साध्या, भावोत्कट कथांना पसंती (महेश बर्दापूरकर)

goa-iffi
goa-iffi

गोव्यात झालेला ४७वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) या वर्षी अनेक अर्थांनी संस्मरणीय ठरला. महोत्सवाचा दहा दिवसांवरून आठ दिवसांवर आणलेला कालावधी, चित्रपटांची वाढवलेली संख्या आणि त्यामुळं सकाळी आठपासून रात्री दोनपर्यंत चालणारे खेळ, नोटाबंदीमुळं प्रेक्षकांची घटलेली संख्या आणि महोत्सवाच्या कॅंपसबाहेर भरलेल्या जत्रेमुळं सिनेरसिकांबरोबरच पर्यटकांची झालेली चंगळ या विशेष बाबी ठरल्या. 

आंतरराष्ट्रीय स्पर्धेत जोरदार टक्कर
या श्रेणीत जगभरातल्या १५ चित्रपटांमध्ये स्पर्धा असते आणि त्यातल्या सर्वोत्तम चित्रपटाला पुरस्कारानं सन्मानित करण्यात येतं. यंदाही या प्रकारांमध्ये मोठी स्पर्धा होती. बाजी मारली ती इराणच्या रेझा मिरकरीमी दिग्दर्शित ‘डॉटर’ या चित्रपटानं. कथा आणि मांडणीतल्या वेगळेपणासाठी इराणच्या चित्रपटांकडं प्रेक्षक अपेक्षेनं पाहतात आणि ती अपेक्षा यंदा ‘डॉटर’नं पूर्ण केली. इराणमधल्या एका छोट्या शहरांत घडणारी ही गोष्ट. कॉलेजमध्ये शिकणाऱ्या सेतहेर या आपल्या मुलीला धाकात ठेवणारा, तिला कोणतंही स्वातंत्र्य नाकारणारा बाप आणि त्याला नकळत आव्हान देणाऱ्या मुलीच्या नात्यातला हळवा कोपरा उलगडणारी ही कथा. सेतरेहला उच्च शिक्षणासाठी कॅनडामध्ये निघालेल्या आपल्या वर्गमैत्रिणीच्या पार्टीसाठी तेहरानला जायचं असतं; मात्र, वडील नेहमीप्रमाणं नकार देतात. घरच्या इतरांना विश्‍वासात घेत ती विमानानं तेहरानला पोचते. मात्र, पार्टीवरून परतताना ती तिथंच अडकते. चिडलेले वडील मोटारीतून तेहरानकडं निघतात. या दोघांची तिथली भेट, वडिलांचं तिच्यावर चिडणं, सेतरेहचं पुन्हा गायब होणं आणि त्यानंतर घडलेल्या कौटुंबिक नाट्याची अत्यंत हळवी गुंफण चित्रपटामध्ये करण्यात आली. चित्रपटाचा खूप वेगळा आणि हळवा शेवट प्रेक्षकांना भावला. सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीच्या ‘सुवर्ण मयूरा’बरोबरच मिरकरीमी यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, तर वडिलांची भूमिका साकारणाऱ्या फरहाद अस्लानी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाल्यानं ‘डॉटर’नं हॅटट्रिक साधली.   

‘पर्सनल अफेअर्स’ हा महा हज दिग्दर्शित इस्राईलचा चित्रपट ‘डॉटर’च्या खूप जवळ जाणारा होता. एकत्रित कुटुंब विभक्त झाल्यानंतर नात्यांमध्ये आलेला तणाव आणि त्यातून बाहेर पडण्याची प्रत्येकाचीच धडपड चित्रपटात मांडण्यात आली. कुटुंबाचे कर्ते पुरुष आणि त्यांच्या पत्नीत अनेक वर्षांच्या सहवासानंतर कटुता आली आहे. त्यांचा एक मुलगा घरापासून दूर राहतो आहे. त्यानं लग्न न करण्याचा निर्णय घेतला असला तरी, त्याची प्रेयसी लग्नासाठी आग्रही आहे. वयस्कर दांपत्याची मुलगी गरोदर आहे, तर गॅरेज चालवणाऱ्या तिच्या पतीला चित्रपटात काम मिळण्याची शक्‍यता निर्माण होते. प्रत्येक नात्याला पीळ बसला असून, काहींना त्यातून सुटायचं आहे, तर काहींना कायमचं जोडलं जायचं आहे. ही कोंडी कशी फुटते, याचं चित्रण खुसखुशीत विनोदाच्या आधारे करण्यात आलं. गंभीर विषयाची हलकीफुलकी मांडणी आणि खुमासदार संवादांमुळं चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. 

