लक्ष्मणाचं रामराज्य!

vvs-laxman
vvs-laxman

कोलकत्याला ऑस्ट्रेलिया विरुद्ध  फॉलो ऑनचं विष पचवून आपण जिंकलो, त्याला गेल्या आठवड्यात २० वर्षं झाली. अजूनही आपण एक परिकथा ऐकलीय असंच वाटतं. स्टीव्ह  वॉ तेव्हा सिकंदराच्या थाटात आला होता. त्या कसोटीच्या चौथ्या दिवशी मॅच संपणार, तो जग जिंकल्याचं घोषित करणार असे सर्व मांडे तो मनात खात होता. मद्याची लाडकी बाटली त्यानं ड्रेसिंग रूममध्ये आणून ठेवली होती. पण एका माणसानं त्याचं स्वप्न उद्ध्वस्त केलं. त्याच नाव होतं : वांगीपुरुप्पू वेंकटसाई लक्ष्मण. या लक्ष्मणानं कांचनमृग पकडला. सीतेचं अपहरण होऊ दिलं नाही. जुन्या लक्ष्मणरेषा पुसून टाकल्या. आणि एक नवीन लक्ष्मणरेषा आखली.

त्या दिवशी लहानपणी शिकलेला एक वाक्प्रचार अपुरा वाटला.‘पराभवाच्या कराल दाढेतून बाहेर काढणं वगैरे...’ लक्ष्मणनं विजयाचा घास स्टीव्ह वॉ याच्या जठरातून बाहेर काढला. तो घास निघाला होता आतड्यांमध्ये जायला... पुढं जाण्याआधी थोड्या आठवणी जागवत ठेवतो.

ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात ४४५ धावा केल्या. भारतीय संघ १७१ धावांत कोसळला. त्यांनी फॉलो ऑन दिला. फरक तब्बल २७४ धावांचा. स्टीव्ह वॉ याचं चुकलं असं कुणाला वाटलं नाही. एक माणूस होता, ज्याला ‘स्टीव्ह चुकला’ असं वाटलं. आमचा वासू परांजपे. त्याचा मित्र त्या वेळी ऑस्ट्रेलियन ड्रेसिंग रूममध्ये होता. त्याला वासूनं सांगितलं :‘फॉलो ऑन देऊ नका.’ त्याची स्टीव्ह वॉला सांगायची हिंमत झाली नाही. हे अलीकडेच वासूनं पुस्तकात लिहिलेलं आहे. मी स्टीव्ह वॉ असतो तर वासूच्या पायावर डोकं ठेवलं असतं.

असो, तर काय सांगत होतो? हां, पहिल्या डावात लक्ष्मणनं ५९ धावा केल्या. त्या वेळी तो सहाव्या क्रमांकावर खेळला होता. दुसऱ्या डावात गांगुली मास्टरस्ट्रोक खेळला. त्यानं लक्ष्मणला तिसऱ्या क्रमांकावर पाठवलं. तरीही एक वेळ अशी होती की भारताची धावसंख्या ४ बाद २३८ होती आणि फॉलो ऑनच कर्ज चुकतं झालेलं नव्हतं. तिथून हा सामना भारतानं जिंकला.

मॅच जिंकण्यात आणखी दोघांचा वाटा महत्त्वाचा होता. एक राहुल द्रविड, दुसरा हरभजनसिंग. राहुलनं १८० धावा करून ३७६ धावांची मोठी भागीदारी लक्ष्मणबरोबर केली. तलवारीला ढाल लागते, ती राहुलनं पुरवली आणि हळूहळू ती ढालसुद्धा तलवार झाली. समोर लक्ष्मणच्या रुद्रावतारानं प्रभावित होऊन राहुलच्या बॅटनं तांडवनृत्य शिकायला सुरुवात केली. त्यानं ५१ च्या स्ट्राईक रेटनं धावा केल्या.

दुसरा वाटा होता हरभजनचा. त्यानं १३ बळी सामन्यात घेतले. शेवटच्या दिवशी टी टाईमपर्यंत ऑस्ट्रेलियानं फक्त ३ बळी गमावले होते. तिथून हरभजननं मॅच जिंकून दिली. एरवी, हरभजन ‘मॅन ऑफ द मॅच’ झाला असता; पण लक्ष्मणच्या झंझावाताचा झपाटा असा होता की इतर वादळं किरकोळ वाटली. सन १९७१ मध्ये पोर्ट ऑफ स्पेनला सुनील अशीच खेळी खेळला होता. पहिल्या डावात शतक ठोकून दुसऱ्या डावात द्विशतक.

