पिंप्री बुद्रुकमध्ये कबीराचा जागर

उत्तम कांबळे
रविवार, 25 डिसेंबर 2016

दशकं उलटली...शतकं उलटली...कबीर अखिल मानवजातीला दिशा दाखवत उभाच आहे. मात्र, घेणारा कबीराकडून किती घेऊ शकतो, हाच प्रश्‍न असतो. कबीराच्या दोह्यांमधलं जीवनधन एका खेड्यानं मनापासून जपलं आहे. जळगाव जिल्ह्यातल्या एरंडोलपासून सात-आठ किलोमीटरवर असलेलं जेमतेम १५०० लोकवस्तीचं पिंप्री खुर्द हे ते गाव. इथली निम्म्याहून जास्त लोकसंख्या कबीरपंथी आहे. सोनार, मराठा, माळी, दलित अशा वेगवेगळ्या जातींमधल्या लोकांनी कबीरपंथ स्वीकारला आहे. या सगळ्यांनी आपापली जात संपवून टाकली आहे. जातिभेदाच्या खुणा पुसट पुसट होत चालल्या आहेत.
 

दशकं उलटली...शतकं उलटली...कबीर अखिल मानवजातीला दिशा दाखवत उभाच आहे. मात्र, घेणारा कबीराकडून किती घेऊ शकतो, हाच प्रश्‍न असतो. कबीराच्या दोह्यांमधलं जीवनधन एका खेड्यानं मनापासून जपलं आहे. जळगाव जिल्ह्यातल्या एरंडोलपासून सात-आठ किलोमीटरवर असलेलं जेमतेम १५०० लोकवस्तीचं पिंप्री खुर्द हे ते गाव. इथली निम्म्याहून जास्त लोकसंख्या कबीरपंथी आहे. सोनार, मराठा, माळी, दलित अशा वेगवेगळ्या जातींमधल्या लोकांनी कबीरपंथ स्वीकारला आहे. या सगळ्यांनी आपापली जात संपवून टाकली आहे. जातिभेदाच्या खुणा पुसट पुसट होत चालल्या आहेत.
 

बारा डिसेंबरच्या भरात आलेल्या दुपारी मी आणि आल्हाद जोशी पिंप्री खुर्द या छोट्याशा खेड्याकडं निघालो होतो. एरंडोलपासून सात-आठ किलोमीटरवर एखाद्या बेचक्‍यात अडकल्यासारखं हे गाव आहे, असं सांगण्यात आलं. रस्त्याला लागलो आणि काही क्षणांतच मुगसांचा एक मोठा कुटुंबकबिला आडवा आला. दोन-चार पिल्लं, मुंगूस आणि मुंगशी असं हे कुटुंब असावं. ड्रायव्हरनं गाडी एकदम हळू केली आणि हा कबिला निघून गेला. मुंगूस म्हणजे कुबेराचं वाहन, असं म्हणतात. खजिन्याचे सगळे साठे मुंगसाला ठाऊक असतात, असंही सांगितलं जातं; पण ‘साठा सापडला’ असं ठोस सांगणारं कुणीच नसतं. मुंगसाचं दर्शन आजही खेड्यापाड्यात शुभशकुनाचं समजतात. जगण्याच्या लढाईत अडकलेलं आणि पर्यावरण कोसळण्याच्या काळात कसंतरी तग धरून राहिलेलं मुंगूस स्वतःसाठी अन्न कधी शोधणार आणि खजिना कधी दाखवणार हा प्रश्‍नच आहे.

एरंडोल भागात अलीकडं भेंडीचं पीक मोठ्या प्रमाणात येतंय. या गावातून रोज दोन-तीन ट्रक भेंडी मुंबईकडं कूच करत असते. केळीच्या आणि भेंडीच्या रानातही हे मुंगूस व्यक्त होत असतं. पाच-दहा मिनिटांचा प्रवास केल्यानंतर आमच्या लक्षात आलं, की आम्ही पिंप्री बुद्रुकला नव्हे, तर पिंप्री खुर्दला पोचलो आहोत. चौकात एकाला बुद्रुकचा रस्ता विचारला. तो म्हणाला ः ‘‘शॉर्टकट पाहिजे तर इकडं फाकून घ्या; पण रस्ता खड्ड्यातून जातोय. चांगला रस्ता पाहिजे तर तिकडं फाकायचं.’’ आम्ही चांगला रस्ता पकडला. मोठमोठे नेते असलेल्या जिल्ह्यात खड्ड्यानं भरलेले रस्ते पाहिले, की विकास कोणत्या मार्गानं आणि कुणाचा होतोय हे लक्षात यायला वेळ लागत नाही. जळगाव जिल्ह्यात कुठल्याही खेड्यात, कुठल्याही खराब रस्त्यावर जा... होर्डिंगवर एकनाथ खडसे, त्यांची पत्नी, सून किंवा मुलगी यांचा भला मोठा फोटो पाहायला मिळतोच. रस्ता चुकल्याचं आम्हाला वाईट वाटलं. ‘कबीरा कहे जग अंधा’ ही ओळ आपसूकच ओठावर आली. ज्यांना जास्त दिसतं, तेच जास्त अपघात घडवतात किंवा त्यासाठीच्या चुका करून बसतात. ‘अंध माणूस सहसा अपघात घडवत नाही,’ हे कबीराचं आणखी एक सूत्र आठवायला लागलं.

