एकटेपणाच्या निवांत सावलीत

प्रा. स्वाती धर्माधिकारी
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

भारतामध्ये एकटे राहणाऱ्यांचे प्रमाण लोकसंख्येच्या पाच टक्के एवढे आहे. अर्थात, हा आकडा 2011च्या जनगणनेनुसार असल्याने त्यात नक्कीच वाढ झाली आहे. आपण केवळ टक्केवारी बघितली तर एवढा विचार करायची गरज काय, वगैरे प्रश्‍न विचारू. पण, लोकसंख्येच्या पाच टक्के हा आकडा विचार करण्यासाठी आवश्‍यक इतकाच नव्हे, तर अक्षरशः घाबरवून सोडणारा आहे. अपंगत्वाचं लोकसंख्येतील प्रमाण तीन टक्के असतं. त्यांच्या बाबतीत जी काही तुटपुंजी विचारशक्ती, जागरूकता समाजात आहे, त्याच्या निम्मीदेखील शक्ती "एकट्यांचा' विचार करण्यासाठी वापरली जात नाही.

भारतामध्ये एकटे राहणाऱ्यांचे प्रमाण लोकसंख्येच्या पाच टक्के एवढे आहे. अर्थात, हा आकडा 2011च्या जनगणनेनुसार असल्याने त्यात नक्कीच वाढ झाली आहे. आपण केवळ टक्केवारी बघितली तर एवढा विचार करायची गरज काय, वगैरे प्रश्‍न विचारू. पण, लोकसंख्येच्या पाच टक्के हा आकडा विचार करण्यासाठी आवश्‍यक इतकाच नव्हे, तर अक्षरशः घाबरवून सोडणारा आहे. अपंगत्वाचं लोकसंख्येतील प्रमाण तीन टक्के असतं. त्यांच्या बाबतीत जी काही तुटपुंजी विचारशक्ती, जागरूकता समाजात आहे, त्याच्या निम्मीदेखील शक्ती "एकट्यांचा' विचार करण्यासाठी वापरली जात नाही. मुळात एकटे राहताना काही समस्या असू शकतात, याचा साकल्याने विचारदेखील क्वचितच होताना दिसतो.

प्रश्‍न हा आहे की, एकटं राहणं ही समस्या आहे का, ती समस्या बनू शकते का, यावर विचार करून मग आवश्‍यक त्या उपाययोजना विचारात घ्यायला हव्यात. एकटं राहणाऱ्या व्यक्ती सतत उदास, चिंतेतच असणार, अशी गृहीतकं चुकीची असली, तरी एकटेपणा आणि डिप्रेशनचा खूप जवळचा संबंध आहे. सरसकट सर्वच एकट्या व्यक्ती एकाकी असणार किंवा असतात, ही चुकीची समजूत आहे. एकटे असूनही आनंदाने जीवन जगणारे, जीवनाकडे अत्यंत सकारात्मकतेने बघून स्वतःमधील गुणांचा, क्षमतांचा उपयोग लोककल्याणाकरिता करणाऱ्या व्यक्ती आपल्याच भोवती दिसतात. मात्र, अशांची संख्या कमी असते. एकट्या राहणाऱ्या स्त्रिया आणि पुरुषांच्या जगण्याशी निगडित प्रश्नदेखील वेगवेगळे असतात. त्यांची उत्तरंसुद्धा वेगवेगळीच, अतिशय वैयक्तिक असणार. ग्रामीण क्षेत्रात एकटे राहणाऱ्या लोकांची संख्या शहरात एकटे राहणाऱ्यांपेक्षा जास्त आहे.

जे एकटे राहतात, त्यांच्या मानसिक समस्यांबद्दल क्वचितच मोकळेपणाने बोललं जातं. एकटेपणा आणि मानसिक आजार याचं खूप जवळचं नातं आहे. याचा अर्थ, एकटेपणा हे मानसिक आजाराचे कारण आहे, असं मात्र नाही. मनोरुग्णांपैकी असंख्य मनोरुग्ण एकटे असतात. शिवाय एकाकीदेखील असतात. एकटे असणे आणि एकाकी असणे या दोन्ही गोष्टी खूप वेगळ्या आहेत. एकटे असलेले एकाकी असतीलच असं नाही. काही जण "भीड में भी अकेले' या गटात मोडणारे असू शकतातच. एकटे असणे ही परिस्थिती असते, तर एकाकीपण ही आपली भावना असते. एक खूप सुंदर वाक्‍य वाचायला मिळालं : सॉलीट्यूड म्हणजे निवांत-एकांत हे मनाच्या श्रीमंतीचं लक्षण असतं, तर एकाकीपण हे मनाच्या दारिद्य्राचं लक्षण'. एकटेपण खायला उठतं, अशी मनाची अवस्था कधी असते? कुणाच्या आठवणी, काही वेदना अशा वेळी व्याकूळ करतात. त्या नाकाराव्यात, असं अजिबात म्हणणं नाही. पण, त्याच वेदनांमध्ये मन गुंतून पडलं आणि "आजच्या' दिवसावरून जर नजर ढळली तर मात्र जगणं कठीण होतं. आयुष्यात एकटेपण अचानक आलंय की त्याची तयारी करायला वेळ मिळालाय, यावरदेखील आपल्या प्रतिक्रिया अवलंबून असतात. मुळात एकटेपणा ही लादलेली, नकोशी परिस्थिती वाटणाऱ्या व्यक्तीला एकाकीपणा येण्याची संभावना जास्त असणार. तर, कलावंतांकरिता हे एकटेपण खूप सृजनात्मकदेखील ठरू शकतं. असंख्य शोध हे टोकाचा एकटेपणा असलेल्यांनी लावले हेदेखील वास्तव आहेच. एकटेपणदेखील देखणं, नितळ, आत्मस्पर्शी असू शकतं. जे आत्मपरीक्षण आपण गोंगाटात लोकांसोबत असताना करू शकत नाही, ते अशा निवांत एकटेपणात सहज साध्य होऊ शकतं. आपण मूलतः सामाजिक जीवन जगायच्या मागे असतो. आपल्याला नातेसंबंध हवेसे वाटतात. आपल्याला लोकांसोबत जोडून घेऊन कोणत्या तरी समूहाचा हिस्सा बनायचं असतं. हे सारं आपल्या नैसर्गिक गुणधर्मानुसार अत्यावश्‍यक असतं. एकटेपणात हे शक्‍य नाही, असा उगाच समज असतो.

