esakal | कणा असाच ताठ राहू देत
sakal

बोलून बातमी शोधा

Virat Kohli and Ravi Shastri

कणा असाच ताठ राहू देत

sakal_logo
By
द्वारकानाथ संझगिरी dsanzgiri@hotmail.com

भारतीय क्रिकेट निवड समितीच्या पाठीला कणा आहे, हे परवा चेतन शर्मानं दाखवून दिलं ते बरं केलं. रवी शास्त्री, विराट कोहली यांची आणखी एका आघाडीच्या फलंदाजाची मागणी त्यानं धुडकावून लावली. हा कणा उभा करण्याचं काम अर्थातच बीसीसीआयनं केलंय हे सांगायची काही गरज नाही. त्याशिवाय हे काही घडलं नसतं. विराट आणि शास्त्री यांच्या डोक्यात, आपणच भारतीय क्रिकेट चालवतो, ही वाफ शिरली होती आणि बोर्डानं ती वाफ काढून टाकायची पहिली झडप उघडली.

काही वर्षांपूर्वी भारताच्या तीन महान खेळाडूंनी अनिल कुंबळेला प्रशिक्षक केलं. त्या वेळी कुटील कारस्थान करून विराट आणि शास्त्री यांनी शिस्तप्रिय कुंबळेला दरवाजा दाखवला आणि शास्त्री पुन्हा प्रशिक्षक झाला. त्या वेळी हे महान खेळाडूसुद्धा नमले होते. ‘कर्णधाराला जसा हवा तसा संघ द्यावा’ किंवा ‘त्याला हवा तो प्रशिक्षक द्यावा’ या सबबीखाली सर्व काही चालवून घेतलं गेलं; पण हे चुकीचं होतं. कर्णधाराचं मत संघनिवडीच्या बाबतीत किंवा प्रशिक्षकाच्या बाबतीत जरूर घेतलं जावं; पण त्याच्याच ओंजळीनं पाणी पिणं हे काही योग्य कारभारच लक्षण नव्हतं.

भारतीय क्रिकेटच्या इतिहासात डोकावून पाहिलं तर लक्षात येईल, एक जमाना असा होता की निवड समितीला फक्त कणाच होता, इतर काहीही नव्हतं. दादागिरीवर निर्णय घेतले जायचे आणि खेळाडूंची गुणवत्ता या दादांच्या खिजगणतीतही नसायची.

सी. के. नायडू हे माझ्या वडिलांच्या पिढीचे ‘सचिन तेंडुलकर’. महान फलंदाज. वयाच्या ६२ वर्षी शेवटची रणजी ट्रॉफी ते खेळले आणि त्यातही त्यांनी अर्धशतक ठोकलं; पण ते निवड समितीचे अध्यक्ष झाले आणि त्यांनी तिथं मनमानी सुरू केली. सन १९५२ च्या इंग्लंडच्या दौऱ्यावर त्यांनी विनू मंकड यांना संघात घेतलं नाही. मंकड हे तेव्हाही भारताचे सर्वश्रेष्ठ अष्टपैलू खेळाडू होते. का घेतलं नाही? तर मंकड हे त्या वेळी पोटासाठी इंग्लंडमध्ये लीग क्रिकेट खेळत होते आणि त्यांनी फक्त कसोटी सामन्यात खेळण्याची परवानगी मागितली होती.

‘मी छप्पन्न मंकड उभे करीन’ असा नायडू यांचा तोरा होता, म्हणून त्यांनी पहिल्या कसोटीत मंकड यांना वगळलं. मग पहिली कसोटी भारतीय संघ मानहानिकारकरीत्या हरला. दुसऱ्या कसोटीसाठी म्हणजे ‘लॉर्डस्’ कसोटीसाठी त्यांना मंकड यांना निमूटपणे घ्यावंच लागलं आणि ती ‘लॉर्डस्’ कसोटी पुढं ‘मंकड्स टेस्ट’ म्हणून ओळखली गेली. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे, मंकड यांनी पहिल्या डावात आघाडीला जाऊन ७२ धावा केल्या. मग त्यांनी तब्बल ७३ षटकं टाकली, त्यात त्यांनी ५ विकेट्स काढल्या. पुन्हा दुसऱ्या डावात त्यांनी १८४ धावा केल्या आणि पुन्हा इंग्लंडच्या दुसऱ्या डावात २४ षटकं टाकली. ‘दात घशात घालणं’ या वाक्प्रचाराचं हे चपखल उदाहरण!

