गणाधीश जो ईश सर्व गुणांचा

file photo
file photo

वाजतगाजत आपल्या लाडक्‍या दैवताचं आगमन झालं काल! गणपती उत्सवाची सगळेच आतुरतेने वाट बघत असतात. कारण गणपती सगळ्यांची प्रिय देवता. रूप किती लोभस! हत्तीचं डोकं, लांबच लांब सोंड, मोठ्ठं पोट, पायापाशी उंदीर आणि समोर मोदकाचं ताट. बघितल्याबरोबर चेहऱ्यावर हसू आणि हृदयात प्रेमाची भावना येते आणि तो आहे पण असाच नं "हॅप्पी गो लकी' सदा आनंदी, हसत-नाचत येणारा आणि दहा दिवसांनी परत येण्याचं वचन देऊन, मनाला हुरहूर लावून जाणारा.
गणेश चतुर्थी हा दिवस गणपतीच्या जन्माचा. गणेशाच्या जन्माची कथापण फार रोचक आहे. पार्वती माईने आपल्या अंगाला हळदीचा लेप लावला आणि मळ काढून त्याचा एक पुतळा तयार केला. त्याला सांगितलं, आई आंघोळीला जातेय, कुणाला येऊ नको देऊ बरं आत! बाळ बाहेर पहारा देत उभं राहिलं. तेवढ्यात तिकडे आले साक्षात शिव भगवान. बाळाने त्यांना दारावरच अडवलं. आत जाण्यास मनाई केली. शंकरांना आला राग! हा कोण मला अडविणारा! त्यांनी रागाने त्याचं डोकंच धडापासून वेगळं करून टाकलं. गडबड ऐकून पार्वती माई बाहेर येऊन बघते तर काय, शंकरांनी तिच्या मुलाचं शिर कापलं! ती खूप रागावली, रुसली. शंकरांनी आपल्या गणांना आज्ञा केली, उत्तरेकडे जा आणि जो पहिला प्राणी भेटेल, त्याचं डोकं कापून आणा. गण निघाले, आणि त्याना भेटलेला पहिला प्राणी, एका हत्तीचं डोकं घेऊन आले. शंकरांनी ते बाळाच्या धडाला लावलं, त्याला जिवंत केलं आणि त्याला आपल्या गणांचं मुख्य नेमलं. म्हणून त्याचं नाव झालं गणाधीश....शंकरांनी मग त्याला आशीर्वादही दिला- कुठल्याही कार्यात सर्वांत आधी तुझी पूजा होणार!!
किती साझी सरळ छान गोष्ट आहे, हो ना? पण त्यात मोठं ज्ञान लपलेलं आहे! मळ हे प्रतीक आहे अज्ञानाचं. अज्ञानातून अहं जन्म घेतो. शिरच्छेद करणे हे लाक्षणिक अर्थाने अहंचा नाश करणे होय. गणांना हत्तीचच डोकं सापडावं अशी योजना का केली शंकराने? हत्ती सर्व प्राण्यांमध्ये मोहक, डौलदार व भव्य आहे. मोठं डोकं अर्थात ज्ञान व बुद्धीचे भांडार! हत्तीच्या डोळ्यांमध्ये अपार करुणा व ममता असते. अर्थात शंकराने अहं व अज्ञानाचा नाश करून पार्वतीला अतिशय बुद्धिमान, दयाळू, करुणामय बालक भेट दिला. म्हणून आपण उत्सव साजरा करतो तो अज्ञानाचा नाश होऊन बुद्धी व ज्ञान, विवेक यांचा आगमनाचा. गणपतीचा उल्लेख वेदांमध्ये दुसऱ्या व दहाव्या मंडळात सापडतो. दहाव्या मंडळातला श्‍लोक गणपतीसूक्तात आहे व आपण त्याने या देवतेचं आवाहन करतो.

