अमिताभ-ऋषीचा ‘रस्त्यावरचा धिंगाणा’

‘नसीब’ चित्रपटात आनंद बक्षी आणि लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी रचलेली सगळीच गाणी श्रवणीय होती, पण अमिताभची एन्ट्री असलेले आणि मोहम्मद रफीनं गायलेलं ‘जॉन, जानी, जनार्दन’ हे गाणे विशेष आठवणीत राहिलं.
Naseeb Movie
Naseeb MovieSakal

‘नसीब’ १९८१ मध्ये आला. अमिताभचा हा चित्रपट येईपर्यंत ‘अमर, अकबर, अँथोनी’, ‘परवरीश’, ‘सुहाग’ असा सुवर्ण महोत्सवी धुमाकूळ मनमोहन देसाई आणि अमिताभ या जोडीनं आधीच्या चार वर्षात घातला होता. मनोरंजनाचं अमिताभरूपी खणखणीत नाणं हाती लागताच देसाईंचा वारू पार उधळला होता. ‘नसीब’मध्ये काय नव्हतं? धार्मिक सौहार्द, लॉटरी लागण्याची गम्मत, खून, मारामाऱ्या, स्त्री–पुरुषांमधील कबड्डी सामना, बम्बैय्या बॉक्सिंग चे रिंगण, प्रेम , गाणी, दोस्ती आणि शेवटी वैविध्यपूर्ण पोशाखातील नृत्य. अतर्क्याची अशी जंत्री, प्रेक्षकाला आपल्यामागे फरफटत नेण्याची क्षमता असणारा अमिताभ समोर असला, की तर्कांना थारा द्यायची प्रेक्षकांना गरजच पडत नसे.

‘नसीब’ चित्रपटात आनंद बक्षी आणि लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी रचलेली सगळीच गाणी श्रवणीय होती, पण अमिताभची एन्ट्री असलेले आणि मोहम्मद रफीनं गायलेलं ‘जॉन, जानी, जनार्दन’ हे गाणे विशेष आठवणीत राहिलं. त्याचं कारण या गाण्यात राजकपूर, राजेश खन्ना, शम्मीकपूर, धर्मेंद्र, रणधीर कपूर, राकेश रोशन आणि तितक्याच नव्या जुन्या नट्या अवतरल्या होत्या. त्यांच्यासमोर वरील गाणे अमिताभनं सादर केलं आणि चित्रपटप्रेमींचे पैसे वसूल झाले.

क्लायमॅक्सला असलेलं ‘रंग जमाके जायेंगे’ हे गाणं सुद्धा गाजलं होत. यामध्ये अमिताभ, शत्रुघ्न सिन्हा आणि ऋषीकपूर यांची वेशभूषा अनुक्रमे मेटॅडोर स्पॅनिश बुलफायटर), कोझॅक (कझाक सेनानी) आणि चार्ली चॅप्लीन यांची होती. या गाण्यात शत्रुघ्नच्या नृत्य निपुणतेला (!) कंटाळून शेवटी त्याच्यासाठी ‘डुप्लीकेट वापरल्याची अफवा खूप जोरात होत्या. पण सगळ्यावर ताण केली ती ‘चल मेरे भाई तेरे हात जोडता हू’ या गाण्यानं.

मित्राखातर स्वत:वर लादून घेतलेल्या प्रेमभंगाच्या दु:खात जॉन दारू प्यायला लागतो आणि दारूच्या नशेत त्याचा पार्ट टाइम व्यवसाय असलेल्या बम्बैया बॉक्सिंग रिंग मध्ये जाउन फ़ाईट मध्ये सहभागी होतो. प्रतिस्पर्धी बॉक्सरकडून तो चांगलाच बुकलला जात असताना त्याचा धाकटा भाऊ ऋषीकपूर तिथे पोहोचतो आणि रिंगणात उतरून प्रतिस्पर्धी बॉक्सरला चोप देतो. रिंगणातील मार आणि दारूच्या नशेमुळं गलितगात्र झालेल्या अमिताभला त्या अवस्थेत घरी चलण्याचा आग्रह धाकटा ऋषीकपूर करतो आणि मुंबईच्या गल्ल्यांमधील मध्यरात्रीचा माहौल दाखविणाऱ्या मोहम्मद रफी आणि अमिताभच्या आवाजातील या सुपरहिट गाण्याची आपल्याला मेजवानी मिळते. पडद्यावरचा अट्टल दारुडा होता अमिताभ. अनेक चित्रपटांमध्ये बऱ्याच प्रसंगात त्याने दारूबाज हुबेहूब वठवला होता. अमिताभला दारू पाजण्याच्या मोहात दिग्दर्शक अनेक वेळा पडत असत. काही डोळस अमिताभप्रेमींना शंका यायची की सततच्या अशा दृश्यांमुळं अमिताभच्या अभिनयात तोच तोपणा येईल की काय. पण प्रत्येकवेळी अमिताभ दारूच्या नशेतील निराळीच अदा सादर करण्यात सफल होई आणि चाहते पुन्हा एकदा मोहरून जात .

काळी पँट, पांढरा शर्ट, खांद्यावरून उतरणारे पँटचे इलॅस्टीक सस्पेंडर, एका हातात दारू बाटली आणि गोड रीदम पकडून सुरू असलेल गाणं. मोहम्मद रफीची वैविध्यपूर्ण गायकी आणि अमिताभचा अभिनय. हे गाणं एका वेगळ्याच विश्वात प्रेक्षकांना घेऊन जातं. मनमोहन देसाईंचे बालपण मुंबईच्या गल्ल्यांमध्ये गेले होते. बॉक्सिंग रिंग, रस्त्यावरील जुने लँम्प पोस्ट, ब्रिटिश योद्ध्यांचे घोड्यावर स्वार असलेले पुतळे असं नेपथ्य त्यांच्या चित्रपटात नजरेस पडायचं. या गाण्यात अमिताभला रस्त्यावरील एका पुतळ्यावर कवायत करत एक कडवे म्हणायचं होत. त्याच्या हालचाली सोयीच्या व्हाव्या म्हणून नुसता घोड्याचा पुतळा दाखविणारे देसाई खरच अफाट होते.

गाणंभर अमिताभच्या मिन्नतवाऱ्या करून थकलेला ऋषी जेव्हा नाराज होतो, तेव्हा तोपर्यंत त्याला हिडिसपिडीस करणाऱ्या मोठ्या भावाचं प्रेम उफाळून येतं आणि ‘तू जानेमन है जानेजीगर है तेरे लीये जान भी हाजीर है’ असे अमिताभच्या आवाजात शब्द येतात. नुसती गम्मत आहे या गाण्यात. अमिताभ वजा करा आणि तिथे शून्य दिसेल अशी अनेक गाणी, असे अनेक प्रसंग अमिताभच्या उपस्थितीने कायम स्मरणात राहिले. नशेतील शिवीगाळ, बेशिस्त असूनही त्या गाण्यातून दोन भावांचं प्रेम मात्र नक्कीच दिसून आलं होत. इतकंच नव्हे तर लहान भावाचा मोठ्या भावाविषयीचा आदर आणि मोठ्याला लहानग्याचं असलेले कौतुक हे रस्त्यावरील तमाशात देखील ठळकपणे व्यक्त करण्यात अमिताभ आणि ऋषी दोघेही यशस्वी झाले होते.

(सदराचे लेखक अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटांचे अभ्यासक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com