‘फिरस्ती’तल्या उजेडवाटा

‘फिरस्ती’तल्या उजेडवाटा

प्रदीर्घ काळ सुरू असलेल्या ‘फिरस्ती’ या सदरानं मला खऱ्या अर्थानं ‘फिरस्ता’ बनवलं ‘फिरस्ती’च्या अगणित वाचकांनी अनेक उजेडवाटा तयार केल्या. केवळ एक वाचक म्हणून नव्हे, तर समाजघटक बनून वाचकांचा हा सगळा कारवाँ ‘फिरस्ती’ वाचत आला. तो समाजघटक बनल्यानंच ‘फिरस्ती’मधून उजेडवाटा तयार झाल्या. ‘फिरस्ती’च्या वेगवेगळ्या वाटांवर मला किती आणि काय काय भेटलं याची गणती मी स्वतः करूच शकत नाही. हे सदर काही प्रश्‍न सोडवण्यासाठी नव्हतं, नाही, तर ते समाज आणि त्याचा घटक असलेल्या माणसाला ओळखण्यासाठी होतं; पण घडत गेलं उलटंच. सदराच्या लोकप्रियतेतून एक नैतिक दबाव तयार होत गेला. काळोख दूर होण्यासाठी हात तयार होत राहिले. विचारी मनं तयार होत राहिली. या सगळ्यांनी उजेडवाटा तयार केल्या.

जीवन कॅलेंडरच्या पानात किंवा पानांवर फिट केलेल्या २४ तासांच्या घरात कधी थांबत नाही... छोट्याशा चौकोनात असलेल्या ६४ घरांच्या बुद्धिबळातही ते उंट, प्यादी किंवा राजा मारत थांबत नाही...ऋतूंची संख्या मोजत कुण्या एका ऋतूतही ते थांबत नाही किंवा कुण्या एका मैलाच्या दगडावरही ते रेंगाळत नाही. आपापल्या गतीनं ते चालत असतं, धावत असतं आणि कधी कधी मॅरेथॉनमध्ये पोचतही असतं. कधी कधी सिग्नलवर हिरव्या रंगाची वाट पाहत उभं असतं; पण काही झालं तरी त्याला चालतंच राहायचं असतं, हे मात्र नक्की. जग टिकून कसं राहीलं, या गंभीर प्रश्‍नाचं साधं-सोपं उत्तर म्हणजे ते चालत राहिलंय... चालता-चालता त्यानं हजारो-लाखो, कोट्यवधी कॅलेंडरं उलटून लावली. अर्थात, या सगळ्या कॅलेंडरांचा जन्मही माणसाच्या चालण्यातूनच झालेला... जीवन समजावून घेणं म्हणजे हे कॅलेंडर आणि त्यातली ३६५ घरंच समजून घेणं असतं. कोणत्या घरात काय वाढून ठेवलेलं असेल आणि जंगल संपल्यानं कधी कोणत्या घरात बिबट्या शिरेल आणि हॉल किंवा किचनचा ताबा घेईल, हेही समजून घेणं असतं. कॅलेंडरची पानं गळून पडण्याचा आनंदही असतो आणि दुःखही असतं. गळून पडलेलं पान पुन्हा कधीही कॅलेंडरला चिकटणार नाही, याचं दुःख असतं.

कारण, पानातल्या रंध्रारंध्रांत आपला इतिहास साठतो, आपल्या आठवणी साठलेल्या असतात. आनंद एवढ्यासाठी असतो, की नवं पान तरारण्यासाठी जुन्याला गळून पडावंच लागतं. हे जे काही गळून पडणं आणि नवं उगवणं याच्या मध्येच तर जीवन कुठं तरी घुटमळत असतं. कधी ते मौनात जातं; तर कधी कबूतरासारखं गुटर्र ऽ ऽ घूम असं घुमत राहतं... २४ डिसेंबरच्या रात्री पुणे विद्यापीठातल्या १० नंबरच्या गेस्ट रूमचं दार उघडलं तर दरवाजावर काहीतरी फडफडतंय, असं वाटायला लागलं. अंधार होता, नीट काही दिसत नव्हतं. मान वर केली तर विजेच्या फ्यूजसाठी केलेल्या छोट्याशा लाकडी बॉक्‍सवर एक कबूतर अंग चोरून बसलं होतं. कबूतरानं माणसाचा शेजार कसा काय स्वीकारला, हे कोडं काही उलगडलं नाही. पहाटे पाचला फिरायला जाण्यासाठी भीकचंद आला, तेव्हा मी रूमचा दरवाजा उघडला आणि रात्रभर बॉक्‍सवर बसलेलं कबूतर फडफड करत निघून गेलं. खूप वाईट वाटलं आणि अलीकडं इमारतीवर, धर्मस्थळांवर बसताना कबूतरं का बिचकतात, हेही लक्षात यायला लागलं.