ऊँ गणानाम्‌ त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमम्‌ ।
ज्येष्ठराजं ब्रह्मणाम्‌ ब्रह्मणस्पत आ न: श्रृण्वन्नूतिभि:सीदसादनम्‌ ।।

परंतु, इथे गणपतिचा अर्थ आहे ब्रह्म. या जगाचा निर्माता. गणपती अर्थात गणांचा राजा, अर्थात या जगात जेवढ्या चल, अचल वस्तू आहेत त्यांचा ईश्वर. आपण ज्या गणपतीची पूजा करतो त्याचा प्रचुर उल्लेख पुराणांमध्ये सापडतो. प्रत्येक ग्रंथाच्या सुरुवातीला, प्रत्येक पूजेच्या आधी व कुठल्याही शुभ कामाच्या सुरुवातीला गणेशाचं वंदन केलं जातं. याशिवाय आपल्या शरीरातल्या सप्तचक्रांपैकी गणपती मूलाधार चक्राची देवता आहे. गणपतीची पूजा फक्त आपल्याच देशात नाही तर अनेक देशांमध्ये होते. भारताचे व्यापारिक संबंध पूर्वेकडे वाढायला लागले तसे बाप्पा इंडोनेशियातील बाली व जावा, कंबोडिया, मलाया, थायलॅंड व व्हिएतनामला जाऊन पोचले. इथे पण त्यांची पूजा बुद्धीची देवता आणि विघ्नहर्ता म्हणूनच केली जाते. राजस्थानच्या जैन मंदिरांमध्ये पण गणेशाची प्रतिमा आढळून येते. तसेच बौद्ध संस्कृतीतही गणेशजी "विनायक' या नावाची देवता मानले जातात. बौद्ध धर्माच्या प्रचाराबरोबरच गणपती चीन व जपानलासुद्धा गेले. एवढंच नव्हे तर गणपती अमेरिकेच्या "सिलिकॉन व्हॅली'ची आराध्य देवता आहे. "सिलिकॉन व्हॅली' हे संगणक क्षेत्र आहे. गणपती बुद्धीची देवता आणि त्यांचं वाहन उंदीर, म्हणजेच "माउस' असल्यामुळे ते संगणक क्षेत्रातसुद्धा प्रिय आहेत.

गणपतीचे निर्माण मळातून अर्थात मातीतून झाले. म्हणून गणेशमूर्ती मातीची असावी. मूर्तीची पूजा करून प्राणप्रतिष्ठा केली जाते म्हणजे त्यात देवतेला आवाहन करून स्थित व्हायला प्रार्थना केली जाते. दीड, पाच, सात किंवा दहा दिवस त्याची पूजा, आरती, नैवेद्य इत्यादींनी सेवा करून मग निरोप दिला जातो. पाण्यात विसर्जन केल्याने मूर्तीमध्ये निर्माण झालेली ऊर्जा शमते व मातीत माती मिसळून जाते. आजच्या काळात प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती मिळतात. दिसायला अतिशय आकर्षक असल्या तरी त्यांच्यामुळे पर्यायवरणाचं प्रचंड नुकसान होतं.

गणेशोत्सव प्रचलित करण्याचं श्रेय छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे. त्यांच्या काळात हा उत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा होत असे. इंग्रजांच्या काळात याचं प्रमाण कमी झालं. पुण्यात पहिला सार्वजनिक गणेशोत्सव 1892 मध्ये भाऊसाहेब लक्ष्मण जावळे यांनी केला. टिळकांनी "केसरी'त याची नोंद घेऊन जनतेला सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करायचं आवाहन केलं. त्याचं कारण होतं इंग्रजांनी 1870 मध्ये केलेला कायदा. ज्यामुळे एका जागेवर वीसपेक्षा जास्त लोकांच्या जमावाला बंदी होती. परंतु, धार्मिक कार्यक्रमांना या कायद्यातून वगळण्यात आलं होतं. टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवातून स्वातंत्र्याची चळवळ, बौद्धिक प्रवचनं, नाटक, नृत्य, ग्रामीण व इतर कलांना प्रोत्साहन मिळायला मोठा मंच प्रदान केला. सर्व जातींच्या लोकांना एकत्र आणण्याचा त्यांचा हा प्रयत्न फार यशस्वी झाला. परंतु, आज बहुतांश ठिकाणी गणेशोत्सवाचं विकृत रूप बघायला मिळते.

तर आपल्या लाडक्‍या बाप्पाचं स्वागत करूया आणि दहा दिवस त्याची उत्तम बडदास्त ठेवून, पुढच्या वर्षी परत येण्याचं वचन घेऊन त्याला निरोप देऊया! पण जलप्रदूषण, मृदाप्रदूषण व ध्वनिप्रदूषण न होऊ देता, आपल्या पर्यावरणाची काळजी घेऊनच. ती पण आपली देवताच, नाही का?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com