‘शास्त्रीय बाजा’चा गायक dwarkanath sanzgiri writes classical music songs singer manna dey movie entertainment | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Manna Dey

‘शास्त्रीय बाजा’चा गायक

मन्ना डे म्हटलं की, आपल्या कानात शास्त्रीय संगीतावर आधारित गाणी आपोआप वाजायला लागतात. मग ते ‘लागा चुनरी में दाग’ असो किंवा ‘तेरे नयना तलाश’ असो, किंवा ‘फूल गेंदवा न मारो’ असो. मागच्या लेखात मी म्हटल्याप्रमाणे त्यांचे पहिले गुरू अर्थातच के. सी. डे म्हणजे त्यांचे काका. मुंबईत आल्यावर उस्ताद अब्दुल रहमान, उस्ताद गुलाम मुस्तफा खाँ यांच्याकडे त्यांनी गाण्याचं शिक्षण घेतलं, त्याचा त्यांना पार्श्वगायनात फायदा झाला. त्यांना मोहम्मद रफी नेहमी विचारत असे, ‘‘तुझा आवाज सहज कसा वर चढतो?’’ बर्मनदाही म्हणत, ‘‘मन्नादा मला आवडतो, कारण त्याचा पहाटेचा रियाज तो कधीही चुकवत नाही.’’ आणि तरीही मन्नादांना शास्त्रीय गायक व्हावंसं वाटलं नाही.

कारण त्यांना शास्त्रीय संगीत कंटाळवाणं वाटायचं. शास्त्रीय संगीत गायक म्हणून स्वतःची जागा तयार करण्यासाठी भरपूर वेळ लागेल, तोपर्यंत केस पांढरे होऊन जातील, ही त्यांची धारणा होती.

एक किस्सा सांगण्यासारखा आहे. ‘बसंत बहार’ सिनेमात त्यांना पंडित भीमसेन जोशींसमोर गायचं होत. त्यांनी बायकोला सांगितलं, ‘चल सामान बांध, आपण बाहेरगावी जातोय.’ तिने विचारलं, ‘का?’ ते म्हणाले, ‘मला भीमसेनसमोर गायचं आहे. केवढा मोठा गायक तो! माझं हसं होईल.’ त्यांची बायको म्हणाली, ‘पळता कशाला, घ्या आव्हान. शेवटी हिरोचा आवाज तुमचा आहे आणि हिरो जिंकतो.’ मन्ना डेंनी कसून सराव केला, ते गायले. भीमसेन त्यांना म्हणाले, ‘तू शास्त्रीय संगीतात नाव कमावू शकशील.’

मोठ्या गायकाकडून मोठी स्तुती; पण त्यांना त्यात रस नव्हता. ‘‘त्यापेक्षा यशस्वी पार्श्वगायक होणं जास्त सोपं आहे, त्यात पैसाही आहे,’’ हे त्यांनी स्वतः म्हटलं. हा त्यांनी दाखवलेला प्रामाणिकपणा आहे. पण, विविध शास्त्रीय संगीतांवर आधारित सिनेमांच्या गाण्यांतून त्यांनी शास्त्रीय गाण्यावरचं प्रेम नक्कीच दाखवलं. उदाहरणार्थ ‘मेरे हुजूर’मधलं ‘झनक झनक तोरे बाजे पायलिया’ हे दरबारी रागातलं गाणं. सतार आणि तंतुवाद्यांचा फार सुंदर उपयोग ह्या गाण्यात केलाय.

सुरुवातीला जम बसण्यापूर्वी मन्ना डे द्विधा मनःस्थितीत होते. ते शिवाजी पार्कला राहून कंटाळले. शिवाजी पार्कला कंटाळलेला असा मी ऐकलेला पहिला आणि बहुधा शेवटचा माणूस. ते कंटाळून कलकत्त्याला निघाले होते; पण त्याच वेळेला बर्मनदांनी मन्ना डेंना ‘मशाल’ चित्रपटात ‘उपर गगन विशाल’ हे गाणं दिलं आणि ते सुपरहिट झालं. हिंदी सिनेमातल्या त्यांच्या अंधाऱ्या रस्त्यावर अचानक दिवे लागले आणि तो रस्ता त्यानंतर कायमचा उजळून गेला. मन्ना डेंकडे बर्मनदांचे अनेक किस्से होते.

