जगण्याचं 'तंत्र' बनेल सुकर (डॉ. मिलिंद पांडे)

डॉ. मिलिंद पांडे
रविवार, 25 मार्च 2018

दूरसंचार प्रणाली आता केवळ मोबाईलपुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत. संवाद-तंत्रज्ञानातली क्रांती पुढच्या काही वर्षांत आणखी काही महत्त्वाचे टप्पे घेईल आणि थक्क करायला लावणारे बदल घडतील. शिक्षकरहित वर्गांपासून यंत्रमानवाद्रारे शेती करण्यापर्यंत अनेक संकल्पना हळूहळू विकसित होत आहेत. इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्‍नॉलॉजीमुळं (आयसीटी) वेगवेगळ्या क्षेत्रांत काय बदल होऊ घातले आहेत याचा घेतलेला वेध. 

दूरसंचार प्रणाली आता केवळ मोबाईलपुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत. संवाद-तंत्रज्ञानातली क्रांती पुढच्या काही वर्षांत आणखी काही महत्त्वाचे टप्पे घेईल आणि थक्क करायला लावणारे बदल घडतील. शिक्षकरहित वर्गांपासून यंत्रमानवाद्रारे शेती करण्यापर्यंत अनेक संकल्पना हळूहळू विकसित होत आहेत. इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्‍नॉलॉजीमुळं (आयसीटी) वेगवेगळ्या क्षेत्रांत काय बदल होऊ घातले आहेत याचा घेतलेला वेध. 

'आयसीटी' म्हणजे दूरसंचार (टेलिकम्युनिकेशन्स) प्रणालीद्वारे माहिती मिळवून देणारं तंत्रज्ञान. ही संकल्पना माहिती-तंत्रज्ञानासारखी (इन्फॉर्मेशन टेक्‍नॉलॉजी) असून, मुख्यत्वे संपर्क तंत्रज्ञानकेंद्रित (कम्युनिकेशन टेक्‍नॉलॉजीज) असते, ज्यामध्ये मोबाईल फोन्स, इंटरनेट, वायरलेस नेटवर्क्‍स आणि इतर संपर्क माध्यमांचा समावेश असतो. 'आयसीटी'नं बऱ्याच क्षेत्रांमध्ये क्रांतिकारी बदल घडवला असून, त्याचा सकारात्मक प्रभाव जगभर दिसत आहे. 'आयसीटी'च्या जोडीला 'आयओटी' म्हणजेच 'इंटरनेट ऑफ थिंग्स' ही नवीन संकल्पना आली असून, यामध्ये कॉम्प्युटर्स, मशीन्स, डिजिटल मशिन्स, घरगुती उपकरणे, गाड्या आणि मानव एकमेकांशी संपर्क साधून माहितीची देवाणघेवाण करतात, ज्याचा वापर कामासाठी होतो. या दोन्ही संकल्पना सामाजिक, आर्थिक विकासासाठी परिणामकारक ठरत आहेत. व्यवसायांना त्यामुळं अधिक चांगल्या पद्धतीनं कामकाज हाताळणं शक्‍य झालं असून, महत्त्वाचे निर्णयही अधिक उत्तम घेता येऊ लागले आहेत. यातून प्रशासनाचं एक नवीन प्रारूप विकसित होत असून, एकंदरच व्यवस्थेमध्ये वाढीव कार्यक्षमता, प्रभाव आणि पारदर्शकता येत आहे. या सर्व बदलांत स्मार्टफोन आणि इंटरनेट हीच दोन प्रमुख साधनं म्हणून समोर आली आहेत. 

मोबाईल : मानवाचा जवळचा मित्र 
गेल्या शतकातल्या शेवटच्या दशकात एखादा कॉल करण्यापूर्वी किंवा स्वीकारण्यापूर्वी विचार करावा लागत असे. त्याकाळी आऊटगोइंग कॉल्स आणि इनकमिंग कॉल्ससाठीच शुल्क महाग होते. नंतर एकविसाव्या शतकाच्या सुरवातीला भारतात बड्या टेलिकॉम कंपन्या येऊ लागल्यावर तंत्रज्ञान आणि स्पर्धेमुळं ही दरी कमी झाली. मोबाईल फोन्सचा वापर वाढला, तसं लॅंडलाइन टेलिफोनपेक्षाही मोबाईल फोन्सना अधिक महत्त्व आलं. नंतर स्मार्ट फोन्सच्या आगमनानं डेटा नावाची नवी संकल्पना क्रांती घडवू लागली. मोबाईल फोन केवळ संपर्कापुरता नव्हे, तर माहिती आणि मनोरंजनासाठीही वापरला जाऊ लागला. आता तर आपण अशा काळात आहोत, की स्मार्ट फोन हा आपल्या दैनंदिन कामकाजाचा व जीवनशैलीचा अविभाज्य घटक ठरला आहे. 

