फेसबुक आपण आणि केंब्रिज अॅनालिटिका...

Facebook
Facebook

फेसबुकवर वेगवेगळे अॅप वापरून तुम्हीही सरपंच किंवा आमदार, खासदार बनताय का ? पण ते अॅप्स तुमच्या फेसबुक प्रोफाईलला लिंक होताना काय काय माहिती एक्सेस करतायेत याची माहिती घेतली का ? याच माहितीचा वापर करून तुमच्यावर टार्गेटेड अॅडव्हर्टायझिंगचा मारा होऊ शकतो, हीच माहिती तुमचं एखाद्या राजकीय नेत्याबद्दलचं मत बदलू शकते किंवा तुम्हाला गरज नसलेल्या गोष्टी विकत घ्यायलाही भाग पाडू शकते.

केंब्रिज अॅनालिटिका या कंपनीने कोट्यवधी अमेरिकन नागरिकांचा फेसबुक डाटा वापरून अमेरिकन निवडणुका मॅनेज केल्याचे उदाहरण आपल्या सर्वांसमोर आहेच. फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग याने माफी मागूनही फेसबुक आणि कोट्यवधी युजर्सच्या डाटा चोरीचे हे प्रकरण एवढ्यातच संपणार नाही. आपण फेसबुकवर आवडत्या पेजेस ला लाईक करतो, एखादी पोस्ट आवडली तर तिलाही लाईक करतो, पण तुमच्या या लाईक्स मधून तुमच्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये, कंगोरे स्पष्ट होत असतात, आता या लाईकच्या माहितीवरून तुमची सायकोलॉजिकल प्रोफाईल बनवून तुम्हाला आवडू शकेल अशाच वस्तू किंवा आवडेल असाच राजनेता किंवा राजकीय पक्ष जर कुणी तुम्हाला विकू लागले तर ?

फेसबुकवर जाहिराती करणाऱ्या कंपन्या सहसा याच तंत्राचा वापर करत असतात, पण केंब्रिज अॅनालिटिकाने यापेक्षाही पुढची पातळी गाठत कोट्यवधी फेसबुक युजर्सचा डाटा त्यांच्या संमतीशिवाय गोळा करून अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्याचा (गैर)वापर केला. अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीआधी बऱ्याच फेसबुक युजर्सना एक क्विझ अॅप वापरायची ऑफर आली होती, या युजर्सनी त्या अॅपमध्ये आपली व्यक्तिमत्व-विषयक माहिती भरायची, आपली फेसबुक प्रोफाईल त्या अॅपला लिंक करायची आणि त्याबदल्यात २ ते ५ डॉलर्स मिळवायचे अशी ती ऑफर होती. त्या अॅपच्या फॉर्म मध्ये भरलेली माहिती हि थेट केंब्रीज अॅनालिटिका या (डोनाल्ड ट्रंप यांच्या सोशल मिडिया मोहिमेचं नियोजन करणाऱ्या) कंपनीकडे जात होती. ती कंपनी मिळालेली माहिती आणि त्या युजरने लाईक केलेले पेजेस यांचा ताळमेळ घालून प्रत्येक युजरची एक सखोल सायकोलॉजिकल प्रोफाईल बनवत होती, यापेक्षा भयानक आणि महत्वाचे म्हणजे केंब्रीज अॅनालिटिका त्या युजरच्या सर्व फेसबुक मित्रांचीही माहिती याचवेळेस दिलेल्या एक्सेस मधून मिळवत होती, अशा प्रकारे पहिल्या १००० सिडर्स (माहिती भरणारे) कडून केंब्रीज अॅनालिटिकाने तब्बल १,६०,००० लोकांची माहिती त्यांच्या संमती शिवाय मिळवली होती. पुढे अशाप्रकारे फक्त काही लोकांच्या प्रोफाईल एक्सेसचा वापर करून केंब्रीज अॅनालिटिकाने कोट्यवधी युजर्सचा डाटा मिळवला होता.

विशेष म्हणजे हे क्विझ फेसबुकवर नव्हते तर अॅमेझॉनच्या 'मॅकेनिकल टर्क' या साईटवर होते. म्हणजे तुमचा फेसबुक डाटा चोरी जाण्यासाठी तुम्ही फेसबुकच्याच साईटवरून माहिती भरली पाहिजे असेही काही नाही. आपण ईमेल व पासवर्ड न वापरता कित्येक वेबसाईटवर 'Sign up with Facebook' हा पर्यायही वापरत असतो तिथूनही तुमची माहिती चोरीस जाऊ शकते. अशा साईट्स साईन अप करताना आपण फेसबुककडून काय काय माहिती घेणार याची यादी दाखवत असतात. त्यामुळे नाव, इमेल आयडी आणि वय यापेक्षा जास्त माहिती मागणाऱ्या अॅप किंवा साईट्स पासून सावध राहिलेलेच बरे.

खरंतर या प्रकारचं राजकीय कॅम्पेनींग आपल्या देशातही होत आहे. अर्थात अमेरिकेत झाला तितका मोठा व त्या प्रकारचा डाटाचा गैरवापर वापर भारतात होत नाही हे हि तितकेच खरे आहे पण भारतातही केंब्रिज अॅनालिटिकाने आपले हातपाय पसरायला सुरु केलेले आहेत. त्यांची एक सहकारी कंपनी आपल्या देशात २००८ पासून काम करते आहे आणि फेसबुक प्रचंड लोकप्रिय सोशल मिडिया साईट असल्याने सरकार फेसबुकवरही बंदी घालू शकत नाही. अशा स्थितीत आपणच सोशल मिडिया वापरताना आपल्या प्रायव्हसीची काळजी घ्यावी हे उत्तम, आणि अजून एक महत्वाचे, ते फेसबुकच्या कमेंट बॉक्स मध्ये 'BFF' लिहून फेसबुक अकाऊंट सुरक्षित आहे कि नाही हे पाहता येत नाही. BFF लिहिल्यावर रंग बदलणे हे फेसबुकच्या नवीन फीचर्सचा भाग आहे, तुम्ही तुमचं अॅप अपडेट करून हे फिचर वापरू शकता. त्याचा तुमच्या अकाऊंटच्या सुरक्षेशी काहीही संबंध नाही.

आपली माहिती कुणाच्या हाती पडू नये असे वाटत असले तर फेसबुकवरचे वेगवेगळे अॅप्स (तुम्ही कुठल्या नेत्या/हिरोसारखे दिसता, तुम्हाला कुठला शेर सूट होतो याप्रकारचे) वापरताना सावधानता बाळगावी हाच एकमेव उपाय आहे.
 

(लेखक सोशल मिडिया सल्लागार म्हणून काम करतात)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com