
रफी, किशोर, लता, आशा यांच्याप्रमाणे मन्ना डेंचं पार्श्वगायनाचं राज्य प्रचंड कधीच नव्हतं. त्यांचं एक छोटं; पण सुरेल राज्य होतं. शास्त्रीय संगीतावर आधारित गाणं हा त्या राज्याचा भक्कम पाया होता.
गाण्यापलीकडचे मन्ना डे
रफी, किशोर, लता, आशा यांच्याप्रमाणे मन्ना डेंचं पार्श्वगायनाचं राज्य प्रचंड कधीच नव्हतं. त्यांचं एक छोटं; पण सुरेल राज्य होतं. शास्त्रीय संगीतावर आधारित गाणं हा त्या राज्याचा भक्कम पाया होता. आधी तलत, मग रफी, नंतर किशोर हे त्या त्या काळात, पार्श्वगायनाचे हिरो होते; पण मन्ना डेंनी त्यांच्याबरोबर कधीही स्पर्धा केली नाही. याचं कारण असं की, त्यांचा आवाज हा एका विशिष्ट हिरोचा आवाज कधीच नव्हता, किंबहुना तो हिरोचा आवाजही नव्हता.
म्हणून ते सर्व हिरोंसाठी गायले. पण कधी? तर जेव्हा ती गाणी त्यांच्या राज्याच्या हद्दीतून जात तेव्हा. सुप्रसिद्ध अंध गायक के. सी. डे यांचे ते पुतणे. मन्ना डेंच्या वडिलांना त्यांनी वकिली करावी असं वाटत होतं. झालं काय, त्यांच्या काकांकडे सचिन देव बर्मन गाणं शिकायला येत. त्यांचं गाणं ऐकता ऐकता मन्ना डेंना गायक व्हावं असं वाटे. ते सचिनदांच्या गळ्याच्या इतक्या प्रेमात पडले की, बर्मनदा नाकात गातात म्हणून ते नाकात गायला लागले. त्या वेळी त्यांच्या काकांनी त्यांना सांगितलं, ‘‘कुणाची कॉपी करू नकोस, स्वतःची शैली तयार कर.’’
मन्ना डेंच्या वाडवडिलांचं घर कलकत्त्यात होतं. आपल्या शेजारी कुलकर्णी, गोखले, चव्हाण, धुरी, शहा, गंगवाणी वगैरे रहात असतात, त्यांच्या शेजारी कोण राहत होतं ठाऊक आहे? चक्क स्वामी विवेकानंद. त्यांचा जन्म झाला त्या वेळेला स्वामी विवेकानंद या जगात नव्हते; पण त्यांची आई त्यांना लहानपणी स्वामीजींच्या गोष्टी सांगत असे. त्यांच्या घराच्या जवळ आणखीन एक महान व्यक्ती राहत होती. त्या व्यक्तीचं नाव रवींद्रनाथ टागोर.
त्यांचं कर्तृत्व मन्नादांनी आईच्या तोंडून लहानपणी ऐकलं होतं. तेव्हा स्वातंत्र्यचळवळ जोरात सुरू होती, आजूबाजूला आभाळाएवढी माणसं होती, त्यामुळे मन्नादांवर चांगले संस्कार झाले. त्यांचे हिरो होते सुभाषचंद्र बोस. त्या काळात अनेक तरुणांना वाटत असे की, स्वातंत्र्याचा मार्ग हा बंदुकीच्या नळीतून जातो. बंगाली रक्त तर उसळणाऱ्या माणसाचंच रक्त. त्यामुळे मन्नादांना असं वाटे की, काही काळ संगीत बाजूला ठेवू या आणि बंदूक घेऊन चार ब्रिटिश माणसांना ख्रिस्ताकडे पाठवू या. त्यामुळे असेल, पण राष्ट्रप्रेमाचं गाणं त्यांच्या गळ्यातून नाही, तर चक्क हृदयातून यायचं. एकदा वेस्टइंडीजमध्ये ते स्टेज शो करत होते आणि तिथं त्यांनी त्यांचं काबुलीवाला सिनेमातलं ‘ऐ मेरे प्यारे वतन’ हे गाणं म्हटलं.
