गोष्टींची गमतीदार गोष्ट

story.
story.

वेदांची उत्पत्ती विष्णूपासून झाली, असा समज आहे. विष्णू भगवान यांनी ब्रह्माला व ब्रह्माने ऋषी-मुनींना हे ज्ञान दिलं. त्यानंतर हे ज्ञान पिढी दर पिढी गुरूंकडून शिष्यांना मिळत गेलं. हे ज्ञान लिखित नव्हे, तर मौखिक असल्यामुळे यांना श्रुती असे म्हणतात. पुढे व्यास ऋषींनी ते लिहून काढलं, मग ते कुणालाही वाचता येऊ लागलं. या श्रुतींच्या आधारे बऱ्याच ऋषी-मुनींनी आपली स्वत:ची आख्याने लिहिली, जी आपण स्मृती म्हणून ओळखतो. रचनाकाराच्या नावावर ग्रंथाचं नाव दिल्या गेलं, उदाहरणार्थ मनुस्मृती, पाराशर स्मृती इत्यादी. तरीपण सामान्य जनतेसाठी हेसुद्धा अवघडंच होतं वाचायला. पण मग एवढं गूढ ज्ञान सामान्य लोकांपर्यंत येणार तरी कसं?
तेव्हाच केव्हातरी कथेची गरज भासली असेल. म्हणून रामायण-महाभारत यांसारख्या इतिहास म्हणविल्या जाणाऱ्या रचना व गोष्टीरूपाने सामान्यांपर्यंत ज्ञान पोहोचवणारे पुराण इत्यादी ग्रंथांचा जन्म झाला. सोप्या भाषेत बोध करून द्यायचा असेल तर गोष्टींपेक्षा जास्त प्रभावकारी माध्यम नाही. रामाची कथा, कृष्णाच्या लीला, अर्जुनाच्या गोष्टी लहानांपासून मोठ्यांपर्यंत, सर्वांनाच मोहात पाडतात. पुराणात सापडणाऱ्या अनेक अन्य गोष्टी, दशावताराच्या कथा, ध्रुव बाळाची गोष्ट, भक्त प्रल्हाद इत्यादी आदर्श आचरणाची उदाहरणंच आहेत.
गोष्ट ऐकल्याने किंवा वाचल्याने कल्पनाशक्तीचा विकास होतो. आपण त्या व्यक्ती व घटना दृश्‍यरूपाने कल्पित करतो व त्यामुळे विचारशक्तीच्या कक्षा रुंदावतात. प्रत्येक व्यक्तीच्या मनात तीच गोष्ट ऐकून वेगवेगळी दृश्‍यं उभी राहतात व प्रत्येक व्यक्ती त्या कथेला वेगळ्या पद्धतीने बघतो. म्हणूनच एखाद्या प्रसिद्ध गोष्टीवर किंवा कादंबरीवर आधारित चित्रपट तयार झाला की तो सर्वांनाच रुचेल, याची शक्‍यता कमी असते.
याच कल्पनाशक्तीची मदत घेऊन पंडित विष्णू शर्मा यांनी पंचतंत्राची रचना केली. यात सगळी पात्रे प्राण्यांची आहेत. राजा अमरशक्ती यांच्या तीन उन्मुक्त पुत्रांना सरळ मार्गावर आणण्याच्या हेतूने या गोष्टी पंडित विष्णू शर्मा यांनी त्या राजपुत्रांना सांगितल्या. त्यांचा उद्देश्‍य सफल तर झालाच; परंतु पशुपक्ष्यांच्या मार्फत सांगितलेल्या व्यवहारचातुर्य व नीतीमत्तेच्या या गोष्टी अत्यंत लोकप्रिय झाल्या. प्राचीन काळातच या ग्रंथाचा अनुवाद फारसी, अरबी, युनानी, लॅटिन व नंतर जवळपास सर्व युरोपीय भाषांमध्ये केला गेला. याच गोष्टींचा आधार घेऊन नारायण पंडित यांनी "हितोपदेश' या पुस्तकाची रचना केली.
युनानी भाषेत उत्पत्तिस्थान असलेल्या इसापनीतीतल्या गोष्टी पण पंचतंत्रातल्या गोष्टींसारख्याच आहेत. या गोष्टींमध्येही मुख्य पात्रे प्राणी जगतातलेच आहेत, व फार सोपी उदाहरणं देऊन नीती व व्यवहाराचे धडे शिकविले आहेत.

अवघड संकल्पना सामान्य बुद्धी असलेल्या व्यक्तीलाही समजावून देण्याचं कठीण काम गोष्टी लीलया करतात. मोरोपंतांनी त्यांची सुप्रसिद्ध काव्यरचना "केकावली' यात कथेला सुरभी, म्हणजेच गाईची उपमा दिली आहे. कथा सुरभीच्या रसात गाईच्या दुधाची गोडी आहे, परंतु कथा या सुरभीपेक्षाही सरस ठरतात, कशा ते बघू...

