संगीतच आपुले बलस्थान! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Oscar Award 2023

‘नाटू नाटू’च्या यशाने भारतीय सिनेमाची स्ट्रेंथ ही संगीतात आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

संगीतच आपुले बलस्थान!

- गिरीश वानखेडे

‘नाटू नाटू’च्या यशाने भारतीय सिनेमाची स्ट्रेंथ ही संगीतात आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. दक्षिणेतील तेलुगू चित्रपटांनी मातीशी नाळ जोडत स्थानिक संस्कृतीचा गोडवा असणारी गाणी तयार करून ऑस्कर जिंकण्याची किमया साधली आहे. संगीत आणि नृत्य हे भारतीय चित्रपटांचा आत्मा आहेत. ‘नाटू नाटू’ पूर्वी २००९ मध्ये ‘स्लम डॉग मिलेनियर’ चित्रपटातील ‘जय हो’ गाण्याला याच श्रेणीत पुरस्कार मिळाला होता. या दोन्ही गाण्यांच्या यशावरून जगभरातले प्रेक्षक भारतीय चित्रपटांना त्यातील गाणी आणि नृत्यामुळेच जास्त पसंत करतात, हे अधोरेखित झाले आहे.

भारताला ओरिजनल साँग श्रेणीत ऑस्कर पुरस्कार मिळाल्याने एक गोष्ट सिद्ध झाली ती अशी की, ज्या प्रकारात आजकाल आपला परफॉर्मन्स ॲव्हरेज किंवा त्याहीपेक्षा कमी दर्जाचा असल्याचे आपण मान्य करत होतो, त्याच संगीत आणि नृत्य क्षेत्रात जागतिक स्तरावर सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या पुरस्कारावर आपण आपले नाव कोरले आहे. संगीत क्षेत्रात आजकाल आपण काहीही ग्रेट करत नाही, असे मानण्याचे कारण म्हणजे गेल्या आठ ते १० वर्षांत भारतीय चित्रपट संगीताचा दर्जा रोजच खालावत चालला आहे. कोविडनंतर जसजसा ओटीटीचा जम बसत चालला, तसतसे भारतीय चित्रपट संगीत आपली पत गमावू लागले आहे. ओटीटीने तर सिनेमाची लांबीदेखील घटवून दोन ते सव्वादोन तासांवर आणली आहे.

आता इतक्या थोड्या वेळात कथा फुलवणे आणि सोबतच चांगली गाणी देणे, मोहक पदन्यास सादर करणे कसे शक्य आहे? मग अशा स्थितीत हिट गाणी, म्युझिकल डान्स नंबर येणार कुठून? नाही म्हणायला बंदिश बॅंडिट, कला, शेरशहा असे अपवादात्मक संगीतप्रधान चित्रपट तयार झाले आहेत, ज्यामुळे अजूनही भारतीय चित्रपट संगीत जिवंत आहे, असे वाटते. अशा वेळी मातीचा सुगंध असलेल्या, एम. एम. किरवानी यांच्या स्वरसाजाने नटलेल्या, कालभैरव आणि राहुल सिपलीगंज यांच्या स्वरातील तसेच प्रेमरक्षितच्या पदलालित्यामुळे आकर्षक बनलेल्या ‘नाटू नाटू’ या भारतीय गीताने जगाला भुरळ घातली. या गाण्याला जेव्हा ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात स्टॅंडिंग ओवेशन मिळते आणि एक गाणं जेव्हा देशाला ऑस्कर मिळवून देते तेव्हा कुठे आपण भारतीय मान्य करतो की, आपले संगीत आणि नृत्य ग्रेट होते. खरे तर सध्याच्या काळात भारतीय चित्रपटांनी उच्च दर्जाच्या नृत्य आणि संगीतापासून फारकत घेतली आहे. कधी काळी संगीतप्रधानता हीच भारतीय चित्रपटांची ओळख होती, हे आपण विसरत चाललो आहोत, ही खेदाची बाब आहे.

भारतीय चित्रपट जेव्हापासून बोलू लागला तेव्हापासूनच त्यामध्ये गाणी आहेत. सन १९३१ मध्ये प्रदर्शित झालेला पहिला बोलपट ‘आलम आरा’ यामधील ‘दे दे खुदा के नाम पर’ हे भारतीय चित्रपटातील पहिले गाणे आहे. भारतीय प्रेक्षकांचे गाण्याचे वेड जाणूनच सन १९३२ मध्ये प्रदर्शित ‘इंद्रसभा’ या चित्रपटात तब्बल ७२ गाणी घातली होती. ३० आणि ४० च्या दशकात भारतात अंदाजे ९०० ते १००० चित्रपट तयार झाले आणि या प्रत्येक चित्रपटात सरासरी १० गाणी होती. या दोन्ही दशकांमध्ये गाणे गाऊ शकणाऱ्या अभिनेत्यांना प्राधान्य दिले जात असे. के. एल. सहगल तुम्हाला चटकन आठवले ना! हा काळ गाजवला तो पंकज मलिक, सरस्वती देवी, खेमचंद प्रकाश, रायचंद बोराल या संगीतकारांनी.