२८१ च्या खेळीनं लक्ष्मण क्रिकेटच्या इतिहासात अजरामर झाला. विस्डेननं इतिहासातल्या सर्वश्रेष्ठ खेळीची एक यादी  तयार केलीय. त्यात लक्ष्मणची खेळी सहाव्या क्रमांकावर आहे. का नसणार? तेल कुणीही पेटवेल, यानं पाणी पेटवलं!
चौथ्या दिवशी सकाळी त्यानं आणि राहुलनं पहिल्या तासात ओव्हरमागं ७ धावांच्या सरासरीनं धावा केल्या. 

कुणासमोर? मॅग्रा आणि गिलेस्पी. लढाईत रक्ताचे पाट वाहतात. इथे चौकारांचे पाट वाहत होते. स्टीव्ह वॉ यानं कबूल केलं की ऑस्ट्रेलियन संघ प्रथम तिथं खचला. मग लक्ष्मणनं वॉर्न याला निःशस्त्र केलं. लेग स्टंपबाहेरच्या बूटमार्क्समधून तो चेंडू वळवत होता. लक्ष्मणनं त्याला लाँग ऑनला स्पिनच्या विरुद्ध दिशेला ड्राईव्ह मारले. हे सोपं नसतं. मग वॉर्ननं लेगला तटबंदी वाढवली. आणि पुन्हा लेगस्टंप बाहेरून चेंडू फिरवले. लक्ष्मणनं पुढं जात ऑफला ड्राईव्ह मारले. सर्वोच्च दर्जाचा फलंदाज फक्त हा खेळ खेळू शकतो. आता याच्या पुढं काय करावं ते आपल्याला कळेना, असं वॉर्न यानं कबूल केलं. 

माणूस वादळ रोखू शकत नाही. ते ओसरेपर्यंत तो ते फक्त हताशपणे पाहू शकतो. ऑस्ट्रेलियानं ते केलं. तोपर्यंत विध्वंस होऊन गेला होता. संघाला पराभवापासून वाचवायला लक्ष्मण खेळलाच नव्हता, तो जिंकण्यासाठी खेळला होता. काही संकटं अशी टाळता येतात. लक्ष्मणनं कसोटी जिंकली. आणि मालिका जिंकली.

त्यानं आपल्या स्वभावापलीकडे काही केलं नाही. त्याआधी सिडनीला त्यानं १९८ चेंडूंत १६७ धावा ठोकल्या होत्या. त्यात २७ चौकार होते. तो काय चेंडूच्या योग्यतेनुसार खेळला? ऑस्ट्रेलियन गोलंदाज एका फलंदाजाला २७ चौकार देऊ शकत नाहीत. ते त्यानं त्यांच्याकडून लुटले. त्यांच्या भावना न दुखावता. त्यांना सौंदर्याची भूल घालून. २७ चौकारांचे शिलालेख त्यानं प्रेक्षकांच्या मनावर कोरले. सचिननं त्याला खूश होऊन ओकली गॉगल दिला. तो स्वाक्षरी देत असताना एक वयस्कर आवाज त्याच्या कामात घुमला...‘तू आज माझा दिवस सार्थकी लावलास,’ ते होते जॉर्ज हॅवर्ड. ऑस्ट्रेलियाचे तेव्हाचे पंतप्रधान!

त्यानंतरची ही त्याची मोठी खेळी.
‘राहुलसारखं खेळ,’ असं त्याला सांगणं म्हणजे देवानंदला धोतर नेसायला सांगण्यासारखं होतं. रसिकता शिस्तबद्ध होऊ शकते; संन्यासी नव्हे. ती शिस्तबद्ध झाल्यावर त्यानं सन २००३ मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये धूमशान घातलं. तेव्हा ईयान चॅपेल त्याला ‘व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण’ असं म्हणाला होता.

लक्ष्मणची कसोटी सरासरी आहे ४६, जवळपास १३४ कसोटींत. तेही जास्त काळ सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करून. वर खेळला असता तर ५० पर्यंत गेला असता कदाचित; पण लक्ष्मणच्या सरासरीचं कुणाला काय देणं-घेणं! शॅम्पेन ही मद्यार्कावर मोजत नाहीत. महत्त्वाचं असतं ते तिचं फसफसून बाहेर येणं. लक्ष्मणची फलंदाजी हे सेलिब्रेशन होतं, आकडेमोड नव्हे.

भारतीय क्रिकेटच्या प्रत्येक युगात एक राम होता. नावं बदलली. कधी हजारे, कधी सुनील, कधी सचिन, कधी विराट; पण ज्या लक्ष्मणानं एका महत्त्वाच्या मालिकेत रामराज्य आणलं तो एकच. वांगिपुरुप्पू  वेंकट साई लक्ष्मण.

(सदराचे लेखक ज्येष्ठ क्रीडापत्रकार-लेखक आहेत.)

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com