माधव आपटे यांच्यासारखा क्रिकेटपटू, ज्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये फक्त ७ सामन्यांमध्ये ४९.२७ च्या सरासरीनं ५४२ धावा केल्या. ते पुढं कसोटी सामना खेळलेच नाहीत. काय कारण होतं माहितेय? आपटे यांच्या वडिलांकडे ‘कोहिनूर मिल’ची त्या वेळी होलसेल एजन्सी होती. त्या वेळच्या निवड समितीच्या एका सदस्याला, त्यातली सब-एजन्सी हवी होती. ती आपटे यांच्या वडिलांनी त्याला दिली नाही, म्हणून तो राग माधव आपटे यांच्यावर काढला गेला आणि माधव आपटे यांची कारकीर्द संपवली गेली. असे अनेक किस्से त्या काळी घडत.

हल्ली सगळेच खेळाडू हाफ पॅंटमध्ये फिरतात. सुरेंद्रनाथ नावाचा त्या वेळचा वेगवान गोलंदाज मिलिटरीत होता. तो हाफ पॅंटमध्ये आलेला निवड समितीच्या एका सदस्याला आवडलं नाही. त्या सदस्यानं त्याला सांगितलं, ‘जा, फुल पॅंट घालून ये.’ त्यानं नकार दिला. तो निवड समितीचा सदस्य त्याला म्हणाला, ‘तू आयुष्यात पुन्हा कधीही कसोटी सामना खेळू शकणार नाहीस.’ आणि तसंच घडलं. अशी मनमानी अनेक प्रकारे चालत असे.

एवढा मोठा सुनील गावसकर; पण त्याच्यावरही निवड समितीच्या सदस्यांना जोकर म्हणायची वेळ आली होती आणि मग ‘आय रिग्रेट’ असं म्हणावं लागलं होतं.

सचिन तेंडुलकरला त्याला हवी तशी टीम निवड समितीनं कधीच दिली नाही. खरं तर, आज विराट जशी दादागिरी करतो तशी दादागिरी सचिन त्या वेळी सहज करू शकत होता. कारण, सचिन हा भारतीय क्रिकेटचा चेहरा होता. बोर्डाच्या अंगणात जी पैशाची गंगा अवतरली होती तीत त्याच्या पराक्रमाचा वाटा मोठा होता...पण सचिनचा तो स्वभाव नव्हता, ती दादागिरी करण्याची त्याची वृत्ती नव्हती. त्यानं नेतृत्वच सोडून दिलं.

आता काळ अक्षरशः ३६० कोनातून फिरला आहे. खेळाडू वाघ झाले आहेत आणि निवड समितीचे सदस्य मांजर झाले आहेत. त्यांना लाखो रुपये मिळायला लागले आणि त्यामुळे ते मिंधे झाले. खरं तर ‘रबर स्टॅम्प’ झाले.

विराट आक्रमक आहे. आपला चेहरा हा आता भारतीय क्रिकेटचा चेहरा आहे हे त्याला माहीत आहे. रवी शास्त्री हा एकंदरीत स्वभाव, विचार आणि महत्त्वाकांक्षा याबाबतीत अतिशय योग्य असा गुरू त्याला लाभलेला आहे, त्यामुळे दोघांची ही जोडी भारतीय क्रिकेट चालवत असते. दोघांच्या आवडी-निवडी अत्यंत तीव्र आहेत, त्यामुळे इतरांचं कारण नसताना नुकसान होऊ शकतं.

