलची गायकी मागे पडत गेली आणि लता आशा, गीता दत्त, सुमन कल्याणपुर यांच्या आवाजातली गाणी लोकप्रिय होत गेली तरीसुद्धा १९४० ते ५० दरम्यानच्या गायिकांचं योगदान अत्यंत महत्त्वाचं आहे. अलीकडच्या काळात अधून मधून तसे वेगळे आवाज काही गाणी गाजवून गेले. उदाहरणार्थ ''चोली के पीछे क्या है'' किंवा मुन्नी बदनाम हुई वगैरे. अशाच वेगळ्या अवाजाबद्दल पुन्हा कधी तरी.
( लेखक चित्रपट व क्रीडाक्षेत्राचे अभ्यासक आहेत. या दोन्ही विषयांवर त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत.)