भारतीय चित्रपट सृष्टीने ५० आणि ६०च्या दशकात संगीताचा सुवर्णकाळ अनुभवला आहे. हा काळ होता नौशाद, सचिन देव बर्मन, ओ. पी. नय्यर, मदन मोहन, सी. रामचंद्र, शंकर जयकिशन, वसंत देसाई, अनिल बिस्वास, गुलाम हैदर, हुस्नलाल भगतराम, सलील चौधरी, रोशन, रवि, चित्रगुप्त, एन. दत्ता, खय्याम, जयदेव यांसारख्या दिग्गज संगीतकारांचा, ज्यांनी प्रत्येक भारतीय मनाला सूरांच्या सरींनी चिंब भिजवले होते. या काळात चित्रपटाच्या पोस्टरवर नायक-नायिकेसह संगीतकाराचा फोटो छापला जाण्याचा मान नौशाद यांना मिळाला होता. हाच तो काळ होता जेव्हा प्रेक्षक चित्रपट पाहायला जायचे ते केवळ संगीतासाठी. बैजु बावरा, बसंत बहार, बरसात, मधुमती, गाईड, मुघल ए आझम, लीडर, कोहिनूर, राम और शाम असे अनेक चित्रपट आपल्याला आजही आठवतात ते फक्त त्यामध्ये असलेल्या गाण्यांमुळेच! विश्वजीत, प्रदीपकुमार, भारतभूषण यांसारख्या हिरोंना प्रेक्षकांनी सहन केलं ते त्यांच्यावर चित्रित झालेल्या एकाहून एक कर्णमधुर गाण्यांमुळेच!

७०च्या दशकात भारतीय चित्रपट संगीताला आधुनिकतेची जोड मिळाली. या काळात आर. डी. बर्मन, लक्ष्मीकांत प्यारेलाल, बप्पी लहरी, कल्याणजी आनंदजी, राजेश रोशन आणि इतर अनेक संगीतकारांनी संगीतामध्ये नवनवे प्रयोग केले. याच काळात भारतीय चित्रपटात महानायक अमिताभ बच्चनची एंट्री झाली होती. हाच तो काळ होता जेव्हा भारतीय चित्रपट संगीतात पाश्चिमात्य संगीताने आपला प्रभाव दाखवायला सुरुवात केली होती.

८० आणि ९० च्या दशकात भारतात अनेक प्रेमकथांची निर्मिती झाली. आपल्या प्रेमकथा गाण्यांशिवाय अपुऱ्या असतात म्हणून प्रेक्षकांनाही अनेक सुश्राव्य गाणी ऐकायला मिळाली. ९०चा काळ होता जतन ललित, नदीम श्रवण, अन्नु मलिक, आनंद राज आनंद या संगीतकारांचा.

२००० नवीन शतक सुरू झाले आणि एकंदरीतच भारतीय चित्रपट संगीताचा ओहोटीचा काळ सुरू झाला. या काळात जुन्या कर्णमधुर गाण्यांची मोडतोड करून रिमिक्स करण्याचा रिवाज सुरू झाला. २०१०च्या दशकात संगीताचा दर्जा आणखीनच खालावला. २०२२ पर्यंत हे पतन सुरूच आहे. आता तर गाणे नसलेल्या चित्रपटांची निर्मिती होऊ लागली आहे. आजकाल गाणी पाहतो कोण? असा प्रश्नदेखील विचारला जाऊ लागला आहे. कधी काळी आपल्या चित्रपटाचा आत्मा असलेले नृत्य आणि गाणी आता चित्रपटातून गायब होऊ लागली. ओटीटीच्या आगमनामुळे डार्क चित्रपटांचेही प्रमाण वाढले. याच प्रकारचे चित्रपट सिनेमागृहातदेखील प्रदर्शित होऊ लागले. तीन-चार संगीतकारांनी एका चित्रपटामध्ये संगीत देण्याचा प्रकार याच काळात सुरू झाला. नंतर तर प्रत्येक गाण्यासाठी वेगवेगळा संगीतकार बोलवण्याची पद्धत सुरू झाली.

एकाच चित्रपटात पाच-सहा संगीतकारांनी एकमेकांशी ताळमेळ न साधता तसेच पटकथा व्यवस्थित न समजून घेता संगीत दिल्यामुळे गाण्यांचा दर्जा घसरतच गेला. अशा अनेक चुका संगीत क्षेत्रात घडत गेल्या. या काळात ॲक्शन चित्रपट, सस्पेन्स चित्रपट, भयपट तयार करण्याचे प्रमाण वाढले आणि सोबतच अशा चित्रपटांमध्ये गाण्यांची गरज नाही, असा समज पसरवण्यात आला. त्यामुळे भारतीय चित्रपटातून संगीत समाप्त होईल की काय, अशी स्थिती निर्माण झाली. या लोकांना कदाचित ‘बीस साल बाद’ हा सस्पेन्स चित्रपट होता याचा विसर पडला असावा किंवा सस्पेन्स चित्रपट असूनही त्यात गाणी होती, याचा विसर पडला असावा. सस्पेन्स प्रकारात मोडणाऱ्या चेहरे पे चेहरा, गुमनाम, कब क्यूँ कहां, सावन भादो, अनिता या सर्व चित्रपटात गाणी होती आणि त्या काळात ती प्रचंड गाजलीदेखील होती. शोले, शान यासारख्या ॲक्शन चित्रपटातील गाणी तर लोक आजही गुणगुणतात.