एका गोऱ्या बाईने ते गाणं ऐकलं आणि कार्यक्रम संपल्यावर ती त्यांना भेटली आणि म्हणाली, ‘‘तुम्ही जे गाणं म्हटलं, त्याचे एक्झॅक्ट शब्द सांगाल का, ते राष्टप्रेमाचं गाणं आहे का?’ मन्नादा म्हणाले, ‘मी सांगतो; पण तुला कसं कळलं? तुला हिंदी येतं का?’ ती म्हणाली, ‘‘नाही. पण ज्या पद्धतीने तुम्ही ते गायलं, ते पाहून मला असं वाटलं की, ते राष्ट्रप्रेमावर आधारित गाणं आहे.’ त्यांनी पहिलं गाणं १९४२ मध्ये ‘तमन्ना’ सिनेमात म्हटलं.
त्या वर्षी मन्ना डे काकांबरोबर मुंबईत आले, त्यांचा साहाय्यक म्हणून. पगार १५० रुपये होता. त्या वेळी १५० रुपये ही खूप मोठी रक्कम होती आणि आमच्या शिवाजी पार्कला ते रहात. त्या सिनेमातल्या एका गाण्यासाठी त्यांच्या काकांनी अनेक गायक ट्राय करून पाहिले; पण के. सी. डेंचं समाधान होईना. त्यांनी मन्नादांना विचारलं, ‘‘तू गाणं म्हणतोस?’’ मन्ना डे एका पायावर तयार झाले. पहिल्यांदा जेव्हा ते गाणं गायले, त्या वेळेला त्यांच्या काकांना ते पसंत पडलं नाही. काकांनी त्यांना ते कुठं चुकतात ते सांगितलं. दोन-चार प्रयत्न केल्यावर ते पास झाले.
गाणं अर्थातच त्यांनी सुरय्याबरोबर गायलं. तीसुद्धा तेव्हा नवीन गायिका होती. १९४३ मध्ये ‘रामराज्य’ सिनेमात त्यांनी पहिलं सोलो गाणं म्हटलं. त्या सिनेमाचे निर्माते असलेल्या विजय भटना ‘वाल्मीकी’साठी पार्श्वगायन करणारा गायक हवा होता. त्यांनी के. सी. डेंना आधी विचारलं. ते म्हणाले, ‘‘मी ज्या सिनेमात काम करतो, त्या सिनेमातल्या व्यक्तिरेखेसाठीच गातो, मी पार्श्वगायन करत नाही.’ त्यांना खर्जातल्या आवाजात गाणारा गायक हवा होता.
के.सी. म्हणाले, ‘माझा पुतण्या मन्ना हे गाणं गाईल.’’ मन्नाकडे पाहून विजय भट्ट हतबुद्ध झाले. एवढा तरुण मुलगा आणि खर्जात कसा गाणार? पण के.सी. त्यांना म्हणाले की, ‘तू त्यालाच गाणं दे.’ आणि मन्नादांनी ते गाणं थेट काकांच्या शैलीत गायलं. तिथून पुढे त्यांनी प्रचंड मोठा प्रवास हिंदी सिनेमात केला.
मन्नादा जर गायक झाले नसते, तर ते उच्च दर्जाचे खेळाडू होऊ शकले असते, ते क्रिकेटपटू होऊ शकले असते; पण त्यांचं गाण्यावर एवढं प्रेम होतं की, फलंदाजी करताना आणि शतकाकडे जाताना ते चक्क गाण्याचा रियाज करत. कदाचित देशाने त्याकाळातला सौरव गांगुली गमावला असावा. ते फुटबॉल खेळत; पण ड्रिबल करत असतानाही त्यांच्या जिभेवर रागाची उजळणी होत असे. बंगाली माणसाच्या रक्तात फुटबॉलप्रेम असतं. मन्नादा मोहन बगानचे, तर बर्मनदादा ईस्ट बंगालचे. केवळ फुटबॉलवरून दोघांची खूप भांडणं होत.