नातेसंबंधांवरच बेतलेल्या ‘अकॉर्डिंग टू हर’ या अमेरिकन चित्रपटानं प्रेक्षकांना आपलंसं केलं. करिअर आणि पालकत्व या विषयाचे अनेक कंगोरे या चित्रपटात उलगडून दाखविण्यात आले. आंतरराष्ट्रीय पियानोवादक व्हेरोनिका प्रसिद्धीच्या शिखरावर असताना मूल झाल्यानं वादन सोडते आणि पूर्णवेळ मुलासाठी देते. या निर्णयामुळं तिला नवरा, नातेवाईक आणि मित्रांचे टोमणे खावे लागतात. मुलाला जन्मापासून बाहेर ठेवणारी तिची मैत्रीण, लग्न न करता करिअरवर लक्ष देणारी नवऱ्याची मैत्रीण आणि सतत छोट्या मुलामागं फिरणारी शेजारीण यांच्या माध्यमातून दिग्दर्शकानं पालकत्व या विषयाच्या अनेक पैलूंवर चर्चा केली. छायाचित्रण, संगीत आणि अभिनय या सर्वच आघाड्यांवर जोरदार कामगिरी केली, तरी पुरस्कारांच्या बाबतीत चित्रपट दुर्दैवीच ठरला. ‘नेली’ या कॅनडाची अभिनेत्री व लेखिका नेली अरकनच्या जीवनावरच्या चित्रपटातील भावनांच्या कल्लोळानं प्रेक्षकांना अंतर्मुख केलं. लोकप्रियतेच्या शिखरावर असताना वाममार्गाला लागल्यानं हिंसेचा सामना करावा लागलेल्या नेलीनं वयाच्या तिसाव्या वर्षी हा प्रवास पुस्तकरूपानं जगासमोर आणला. या आत्मचरित्रानं उत्पन्नाचे विक्रम मोडले. मात्र, प्रत्येक यश तिच्या जीवावर उठलं आणि शेवटी ३६व्या वर्षी तिनं आपलं आयुष्य संपवलं. मेलिन मॅके या अभिनेत्रीनं साकारलेल्या या आव्हानात्मक भूमिकेला दाद मिळाली. याच स्पर्धेतल्या ‘स्कार्ड हर्टस्‌’ या जर्मनीच्या चित्रपटानंही प्रेक्षकांना अंतर्मुख केलं. ही १९३७मध्ये घडलेली सत्यकथा. ऐन तारुण्यात एमानुएला पाठीच्या मणक्‍याच्या दुर्धर आजारानं ग्रासलं आहे आणि घरापासून दूर एका रुग्णालयात तो बिछान्याला खिळून आहे. जिंदादिल प्रवृत्तीचा हा तरुण छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये जीवनाचे विविध रंग शोधतो. बिछान्यावर पडलेले अनेक मित्र त्याला मिळतात. वेदनेवर मात करीत आयुष्याला हसत सामोरं जाण्याचं बळ तो सर्वांना देतो. जगण्याचं तत्त्वज्ञान शिकवणारे प्रेरणादायी संवाद, क्रिस्टिन निकोलसचा अभिनय, कलादिग्दर्शकानं उभा केलेला १९३७चा काळ आणि संगीत या जमेच्या बाजू ठरल्या. 

