प्रसन्ना-बेदी पुन्हा पाहायला मिळतील?

बापू नाडकर्णी यांनी लागोपाठ २१ षटकं निर्धाव टाकण्याचा एक जागतिक विक्रम केला होता याची तुम्हाला कल्पना असेलच. सन १९६४ ची ती इंग्लडविरुद्धची मद्रास कसोटी होती.
Bapu Nadkarni
Bapu NadkarniSakal

बापू नाडकर्णी यांनी लागोपाठ २१ षटकं निर्धाव टाकण्याचा एक जागतिक विक्रम केला होता याची तुम्हाला कल्पना असेलच. सन १९६४ ची ती इंग्लडविरुद्धची मद्रास कसोटी होती. त्यांचं गोलंदाजीचं पृथक्करण होतं २९ षटकं, २६ मेडन, ३ रन्स आणि शून्य विकेट्स. इंग्लडच्या ब्रायन बोलस आणि केन बॅरिंग्टन या दोन फलंदाजांना त्यांनी ती षटकं टाकली. तो विक्रम अजून अबाधित आहे आणि आजचं बदललेलं क्रिकेट पाहता, तो मोडला जाण्याची शक्यताही जवळपास नाहीच. बरं, त्यांच्या आयुष्यात अचानक असं घडून गेलं अशीही ही गोष्ट नव्हती. नाडकर्णींचा करिअर इकॉनॉमी रेट षटकांमागं दोन धावांपेक्षा कमी आहे.

बॅरिंग्टन हा एक महान फलंदाज होता. त्याची कसोटी सरासरी तब्बल ५८ आहे. तो बचावात्मक फलंदाज होता हे मानलं तरी २१ षटकं धाव न देणं हे बॅटला बेड्या ठोकण्यासारखंच होतं! दोन-तीन क्षेत्ररक्षक सोडून इतरांनी मैदानावर वामकुक्षी घेतली असती तरी चाललं असतं.

त्यामुळे एकदा मी सचिन तेंडुलकरला विचारलं होतं : ‘आजच्या काळात बापू नाडकर्णी इतकी निर्धाव षटकं टाकू शकले असते का?’

तो म्हणाला : ‘कठीण आहे. फलंदाजांनी त्यांच्यावर आक्रमण केलं असतं. कदाचित त्यांची गोलंदाजी फोडून काढली असती किंवा कदाचित त्यांनी फलंदाजांच्या विकेट्स काढल्या असत्या; पण चेंडू नुसता अडवला गेला नसता.’

या उत्तरावरून मी बापूजींनाही प्रेमानं डिवचलं होतं. बापूजी हसून म्हणाले होते :‘‘आज वन डे आणि टी-२० मुळे क्रिकेट अधिक आक्रमक झालंय हे मला मान्य आहे; पण तुला काय वाटलं, आमच्या काळी आक्रमक फलंदाज नव्हते? सोबर्स, कन्हाय, मे, ग्रॅव्हिनी, हार्वे, ओनील यांसारख्या आक्रमक फलंदाजांना मी गोलंदाजी टाकली आहे. त्या काळी ऑस्ट्रेलियन फलंदाजांचं पदलालित्य एखाद्या बॅले डान्सरसारखं असायचं. मोठेपणा सांगत नाही; पण ऑस्ट्रेलियाविरुद्ध मी दगडी खेळपट्टीवर दोनदा एका डावात सहा सहा बळी घेतलेत.’’

ते पुढं म्हणाले : ‘आमच्या काळातल्या दोन फलंदाजांचं उदाहरण मी तुला देतो. एकदा मी पीटर मे या महान फलंदाजाला इंग्लंडमध्ये कसोटीत गोलंदाजी टाकत होतो. मी त्याच्यासाठी मिड ऑफ ठेवला होता. मे यानं काय केलं असेल? त्यानं मिड ऑनमधून मला ऑन ड्राईव्ह मारला, त्यामुळे मी मिड ऑफ हलवला आणि मिड ऑन ठेवला आणि पुन्हा तसाच चेंडू टाकला. मे यानं तो चेंडू मिड ऑफमधून सीमापार केला. मीही हट्टाला पेटलो आणि मिड ऑन आणि मिड ऑफ हे दोन्ही आणून ठेवले. मे नुसता हसला आणि पुन्हा मी तसाच चेंडू टाकला. मे यानं तो माझ्या बाजूनं सीमापार ठोकला. पीटर मे याचा दर्जा काय होता, हे मला यातून तुला सांगायचं आहे.’’