मन्नादा मल्ल होते. त्यांच्या शरीराकडे पाहिलं की ते कळतं. त्यांनी ऑल बंगाल कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतला होता. ते अंतिम सामन्यातसुद्धा पोचले; पण त्या सामन्याला जाताना त्यांची बस ड्रायव्हरबरोबर मारामारी झाली, त्यामुळे त्या सामन्याला ते उशिरा पोहोचले आणि सामना चुकला. पण, त्यानंतर त्यांनी जी बस पकडली, त्या बसने त्यांना थेट संगीत या स्थानकावर उतरवलं.
काकांनी आपल्या पुतण्याचे फाजील लाड मात्र कधी केले नाहीत. एकदा काकांनी मन्नादांना सांगितलं, ‘मी एक ट्यून तयार केली आहे, त्याचं नोटेशन स्टडी कर आणि उद्या महम्मद रफी आला की, त्याच्याकडून गाण्याचा सराव करून घे. रफी ते गाणं गाणार आहे.’ मन्नादा आपल्या काकांना म्हणाले, ‘मी का नको गाऊ?’ काका म्हणाले, ‘मुळीच गाऊ नकोस. तुझा आवाज रफीसारखा नाही, त्यालाच हे गाणं योग्य होईल.’ मन्नादा मनातल्या मनात चरफडले. त्यांनी रफीला गाणं शिकवलं. जेव्हा ते गाणं रफीच्या आवाजात रेकॉर्ड झालं, त्या वेळी त्यांना कळलं की, रफीच ह्या गाण्यासाठी योग्य आहे, असं काकांनी का सांगितलं. पण, तोच रफी सांगायचा की, माझी गाणी तुम्ही सर्वजण ऐकता; पण मी मात्र मन्नांची गाणी ऐकतो. दोघांची मैत्री शेवटपर्यंत टिकली.
महम्मद रफी आणि मन्ना डे यांच्यामध्ये व्यावसायिक स्पर्धा नक्कीच होती; पण स्टुडिओच्या पलीकडे गाढ मैत्री होती. दोघंही खारला जवळ जवळ रहायचे. दोघंही एकत्र पतंग उडवायचे. लहानपणी मन्नादांचा आवडता छंद म्हणजे पतंग उडवणं, त्यात मन्ना डे दादा होते. दोघांच्या पतंगाच्या स्पर्धेत रफी कधीही जिंकला नाही. मन्ना डे नेहमीच रफीचा पतंग कापायचे. त्यांचा मांजा लखनऊ किंवा अहमदाबादवरून यायचा. त्याला स्पेशल स्टार्च लावलेला असायचा.
पतंगसुद्धा ते ऑस्ट्रेलियाहून मागवायचे किंवा ऑस्ट्रेलियातून मागवलेल्या पेपरमधून तयार करायचे. एवढा मोठा गायक झाल्यानंतरसुद्धा संगीताखालोखाल त्यांचं प्रेम होतं पतंग उडवणं आणि महम्मद रफीचे पतंग कापणं. दोघांची मैत्री मन्ना डेंच्या ‘जंजीर’मधल्या गाण्यासारखी वाटते. यारी है इमान मेरा यार मेरी जिंदगी... मन्ना डेंबद्दल, त्यांच्या गाण्याबद्दल आणि त्यांचे इतर किस्से पुढच्या लेखात.
(लेखक चित्रपट व क्रीडाक्षेत्राचे अभ्यासक आहेत या दोन विषयांवर त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत.)