अभिनेत्यांचा नाच आणि नाचण्याचा अभिनय... Girls Actors dance Bharatanatyam or Kathak | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिलीप कुमार

अभिनेत्यांचा नाच आणि नाचण्याचा अभिनय...

मला आयुष्यात एका गोष्टीची नेहमीच खंत वाटत आलेली आहे आणि ती गोष्ट म्हणजे, मला नीट नाचता येत नाही. माझा पाच वर्षांचा नातू माझ्यापेक्षा खूप चांगलं नाचतो. माझ्या लहानपणी आमच्या घरामध्ये नाचणं हा एक चांगल्या संस्कृतीचा भाग असं मानलं जात नव्हतं.

अर्थात, आपल्या मुलींना भरतनाट्यम किंवा कथ्थक शिकवलं जायचं आणि त्याबद्दल अभिमान असायचा; पण मुलांना प्रोत्साहन दिलं जात नसे. आता माझी सून नातवाला नाच शिकायला पाठवते, तो नाचताना आम्ही त्याचं कौतुक करतो.

राजकुमार या नटाला काही वेळेला नाच करायला लावलंय. जेव्हा तो नाचला ना, तेव्हा माझ्या लक्षात आलं की, त्यापेक्षा वाईट कोणीही नाचू शकत नाही. ‘दिल अपना और प्रीत पराई’ नावाचा सिनेमा पहा, म्हणजे मी काय सांगतो ते तुम्हाला त्यात कळू शकेल.

‘अंदाज मेरा मस्ताना’ आणि त्यापेक्षा गमतीदार ‘तेरा दिल अब मेरा ओ साजना’ या दोन गाण्यांत दोन्ही मिळून दोन मिनिटंही तो नाचला नसेल; पण करमणूक होते. ते पाहून प्रभुदेवानं कायमचा नाच सोडला असता. मुळात रोमान्स त्याच्या अंगात नव्हता,

त्याला नाच शिकवणं म्हणजे इंग्लिश न येणाऱ्या माणसाला लॅटिन शिकवणं. दिलीप कुमार हा काही अंगात लय असलेला नट नव्हता, तो कष्टानं नाचायचा, आपला नाच चांगला व्हावा यासाठी प्रयत्न करायचा. उदाहरणार्थ - ‘संघर्ष’मधलं ‘मेरे पैरों में घुंगरू बंधा दे तो फिर मेरी चाल देख ले’ किंवा ‘नया दौर’मधलं ‘उडे जब जब...’

गरिबांचा दिलीप कुमार म्हणजे राजेंद्र कुमार. त्याचं गाणं म्हणजे अंडर आर्म बॉलिंग. कधी ओव्हर द विकेट, कधी राउंड द विकेट. ‘संगम’मध्ये ‘ये मेरा प्रेमपत्र’ गाण्याला त्याने बॉलिंग टाकू नये म्हणून राज कपूरने त्याच्या हातात वैजयंतीमाला हिचा पदर दिला.

राज कपूरच्या अंगात मात्र लय होती. एखाद्या गाण्यात, मग ते ‘दिल का हाल सुने दिलवाला’ असो, किंवा ‘श्री ४२०’मधील ‘मुड मुड के ना देख’ असो. अशा गाण्यांमधून त्याच्या अंगातली लय कळायची. पण, तरुणाईला नाचायला लावलं ते मास्टर भगवान यांनी. तो सिनेमा होता ‘अलबेला’ आणि त्यातलं ते गाणं ‘नाम बडे और दर्शन खोटे.’

सितारादेवीला नाचताना पाहून ते नाच शिकले. ते फक्त त्यांचं वरचं अंग लयबद्धपणे हलवायचे आणि हाताच्या अतिशय लयबद्ध अशा हालचाली करायचे. त्या हालचाली फार मोठ्या नसायच्या; पण त्यांना नाचताना पाहणं खूप मस्त वाटायचं आणि त्या प्रकारचा नाच आपणही करू शकतो, अशी आपली भावना व्हायची.