ते म्हणत, ‘बर्मनदा एखाद्या गाण्याची रिहर्सल माझ्याकडून करून घेत आणि मग ‘बाँडरफुल’ असं तोंडात रसगुल्ला ठेवल्यागत दाद देत; पण शेवटी गाणं रफीकडून गाऊन घेत. जेव्हा मी रफीचं गाणं ऐकायचो, त्या वेळी मला त्यांचा निर्णय पटायचा. ते मला सांगायचे, मन्ना गाण्यात प्रेम ओत, थोडंसं प्रेम ओत. गाणं चमचमीत होऊ दे...’ आणि खरंच मन्ना डेंनी त्यांची काही गाणी प्रेम ओतून गायली. त्यातलं एक म्हणजे ‘सोचके ये गगन झुमे’ हे ‘ज्योती’ सिनेमातलं गाणं. आनंद बक्षीने लिहिलंय. बाँगोचा वापर फार सुंदर केलाय. म्युझिकल गेम असं त्याचं वर्णन करता येईल.

बर्मनदा म्हणत असत, ‘एखादं गाणं अवघड, क्लिष्ट आणि रागावर आधारित असेल, तर माझा पहिला फोन मन्नादाला असतो,’’ त्यामुळे ‘तलाश’ चित्रपटाच्या वेळी ‘तेरे नैना तलाश करे’ या गाण्यासाठी त्यांनी मन्नादांची निवड केली. त्या सिनेमाचा निर्माता होता ओ. पी. रल्हन. त्याला वाटत होतं ते गाणं मुकेशने गावं. हे गाणं मुकेशकडून गाऊन घ्यायचं म्हणजे कॉकटेल पार्टीत मसाला दूध वाटण्यासारखं आहे. दादांनी त्याला समजावून सांगितलं की, हे गाणं मुकेशसाठी नाही; पण रल्हन ऐकेना.

तो म्हणाला, ‘मग तुम्ही अशी चाल बनवा, जी मुकेशच्या गळ्याला योग्य आहे.’ दादा प्रचंड भडकले आणि म्हणाले, ‘मला तुझ्या सिनेमाला संगीत द्यायचं नाही. तुझे पैसे घरी येऊन घेऊन जा.’ रल्हन घाबरला, त्याने दादांची माफी मागितली; पण बर्मनदांचा राग गेला नाही. शेवटी विजय आनंद मध्ये पडला. ते गाणं सुपर हिट ठरलं. बर्मनदा रात्री नऊ वाजता एकदा मन्ना डेंच्या घरी गेले. कुठल्या अवतारात असतील? त्यांनी एक लुंगी घातली होती आणि वर बनियन. त्यांना त्या अवतारात पाहून मन्नादांना आश्चर्य वाटलं. त्यांच्या हातात कागद होता आणि ते काहीतरी गुणगुणत होते.

त्यांनी सांगितलं, ‘तुझं हार्मोनियम काढ आणि उद्या आपल्याला हे गाणं रेकॉर्ड करायचं आहे. रिहर्सल करायला तुझ्याकडे फक्त आजची रात्र आहे. अहिर भैरव रागावर मी ही सुरावट तयार केली आहे. मन्ना डेंनी थोडा सराव करून ते गाणं दादांना ऐकवलं. दादा खूष झाले. एका रात्रीत तयार केलेलं ते गाणं होतं, ‘पूछो ना कैसे मैने रैन बिताई.’ हे गाणं दादांनी एका टेकमध्ये रेकॉर्ड केलं. रेकॉर्डिंग संपल्यावर स्टुडिओमध्ये शांतता होती.

मन्नादांना कळेना काय झालं, त्यांचं काय चुकलं! बर्मनदांना त्यांनी विचारलं, तर बर्मनदा म्हणाले, ‘‘अरे तू गाणं इतकं सुंदर गायला आहेस की, प्रत्येकाच्या डोळ्यांत पाणी आलं.’’ पण गंमत पहा, या गाण्याला फिल्मफेअर पारितोषिक मिळालं नाही. त्या काळात डोळ्याच्या ऑपरेशनसाठी बर्मनदा हॉस्पिटलमध्ये होते. मन्ना डे तिथं त्यांना भेटायला गेले.

दादांनी सहजच मन्नादांना विचारलं, ‘गाण्याला पारितोषिक मिळालं?’ मन्ना डे म्हणाले, ‘नाही.’ दादा म्हणाले, ‘यापेक्षा चांगलं कुणाला गाता येईल?'

असंच काहीसं ‘उपकार’मधल्या ‘कसमे वादे प्यार वफा’ या गाण्याच्या बाबतीत झालं. हे गाणं प्रथम कल्याणजी आणि आनंदजी यांनी किशोर कुमारला दिलं होतं. किशोर कुमारने कल्याणजींना सांगितलं, ‘‘हे गाणं मन्ना डेला द्या.’’ मन्ना डे ते गायले आणि ते सुपरहिट झालं. मन्ना डेंना वाटलं की, आपल्याला राष्ट्रीय पारितोषिक मिळणार; पण ते त्यांना मिळालं नाही आणि मन्ना डे खूप नर्व्हस झाले.