नवं वर्ष आता केवळ पाच-सहा पावलांवर उभं ठाकलं होतं. जुनं वर्ष आपला अवतार संपणार म्हणून कबुतरासारखंच बिथरलं होतं; पण त्याला काय ठाऊक, की माणूस कधी तरी रूमचा दरवाजा उघडणार होता आणि त्याला असुरक्षितता वाटणार होती. ‘फिरस्ती’ सदर पाच-सहा वर्षं चाललंय. वाचकांनी आपला खांदा देऊन बरीच वर्षं पेललेलं हे सदर आहे. खांद्यावरून मग या सदराला त्यानं काळजात नेलं. थकला-भागला माणूस, अंधाराला कंटाळून उजेडासाठी शीळ घालणारा माणूस मग कधी या सदरात डोकावतो. कधी कधी काटेरी रूप घेऊन समाजात उगवलेलं दुःख वाटून घेतो. कधी कधी काट्याच्या आसपास उगवलेली छोटी-मोठी फुलं घेऊन आनंदी होतो. कधी कधी तो या सदराकडूनच उत्तराची अपेक्षा करतो. कधी कर्ण आणि हरिश्‍चंद्राची भूमिका घेऊन अंधार दूर करायला तो बाहेर पडतो. कधी कधी  ‘अत्‌ दीप भव’ या बुद्धाच्या वचनाप्रमाणेच तो स्वतःच आपल्या चामडीवर रुजू पाहणारा अंधार खरडत जातो. उजेडावरचा गंज चिमटी चिमटीनं पकडून फेकून देतो... काय काय करत राहिला हा ‘फिरस्ती’चा वाचक याचा अंदाज पाच वर्षांनंतरही मला अजून आला नाहीय, याचं वाईटही वाटतं आणि आनंदही वाटतो. न कळण्यातून समजून घेण्याची एक उत्सुकता तयार होते आणि तिला किलकिलणारे का होईना आनंदाचे डोळे असतात. काही असो; पण ‘फिरस्ती’ वाचणाऱ्या अनेकांनी आपापली ऊर्जा, आपापली संवेदना वापरून अनेकांसाठी उजेडवाटा तयार केल्या आहेत.

नव्या कॅलेंडरचं स्वागत करत असताना आणि जुन्या घरांवर टकटक करताना सगळाच काही काळोख दिसत नाही. बऱ्याच घरांत उजेड दिसतो आणि या उजेडावर अर्थातच ‘फिरस्ती’च्या वाचकांचं म्हणजे एका अर्थानं समाजाचं नाव कोरलं गेलं. जवळपास ३०० आठवड्यांत ३०० विषय या घराघरांत उतरले होते. उगीचच कुणावर टीका करायची म्हणून किंवा उगीचच कुणाच्या तरी मागं लागून त्याच्या गळ्यात हार घालायचा म्हणून हे विषय आले नव्हते. ‘फिरस्ती’चा एकमेव उद्देश आहे आणि होता व तो म्हणजे समाजाचा प्रवास समजून घेण्याचा. समाज समजून घेण्याचा. समाजाचा एक सूक्ष्म धागा बनलेल्या आपल्या आयुष्याला समजून घेण्याचा. समाज आणि माणूस यांच्यात एक चिवट वीण असते. कधी कधी समाज समजावून घेताना आपण स्वतःला समजावून घेतो आणि कधी कधी स्वतःचं स्कॅनिंग करताना समाज कळून जातो. किती मस्त असतं हे सगळंच्या सगळंच ते लिहून सांगता येणार नाही. सोडून द्यायचं असतं तसंच आणि चालत राहायचं असतं. सहा वर्षांपूर्वी मी बऱ्याच वेळेला एकटाच चालायला बाहेर पडायचो आणि जेव्हा हे सदर सुरू झालं, तेव्हा मात्र मी लाखो- कोट्यवधी लोकांच्यासोबत चालतोय, एवढ्या सगळ्या दुःखाबरोबर, विविध अनुभवांबरोबर,

