बारामती विरुद्ध भानामती

श्रीमंत माने
बुधवार, 23 जानेवारी 2019

ऐतिहासिक लढाईची संधी
खरेतर भारतीय जनता पक्षाला एका ऐतिहासिक राजकीय लढाईची संधी आहे. गिरीशभाऊंच्या राजकीय भानामतीचा प्रयोग बारामतीवर करून पाहायला हरकत नाही. त्या निमित्ताने महाराष्ट्र एका रंजक निवडणुकीचा साक्षीदार तरी बनेल. पण, जामनेरचा घोडा अन्‌ बारामतीचे मैदान खूप दूर आहे. तिथली निवडणूक दोन वर्षांपूर्वीच झालीय. डिसेंबर २०१६ मध्ये तिथे राष्ट्रवादीने नगराध्यक्षपदासह ३९ पैकी ३५ जागा जिंकल्या. त्यामुळे गिरीशभाऊंना बरीच वाट बघावी लागेल. आता लगेच त्यांच्यापुढे खान्देश, नाशिकमधल्या लोकसभा निवडणुकीचे आव्हान आहे. 

लागोपाठ निवडणुका जिंकल्याच्या आनंदात जलसंपदामंत्री गिरीश महाजनांनी, पक्षाने आदेश दिला तर पवारांची बारामतीही जिंकू, असे म्हटले. अजितदादांनी गिरीशभाऊंना प्रतिआव्हान दिले अन्‌ राज्याला एक ऐतिहासिक निवडणूक खुणावू लागली. पण, राजकीय भानामतीची विद्या महाजनांकडे असलीच तर आधी त्यांना ती लोकसभा निवडणुकीत दाखवावी लागेल. 

आधी नाशिक, मग जळगाव अन्‌ अगदी अलीकडे धुळे या उत्तर महाराष्ट्रातील तीन महापालिका काबीज केल्यामुळे गिरीश महाजनांचा उत्साह व विश्‍वास सातवे आसमाँवर आहे. मध्यंतरी पालघर लोकसभा पोटनिवडणुकीची जबाबदारीही त्यांनी सांभाळली. शिवसेनेने दिवंगत भाजप खासदारांच्या मुलालाच उमेदवारी दिलेली असूनही काँग्रेस सरकारमध्ये राज्यमंत्री राहिलेले राजेंद्र गावित भाजपचे खासदार बनले. स्वत:च्या जामनेर नगरपालिकेत सर्व २५ जागांवर विजय सोडला, तर उरलेल्या निवडणुका गिरीशभाऊंनी प्रतिकूल परिस्थितीत जिंकल्या. ते नाशिकचे पालकमंत्री आहेत. पण इथे शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुलनेत भारतीय जनता पक्ष तसा कधीही बलवान नव्हता.

शहरात तीन आमदार मोदी लाटेत निवडून आले इतकेच. जळगावमध्ये भाजपची ताकद चांगली असली तरी पहिल्यांदाच एकनाथ खडसे केंद्रस्थानी नव्हते. धुळ्यात अनिल गोटे यांनीच बंडाचे निशाण फडकविले. डॉ. सुभाष भामरे, गिरीश महाजन आणि जयकुमार रावल या केंद्र व राज्यातल्या तीन मंत्र्यांना आव्हान दिले. थोडक्‍यात महाजनांकडे जणू नगरपालिका, महापालिका निवडणूक जिंकण्याची भानामतीसारखी विद्या आहे की काय, असे वाटण्याजोगे हे विजय आहेत. त्याचा त्यांना आनंद वाटणे स्वाभाविक. म्हणूनच हरेक निवडणूक निकालावेळी विजयी मिरवणुकीत मंत्रिपदाचा डौल बाजूला सारून कार्यकर्त्यांबरोबर नाचणारे गिरीश महाजन, हे छायाचित्र वर्तमानपत्रांत असतेच असते. असा विजयांचा जोश फुल्ल असताना एकाक्षणी गिरीशभाऊंना आता पक्षाने आदेश दिला तर थेट बारामती नगरपालिकाही जिंकू, असे वाटून गेले. 