करुण नायर आवडत नाही म्हणून, त्रिशतक करूनसुद्धा, त्याचं करिअरचं संपून गेलं.

रोहित शर्माला ऑस्ट्रेलियाला न घेऊन जाण्यासाठी काय काय केलं गेलं! कारण, त्याला ‘चल ए, फूट’ म्हणता येत नाही. रहाणेसारख्या खेळाडूला किती दबावाखाली या जोडगोळीनं वागवलं. त्याला टी-२०तून बाहेर काढलं. त्याला वन डेतून बाहेर काढलं. आज तो केवळ उपकर्णधार आहे आणि त्याच्या नेतृत्वाच्या गुणामुळे तो संघात कसाबसा आहे; पण त्याच्यावर इतका दबाव टाकला गेलेला आहे की, जर इंग्लंडमध्ये तो परफॉर्मन्स करू नाही शकला तर संघाबाहेर कधीही फेकला जाऊ शकेल. म्हणजे खेळाडूला कोपऱ्यात आणायचं, त्याच्यावर दबाव टाकायचा आणि तो बाहेर जाईल हे बघायचं. अशा चाली बऱ्याच वेळा कर्णधाराकडून खेळल्या जाताना आपण पाहतो. हे त्यांच्या दादागिरीमुळे. आणि निवड समितीनं बोटचेपं धोरण स्वीकारलं तर असं सहज करणं शक्य आहे.

धोनी हा कितीही मोठा खेळाडू असेल; पण त्याच्या कारकीर्दीत ज्या पद्धतीनं सेहवाग, गांगुली आणि लक्ष्मण बाहेर गेले ते ‘काढले गेले’ या सदराखालीच येतात.

आघाडीच्या फलंदाजांची मागणी केली गेली तेव्हा चेतन शर्माच्या डोळ्यासमोर १९८६ ची ‘लीड्स’ कसोटी आली असेल. मनोज प्रभाकर असलेल्या संघात, ‘लीड्स’वर चेंडू स्विंग होणार म्हणून, संघात नसलेल्या मदनलालला कर्णधार कपिलनं संघात घेतलं. तो इंग्लंडमध्ये लीग खेळत होता. मला ती सकाळ आठवते. मी आणि चेतन शर्मा हॉटेलच्या डायनिंग हॉलमध्ये ब्रेकफास्ट करत होतो.

पार खचून गेलेला झालेला प्रभाकर समोरच होता. एकाकी, अबोल...आणि ज्या खेळपट्टीवर मदनलाल आग लावू शकतो तिथं स्विंगनं रान पेटवण्याची कुवत असणारा...!

पुढं तो सावरला; पण कपिल आणि त्याच्यातून विस्तव जात नव्हता.

म्हणूनच तिथं आघाडीचे तीन फलंदाज असताना चौथा पाठवल्यावर किमान दोघांचा ‘मनोज प्रभाकर’ झाला असता.

आज अभिमन्यू ईश्वरन राखीव खेळाडू आहे. तो विराटला उघडउघड आवडत नाही.

त्या वेळी प्रदीप सुंदरम हा वेगवान गोलंदाज राखीव होता. इंग्लंडमध्ये तो लीग क्रिकेट खेळत होता; पण त्याचाही विचार झाला नाही. मदनलाल कानामागून आला आणि तिखट झाला. ती मॅच आपण जिंकली. मदनलाल यशस्वी झाला; पण त्या खेळपट्टीवर कुणीही जरा बरा स्विंग टाकणारा गोलंदाज यशस्वी झाला असता.

कारण, जे करायचं ते खेळपट्टीच करणार होती. गोलंदाजाला योग्य टप्पा टाकायचा होता. रवी शास्त्री संघात होता.

त्याला हे आठवतच असेल. असो.

मी एवढंच म्हणेन, कणा असाच ताठ राहू देत.

(सदराचे लेखक ज्येष्ठ क्रीडापत्रकार-लेखक आहेत.)

loading image