‘आणखी एक उदाहरण देतो. एकदा मी एका कौंटी मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या ग्रॅहम पोलॉकला गोलंदाजी टाकत होतो. त्यानं चेंडू सहज वर उचलला. मी उत्साहात ‘अप हिम’ म्हणून ओरडलो. मी चेंडूकडे पाहिलं तर तो प्रेक्षकांत जाऊन पडला होता. माझा चेहरा पडला. मला माझा कौंटीचा सहकारी त्यानंतर म्हणाला : ‘पोलॉकसाठी ‘अप हिम’ नाही. तो जेव्हा चेंडू वर मारतो ना, तेव्हा अप, अप अँड आउट असंच असतं,’ बापूजींनी सांगितलं.

बापूजी पुन्हा सांगू लागले : ‘आजच्या काळातल्या फलंदाजांप्रमाणे मीसुद्धा माझ्यात थोडा बदल केला असता आणि मीसुद्धा त्यांना फटकेबाजी करू न देण्यासाठी आणि त्यांच्या विकेट घेण्यासाठी प्रयत्न नक्कीच केला असता.’’

हे सर्व आठवायचं कारण काय? तर मी परवा विचार करत होतो की प्रसन्ना, बेदी किंवा मुरलीधरनसारखे अस्सल कलाकार फिरकी गोलंदाज आपल्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुन्हा पाहायला मिळतील का?

तो फसवा फ्लाईट? तो टर्न? ती बेदीसारखी नैसर्गिक अ‍ॅक्शन? (बेदीला पाहिल्यावर, फिरकी गोलंदाजी ही केसाचा भांग पाडण्याएवढी सोपी कला वाटायची.)

की हे सर्व संपलं? कारण आता फलंदाजांचा जमाना आहे. ताकदवान बॅट्स आल्यात. सीमारेषा आखडल्या गेल्या आहेत. टी-२०, वन डेमुळे पॉवर हीटिंगची सवय फलंदाजांना झालेली आहे. त्यामुळे क्लासिकल फिरकी गोलंदाजीकडे कोण वळणार? त्यात कसोटी सामना खेळणं ही अलीकडे आयपीएल, टी-२०, वन डेनंतरची महत्त्वाकांक्षा असते. आयपीएलमध्ये जे आता फिरकी गोलंदाजी टाकतात त्यांना सगळ्यांना‘मिस्ट्री स्पिनर’ व्हायचंय, त्यामुळे लेग स्पिनर जास्त गुगली टाकतात. ऑफ स्पिनर कॅरम बॉल टाकतात. वरुण चक्रवर्तीसारखा गोलंदाज तर चक्क साडेआठ कोटींना विकला जातो आणि तो आतापर्यंत फक्त एकच रणजी ट्रॉफी सामना खेळलाय. कोण कशाला बापू नाडकर्णींप्रमाणे पैशाचं नाणं ठेवून दिवस दिवस त्यावर चेंडू टाकण्याचा प्रयत्न करेल? किंवा प्रसन्ना, बेदीप्रमाणे फ्लाईटवर प्रभुत्व मिळवण्यासाठी घाम गाळेल? आयुष्य इतकं सोपं झालेलं असताना.

परवा मी प्रसन्नाचे दोन इंटरव्‍ह्यू ऐकले. त्यात एक होता सुभाष गुप्तेंवरचा. त्याचं असं म्हणणं होतं की, ‘आज सुभाष गुप्ते खेळत असते तर त्यांनी ८०० च्या वर विकेट्स सहज घेतल्या असत्या.’