विविध चेहऱ्यांबरोबर चालतोय असं वाटायला लागलं. समूहाबरोबर चालत राहणं, कारवाँ तयार करणं, त्याचा एक घटक बनणं किंवा या सगळ्यांनी आपल्याला स्वतःचा घटक बनवणं तर खूपच आनंदी असतं. आपण आयुष्य का तुडवतो याचं प्रयोजनही हळूहळू का होईना कळायला लागतं. जगण्याचं प्रयोजन कळलं, की जीवन अधिक आशयपूर्ण बनतं. सुंदर बनतं.

पाच वर्षांच्या या दीर्घ प्रवासात मला लेखक आणि फिरस्ता बनवणाऱ्या वाचकांनी अनेक उजेडवाटा तयार केल्या. त्याचं एक कारण म्हणजे केवळ एक वाचक म्हणून नव्हे, तर समाजघटक बनून हा सगळा कारवाँ ‘फिरस्ती’ वाचत आला. तो समाजघटक बनल्यानंच या सगळ्या उजेडवाटा तयार झाल्या आहेत. किती आणि काय काय भेटलं या वाटांवर याची गणती मी स्वतः तर काही करू शकत नाही. हिशेब चुकत जातो. आनंद घेण्याऐवजी हिशेब चुकल्याचं दुःख तयार होतं. हे सदर काही प्रश्‍न सोडवण्यासाठी नव्हतं; तर समाज आणि त्याचा घटक असलेल्या माणसाला ओळखण्यासाठी होतं; पण घडत गेलं उलटंच. सदराच्या लोकप्रियतेतून एक नैतिक दबाव तयार होत गेला. काळोख दूर होण्यासाठी हात तयार होत राहिले. विचारी मनं तयार होत राहिली. या सगळ्यांनी या उजेडवाटा तयार केल्या. आपली लेखणी एक 
निमित्त असते. महाकाय समुद्र डोळ्यांत साठवून दुसरा किनारा कुठं असंल, याचा वेध ती घेत असते. मी बराच वेळ जागच्या जागी थांबलो होतो; पण या सदरानं मला फिरतं, चालतं ठेवलं. ‘फिरस्ती’त भेटलेल्या सुख-दुःखांनी मला लोहचुंबकाप्रमाणं खेचून घेतलं. याच सदरानं विविध अनुभवांचे हार माझ्या गळ्यात टाकले. या हारातली फुलं कधी सुकली नाहीत. ती नेहमीच टवटवीत राहिली. मी या सगळ्या जीवनानुभवांचा, समाजानुभवांचा खूप आभारी आहे.