ते नर्व्हस मूडमध्ये असताना त्यांना लता मंगेशकरांचा फोन आला आणि लतादीदींनी त्यांना सांगितलं, ‘मन्नादा तुझ्या ‘कसमे वादे’ने मला वेड लागलंय, हे गाणं माझ्या कानांत इतकं ठाण मांडून बसलं आहे की, मला माझी रेकॉर्डिंग रद्द करावीशी वाटतात. इतक्या सुंदरपणे तू त्या गाण्यात भावना कशा ओतू शकलास?’ लतादीदींच्या ह्या कौतुकाने त्यांचं नैराश्य पळालं.

मन्ना डे यांना शंकर जयकिशन यांच्याबद्दल प्रचंड आदर होता. विशेषतः शंकरबद्दल. त्यांचं म्हणणं होतं, ‘‘माझ्यातून सर्वोत्कृष्ट कसं काढून घ्यायचं हे शंकरला जेवढं कळलं, तेवढं इतरांना नाही कळलं, अगदी बर्मनदांनासुद्धा नाही.’’ ते म्हणतात, ‘‘बर्मनदांना वाटायचं की, मी त्यांच्या गुरूप्रमाणे म्हणजे के. सी. डेंच्या शैलीत गावं. पण, शंकर जयकिशन यांनी माझी गुणवत्ता ओळखून त्याप्रमाणे चाली तयार केल्या.’

नौशाद यांचं म्हणणं होतं की, मन्ना डेंचा आवाज थोडा ड्राय होता, त्यामुळे रोमँटिक गाणं त्यांच्या गळ्यासाठी योग्य नाही. पण ‘चोरी चोरी’, ‘श्री ४२०’मधली सुंदर रोमँटिक गाणी गाऊन नौशादचं मत किती खोटं आहे, हे मन्नादांनी सिद्ध केलं. एकापेक्षा एक सुंदर गाणी ते गायले. उदाहरणार्थ ‘ये रात भीगी भीगी’, ‘जहाँ मै जाती हूं वही चले आते हो’, ‘प्यार हुआ इकरार हुआ’, ‘मस्ती भरा है समा’ हे शेवटचं गाणं अर्थातच दत्ताराम म्हणजे शंकर जयकिशन यांचे साहाय्यक यांचं आणि हो, ‘आजा सनम मधुर चांदनी में हम’ राहिलंच की.

शंकरने शास्त्रीय संगीतात मुरलेली गाणी, ही मन्ना डेंची ताकद ओळखून ‘बसंत बहार’मध्ये तशा प्रकारची गाणी दिली; पण ‘श्री ४२०’सारख्या सिनेमात ‘दिल का हाल सूने दिलवाला’सारखी गाणी त्यांनी मोठ्या हिरोसाठी, म्हणजे राज कपूरसाठी दिली. दादांनीसुद्धा देव आनंदला काही वेळेला मन्ना डेंचा आवाज दिला; पण अगदी मोजकीच गाणी.

मेहमूदसाठीही मन्ना डेंचा आवाज वापरला गेला. बंगालमध्ये संगीत क्षेत्रात एक वरचा वर्ग आहे. त्यांना मन्ना डेंनी मेहमूदची गाणी म्हणावी हे अजिबात आवडलं नाही. त्यांना काही लोकांनी ऐकवलं, ‘‘मेहमूदची गाणी काय म्हणतोस?’ पण बर्मनदा आणि रोशनसारख्या संगीतकारांनी मन्ना डेंचा आवाज मेहमूदसाठी राखून ठेवला होता.

शेवटी काही जवळच्या मित्रांनी सांगितलं, ‘‘अरे मेहमूद तर मेहमूद; पण तुझी हक्काची गाणी तुला मिळतात,’’ आणि त्याचा फायदा त्यांना झाला. त्यांनी मेहमूदला दिलेली अनेक गाणी गाजली. मग ‘आओ, ट्विस्ट करे’ असो किंवा ‘प्यार की आग में तन बदन जल गया’ किंवा ‘पडोसन’ची गाणी असोत. मन्ना डे हिरोंचे गायक नसतील; पण फिल्म इंडस्ट्रीत शेवटपर्यंत पाय रोवून उभे राहिले.

(लेखक चित्रपट व क्रीडाक्षेत्राचे अभ्यासक असून, त्यांची या दोन्ही विषयांवर अनेक पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत.)