इमोशनल फर्स्ट एड

Emotional
Emotional

प्रियाची व माझी नुकतीच भेट झाली. तिला भेटल्यावर जे काही कळलं ते कोड्यात टाकणारं होतं. तिचा नवरा एका मोठ्या आयटी कंपनीत मोठ्या हुद्द्यावर आहे. पण गेले काही महिने त्याचं दारू पिण्याचं प्रमाण वाढलं आहे. स्वतःमध्ये मग्न राहणं, चिडचिड करणं, काही विचारल्यास न सांगणं, अशाने ती कंटाळली. त्याच्या वागण्याचं त्याला काही गैर वाटत नव्हतं. ‘‘मी पुरुष आहे आणि माझ्यावर भावनांचा काहीच परिणाम होत नाही, असं त्याचं म्हणणं होतं.’’

माझं काम माहीत असल्याने प्रियाने मला घरी गप्पा मारण्याच्या निमित्तानं त्याच्याशी बोलायला सांगितलं आणि बोलताना माझ्या लक्षात आलं की, ‘‘ऑफिसचं काम त्याला त्रासदायक झालं होतं. प्रोजेक्‍ट मॅनेजरच्या हुद्‌द्‌यावर असल्याने रात्रीचे कॉल्स, सहकाऱ्यांना सांभाळून घेऊन काम करून घेणं, मॅनेजमेंटशी जुळवून घेणं, रोजचा ट्रॅफिकमधून प्रवास असा त्याचा दिवस जायचा. त्यातच त्याला पाठदुखीचं दुखणं सुरू झालं अन्‌ त्याचं वजनही वाढलं. त्यातच व्यायामाचा अभाव. या सगळ्या गोष्टी कशा हाताळायच्या याचं कुठेच प्रशिक्षण नव्हतं. प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात काम केल्यानं शरीर त्याला इशारा देत होतं, पण ते न समजल्याने तो गोंधळला होता अन्‌ त्यातच त्याला व्यसन लागलं.

प्रियाच्या नवऱ्याला भावना, त्याच्या मेंदूतील अमिग्डला (Amygdala) नावाचं घर, चुकीच्या भावनांचे होणारे शारीरिक दुष्परिणाम, ताणात असताना दारू आणि तंबाखूचं व्यसन लवकर कसं लागतं या सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्यावर बऱ्यापैकी त्याचं काय चुकलं याची जाणीव झाली. स्वतःला आणि नात्यांना वेळ देणं हे किती गरजेचं आहे हे लक्षात आलं.

सतत ताणात काम करून शरीर आणि मन थकतं व जसं तेल संपल्यावर दिवा विझतो तसं हळूहळू माणूस ‘Burnout’ या अवस्थेकडे जातो. जिथून परत येण कठीण असतं.  जसं आपण शरीराला काही झालं, तर ‘फिजिकल फर्स्ट एड घेतो’,  तसंच मनालासुद्धा ‘इमोशनल फर्स्ट एड’ची गरज असते. त्यामुळे वेळोवेळी भावनांवर लक्ष ठेवणं आणि त्या व्यक्त करायला शिकणं हे स्त्रियांइतकंच पुरुषांसाठीसुद्धा गरजेचं असतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com