तिची न ओसरणारी जादू !

माधुरी दीक्षितचा ५६ वा वाढदिवस नुकताच साजरा झाला. माधुरीच्या बाबतीत ५६ वगैरे हे न टाळता येणारे असे आकडे असतात.
Madhuri Dixit
Madhuri Dixitsakal

माधुरी दीक्षितचा ५६ वा वाढदिवस नुकताच साजरा झाला. माधुरीच्या बाबतीत ५६ वगैरे हे न टाळता येणारे असे आकडे असतात. टाळता येत नाहीत, कारण पुढे पळणारं कॅलेंडर कोणाला अजून थोपवता आलेलं नाही. एरवी ती स्वप्नात येते, तेव्हा ती धकधक गर्ल किंवा ‘दीदी तेरा देवर दिवाना’ म्हणणारी माधुरी असते. माधुरी म्हणजे उत्तम अभिनय, चेहऱ्यावरचं माधुर्य, वेड लावणारं स्मितहास्य, उच्च दर्जाची नृत्यकला, याचं अत्यंत चविष्ट आणि नशीलं असं कॉकटेल.

आपलं वय कितीही वेगात धावलं, तरी या कॉकटेलची नशा कमी होत नाही. ती मीनाकुमारी, नर्गिस किंवा नूतनच्या काळात असती तर मदर इंडिया, साहेब बीबी और गुलाम, पाकीजा, सुजाता, बंदिनी, सीमा यासारख्या भूमिका आरामात करून गेली असती. ती अशा काळात फिल्मी दुनियेत आली जेव्हा अमिताभनं चित्रपटाचं कथानकच बदलून टाकलं होतं.

पुरुषप्रधान हिंदी सिनेमा अधिक पुरुष प्रधान झाला होता आणि तरीही ती भाव खाऊन गेली आणि ‘लेडी अमिताभ बच्चन’ अशी बिरुदावली तिनं मिरवली. नशीब कोणाला कुठे घेऊन जाईल हे सांगता येत नाही. माधुरी दीक्षितला मायक्रोबायोलॉजिस्ट व्हायचं होतं. त्यासाठी शाळेनंतर तिनं पार्ल्याच्या साठे कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. ती बीएससी झाली. पण नंतर सिनेमात गेली आणि शिक्षण पूर्ण करू शकली नाही.

वयाच्या नवव्या वर्षी तिला कथ्थक शिकण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली. वसंतराव घाडगे यांच्याकडून तिने नृत्याचे धडे घेतले. पुढे तिला पंडित बिरजू महाराजांबरोबर काम करता आलं. तिची काही नृत्य, बिरजू महाराजांनी बसवली किंवा आजच्या भाषेत सांगायचं तर कोरिओग्राफी केली. हिंदी सिनेमामध्ये, ती एकमेव अशी नटी आहे जिच्या नृत्याची कोरिओग्राफी बिरजू महाराज यांनी केली. देवदास, देढ इश्किया आणि ‘दिल तो पागल है’ हे ते चित्रपट. माधुरी म्हणते, ‘‘ ते माझे गुरु आणि मित्र सुद्धा होते. त्यांनी नृत्यामधल्या बारीक बारीक गोष्टी मला शिकवल्या. अभिनय कसा करायचा, चेहऱ्यावर योग्य भाव कसे आणायचे, या गोष्टी मी त्यांच्याकडून शिकले. मुख्य म्हणजे त्यांचे विनोदी किस्से ऐकत राहावे असं वाटतं असे ’’

अबोध या सिनेमातून तिने हिंदी चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं त्यावेळी फक्त सतरा वर्षाची होती राजश्री फिल्म शाकाहारी सिनेमांचा होता. त्याच काळात कधीतरी सुरेश वाडकरला तिचे स्थळ सांगून आलं असं म्हटलं जातं आणि सुरेश वाडकर यांनी तिला म्हणे चक्क नकार दिला. हे खरं असेल तर सुरेश वाडकर यांच्या आजच्या भावना काय असतील हे आपण समजू शकतो. अबोध नंतर ‘दयावान'' सिनेमा आला. त्यात तिची भूमिका तशी छोटी होती. पण विनोद खन्ना बरोबरच्या चुंबनामुळे तिची भूमिका प्रचंड गाजली.

नुसतं चुंबनच नाही पण त्या सिनेमातले रोमँटिक शॉट सुद्धा त्या काळामध्ये फार पुढचं पाऊल वगैरे वाटले. त्यावेळी हिंदी सिनेमांमध्ये आजच्या प्रमाणे चुंबनाचा सुळसुळाट नव्हता. आज चुंबन सामान्य झालंय. मागे वळून पाहताना माधुरीला मात्र आपण असा शॉट द्यायला नको होता असं वाटलं होतं. त्या काळातील सिनेमातल्या अशा एखाद्या शॉटबद्दल दिग्दर्शकासोबत कसं बोलायचं हे तिला ठाऊक नव्हतं. कारण ती फिल्मी कुटुंबातून आलेली नव्हती. दिग्दर्शकाला या शॉटची गरज असू शकते या भावनेतून तिने ते शॉट केले. पण नंतर तिने ठरवून टाकलं की पुन्हा पडद्यावर चुंबनाचा शॉट द्यायचा नाही.

