वाढदिवसाच्या शुभेच्छा, रेहमान!

a-r-rahman
a-r-rahman

जग तेव्हा नव्या सहस्रकाची वाट पाहत होतं.. ! आत्ता जसं आपण २०१८ गाळून थेट २०१९ मध्ये डोकावण्याची धडपड करतोय, तसंच काहीसं..!! अर्थात 'जगात काय चाल्लंय' हे ज्ञान शाळेत न देण्याच्या कालखंडात असल्यामुळे आम्हाला वर्तमानापेक्षा भूतकाळच जास्त माहीत होता.. असो..

१९९८ च्या शेवटी शेवटी टीव्हीवर 'चित्रहार' किंवा 'छायागीत'मध्ये शाहरुख खानचा एका रेल्वेवरचा डान्स भरपूर फेमस झाला होता. गाणंही ठीकठाक असावं.. 'छैय्या छैय्या' करत नाचणारा शाहरुखच जास्त भावला होता.. हितं रस्त्यावर सायकल धड न चालवता येणार्‍यांसाठी थेट चालत्या ट्रेनवर चढून नाचणारा हिरो हे ऑब्वियसली त्या काळात जास्त महत्त्वाचं होतं.. सुखविंदरसिंग मागे अव्याहतपण ओरडत असायचा आणि आम्ही शाहरुख पाहण्यात गुंग! नंतर नंतर सुखविंदरसिंगच्या त्या आवाजाचीही सवय झाली.. येकदम खरीखुरी ट्रेन चाल्ल्यासारखा भास व्हायचा.. पण आम्ही मात्र 'शाहरुखचं लाल ज्याकेट कसलं भारीये', 'छैय्या छैय्या गाण्यात एकूण बोगद्यांची संख्या किती' वगैरे गोष्टींवर तासन्तास वाया घालवायचो..!!

त्यानंतर याच पिक्चरमधलं शाहरुख-मनीषा कोईरालाचं 'सतरंगी रे' ऐकलं.. म्हणजे आधी पाहिलं, मग ऐकलं..! वेड्यासारखं दोघं नाचतायत, सोनू निगम जिवाच्या आकांतानं ओरडतोय.. कविता कृष्णमूर्ती अत्यंत गंभीर आवाजात दोन ओळी गातीये वगैरे! तेव्हाही आमचं लक्ष शाहरुखचं इकडे-तिकडे धावणं आणि क्यामेरा ('संतोष सिवन' म्हणजे कोण, हे नंतर कळालं) याकडेच होतं.. गाणंही ठीकठाक होतं.. मध्येच स्लो व्हायचं.. मध्येच फास्ट व्हायचं.. पण शाहरुख जबदरस्त..!!

'प्रेम' वगैरे गोष्टी ऐकायला आणि कळायला सुरवात झाली होती.. वर्गातल्या खिडकीतून बाहेर बघताना उगाच मागे उदित नारायणचा आवाज ऐकू यायला लागायचा.. 'ए अजनबी'सारखं गाणं ऐकलं, की आपलं प्रेमप्रकरण नसलं, तरीही उगाचच उदास व्हायला व्हायचं..! मग शाहरुख कसा त्या स्टुडिओमध्ये टक लावून बघत बसलेला असतो.. तसं काहीसं करायचा मोह व्हायचा.. पण तसा निवांतपणा कुठे मिळायला! मग परीक्षेमध्ये सगळं वातावरण शांत असताना उदित नारायणचा तो आवाज आणि ती कविता कृष्णमूर्तीची ती हाँटिंग साद आठवायची..! बाकी गाणंही ठीक होतं..!

मधली वर्षं जातात तशी गेली..! शाहरुखचा तो ट्रेनवरचा डान्स, लडाखमध्ये वेड्यासारखं उड्या मारणं आणि मानेला झटका देत भावना 'दाखवून' देणं याचं अप्रूप कमी झालं.. पण तोपर्यंत या गाण्यांची सवय लागली होती.. 'रेहमानची गाणी आधी विचित्र वाटतात.. नंतर त्यातला गोडवा जाणवतो आणि तो जाणवल्यानंतर त्यापासून दूर जाता येत नाही' असं कुणीतरी लिहिलं होतं.. खरंय ते! त्याचं एखादं गाणं तिसर्‍या-चौथ्यांदा ऐकल्यानंतर त्यापासून दूर जाऊच शकत नाही.. 'दिल से' हे त्यांचं ग्रेट उदाहरण आहे..!

जोडीला मणिरत्नम, गुलजारसारखी जगावेगळी माणसं असली, की काहीतरी वेगळंच फिलिंग येतं.. आपण आधी गाणं ऐकतो.. मग ते आवडतं.. मग पुन्हा पुन्हा ऐकतं.. मग त्याहीपलीकडे जाऊन शांतपणे गाणं अनुभवतो.. 'दिल से'तून हे समृद्ध करणारं 'अनुभवणं' दिल्याबद्दल थँक्स!

वाढदिवसाच्या शुभेच्छा, रेहमान!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com