कथासुरभि या भल्या स्वजननीहुनी वाटती;
शिशूंस जरठांसही निरखितां रसें दाटती;
दुहोत भलते सदा, तरि न लेशही आटती;
स्ववत्समल भक्षिती, परि न सर्वथा बाटती ×

मोरोपंत म्हणतात, कथा या गाई किंवा आईपेक्षाही श्रेष्ठ असतात. कारण गाई केवळ आपल्या वत्साला (शिशूला) पाहून पान्हावतात; परंतु कथांचा पान्हा शिशू असो अथवा वृद्ध, सर्वांसाठीच दाटतो. इथे शिशूचा अर्थ अज्ञ व वृद्धाचा अर्थ ज्ञानी, असाही घेता येतो. गाईंना दोहणारा तिचा गवळीच असावा लागतो, नाही तर ती पान्हा चोरते. परंतु कथांचं तसं नाही. त्यांचं दोहन अर्थात श्रवण, चिंतन कोणी नवख्यानेही केलं, तरी तिची गोडी कमी होत नाही. वासरू दूध पीत असताना गाई त्याला चाटून स्वच्छ करतात, व दूषित होतात. कथांचं तसं नाही, वाचकाच्या मनातले भाव निर्मळ करूनही कथांचे पावनत्व कमी होत नाही, त्या जशाच्या तशाच राहतात.

गोष्टी सांगणे हा प्रकार आज जरी जुन्याकाळचा वाटत असला, तरी गोष्टींची शक्ती यत्किंचितही कमी झालेली नाही. फक्त काळाप्रमाणे गोष्ट सांगण्याचे प्रकार व माध्यमे बदलली आहेत. केवळ वाचन किंवा श्रवण हेच एक माध्यम राहिलं नाही, तर चलचित्राच्या माध्यमाने पण गोष्टी अधिक आकर्षक रितीने सांगता येतात. विज्ञापन जगात तर याला असामान्य महत्त्व आहे. कमी वेळात प्रभावीपणे गोष्ट सांगण्यास जाहिरातदार आपले कसब पणाला लावतात, जेणेकरून उपभोक्‍त्यांचं मन स्व:च्या उत्पादनाकडे वळविता येईल. नाटक व सिनेमा या माध्यमाने कलाकार कथेला आपल्या अभिनयाच्या जोडीने अधिक प्रभावीरीत्या मांडतो.

गोष्ट कशी असावी जेणेकरून तिचा प्रभाव जास्त पडेल, हासुद्धा संशोधनाचा विषय आहे. जर्मन नाटककार फ्रेटैग यांनी उत्तम गोष्टीचे पाच भाग वर्णिले आहेत. प्रदर्शन अथवा प्रस्तावना, जटिलता, चरम, परावर्तन व मुक्तता. शेक्‍सपिअरच्या सर्व रचना साधारण याच साच्यात बसतात. मेंदूमध्ये कुठले रासायनिक बदल होतात, ज्यामुळे आपल्यावर त्यांचा अधिक प्रभाव पडतो, यावरही मानसशास्त्रज्ञांनी बरेच संशोधन केले आहे. गोष्टी ऐकताना, विशेषत: प्राण्यांच्या, आपल्या मेंदूत ऑक्‍सिटोसीन नावाच्या रसायनाचे स्त्रवण होते. हे रसायन प्रेम, सहानुभूती व संवेदनशीलता निर्माण करते, त्यामुळे पंचतंत्रातल्या व इसापनीतीच्या गोष्टी फार प्रभावी आढळून येतात. गोष्टींमधल्या तणावाच्या क्षणामध्ये कॉर्टिसोल नावाचे रसायन उत्पन्न होते व हे रोमांचक अनुभूतीस जबाबदार आहे. वीरतेच्या, देशभक्तीपूर्ण गोष्टी या भावनेचा प्रत्यय आणतात. सुखद अंत असलेल्या गोष्टी डोपामीन नावाच्या रसायनाचे स्त्रवण घडवून आणतात, ज्यामुळे आपल्याला प्रसन्न व आशावादी वाटते व आत्मविश्वाससुद्धा वाढतो.

गोष्टी सगळ्यांनाच आवडतात, मग त्या लहानपणी आजीने सांगितलेल्या पौराणिक किंवा देवी-देवतांच्या असो, उन्हाळ्याचा सुट्टीत गच्चीवर भाऊ-बहिणींनी सांगितलेल्या भूत-प्रेताच्या असो, मनाला हुरहूर लावणाऱ्या अर्धवट हळव्या वयात ऐकलेल्या प्रेमकथा असोत किंवा मोठेपणी समोर येणाऱ्या यथार्थवादी असोत. नातवंडांच्या तोंडून स्पायडरमॅनच्या गोष्टी, भलेही कळत नसल्या तरी आजी-आजोबांना गोडच वाटतात. तर अशी ही गोष्टींची गोष्ट, कधी न संपणारी!  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com