डेटाचा वापर लोक मोठ्या प्रमाणावर करत असताना ते काय करतात, काय बघतात, त्यांच्या आवडी काय, याचं सर्व विश्‍लेषण करता येतं. आयसीटी आणि स्मार्ट फोन्स ही क्रांतिकारी जोडी असून, एकीकडे व्यवसाय उद्योग आणि दुसरीकडं ग्राहक आणि सर्वसामान्य जनतेवर याचा मोठा प्रभाव पडत आहे. 

शिक्षण : पाहिजे तसं, पाहिजे तेवढं! 
आयसीटी तंत्रज्ञानामुळं पारंपरिक शिक्षणपद्धती कायमच्या बदलू लागल्या आहेत. पूर्वीच्या खडू-फळा वर्गांनी आता डिजिटल क्‍लासरूम्सचं रूप धारण केलं आहे. शिक्षक पूर्वीप्रमाणं मुलांना एकतर्फी माहिती सांगत नसून, दोघांमध्ये नवे संवादात्मक वातावरण निर्माण होत आहे. भविष्यात यापलीकडंही जाऊन बदल घडतील. 'मूक्‍स' म्हणजे मॅसिव्ह ओपन ऑनलाइन कोर्सेस भारताबाहेर याआधीच लोकप्रिय होत आहेत. वेब पोर्टलद्वारे कुणालाही आपल्याला हवं ते तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली कधीही शिकता येईल. त्यामुळं कदाचित भविष्यात परीक्षेव्यतिरिक्त शाळेत जाण्याची गरजच भासणार नाही. जिथं शिक्षण पोचवणं अजूनही अवघड जात आहे, अशा दुर्गम भागाचा चेहरामोहरा या नव्या शिक्षणानं बदलू शकतो. 'डिजिटल इंडिया' धोरणाअंतर्गत अडीच लाखांहून अधिक ग्रामपंचायतींना ऑप्टिकल फायबरनं जोडून इंटरनेट कनेक्‍टिव्हिटी देण्याचं काम सुरू आहे. त्यामुळं दुर्गम भागातल्या विद्यार्थ्यांना डिजिटल क्‍लासरूम्स किंवा ऑनलाइन आधारित शिक्षण ही फार दूरची बाब राहिलेली नाही. 

या सर्व बदलांमुळं कदाचित 'शिक्षकरहित' वर्गाकडं आपण वाटचाल करू; पण मग शिक्षकांचं काय होणार? सध्या आपल्या वर्गापुरते, शाळेपुरते मर्यादित असलेले शिक्षक पुढच्या काळात भौगोलिक मर्यादा ओलांडत असंख्य विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाद्वारे मार्गदर्शन करतील. 'ऑन डिमांड टीचर' ही संकल्पना पुढच्या दोन दशकांत रुळू शकते. विद्यार्थ्यांच्या बाबतीतही त्यांच्या आवडीनिवडीचं विश्‍लेषण करणारं तंत्र विकसित होऊ शकतं आणि प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या गरजेनुसार आणि बुद्धीनुसार शिक्षण मिळू शकतं. डॉक्‍टर रुग्णांचा रक्तदाब किंवा रक्तातली शुगर तपासतात आणि त्यांना त्यानुसार औषध देतात, तसंच शिक्षणामध्येही विद्यार्थ्यांच्या विविध निकषांवर आधारित शिक्षण दिलं जाईल. एकंदरच या तंत्रज्ञानामुळं शिक्षण हे केवळ अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आणि गुण मिळवण्यासाठी नव्हे, तर जीवनातली मोठी ध्येयं साध्य करण्यासाठी उपयुक्त ठरेल. ही ध्येयं साध्य करताना आणि जगातली सध्याची आव्हानं लक्षात घेता, मुलांची पसंतीची करिअर्सही त्यानुसार बदलतील. एकंदरच कनेक्‍टेड वर्ल्डमध्ये तंत्रज्ञानावर आधारित करिअर्सना जास्त महत्त्व प्राप्त होईल. 

