मुलांना द्या आत्मविश्‍वास

मुलांना द्या आत्मविश्‍वास

बालक-पालक
व्यक्तिमत्त्व विकासाचा आणि आत्मविश्‍वासाचा अतूट संबंध आहे. आत्मविश्‍वास हा व्यक्तिमत्त्व विकासाचा कणा आहे. तो कसा मिळवावा... कसा जोपासावा? मुळात एखाद्याकडे आत्मविश्‍वास का नसतो? त्याची अनेक कारणं असू शकतात; पण एक महत्त्वाचं कारण म्हणजे बालवयात झालेले संस्कार. जन्माला आल्यापासून ते बालवाडीत जाईपर्यंत मुलं घरातच असतात आणि पूर्णपणे पालकांच्या ताब्यात असतात. त्या वेळी पालक आपल्याला सारख्याच सूचना करत असतात. ‘हे करू नकोस, ते करू नकोस,’ असा स्वरूपाच्या. त्या तशा आपल्या हिताच्या, म्हणजेच मुख्यतः सुरक्षिततेसाठी असतात. पण त्या नकारात्मक सूचना मेंदूत रुजून बसलेल्या असतात. हळूहळू कळू लागल्यावर, मोठं झाल्यावर आपण त्यांच्यावर पुन्हा विचार करून वागायचं असतं. पण काही वेळा पालकांच्या धाकदपटशामुळे मुलं बालवयातल्या नकारात्मक सूचनांच्या प्रभावातून बाहेर पडत नाहीत. स्वतः विचार करून आता आपण काय करायला हवं, हे ठरवू शकत नाहीत. बालवयात काही गोष्टींची भीती बसलेली असते. ती प्रयत्नपूर्वक दूर केली गेली नाही तर मुलं भित्रीच राहतात.

तशातच पालकांनी ‘तुला हे जमणार नाही, तू मूर्ख आहेस!’ असं सतत बजावलं असल्यास मुलांत (मोठं होऊनही) आत्मविश्‍वास नसतो. काही वेळा पालकांकडून बुद्धू आहेस का रे तू? असा कसा रे अगदीच घळा तू? असं पोटतिडीकीनं म्हटलं जातं, पण त्याचा परिणाम प्रतिकूलच होत असल्यानं ही पोटतिडीक आवरणंच शहाणपणाचं ठरतं! आत्मविश्‍वासासाठी सर्वांत महत्त्वाचा असतो तो आत्मस्वीकार. आपण जसे आहोत, त्याचा बिनशर्त व उमदेपणानं केलेला स्वीकार. आपलं रंग, रूप, उंची या गोष्टी आपल्या हातात नसतात. तेव्हा त्यांचा मुलांना सहजपणे स्वीकार करायला हवा. लाल बहाद्दूर शास्त्री बुटके होते, तरीही देशातील सर्वोच्च पदावर पोचू शकले. जया भादुरीला उंची नव्हती तरीही ती आघाडीची अभिनेत्री होऊ शकली. स्मिता पाटीलनंही अभिनय क्षेत्रात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं...

पालकांनी मुलांना ही उदाहरणं द्यायला हवीत. मात्र त्याचवेळी ज्या गोष्टी बदलणं आपल्या हाती असतं, त्या गोष्टी बदलण्यासाठी मुलांना उद्युक्त करायला हवं. त्या प्रयत्नांत त्यांची साथ देऊन त्याचा आत्मविश्‍वास उंचावण्याचा प्रयत्न करायला हवा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com