बुद्रुकमध्ये म्हणजे पिंप्री बुद्रुकमध्ये प्रवेश केला. उजव्या बाजूला एक बालवाडी दिसली. तिचं नाव खूपच सुंदर म्हणजे ‘दिव्यज्योती’ असं होतं. मला ते खूपच आवडलं. वाटेत आम्ही एस. आर. पाटील या सरपंचाला गाडीत घेतलं. या छोट्याशा गावात २० वर्षांपासून त्यांची म्हणजे त्यांच्या घराण्याची सत्ता आहे. गाडी एका जुन्या इमारतीसमोर थांबली. ‘श्रीकबीर निर्णय मंदिर, पिंप्री बुद्रुक गद्दीस्थान’ असं खूप उंचीवर लिहिलं होतं. या इमारतीला १९५५ मध्ये सुरवात झाली. गुरू गोविंदमहाराज यांच्या पुढाकारानं कबीरपंथी मंदिराची निर्मिती झाली. मंदिरात कोणती मूर्ती नाही. पुतळा नाही. कबीर आणि गोविंदमहाराजांचा एक फोटो. बाकी फोटो चैत्रात भरणाऱ्या यात्रेचे, समारंभाचे, महाप्रसादाचे, भजन-कीर्तनाचे. पुणे, सोलापूर, शिरपूर अशी काही गावं सोडली, की कबीरमंदिर आणि त्याच्या पंथाच्या खाणाखुणा अपवादानंच दिसतात. या अपवादात पिंप्री बुद्रुकचा समावेश करता येईल.

\जळगावच्या उशालाच असलेल्या बऱ्हाणपूरमधून या गावात खूप वर्षांपूर्वी म्हणजे शंभरेक वर्षांपूर्वी कबीर पंथाचं इथं आगमन झालं. मंदिर वगैरे काही नव्हतं. आपापल्या घरात, आपापल्या जीवनात लोक कबीर धरून बसले होते. या सगळ्या भावनांचं प्रतीकांत म्हणजे मंदिरात रूपांतर झालं ते १९५५ मध्ये. गोविंदमहाराजांच्या काळात... सध्या दोन गुरू आहेत. वयोवृद्ध आहेत. गुरुवर्य सुयशजी साहेब आणि गुरुवर्य रसिकदासजी साहेब अशी त्यांची नावं आहेत. ते स्वतःच स्वयंपाक करतात. रोज रात्री कीर्तन-प्रवचन देतात. गावातले लोकही कबीराचे दोहे म्हणतात. त्यात महिला, मुलं, तरुणही असतात. दिवसभराची जगण्याची लढाई झाली, की कबीराचा काळजातला दोहा ओठावर घेऊन लोक येतात. दोहा म्हणणं हीच पूजा, हीच प्रार्थना. कबीराचे दोहेच आपली जडणघडण करतात. कोणत्या मूर्तीची, देव्हाऱ्याची गरज लोकांना भासत नाहीच. 

आम्ही मंदिरात आल्याचं पाहून महेंद्र पाटील नावाचा एक तरुणही तिथं आला. ‘मी दगडाची पूजा कशाला करू? त्याऐवजी पीठ बाहेर काढणाऱ्या जात्याची पूजा करेन. त्यातून बाहेर पडणारं पीठ जग खातं’ अशा आशयाचा एक दोहा त्याच्या ओठावार उगवला. मग राजू तुकाराम सोनार आला. याच्या अनेक पिढ्या कबीरपंथात आहेत. राजूनंही बघता बघता ‘सब के साया भला, दो साया दिल होय’ असं सांगत ‘आपल्याला कबीराचा विचार आवडला, कबीरच सत्य आणि वास्तव सांगतो, बाकी सारं काल्पनिक आहे,’ असं म्हणणं मांडलं आणि ते खरंही होतं. कबीर आपल्याला वास्तवाचे पदर उलगडून दाखवतो. विसंगती, उपरोध यांनी भरलेलं जीवन समजावून सांगतो. निखळ भक्तीचं माहात्म्य सांगतो. निर्गुण-निराकाराकडं जाण्यासाठी तो आपलं बोट पकडतो.
चर्चा सुरू असतानाच मंदिरातल्या उंच उंच भिंतींवर लक्ष जात होतं. चारही भिंतींवर दोहे लिहिलेले होते. सहज नजरेला पडतील अशा जागी लाल रंगात ते लिहिलेले होते.