या सदरात लढणारे अनेक वाचक आणि समूह आले. त्यांच्यावर लढाई व्यवस्थेनंच लादली होती. त्यांना लढायचंच होतं; पण ‘तू लढ’, असा बुलंद आवाज याच सदरातून वाचकांनी निर्माण केला. लढाया धारदार झाल्या आणि त्यांचा शेवट सुंदर फुलांमध्ये झाला. दुःखाच्या शरीरावरच्या जखमांना याच फुलांनी सुगंधित केलं. फुटपाथवर काकड्या विकणारा एक जण न्यायाधीश झाला. बिगाऱ्याचं काम करण्याच्या शोधात नाशिकमध्ये आलेला एक तुरुंगाधिकारी झाला. पारध्यांची (म्हणजे समाजानं चोर ठरवलेल्या जातीची) दोन पोरं पोलिस खात्यात अधिकारी झाली. अंध असलेला जिवाजी एक स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाला. अंध असलेली संगीता पदवीधर होऊन नोकरीला लागली. येवल्याजवळ चार मुक्‍या पोरींना जन्म देणाऱ्या आईला बळ मिळालं आणि मुक्‍यांसाठी शाळा चालवणाऱ्या अर्जुनच्या शाळेला सचिन तेंडुलकरनं मदत केली. ३६५ दिवस शाळा चालवणाऱ्या सकट पती-पत्नीला राज्य आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळाले...याच सदराच्या निमित्तानं कल्पना दुधाळ या श्रेष्ठ कवयित्रीचा आणि झालंच तर बालिकाचाही शोध लागला. नाशिकच्या स्मशानात मृतदेहांची सेवा करणाऱ्या सुनीता पाटीलला महाराष्ट्रातले मोठमोठे पुरस्कार मिळाले. अशीच कथा भोरमधल्या शीतलची. तीही लहानपणापासून शवचिकित्सा करतेय. भोरला जाऊन आणि तिला बाहेर बोलावून समाजानं तिच्यावर कौतुकाचा आणि मदतीचा वर्षाव केला.

नगरजवळ खरडगावात ३२ वर्षांपासून अंथरुणाला चिकटलेल्या मुलींची सेवा करणाऱ्या पालकांना ४० लाखांहून अधिक मदत मिळाली. बिनपगाराची नोकरी करत आणि चप्पल शिवून पोट भरणाऱ्या विलासलाही अशीच मदत झाली. ही सगळी उदाहरणं प्रातिनिधिक आणि लढणाऱ्यांना बळ देणारी. याचा अर्थ असा नव्हे, की ‘फिरस्ती’ सदर नसतं तर हे सगळे अंधारातच राहिले असते. या सदरानं एकच काम केलं आणि ते म्हणजे या लढाया वाचकांपर्यंत, समाजापर्यंत पोचवल्या. गावंच्या गावं बदलण्याचं काम लोकांनी केलं. गळून पडणाऱ्या स्वप्नांना पुन्हा उभारी दिली. त्यांच्या हातात नवं हत्यार दिलं. कोट्यवधींचा निधी गरजूंकडं परस्पर गेला.

खूप माणसं भेटली या सदरात. स्वतःचं बाळंतपण स्वतःच करणाऱ्या काही भगिनी भेटल्या. घूस खाणारा समूह भेटला. शिक्षणक्षेत्रात पोरं आणि मास्तर या दोघांची पकडापकडी करणाऱ्या घटना दिसल्या. वादळात टिकून राहिलेली आंदगोळ कादंबरी भेटली. अवयव आणि गर्भविक्री करणारे भेटले. काशीत गंगेच्या काठावर लवकरात लवकर मृतदेह जाळण्यासाठीचं युद्ध दिसलं. गैरविश्‍वासानं भरलेल्या काश्‍मीरमधील दऱ्या दिसल्या. मृतदेहासाठीच्या अनुदानात होणारी फसवणूक दिसली. शिक्षणाचा हक्क असतानाही स्वतःच्या कोवळ्या मनगटातून रक्ताच्या चिळकांड्या उडवत भीक मागणारा पोरगा दिसला. ऑनलाइन जगातही शरीर फोडून घेत भीक मागणारा पोतराज दिसला. घुमणारी भुतं दिसली. अंधश्रद्धांचे डोंगर दिसले आणि ते फोडणारेही दिसले. बोकडातून तयार झालेलं अर्थशास्त्र दिसलं. स्मशानातून पुन्हा स्मशानाकडं प्रवास करणारा अंजैया हा स्मशानजोगी दिसला. खोकल्याला आणि प्लेगला देवाच्या रूपात बसवणारी गावं दिसली आणि कबीर आळवणारं गावही दिसलं. बॉडीक्‍लॉक उलटं झालंय म्हणणारी आयटीतली पोरं दिसली. उच्च शिक्षण घेऊन भिकाऱ्यांच्या रांगेत बसलेलीही पोरं दिसली. अपंगत्वावर मात करून निवडणूक जिंकणारी युवती दिसली. ‘निवडणुकीत मत विकून चूल पेटविता येईल’, असं सांगणारी मावशी भेटली. कुंभमेळ्यात भीक मागून ८५ हजार रुपये जमवणारी निरक्षर, मुकी बाई भेटली. ‘हंबरुनी वासराला चाटते जेव्हा गाय...’ या कवितेचे अनामिक ठरलेले कवी पाचपोळ भेटले. प्रतिज्ञा लिहिणाऱ्या लेखकाचा शोध लागला. मिरजेच्या वेश्‍यावस्तीत एका वेश्‍येच्या पोटीच जन्माला येऊन ‘नैतिक’ आणि ‘वर्तन’ अशा नावांनी जगणारी पोरं भेटली. विदर्भात कुमारीमाता एकगठ्ठा भेटल्या. ‘बिसलरीतलं पाणी प्यायल्यानं प्रतिष्ठा वाढते’, असं सांगणारा झोपडीतला नागवा पोरगा भेटला. ‘या सदरातला ‘एक पोकळी असतेच’ हा लेख वाचून आम्ही सामुदायिक आत्महत्या रद्द केली,’ असं हातात लेखाचं कात्रण घेऊनच एक कुटुंब भेटलं. ‘मी मृत्यू पाहिला,’ असा दावा भावनाप्रधान होऊन करणारे प्रा. सूर्यनारायण रणसुभे भेटले. एवढंच काय, गेल्या पाच वर्षांत मला मोजता येणार नाहीत एवढ्या मुली, बहिणी, आया, भाऊ आणि बाप मिळाले. आता मी असा दावा करू शकतो, की गावागावांत मला नातेवाईक मिळालाय.

