मैत्रीचं खणखणीत नाणं

Dharmendra-Amitabh
Dharmendra-Amitabh

शम्मी कपूर, हेमामालिनी आणि राजेश खन्ना अशा त्या वेळच्या दिग्गज अभिनेत्यांना घेऊन रमेश सिप्पींनी १९७१ मध्ये ‘अंदाज’ चित्रपटापासून दिग्दर्शनातील कारकिर्दीची सुरुवात केली. लगेच १९७२ मध्ये हेमा मालिनीची दुहेरी भूमिका असलेला ‘सीता और गीता’ हा दुसरा ब्लॉकबस्टर चित्रपट त्यांनी दिला. वर्ष १९७५ उजाडलं. देशात आणीबाणीसारख्या राजकीय उलथापालथी घडत असताना हिंदी चित्रपटांच्या इतिहासात महत्त्वाची बाब घडली. अवघ्या अठ्ठावीस वर्षे वयाच्या रमेश सिप्पी या दिग्दर्शकाचा ‘शोले’ चित्रपटगृहांमध्ये झळकला. इतक्या तरुण वयात अशी कलाकृती घडविणारी प्रतिभा दुर्मीळच.

अमिताभ बच्चनसोबत रमेश सिप्पींची ही पहिलीच वेळ होती. शहरात भुरट्या चोऱ्या करत, छोटा-मोठा तुरुंगवास भोगत जगणारे दोन शहरी तरुण मित्र अर्थातच जय आणि वीरू रंगवले होते धर्मेंद्र आणि अमिताभ या कलाकार द्वयीनं. या दोन व्यक्तिमत्त्वाचं वर्णन चित्रपटातल्या सुरुवातीच्या दृश्यात ठाकूर बलदेवसिंग ‘‘ बदमाश है लेकीन बहादूर है, खतरनाक है क्योंकी लडना जानते है, बुरे है, लेकीन इन्सान है,’’ अशा शब्दांत करतो. या जोडीतील वीरू शीघ्रकोपी, भोळा आणि काहीसा वेंधळा, तर जय बुद्धिवान, धैर्यवान आणि निर्णयक्षमता अंगी असलेला असा युवक. वीरूची मैत्री भावनाप्रधान, तर जय भावनेच्या पलीकडे जाऊन, समजून उमजून निर्णय घेणारा, दोघांच्या टीमचा अलिखित प्रमुख होता. जय असं नाण वापरत असे ज्याच्या दोन्ही बाजूंना ‘हेड्स’ असायचे. जो निर्णय योग्य असेल त्याच्या बाजूने ‘हेड्स’ चा कौल मागून तो वीरूची फसगत करत असे, पण ती नेहमीच चांगल्यासाठी असायची. अशा प्रकारच्या टॉसमधून मालगाडीवरील डाकूंच्या हल्ल्याच्या प्रसंगात जखमी पोलिस अधिकारी संजीवकुमारला दवाखान्यात नेण्याचा निर्णय, ठाकूरकडून आगाऊ रक्कम घेतल्यानंतर कबूल केल्यानुसार रामगढला जाण्याचा निर्णय आणि शेवटी मित्र वीरू आणि त्याची प्रेयसी बसंतीला वाचविण्यासाठी डाकूंसोबत एकट्यानं दोन हात करत मागे राहण्याचा निर्णय, असे सगळे निर्णय जय घेतो. अर्थात, हे सत्य वीरू आणि प्रेक्षकांना सर्वांत शेवटीच उमगतं.

वीरूचा दारू पिऊन पाण्याच्या टाकीवरील मजेदार तमाशा सुरू असताना बशीतील चहाचा घोट घेत “जब दारू उतरेगी तो वो भी नीचे उतर आयेगा” असं थंडपणे म्हणणारा जय जबरदस्त विनोदबुद्धी असलेली व्यक्ती असते. वीरूकडून होणारे विनोद परिस्थितीजन्य होते, तर जयचे विनोद बुद्धिवादी असतं. “मुझे तो सारे पुलीसवालोकी सुरते एक जैसी नजर आती है,” “तुम्हारा नाम क्या है, बसंती...!,” किंवा आमराईत वीरू बसंतीची छेड काढत असताना “मैंने तो आँखे पहलेही बंद कर रख्खी है” सारखे वन लायनर्स जयच्या चरित्राची ताकद होते. तरुणपणी वैधव्य आलेल्या जया भादुरीविषयी मनात नाजूक कोपरा निर्माण झाल्यांनतर अमिताभनं विना संवाद ती अबोल कथा पडद्यावर उतरवली होती. 

“क्यों, खतरों से खेलने का शौक टूट गया ठाकूर?” किंवा “आपकी नजरों मे हम भी तो चोर, बदमाश है लेकीन इस कामके लिये आपने हमे क्यो चुना?” असे तार्किक प्रश्न उभे करणारा जय एक गंभीर व्यक्तिमत्त्व म्हणून आपल्या पुढ्यात येतो. जयच्या पात्रातील चांगुलपणा “बुराईने बंदूक चलाना सिखाया, नेकी हल चलाना सिखा देगी” ह्या वाक्यातून अधोरेखित होतं. सर्वांवर ताण केली होती ती बसंतीची मौसी लीला मिश्रा सोबतच्या जयच्या संवादानं. सुमारे तीन मिनिटांचा तो प्रसंग उत्तरोत्तर निखळ विनोदाची उंची गाठत “खानदान का पता चलतेही हम आपको खबर कर देंगे” पर्यंत येतो, तोपर्यंत त्या प्रसंगाच्या अपरिमित गुदगुल्या आपण अनुभवलेल्या असतात. आजही हे तीन मिनिटांचे दृश्य समोर आले, की दैनंदिन जीवनातले तणाव विसरायला होते.

‘शोले’ चित्रपटात प्रमुख पात्रांपैकी अष्टपैलू पात्र जयचं होतं. ‘‘अगर किसीने हिलने की कोशिश की तो भून के रख दुंगा” गब्बरच्या अड्ड्यावर दिलेल्या या दमदार धमकीबरोबरच तितक्याच भावनोत्कटतेने अमिताभनं साकारलेला मृत्यूचा प्रसंग अजरामर झाला आहे. ‘शोले’नंतर तब्बल पाच वर्षांनी आलेल्या रमेश सिप्पींच्या ‘शान’ या चित्रपटात प्रमुख कलाकारांपैकी केवळ अमिताभच असणं ही सुद्धा रमेश सिप्पींनी जयच्या अनोख्या भूमिकेत अमिताभनं केलेल्या अफलातून अदाकारीची पावतीच होती.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com