डॉक्‍टर तुमच्या घरापर्यंत 
भारत एकीकडं वैद्यकीय पर्यटनासाठी (मेडिकल टुरिझम) विकसित होत असलेला देश ठरत असताना दुसरीकडं मूलभूत सुविधाही दुर्गम भागांपर्यंत पोचत नाहीत, ही तफावत आयसीटी तंत्रज्ञानाच्या माध्यमानं नाहीशी होईल. डॉक्‍टर तुमच्याकडं येऊ शकत नाही किंवा तुम्ही डॉक्‍टरांकडं जाऊ शकत नाही, ही सध्याच्या धकाधकीच्या जीवनातली परिस्थिती आहे. अशा वेळेस 'व्हर्च्युअल क्‍लिनिक' काही ठिकाणी सुरू झाली असून, त्याचा लाभ मोठ्या प्रमाणावर होत आहे. यापुढं याचा फायदा ज्यांना सध्या तज्ज्ञ डॉक्‍टरांपर्यंत पोचता येत नाही, अशा ग्रामीण भागातल्या रुग्णांनाही होणार आहे. रोबोटिक्‍समुळं याआधीच शस्त्रक्रियेतली अचूकता वाढू लागली आहे. पुढच्या काळात रुग्णांच्या वैयक्तिक वैद्यकीय माहितीसाठ्यामध्ये तंत्रज्ञानामध्ये आमूलाग्र बदल होतील, ज्यामुळं वैद्यकीय क्षेत्रातली तज्ज्ञांची निर्णयक्षमता अधिक जलद आणि परिणामकारक ठरून त्याचा फायदा रुग्णांना होईल. 

मोबाईल फोन्स वैयक्तिक आरोग्यासाठीही उपयुक्त ठरत आहेत. रक्तदाब, रक्तातल्या साखरेचं प्रमाण, हृदयाचे ठोके याचं मापन करण्यासाठी स्मार्ट फोन वापरले जात आहेत. भविष्यात रुग्णाच्या शारीरिक स्थितीवर देखरेख ठेवून अचूक वेळी सतर्कतेचा इशारा देणारे अगदी सडपातळ आणि घड्याळाच्या पट्ट्याच्या आकाराचे मोबाईलही विकसित होणं दृष्टीपथात आलं आहे. 

तंत्रज्ञान 'मुळा'पर्यंत 
भारतासारख्या विकसनशील देशात शेती हा उपजीविकेचा मुख्य व्यवसाय आहे. या क्षेत्रात तर आयसीटीसारख्या तंत्रज्ञानाची गरज मोठ्या प्रमाणात आहे. शेतीच्या जुन्या पद्धती, अतिश्रम, कमी उत्पादकता, कमी मिळकत यांमुळं तरुणांना हे क्षेत्र अनाकर्षक वाटत आहे; पण आयसीटी तंत्रज्ञानामुळं शेतीचं स्वरूप बदलत आहे. या क्षेत्रात हरित क्रांतीसारखीच डिजिटल क्रांती झाल्यास लक्षणीय परिवर्तन घडू शकतं. केंद्र सरकारनं याआधीच शेतकऱ्यांना 'सॉइल हेल्थ कार्ड देऊ कले आहे. त्याच्या मदतीनं कुठल्या पद्धतीच्या मातीमध्ये कुठलं पीक चांगलं येऊ शकतं, हे कळणं सोपं झाल्यानं उत्पादकता वाढत आहे. त्यापुढं जाऊन शेतकरी वापरत असलेले ट्रॅक्‍टर्स किंवा उपकरणं मध्यवर्ती माहिती संकलन केंद्राशी जोडले जाऊ शकतात आणि मिळालेल्या माहितीसाठ्याच्या आधारे पुन्हा शेतकऱ्यांना चांगलं मार्गदर्शन या क्षेत्रातल्या तज्ज्ञांमार्फत मिळू शकतं. मोबाईलच्या साह्यानं सध्या घरबसल्या पंप सुरू करून पिकांना पाणी देता येतं. त्यासाठी रात्री-अपरात्री शेतात जायची गरज भासत नाही. हे एक प्रकारे सुरक्षेसाठीही चांगलं आहे. 

यंत्रमानवांच्या मदतीनं शेती (रोबोटिक फार्मिंग) ही नवी संकल्पना हळूहळू मूळ धरत आहे. पारंपरिक शेतीची जागा येत्या काही काळातच रोबोटिक फार्मिंग घेईल. यामध्ये मानवाच्या ऐवजी रोबोच कॉम्प्युटरच्या साह्यानं शेतातली कामं करतात. शेतातली नांगरणी, खुरपणी, कापणी, तोडणी अशी जवळपास सर्वच श्रमांची कामं वेळखाऊ आणि अधिक मनुष्यबळाची गरज असणारी असल्यानं खर्चिक ठरतात. रोबोटिक फार्मिंगमुळे वेळ आणि पैशांची बचत होईल, शिवाय किटकनाशकांची फवारणीही योग्य प्रमाणात होईल. कमी मनुष्यबळात आणि कमी शारीरिक श्रमांत ही कामं करता येणं लवकरच शक्‍य होणार आहे. यामुळं प्रत्येक रोपाकडं समान लक्ष पुरवता येईल. 