जीवन किती वळणं घेत चालतं. ते अंधार पांघरून कधी कधी उजेड पितं; तर कधी कधी उजेड पांघरून अंधार पितं... या साऱ्या प्रवासात ‘फिरस्ती’मध्ये नैसर्गिकरीत्याच सुविचार वाटावीत, अशी अनेक वाक्‍यं जन्माला आली. साताऱ्यात एक भगिनी या सगळ्याचं संकलन करतेय. सदानंद भोसलेनं ‘फिरस्ती’ हिंदीत नेली. कितीतरी शॉर्टफिल्म तयार झाल्या किंवा होण्याच्या वाटेवर आहेत. १२ पुस्तकं जन्माला आली. ‘वाचक संपलेला नाही’, असा धीर मला या सदरामुळं सतत मिळत आलाय, हे सांगायला मी कसं विसरू? या सदरानं मला इतकं फिरवलंय की पृथ्वीच्या दोन-तीन फेऱ्या त्यातून होतील. किती भन्नाट..! डायबेटिससारखी अखंड व्याधी या सदरामुळंच नियंत्रित झाली, असा माझा स्वतःचा अनुभव. 

‘या पोराचं आयुष्य अल्प असेल,’ असा कुण्यातरी एका ज्योतिषानं माझ्या नातेवाइकांना सांगितलं होतं. ‘फिरस्ती’नं हे भविष्य खोटं ठरवत वयाची ६० वर्षं ओलांडायला मदत केली. शेवटी ‘हे सदर म्हणजे उत्तम कांबळे नव्हे’, हे सतत लक्षात ठेवायला हवं. सदर म्हणजे एक समाज आहे. तोच नायक, तोच उजेडदूत आणि तोच उजेडाच्या वाटा तयार करतोय. समाज सगळाच्या सगळा कधी भ्रष्ट होत नाही, हेही मला ‘फिरस्ती’नं शिकवलंय. मला घडवलंय. स्वतःकडं पाहायला शिकवलंय... पायाला माती आहे की नाही, हे रोज तपासायला शिकवलंय... मानवी प्रवासाशी जोडलेल्या सदराला तसा शेवट नसतो. लेखक भारवाहक असतो. खांद्यावरचा भार कमी-जास्त झाला तरी प्रवास सुरू असतो...अंधारातून उजेडाकडं, जुन्या वर्षातून नव्या वर्षाकडं... एका अनुभवातून दुसऱ्या अनुभवाकडं... शेवटी आयुष्य असतं तरी काय..?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com