बहुत दिवस ते हिडिया शून्य समाधी लगाय
कर हा पडा गाड में/दूरी परा पछताय

किंवा

चलते चलते पगू थका। नग्न रहा नौ कोस
बीचमें ही डेरा परा/ कहहू कौनसा देस

किंवा

लोभेजन्म गॅमाड्या/पापै खाया पून ।।
साधी सौ आधी कहे। तापर मेरा खून

किंवा

सुकृत बचन माने नहीं / आपू करें विचार
कहही कबीर पुकारिके/ सपनेहू गया संसार

काळाच्या ओघात दोह्यांमधल्या शब्दांत बरेच बदल झाले 

आहेत. काही नवे शब्द आले आहेत. त्या त्या प्रदेशातले काही रूढ शब्दही घुसले आहेत. तरीही कबीराचे मूळ दोहे बऱ्यापैकी आपल्याला सहज उपलब्ध होतात. ‘ईश्‍वरप्राप्तीसाठी बरंच भ्रमण करूनही ‘शून्यसमाधी’ कधी लाभली नाही...ईश्‍वरासाठी खूप चालत राहिलो...नऊ कोस नग्न राहिलो; पण मुक्काम मध्येच पडला.. ईश्‍वर कोणत्या देशात आहे कसं काय सांगू...? पारंपरिक वचनं किंवा खूप लोक ती मान्य करतात म्हणूनही मी काही अशी वचनं मान्य केली नाहीत...मी विवेकाला स्मरून सर्व काही करतो’ असा सारांशरूपानं या दोह्यांचा अर्थ होतो. कबीराचं सत्य वेगळं आहे. परमेश्‍वर वेगळा आहे. जीवनाची वाट वेगळी आहे. त्याच्या सगळ्याच वाटा सगळ्याच भेदाभेदातून मुक्त आहेत. या वाटेवर निखळ माणूस, निखळ श्रद्धा, निःस्वार्थी श्रद्धा दिसते. अशा गोष्टी स्वीकारणारा वर्ग कबीराच्या काळातही होता आणि बुवा-बाबांचे मॉल सुरू असल्याच्या काळातही आहे. ‘आम्हाला परमेश्‍वराकडं काही मागायचं नाही, त्याला शोधायचंही नाही, आम्हाला स्वतःला समजून घ्यायचं आहे...आमचा आतला आणि बाहेरचा प्रवास समजून घ्यायचा आहे...विकारमुक्त व्हायचं आहे,’ असं कबीरपंथी सांगत होते. खूप बरं वाटत होतं.

१५०० डोकी असलेल्या गावात जवळपास निम्मेजण कबीरपंथी आहेत. गावात कधीही जात, धर्म, देवाच्या नावावरून ठिणगी पडलेली नाही किंवा बाहेरच्या ठिणगीची धग इथपर्यंत पोचलेली नाही. त्याचं कारण कबीराच्या तत्त्वज्ञानात आहे. ‘माणसाला कलहमुक्त ठेवायचं असेल तर कबीरपंथाला पर्याय नाही,’ असं भक्त सांगत होते. सोनार, मराठा, माळी, दलित अशा वेगवेगळ्या जातींमधल्या लोकांनी कबीरपंथ स्वीकारला आहे. आता या सगळ्यांनी आपापली जात संपवून टाकली आहे. जातिभेदाच्या खुणा पुसट पुसट होत चालल्या आहेत.

मावळतं वर्ष डोळे मिचकावत असताना, नव्यासाठी आपल्या शरीरावरची कात काढून टाकत असताना एका सुंदर गावात जाता आलं, याचा आनंद काही औरच होता. कबीराचे जे दोहे भिंतीवर लिहिले होते, त्याचा अर्थ डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्या मदतीनं समजावून घेतला, तेव्हा तर आणखी आनंद झाला. समाजातल्या आणि माणसाच्या मनातल्या विकृतीवर, अंधश्रद्धांवर कोरडे ओढत त्याला स्वच्छ, सुंदर जीवनाचं महत्त्व सांगणाऱ्या कबीराचा सगळ्यांनीच गांभीर्यानं विचार केला तर आणि आपल्या काळजाच्या एखाद्या कोनाड्यात त्याला जागा दिली तर...तर आपल्या जगण्यातून विकाराचे काटे कधीच डोकं वर काढू शकत नाहीत; उलट मानवता रुजवणारा सुगंध मात्र जगण्यातून बाहेर पडू शकतो. असो. रात्री एरंडोलमध्ये यजुर्वेंद्र महाजन यांच्या पुढाकारानं सुरू झालेल्या आणि प्रतिष्ठित पावलेल्या व्याख्यानमालेला जायचं होतं आणि पुढं   रात्री मुक्कामाला जळगावजवळच रेखा महाजन यांनी सुरू केलेल्या इकोफ्रेंडली अशा दुर्मिळ आणि सुंदर ठिकाणी जायचं होतं...आणि मग रावेरची रंगपंचमी व्याख्यानमाला. हे सगळं सांगत असतानाच तुम्हाला नव्या वर्षाच्या शुभेच्छा देणं विसरून कसं चालंल?

Web Title: Firasti article by Uttam Kamble