या श्रेणीतला ‘द लाँग नाइट ऑफ फ्रांसिस्को सॅक्‍टिस’ हा चित्रपट त्याच्या वेगळ्या मांडणीमुळं लक्षात राहिला, तर कोरियाच्या ‘द थ्रोन’नं बहारदार चित्रणामुळं वाहवा मिळवली. रशियाचा ‘द स्टुडंट’, तुर्कस्तानचा ‘राऊफ’ या चित्रपटांनीही ‘डॉटर’ला जोरदार टक्कर दिली. भारताचे संस्कृतमधील ‘इष्टी’ व बंगालीमधील ‘सहज पाथेर गप्पो’ या चित्रपटांनाही प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. 

सिनेमा ऑफ वर्ल्ड
या श्रेणीमध्ये अफगाणिस्तानवरच्या दोन चित्रपटांनी सर्वाधिक दाद मिळवली. ‘काबुलीवूड’मध्ये शब आणि सिकंदर या तरुणांनी देशात सिनेमा पुन्हा रुजावा यासाठी केलेल्या प्रयत्नांची सत्यकथा मांडण्यात आली. तालिबान्यांनी देशातली सगळी चित्रपटगृहं तीस वर्षांपूर्वी नष्ट केली. त्याला विरोधासाठी हे उच्चशिक्षित तरुण देशात पुन्हा सांस्कृतिक चळवळ उभी करण्यासाठी प्रयत्न करतात, मात्र शबचा भाऊ तिला यापासून रोखू पाहतो. त्यांनी उभं करण्यास सुरवात केलेलं थिएटर जाळून टाकतो. सिकंदरही घरच्यांच्या विरोधामुळं अडचणीत सापडतो, मात्र देशातल्या निडर कलाकारांच्या मदतीनं या केंद्रात सिनेमा आणि मनोरंजनाचे कार्यक्रम सुरू होतात. चित्रपटाचे दिग्दर्शक लुईस मेउनीर यांनी प्रदर्शनानंतर प्रेक्षकांशी संवाद साधताना अफगाणिस्तानात चित्रण करताना आलेले थरारक अनुभव कथन केले. अफगाणिस्तानवरीलच ‘वूल्फ अँड शीप’ या सहरबानो सादत दिग्दर्शित चित्रपटामध्ये देशातील खेड्यांत राहणाऱ्या नागरिकांची दुरवस्था चित्रित करण्यात आली. शिक्षण नसल्यानं गुरांमागं फिरणारी मुलं आणि बालवयातच लग्न करून बाहेर पडण्याची स्वप्नं पाहणाऱ्या मुली यांचं अंगावर शहारे आणणारं चित्रण चित्रपटात आहे. 

फ्रान्सच्या ‘पौला’ या चित्रपटामध्येही भावभावनांचा उत्कट खेळ मांडण्यात आला. पौला बेकर या चित्रकार तरुणीला आपल्या कलेतलं वेगळेपण उमगलं आहे, मात्र इतरांच्या ते लक्षात येत नाही. ओटो हा विख्यात चित्रकार तिचं वेगळेपण ओळखतो, मात्र कलाविश्‍व तिला पूर्णपणे नाकारतं. पौला अज्ञातवासात जाते आणि मानसिक संतुलन हरवून बसते. काळ बदलतो आणि तिचं वेगळेपण जगाला उमगते. ही सत्यकथा मांडताना दिग्दर्शक क्रिस्टियन शोकोहोव यांनी निसर्ग आणि चित्रकलेची घातलेली सांगड दाद देणारी ठरली. 