पूर्वी चित्रपटसृष्टीत संगीत निर्माण करणारे गट होते. जसे की राजकपूर नेहमी शैलेंद्र यांच्याकडून गाणी लिहून घ्यायचे आणि शंकर जयकिशन यांच्यासोबत त्या गाण्यांना चाली लावायचे; तर देवानंद आपल्या चित्रपटातील गाणी एस. डी. बर्मन यांच्याकडून तयार करून घ्यायचे. साहीर लुधियानवी, कवी प्रदीप, मजरुह सुलतानपुरी, आनंद बक्षी, हसरत जयपुरी, गुलजार, कैफी आझमी, जावेद अख्तर, शकील बदायुनी, निदा फाजली, नीरज या महान गीतकारांनी चित्रपट संगीतात मोठे योगदान दिले आहे.

मागच्या काही वर्षांत चांगले संगीत असलेला चित्रपट येऊन गेला तो म्हणजे सलमान खानचा पहिला ‘दबंग’. हा चित्रपट ॲक्शनने भरपूर असूनदेखील यातील गाणी आजही लोकांना आठवतात. याचे कारण म्हणजे या चित्रपटात खरोखरीच गायक असलेल्या सोनू निगम, श्रेया घोषाल यांनी गाणी गायली होती, म्हणूनच ती स्मरणीय झाली होती. या काळात उगाच केस वाढवून आणि गाण्यांचे बोल इंग्रजीत लिहून घेऊन गाणी म्हणणाऱ्यांचा बोलबाला वाढला होता. ‘नाटू नाटू’च्या यशाने मात्र या सर्व लोकांचे समज-अपसमज मोडीत काढून भारतीयांची स्ट्रेंथ कशात आहे हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. त्यामुळे चित्रपट संगीताच्या अधोगतीला कारणीभूत असलेले लोक भारतीय चित्रपट संगीत ग्रेट असल्याचे वरकरणी मान्य करत आहेत. या लोकांनी गेल्या एक-दोन दशकांत आपण चित्रपट संगीतासाठी काय केले, याचे सिंहावलोकन करणे आवश्यक आहे.

बॉलीवूड चांगले चित्रपट तयार करण्यात माहीर असेलही; पण संगीतात मात्र पिछाडीवर आहे. या उलट दक्षिणेतील तेलुगू चित्रपटांनी मात्र मातीशी नाळ जोडत स्थानिक संस्कृतीचा गोडवा असणारी गाणी तयार करून ऑस्कर जिंकण्याची किमया साधली आहे. दाक्षिणात्य चित्रपटांनी नेहमीच चित्रपटांशी इमान राखले आहे. या चित्रपटांनी आपली लार्जर दॅन लाईफ इमेज जपत मातीशी नाळ जोडणारी गाणीदेखील दिली आहे. जागतिक स्तरावर भारतीय चित्रपटांची वेगळी ओळख आहे ती चित्रपट संगीत आणि नृत्य यामुळेच. संगीत आणि नृत्य हे भारतीय चित्रपटांचा आत्मा आहेत. प्रयोगाच्या नावाखाली जर कोणी हा आत्माच हिरावून घेणार असेल तर कसे चालेल?

‘नाटू नाटू’ पूर्वी २००९मध्ये ‘स्लम डॉग मिलेनियर’ चित्रपटातील ‘जय हो’ या गुलजार लिखित आणि ए. आर. रहमान यांचे संगीत असलेल्या गाण्याला याच श्रेणीत पुरस्कार मिळाला होता. या दोन्ही गाण्यांच्या यशावरून हे लक्षात येते की जगभरातले प्रेक्षक भारतीय चित्रपटांना त्यातील गाणी आणि नृत्य यामुळेच जास्त पसंत करतात. म्हणूनच आपणही आपली ही खास ओळख दूर लोटू शकत नाही. आपण हॉलीवूडच्या चित्रपटांना कॉपी करत त्यांच्याप्रमाणे दोन तासाचे, गाणी नसलेले चित्रपट तयार करणे चुकीचे आहे. ‘नाटू नाटू’ने मिळवलेले यश हे संपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टीचे आणि त्यातील संगीताचे आहे. या संगीताचा उगम हिंदी चित्रपटसृष्टीपासून झाला आहे, हे बॉलीवूडने कायम लक्षात ठेवले पाहिजे. सोबतच चित्रपट संगीताची धुरा वाहून नेण्याची जबाबदारीदेखील बॉलीवूडने तितक्याच तत्परतेने पाळली पाहिजे.

(लेखक प्रसिद्ध चित्रपट समीक्षक आहेत.)