ज्या जळगावात महाजनांनी हे विधान केले तिथल्या राष्ट्रवादीच्या मंडळींनी तो दावा हसण्यावारी नेला. कुणाचीच प्रतिक्रिया नव्हती. चार दिवसांपूर्वी निर्धार परिवर्तन यात्रेत स्वत: अजित पवार जळगावात गिरीशभाऊंवर बरसले. बारामती जिंकतो का, ये बघतोच, अशा त्यांच्या खास स्टाईलमध्ये प्रतिआव्हान दिले. त्यानंतर राष्ट्रवादीतले अजितदादांचे चाहते महाजनांवर तुटून पडले. गोष्ट बारामती नगरपालिकेची होती, विधानसभेची नव्हती, हे विसरून दादांच्या विरोधात डिपॉझिट वाचवून दाखवा, तोंडाला डांबर फासू, वगैरे पत्रकबाजी नाशिकच्या पुरुषोत्तम कडलगांपासून पुण्याच्या रूपाली चाकणकरांपर्यंत सुरू आहे. तरीही, लोकशाहीत कोणी तहहयात सत्तेवर नसते. पक्षाने आदेश दिला तर बारामती जिंकण्याची जबाबदारी आपण स्वीकारू, अशा शब्दांत गिरीशभाऊ आव्हानावर ठाम आहेत.   

क्रमाने शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्या रूपाने बारामती आणि पवार या ५० वर्षांच्या समीकरणावर वेगळे सांगण्याची गरज नाही. एकदा सुनील पोटे यांनी मिळविलेला नगराध्यक्षपदाचा विजय वगळला तर गेली कित्येक दशके बारामती नगरपालिकेवर पवारांचीच सत्ता आहे. बारामतीचे लोक राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांचा दावा सतत सांगत असतात, की लोकसभा निवडणुकीवेळी नरेंद्र मोदींनी बारामतीत सभा घेतली असती तर आपण लोकसभेत पोचलोच असतो. पण, त्यानंतर पाचच महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी, ९ ऑक्‍टोबर २०१४ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बारामतीत जंगी प्रचारसभा घेतली. काका-पुतण्यांचे साम्राज्य उखडून टाकण्यासाठी मतदारांना कौल मागितला. परिणाम हा झाला की १५ ऑक्‍टोबरच्या मतदानात अजित पवारांनी तब्बल दीड लाख मते घेऊन बाळासाहेब गावडे यांचा विक्रमी ९० हजारांच्या फरकाने पराभव केला. 

ऐतिहासिक लढाईची संधी
खरेतर भारतीय जनता पक्षाला एका ऐतिहासिक राजकीय लढाईची संधी आहे. गिरीशभाऊंच्या राजकीय भानामतीचा प्रयोग बारामतीवर करून पाहायला हरकत नाही. त्या निमित्ताने महाराष्ट्र एका रंजक निवडणुकीचा साक्षीदार तरी बनेल. पण, जामनेरचा घोडा अन्‌ बारामतीचे मैदान खूप दूर आहे. तिथली निवडणूक दोन वर्षांपूर्वीच झालीय. डिसेंबर २०१६ मध्ये तिथे राष्ट्रवादीने नगराध्यक्षपदासह ३९ पैकी ३५ जागा जिंकल्या. त्यामुळे गिरीशभाऊंना बरीच वाट बघावी लागेल. आता लगेच त्यांच्यापुढे खान्देश, नाशिकमधल्या लोकसभा निवडणुकीचे आव्हान आहे. 

नगरसह उत्तर महाराष्ट्रातील आठपैकी सहा खासदार भाजपचे, तर नाशिक आणि शिर्डीचे खासदार शिवसेनेचे आहेत. धुळ्याचे खासदार व संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे वगळता तर इतरांच्या लढाईची सुरवात उमेदवारीपासूनच आहे. काँग्रेसकडून एकनाथ खडसे यांना जवळ करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्या खासदार स्नुषा श्रीमती रक्षा यांच्या उमेदवारीचा फैसला त्यावर अवलंबून आहे. जळगावचे ए. टी. पाटील आणि दिंडोरीचे हरिश्‍चंद्र चव्हाण यांच्याऐवजी नवा चेहरा दिला तरच भाजपला आशा बाळगता येईल. नंदुरबारमध्ये गावित कुटुंब दोलायमान मन:स्थितीत असल्याचे बोलले जाते. छगन भुजबळ केवळ व्यक्‍ती म्हणून आखाड्यात उतरलेत असे नाही. जुनी खुमारी पुन्हा त्यांच्या भाषणांमध्ये परतल्याचे लोक अनुभवताहेत. भाजप त्यांनी थेट अंगावर घेतलाय. दिंडोरीत त्यांनी धनराज महालेंना कौशल्याने शिवसेनेतून राष्ट्रवादीत आणले. गेल्या वेळी लढलेल्या डॉ. भारती पवार यांना उमेदवारीची शक्‍यता धूसर आहे. त्यामुळे नाशिकमधून भुजबळांच्या स्नुषा शेफाली यांना उतरविण्याचा विचार असेल तर एकाच जिल्ह्यात दोन महिला उमेदवार देण्यातला पेच आपोआप सुटला आहे. ही आव्हाने पेलल्यानंतरच महाजनांना बारामतीकडे निघता येईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Girish Mahajan challenge to Ajit Pawar contest election in Baramati