ज्यांना एकटेपण टोचत राहतं, अशा लोकांनी डिप्रेशन, चिंताग्रस्तता आणि अन्य मानसिक विकारांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी विशेष प्रयत्न करायला हवेत. त्यांच्यासाठी समुपदेशन, हेल्पलाइन्स उपलब्ध असाव्यात. मात्र, काही एकटे असूनही खूश असू शकतात. संतोष किंवा समाधानी वृत्ती हा सर्वांत महत्त्वाचा व्यवहारगुण असेल तर एकटी असूनही कितीही संकटं आली ती व्यक्ती तुटत नाही. एकाकी व्यक्ती स्वतःला बंदिवान समजत असतात. परिस्थितीच्या हातातलं बाहुलं समजत असतात. तर, एकटेपणा असला आणि व्यक्ती जर मनाने स्वतंत्र असेल तर एका मोकळेपणाचा, स्वातंत्र्याचा अनुभव ती घेऊ शकते. एकाकी असलेल्या व्यक्तींच्या मनातला आकांत त्यांच्या देहबोलीत त्यांच्या वागणुकीतून झिरपतो, तर एकट्या पण निराश नसलेल्या व्यक्ती शांत असतात. स्वीकारामुळे आलेला समंजस, सकारात्मक दृष्टिकोन इतरांनादेखील सहज दिसतो आणि वेळप्रसंगी मार्गदर्शक ठरतो.

काही जणांना एकटे राहण्याचीच भीती वाटत असते. त्यांच्या भीतीची कारणं ही त्यांच्या अनुभवांमध्ये सापडू शकतात. कधीकधी लहानपणी झालेल्या छळवणुकीच्या काळ्या छाया मनावर सावट धरून असतात. त्यातूनच एकटे राहण्याची प्रचंड भीती निर्माण होते. अशा वेळी समुपदेशनातून त्यावर उपचार करून घ्यायला हवेत. एकाकी असलेल्या व्यक्ती आणि अशी भीती वाटणाऱ्या व्यक्ती अत्यंत अस्वस्थ असतात. समाधान, तृप्ती त्यांच्याशी लपंडाव खेळतात, असं त्यांना वाटत असतं. क्वचित यासाठी सदोष पालकत्वाकडेदेखील अंगुलीनिर्देश करता येईल. कारण, निराशा कशी झेलायची, एकटे असताना शांत राहून आणि न घाबरता कसं राहता येईल याची बीजं पालकत्वामध्ये, पालकांच्या बालसंगोपन पद्धतींमध्ये असतात.

एकटेपणावर मात करायची असते. ती आपल्या जगण्याला समृद्धी देऊन, काहीतरी सर्जनशील कृती केली, कुणाशी जोडून घेतलं, एखाद्या मोठ्या कामाला स्वतःला वाहून घेतलं तरी एकाकीपणा कमी करता येईल किंवा दूरही ठेवता येईल. एका लहानशा आयुष्याच्या प्रवासात अशा कितीतरी गोष्टी आहेत, ज्या आपल्याला माहिती नसतात. त्यांची माहिती मिळवणं, वाचन, संगीत ऐकणं, त्यात रममाण होणं याने एकटेपणा हमखास दूर होतो. जवळ एखादा पाळीव प्राणी असला, तरी त्याच्याशी संवाद साधल्यानेदेखील एकटेपणा कमी होऊ शकतो. आपल्या सर्वांध्ये एक कुतूहल असतं. नावीन्याची ओढ असते. प्रयोगशीलता असते. त्याची कास धरत आपण आयुष्याची वाटचाल अधिक मनोरंजक करू शकतोच की! आयुष्यात एकटेपण येणं ही काळाची वळणं असतात. कधी माहीत असलेली, कधी अनपेक्षित, मात्र त्या वळणावर वळताना-मनात आठवणींचे असंख्य दीप तेवत ठेवत, आज ऐकलेला प्रेमाचा आपुलकीचा शब्दन्‌ शब्द जपत एकटेपणाचा आनंद उपभोगायचा. हे कठीण असेल; पण अशक्‍य नाही ना? करून बघूयात!

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ekatepanachya nivant sawalit