तेथे कर माझे जुळती

steve-waugh
steve-waugh

कोलकत्यात २००१ मध्ये लक्ष्मण अजरामर खेळी खेळून गेला. त्याबद्दल गेल्या आठवड्यातल्या लेखात मी लिहिलं होतं. त्याच कोलकत्यात स्टीव्ह वॉ हाही एक अजरामर खेळी १९९८ मध्ये खेळून गेला. ती क्रिकेटच्या मैदानावर नव्हती. ती ऑस्ट्रेलियासाठी नव्हती. ती मानवतेसाठी होती. ती खेळायला बॅट लागत नाही. अत्यंत उदार आणि संवेदनक्षम मन लागतं. ते स्टीव्हकडे होतं.

खरं तर १९९८ च्या कसोटीत भारतानं ऑस्ट्रेलियाला चोप दिला होता. चार दिवसांत मॅच संपली होती. स्टीव्ह रूमवर परतला तेव्हा त्याला ‘उदयन’ या संस्थेचं एक आमंत्रण मिळालं. ती संस्था कोलकत्यात कुष्ठरुग्णांच्या मुलांसाठी कार्य करते. आमंत्रण फक्त स्टीव्हलाच का दिलं गेलं?

कारण, त्यानं मॅच सुरू असताना एक मुलाखत तिथल्या वर्तमानपत्राला दिली होती. तीत त्यानं म्हटलं होतं : ‘मला वंचित (Underprivileged) मुलांसाठी काम करायचंय. त्यांना मदत करायची आहे.’ दुसऱ्या दिवशी उदयन या संस्थेच्या श्यामलू दुडेजा यांच्याबरोबर स्टीव्ह ‘उदयन’मध्ये गेला. शहराच्या सीमारेषेवर बराकपूरला जायला एक तास लागला. उदयन ही संस्था रेव्हरंड जेम्स स्टीव्हन्स यांंनी उभी केली होती. १९७० मध्ये तिथल्या पिलखाना झोपडपट्टीतल्या कुष्ठरुग्णांच्या ११ मुलांना घेऊन त्यांनी ही संस्था सुरू केली. त्या वेळी आई-बाप मुलांना सोडत नव्हते. त्यांना भीती होती, मुलं पळवली तर जाणार नाहीत ना? त्यांचं धर्मांतर तर केलं जाणार नाही ना? 
मात्र, या मुलांना एक चांगलं आयुष्य द्यायचं हाच रेव्हरंड स्टीव्हन्स यांचा उद्देश होता. कुटुंबात एकाला कुष्ठरोग झाला की सगळं कुटुंब बहिष्कृत होई, असा तो काळ होता. अशा कुटुंबातल्या मुलांना ना शिक्षण मिळे, ना नोकरी. स्टीव्ह वॉ तिथं गेला तेव्हा ‘उदयन’मध्ये २५० मुलं होती. 
स्टीव्ह म्हणाला : ‘जिथून ही मुलं आली आहेत ती वस्ती मला पाहायची आहे.’

स्टीव्हला तिथं नेण्यात आलं. समृद्ध ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या स्टीव्हसाठी तो सांस्कृतिक धक्का होता. काळं प्लॅस्टिक, पत्रे, तुटक्या विटांनी बांधलेल्या त्या झोपड्या होत्या. चार-दोन भांडी, एखादी चूल, चटई, चादर यापलीकडे तिथं काहीही नव्हतं. ना पाणी, ना वीज. तिथले कुष्ठरुग्ण पाहून स्टीव्ह शहारला.
त्यानं कधी कुष्ठरुग्ण पाहिलेला नव्हता. अमक्याला कुष्ठरुग्णासारखं वागवलं वगैरे वाक्प्रचार ऐकले असतील कदाचित. मात्र, झडलेली बोटं, चेहरा, हात-पाय तो प्रथमच पाहत होता. तुटलेल्या बोटांची एक बाई मुलीचे केस विंचरत होती.  स्टीव्हनं दुभाषामार्फत तिला विचारलं : ‘आयुष्याकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत?’
‘काहीच नाही,’ ती  म्हणाली.
‘श्वास सुरू राहू देत,’ यापेक्षा ती जास्त काय सांगणार? बोटं झडलेली एक बाई विणत होती. स्टीव्ह ते पाहून आश्चर्यचकित झाला.
स्टीव्हनं विचारलं : ‘हे सगळे लोक उदरनिर्वाहासाठी काय करतात?’
त्याला उत्तर मिळालं : ‘मुलं भीक मागतात.’
त्यानं विचारलं : ‘मुली का दिसत नाहीत?’
उत्तर आलं : ‘त्या शरीरविक्रय करतात.’
मैदानावर कठीण प्रसंगात धीरोदात्तपणे उभा राहणारा हा माणूस गहिवरला. त्याच्या मनाचा बांध फुटला. त्याची मुलगी त्या वेळी फक्त अठरा महिन्यांची होती. बघता बघता ती त्याच्या डोळ्यांसमोर मोठी झाली. आठ वर्षांची झाली आणि ती शरीरविक्रय करतानाचं चित्र त्याच्या डोळ्यासमोर उभं राहिलं. नुसत्या विचारानं त्याला घाम फुटला. त्यानं तिथल्या तिथं सांगितलं : ‘‘या मुलींसाठी काहीतरी करू या. त्यांना मुलाप्रमाणे, नवं, वेगळं, सन्मानाचं आयुष्य जगण्याचा हक्क आहे.’’
दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रांत कुष्ठरुग्णांबरोबरचा स्टीव्हचा फोटो झळकला. शहरावर अशी भळभळणारी जखम आहे आणि औषधोपचार होत नाहीत, हे शहराला जाणवलं. एक सेलिब्रिटी ही गोष्ट नुसत्या एका फेरीनं करू शकला.  स्टीव्ह तिथंच थांबला नाही. त्यानं ‘उदयन’साठी पैसे उभारायचे ठरवले. 