कामकाजाच्या पद्धतीत बदल 
भारतातल्या उद्योगक्षेत्रावरदेखील आयसीटी तंत्रज्ञानाचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यामुळं उद्योगाचं स्वरूप बदलत जाणार आहे. विशेषतः उत्पादन क्षेत्रातल्या रोजगारांवर त्याचा मोठा परिणाम होईल. 'रोबोटिक्‍स', 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' आणि 'इंडस्ट्री 4.0' यांसारख्या संकल्पनांचं महत्त्व अधिक वाढेल. यामुळं प्रक्रियेतली अचूकता साधणं शक्‍य होईल. पुढची दोन दशके ही 'डिसरप्शन्स'ची असतील. 'डिसरप्शन्स' म्हणजे असं नवीन तंत्रज्ञान ज्यानं त्या क्षेत्रातल्या कामकाजाच्या पद्धती बदलतात. उदाहरणार्थ, चालकरहित कारचा प्रयोग याआधीच सुरू आहे. भविष्यात मोबाईलच्या एका क्‍लिकवर आपण ही चालकरहित कार घरापर्यंत बोलवून घेऊ शकतो. कार्यालयातून घरी परतताना नोकरदार महिला मोबाईलवरून घरच्या ऑटोमॅटिक स्वयंपाक यंत्राला सूचना देऊ शकतील, परिणामी घरी पोचताच कुटुंबासाठी गरम भोजन तयार असेल. ही आता अशक्‍य कोटीतली गोष्ट राहणार नाही. 

स्वतःच निर्णय घेणारी मशिन्स 
अनेक मॉल्समध्ये किंवा हॉटेल्समध्ये आपण प्रवेश करताना आपोआप दार उघडतं आणि बंद होतं, खोलीत प्रवेशताच दिवे आपोआप सुरू होतात. नळाखाली हात धरल्यास आपोआप पाणी चालू होतं. हे सर्व सेन्सर टेक्‍नॉलॉजीच्या साह्यानं शक्‍य होतं. यामुळं श्रम, पैसा आणि ऊर्जेची बचत होते. कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशिअल इंटिलिजन्स) म्हणजे मानवासारखीच विचारक्षमता (विवेक) एखाद्या मशिनमध्ये फीड करणं. मानवी भाषा समजणं, निर्णय घेणं, भावना समजणं आणि मानवानं बोलल्यानंतर स्वतः विचार करून निर्णय घेणं. सध्या आपण मशिनला त्यानं कोणतं काम करायचं आहे ही आज्ञा देतो; पण 'आर्टिफिशिअल इंटिलिजन्स'मध्ये मशिन स्वतःच निर्णय घेतं, की त्याला पुढं काय करायचं आहे. याचं एक उदाहरण म्हणजे 'सेल्फ ड्रायव्हिंग कार.' यामुळं मानवी चुका टाळणं शक्‍य होणार आहे. यामध्येही सतत संशोधन चालू आहे. या नवीन तंत्रज्ञानांमुळं उद्योग क्षेत्रात आमूलाग्र बदल होत आहेत. माणसाचे शारीरिक श्रम कमी करत काम मात्र अहोरात्र चालू ठेवणं शक्‍य होणार आहे. 

काही वर्षांपूर्वी ओला किंवा उबर टॅक्‍सीसारख्या संकल्पनेचा विचारदेखील कुणी केला नसेल; पण आता आपल्याकडे कार नसली, तरीसुद्धा प्रवासाचा आनंद घेता येतो आणि बऱ्याच लोकांच्या दैनंदिन जीवनाचा तो भाग झाला आहे. आयसीटी तंत्रज्ञानानं जवळपास सर्वच क्षेत्रांवर प्रभाव पाडला असून, त्याचा फायदा सर्वव्यापी आहे. आगामी काळात आयसीटी सर्वच क्षेत्रांत महत्त्वपूर्ण बदल घडवून मानवाच्या कल्याणात अनन्यसाधारण भूमिका बजावेल, हे निश्‍चित. 

'सप्तरंग'मधील लेख वाचण्यासाठी क्लिक करा

Web Title: Future of information and communication technology