‘तेजाब’ आला आणि त्या सिनेमातल्या तिच्या मोहिनीच्या भूमिकेने रसिकांना मोहिनी घातली. त्यातल्या ‘एक दो तीन चार'' या गाण्याने तिला लोकप्रियता मिळवून दिली. तिचं ते नृत्य खऱ्या अर्थाने दिलखेचक होतं. सामान्य माणूस त्या भूमिकेच्या प्रेमात पडला. ती एकदा अमेरिकेहून परतली आणि एअरपोर्टवरचे टॅक्सीवाले तिला मोहिनी - मोहिनी अशी हाक मारायला लागले. तो सिनेमा तिच्या गाण्यामुळे जरी गाजला असला, तरी त्यातला तिचा अभिनय अत्यंत दर्जेदार होता. पैशासाठी तिचे वडील तिच्यावर मानसिक अत्याचार करत असतात.

त्या चित्रपटातले तिचे अनुपम खेरबरोबरचे काही प्रसंग अंगावर काटा आणतात. त्यानंतर तिनं कधी मागे वळून पाहिलं नाही. तिची अनिल कपूर बरोबर जोडी जमली. पुढं ‘अंजाम’ सिनेमा मी दुसऱ्यांदा पाहणं टाळलं. मला त्यातलं, ‘चनेके खेतमे’ हे गाणं प्रचंड आवडतं. काय नाचलीयं आणि काय तिचा मुद्राभिनय. शाहरुखला ती त्यात लग्न झालेली असून तिच्याबद्दल आपलीच व्हावी अशी भावना होणं साहजिकच होतं. पण पुढं तो त्या सिनेमात जो तिचा छळ करतो ते पाहवत नाही. हा सिनेमा आहे. हे खोटं आहे हे उमगूनही शाहरुखला तिथल्या तिथे गोळी घालावी अस वाटतं, इतका तिने अभिनय उत्तम केला.

पुढं तिचे सिनेमे गाजतच गेले. राम लखन आला आणि मग बेटा. या सिनेमाचं नाव बेटा असलं आणि त्यात अनिल कपूरने बेट्याची भूमिका केली असली तरी बेटी खऱ्या अर्थानं भाव खाऊन गेली. त्यातला तिचा ‘‘धगधग करने लगा’’ या गाण्यावरचं नृत्य तर तरुणांना वेडपिसं करून गेला. म्हटलं तर हा सेक्सी नाच. कडकडीत ब्रह्मचाऱ्याचं व्रत घेतलेल्या संन्याशाला ‘आपण पायावर का धोंडा मारून घेतला’असं वाटावं असा नाच. पण तरीसुद्धा तो नाच बीभत्सपणाची लक्ष्मण रेषा ओलांडत नाही. त्या नाचात सुद्धा एक प्रकारचा सुसंस्कृतपणा आहे, हे आपल्याला जाणवतं. जसं मधुबालाला सेक्सीपणा दाखवण्यासाठी कधी पदर पडावा लागला नाही तसं माधुरीलासुद्धा अशा गोष्टी कराव्या लागल्या नाहीत.

तिचं खलनायक मधलं गाणं ‘चोली के पीछे क्या है’ या गाण्याने धमाल उडवली. त्या काळात दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओवर त्या गाण्यावर अघोषित बंदी घातली गेली होती अनेक संस्कृतिरक्षकांची कानशील दोन्ही अर्थाने तापली होती. त्यातला मुखडा द्वैअर्थी आहे. पण ते राजस्थानी मातीतलं गाणं आहे आणि माधुरीनं गाणं पेश करताना कुठेही चावटपणा केलेला नाही. आत्ताची गाणी जर पाहिली तर ते गाणं बालगीत या सदरात मोडू शकतं. तिच्या पायी वेडं होणाऱ्यांच्या यादीत आणखीन एक नाव होतं चित्रकार मकबूल फिदा हुसेन. ते माधुरीवर, या सिनेमावर फिदा होते. त्यानं तो सिनेमा तब्बल ६७ वेळा पाहिला. त्यांनी गजगमिनी नावाचा सिनेमा काढला. त्यात माधुरीला घेतलं. तिला पाच भूमिका दिल्या. सिनेमा आपटला. कारण तो फक्त हुसेनला कळला.

सुरुवातीच्या काळात तिची एखाद दोन प्रेम प्रकरणं गाजली. विशेषतः संजय दत्त बरोबरचं. पण पुढं संजय दत्त तुरुंगात गेला आणि ती हळूच ‘मै चुप रहूंगी'' म्हणत या वादातून सही सलामत बाहेर आली. त्यानंतर १९९९ मध्ये तिनं डॉक्टर श्रीराम नेने यांच्याबरोबर लग्न केलं. मग ती अमेरिकेला गेली. संसारात रमली. टिपिकल बायको बनून मुलांना शाळेत सोडलं. त्यांची देखभाल केली. बाजारहाट केला. पण जेव्हा ती भारतात परतली आणि मग रियालिटी शो, एखादा सिनेमा किंवा आता ‘ओ टी टी’ प्लॅटफॉर्मवर आल्यावर पुन्हा ग्लॅमरच्या दुनियेत अशी काही मिसळली जशी नदी स्वतःला समुद्रात झोकून देते. आधीचा मान, ते वलय, या सगळ्यासकट माधुरी दीक्षित नावातली जादू तिनं तीळभरही कमी होऊ दिलेली नाही.

(लेखक चित्रपट व क्रीडाक्षेत्राचे अभ्यासक असून त्यांची या विषयांवरची अनेक पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com