‘इनव्हर्जन’ या बेहनाम बहजादी दिग्दर्शित इराणी चित्रपटात मुलीला करिअर आणि आयुष्याचे निर्णय घेण्याच्या बाबतीत गृहीत धरलं जातं, हे सर्वत्र दिसणारं चित्र मांडलं गेलं. तेहरानमध्ये राहणाऱ्या निलोफरला याचाच सामना करावा लागतो. मोठा भाऊ वडिलांचा व्यवसाय सांभाळत वेगळा राहत असल्यानं आईची जबाबदारी निलोफरवर येते. त्यातच शहरात वाढलेल्या प्रदूषणाचा आईला त्रास होतो आणि डॉक्‍टर त्यांना शहराबाहेर हलवण्यास सांगतात. भाऊ ही जबाबदारी टाळतो आणि त्यामुळं निलोफरवर करिअर, मित्र, आशा-आकांक्षा गुंडाळून ठेवत बाहेर पडण्याची वेळ येते. मात्र, एका महत्त्वाच्या क्षणी ती सगळी बंधनं झुगारून देत संघर्षाचा पवित्रा घेते. निलोफरचं अतिशय ताकदीनं उभे केलेलं पात्र, तेहरानची प्रदूषित हवा दाखविणारं चित्रण आणि वेगवान मांडणीमुळं चित्रपटानं वाहवा मिळवली.

दक्षिण कोरियाच्या ‘टाइम रेनेगादेस’ची कथा १९८३मध्ये सुरू होते. हवान आणि यून यांचं लग्न ठरलेलं असतं, मात्र हवानला भविष्यात घडणाऱ्या घटना दिसू लागतात. संभाव्य दुर्घटना टाळण्याचा प्रयत्न करूनही हवान आणि यून यांच्यासह अनेकांना प्राण गमवावे लागतात. कथा २०१५मध्ये येऊन पोचते व एक गुप्तहेर गनवू याला तीस वर्षांपूर्वी घडलेल्या घटनांचे संदर्भ स्वप्नात दिसू लागतात. त्यातून मोठ्या कारस्थानाचा उलगडा होतो. चित्रपटाचं वेगळं कथानक आणि मांडणीनं प्रेक्षकांना गुंतवून ठेवलं.
‘इनर सिटी’ हा या श्रेणीतला आणखी एक वेगळा चित्रपट. कॉलेजमध्ये शिकणारी आरजू पियानोच्या क्‍लासच्या शिक्षिकेच्या मुलाच्या प्रेमात पडते. राफेल करबखच्या युद्धात लढलेला माजी सैनिक असून, त्याचं वय आरजूच्या दुप्पट आहे. आरजूच्या आईला हे संबंध मान्य नाहीत, तर आरजूला पारंपरिक पद्धतीनं जगण्यात कोणताही रस नाही. युद्धातील एका घटनेमुळं कायम अपराधी भावनेनं जगणाऱ्या राफेलला परिस्थितीच भान आहे. आरजूची राफेलबरोबर जाण्याची तयारी असली, तरी भविष्याचा विचार करत तो प्रेमाचं बलिदान देतो. हा चित्रपट युद्धाचे प्रसंग, अझरबैजानमधील निसर्गाचं दर्शन आणि पियानोच्या सुरावटींमुळं प्रेक्षकांची मने जिंकून गेला. 

‘बेंच सिनेमा’ आणि ‘संगम’
‘बेंच सिनेमा’ या मोहंमद रहमानियन दिग्दर्शित इराणी चित्रपटामध्ये जगभरातले गाजलेले चित्रपट तोंडपाठ असलेल्या एका व्हिडिओ बेंचवर उभा राहून संपूर्ण चित्रपट एकपात्री सादर करण्याची कला तो आत्मसात करतो आणि त्याला देशभर प्रसिद्धी मिळते. देशातल्या न्यायव्यवस्थेवर बोचरं भाष्य करत आणि जगभरातल्या सिनेमाचा इतिहास उभा करत चित्रपट छान मनोरंजन करतो. राजकपूरच्या ‘संगम’ या चित्रपटातील एक प्रसंग हा कलाकार सादर करताना दाखवला असून, भारतीय प्रेक्षकांनी त्याला जोरदार प्रतिसाद दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com