एकदा राज कपूर भगवानदादांना भेटले आणि त्यांनी सांगितलं, ‘‘मी तुमच्या नाचाची कॉपी करण्याचा प्रयत्न करतो.’’ कमल हासनच्या गुरूनं त्याला सांगितलं, ‘‘मुंबईला जाशील तेव्हा भगवानदादांना नक्की भेट, नाचातल्या चार गोष्टी शिकशील.’’ अमिताभ बच्चनचा नाच बघितला तर त्यात तुम्हाला भगवानदादांचा नाच सापडेल.

त्यांनी भगवानदादांच्या स्टाइलचा खूप सुंदर उपयोग करून स्वतःची अशी एक स्टाइल निर्माण केली. त्या काळामध्ये किशोर कुमार हा एक स्वयंभू असा डान्सर होता, तो सर्वांगाने नाचायचा; पण त्याची इतरत्र कुठेही शाखा नव्हती. त्याला कॉपी करणं अत्यंत कठीण होतं.

माझ्या पिढीला त्या काळात शम्मी कपूरचा नाच आवडत होता. आता आम्ही त्याला कदाचित नाच म्हणणार नाही. तो शरीरात कुठंही, कसाही वाकायचा, काही करायचा आणि त्याच्या आळोखेपिळोख्यांनासुद्धा नाच म्हणायची एक स्टाइल होती. तो इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करत होता आणि आम्ही त्याला नाच समजायला लागलो.

मग जितेंद्रची कवायत आली आणि आमची पिढी त्या कवायतीला नाच समजायला लागली. राजेश खन्नाला नाच कधी जमला नाही. ज्याला आपण आज नाच म्हणतो, तो नाच ऋषी कपूरने दाखवला. ऋषी कपूर हा कपूर असल्यामुळे त्याच्या अंगात ती कपूरची लय होती.

आजचा प्रत्येक नट नाच शिकून येतो. मात्र, तरी सनी देवल, जॅकी यांना कधी नाच जमला नाही. पण अनेक नट चांगलं नाचतात. रणवीर आणि हृतिक तर गेल्या जन्मी नाच शिकल्यासारखं नाचतात. शाहरुखसारखा नट म्हणतो, ‘‘मला नाचताना खूप टेन्शन येतं.’’ सिनेमातल्या नाचाचं प्रतिबिंब समाजावर पडलं. बंदिस्त समाज अधिक मोकळा झाला. आता आनंद उत्सव, लग्न समारंभ नाचाशिवाय होत नाही.

नाचासाठी सडपातळ शरीर हवं, ही अंधश्रद्धा आहे. दक्षिणेचे नट काही वेताच्या छडीसारखे नाहीत, ते झाडाच्या बुंध्याशी सलगी करणारे; पण नाचतात भन्नाट. त्यांना पाहून मी थोडा सुधारलोय. ‘पप्पू कान्ट डान्स साला’ हे माझ्यासाठी आता अर्धसत्य आहे. संधी मिळाली की, मी जमेल तेवढं अंग हलवतो, बॅकलॉग भरून काढतो.

बऱ्याच गोष्टींची स्फूर्ती आपल्याला सिनेमातून मिळते. त्यावेळेला सिनेमामधून ही स्फूर्ती फारशी मिळायची नाही. कारण असं होतं की, सिनेमात त्यावेळेला नट्या कथ्थक किंवा भरतनाट्यमवर आधारित नाच करत, किंवा टिपिकल फोक डान्स आणि कॅब्रे डान्ससुद्धा असे; पण पुरुष डान्सर्स हे सिनेमात हिरो नव्हते, गाताना जी ॲक्शन करतील तोच डान्स.

(लेखक चित्रपट व क्रीडाक्षेत्राचे अभ्यासक आहेत. या दोन्ही विषयांवर त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत.)