तो म्हणतो : ‘एका दुलीप ट्रॉफी मॅचमध्ये मी गुप्तेंची अडीच षटकं खेळलो आणि चेंडू फ्लाईट कसा करावा, त्यासाठी पुढच्या हाताचा उपयोग कसा करावा, चेंडू कधी; कुठून सोडावा याचे ज्ञानकण मी त्या अडीच षटकांमध्ये जमवले.’

आज प्रसन्नासारखा शिष्य जरी असेल तरी त्याला तशी अडीच षटकं टाकणारे सुभाष गुप्ते कुठून आणायचे?

प्रसन्नानं त्या मुलाखतीत आणखी एक गोष्ट फार चांगली सांगितली. तो म्हणतो : ‘आम्ही (तो आणि बेदी) सचिन, सेहवाग, विराट वगैरे फलंदाजांचं आव्हान नक्की स्वीकारलं असतं.’

आपल्या मंडळींना अजून फ्लाईट आणि चेंडू टॉस करणं यातला फरक कळत नाही. बरेच लोक चेंडू टॉस केल्याला फ्लाईट म्हणतात आणि आपले जवळपास सगळेच गोलंदाज चेंडू टॉस करतात. जसा एखादा टेनिसप्लेअर सर्व्हिस करताना चेंडू उडवतो ना त्याला टॉस करणं म्हणतात, तसंच आपल्या आजच्या फिरकी गोलंदाजांचं आहे. ती फ्लाईट नसते. कारण, फ्लाईट ही फसवी असते. तिला एक लूप असतो. त्यामुळे फलंदाजाला चेंडू जिथं पडेल असं वाटतं तिथं तो न पडता अलीकडे पडतो. अशा प्रकारची फ्लाईट आता किती गोलंदाज देतात? खरी फ्लाईट दिल्यानंतर चेंडू ज्या वेळी खेळपट्टीवर पडतो त्या वेळी त्याची आणि खेळपट्टीची जी पकड होते त्यामुळे चेंडू जास्त वळतो.

हे दोघं पूर्वी जेवढे यशस्वी झाले त्यापेक्षा जास्त ते आज यशस्वी झाले असते याबद्दल मला तिळमात्र शंका नाही; किंबहुना टी-२० मध्ये ज्यांना फिरकी खेळणं नीट जमत नाही; पण केवळ पॉवर हीटिंगच्या जोरावर ते उंच उंच स्पिनर्स फेकून देतात त्यांचा या दोन गोलंदाजांनी फ्लाईटवर सहज ‘मामा’ केला असता! दोघांनी आजच्या

काळातसुद्धा दादागिरी केली असती. कसोटीत तर त्यांनी अहमदाबादच्या खेळपट्टीवर इंग्लंडला दिवसात तीनदा बाद केल असतं; पण वन डे, टी-२० मध्येही स्वतःला ॲडजस्ट केलं असतं. कसोटी ते टी-२० हा प्रवास गोलंदाज आणि फलंदाज दोघांसाठी टी-२० ते कसोटी या प्रवासापेक्षा जास्त सोपा आहे.

तुम्हाला जर बेदी किंवा प्रसन्न व्हायचं असेल ना, तर तुम्ही त्यांच्या क्लिप्स पाहा. तुमच्या सुदैवानं त्या आज तुम्हाला यूट्यूबवर मिळू शकतील. मग तुम्हाला कळेल की खरं एव्हरेस्ट काय आहे ते आणि ते एव्हरेस्ट चढण्याचा प्रयत्न करा; पण त्यासाठी तुम्हाला महान कसोटीपटू होण्याची महत्त्वाकांक्षा बाळगून तो प्रयत्न करावा लागेल.

ते एव्हरेस्ट जेव्हा चढाल तेव्हा वन डे आणि टी-२०ची शिखरं ही सह्याद्री आणि सातपुड्याएवढी सोपी होऊन जातील. मग आमच्यासारख्या मंडळींचे डोळेसुद्धा ती कला पाहून सुखावतील.

(सदराचे लेखक ज्येष्ठ क्रीडापत्रकार-लेखक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com