तो, त्याचं नाव, त्याचा लौकिक, त्याची विश्वासार्हता पणाला लावायला तो तयार झाला. तो खिशात हात घालणार होता. तो पुरस्कर्ते शोधणार होता. तो देणग्या जमवणार होता. तो मदतीसाठी कार्यक्रम आयोजित करणार होता. तो ‘उदयन’साठी जाहिरातीचे करार करणार होता. त्यानं आपल्या संघाला सर्व कल्पना दिली. संघ त्याच्या मागं उभा राहिला. एक डिनर आयोजित केलं गेलं. खेळाडूंच्या विविध गोष्टींचा लिलाव करण्यात आला आणि तिथल्या तिथं एक रक्कम उभारून ती दिली गेली. ‘उदयन’कडे जागा होती.
मुलींच्या होस्टेलच्या पायाचे पैसे उभे राहिले.

स्टीव्हनं एक मुलगी दत्तक घेतली. नाव लखीकुमारी. ती पोलिओमुळे पंगू झाली होती. आई-वडील कुष्ठरुग्ण. परिस्थितीमुळे तिचं मनही पंगू झालं होतं. ‘उदयन’मध्ये पहिले सहा महिने तिच्या चेहऱ्यावर फक्त भकास भाव असत. नंतर ती नाचायला, गायला लागली. अभ्यासातही हुशार होती; पण स्टीव्ह म्हणतो :‘‘मुलं दत्तक घेऊन फार काही साध्य होत नाही. ज्यांची निवड होत नाही ती मुलं हिरमुसतात. त्यापेक्षा सर्वांवर पैसे खर्च करणं योग्य.’’ 
ऑस्ट्रेलियातील एका दांपत्यानं ३०० बेड पाठवले. ती मुलं वेडावली. आयुष्यात पहिल्यांदा ती बिछान्यावर झोपत होती. मग ऑस्ट्रेलियातून वैद्यकीय विद्यार्थी या मुलांना वैद्यकीय मदत द्यायला स्वखर्चानं यायला सुरुवात झाली. २३ वर्षं झाली या गोष्टीला. ‘उदयन’ हा आता स्टीव्हच्या आयुष्याचा भाग आहे.
तो म्हणतो : ‘‘ ‘उदयन’चं गेट उघडून आत गेलो की वंचित मुलांसाठी काही तरी केल्याचं समाधान मिळतं.’’ 
हे समाधान पैशानं विकत मिळतं नाही. पैसे देऊन मिळतं. स्टीव्हसाठी ही खेळी त्यानं मिळवलेल्या वर्ल्ड कपएवढीच प्रिय आहे.
मानवतेला झेंडा नसतो, धर्म नसतो, राष्ट्रगीत नसतं, देश नसतो, भाषा नसते हे स्टीव्हनं दाखवून दिलं. कुष्ठरुग्णांची सेवा करायला बाबा आमटेच व्हावं लागतं असं नाही. तो देवाचा माणूस. तो त्यांच्यातच राहिला; पण एक सेलिब्रिटी आपलं संपन्न आयुष्य जगता जगता, हृदयाचा एक कोपरा, आयुष्याचा छोटा काळ त्यांना देऊ शकतो. त्यातून शेकडोंचं आयुष्य बदलू शकतो.

आजच्या आयपीएलच्या समृद्ध ताटात जेवणाऱ्या क्रिकेटपटूंना एकच सांगायचंय : ‘जगा समृद्ध, जेवा भरपेट; पण दोन घास वंचितांसाठी काढून ठेवायला विसरू नका. काही कुटुंबं त्यातून मीठ-भाकर खातील.’
मग आम्ही स्टीव्हसंदर्भात जे म्हणतो तेच तुमच्याबाबतीतही म्हणू...‘तेथे कर माझे जुळती.’

(सदराचे लेखक ज्येष्ठ क्रीडापत्रकार-लेखक आहेत.)

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com