રાહુલ ગાંધી આવ્યા છે

Gujrat Elections Rahul Gandhi Congress Profile Writes Sachin Nikam
Gujrat Elections Rahul Gandhi Congress Profile Writes Sachin Nikam

રાહુલ ગાંધી આવ્યા છે (राहुल गांधी आले आहेत) होय हे गुजरातीमधून का, असा प्रश्न पडला असेल तर त्याला कारणही तसेच आहे. देशातील सर्वांत जुना राजकीय पक्ष काँग्रेसचा नवा अध्यक्ष हा खऱ्या अर्थाने गुजरातनेच पारखला असून, गुजरातमध्ये मिळालेली लोकप्रियता नरेंद्र मोदींसारख्या गुजराती माणसासमोर राहुल गांधी हा सक्षम पर्याय म्हणून उभा राहण्यास पुरेशी ठरली आहे. गुजरात विधानसभा निवडणुकांच्या धामधुमीतच काँग्रेसचे यशस्वी चाल करत अध्यक्षपदाच्या निवडणुकांचा कार्यक्रम उरकला अन् राहुल गांधींची ताजपोशी करून टाकली. 2014 च्या लोकसभा निवडणुकीसह त्यानंतर काही राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राहुल गांधींना अपयश मिळाले असूनही काँग्रेसने गांधी घरण्यावरील विश्वास कायम ठेवला आहे. त्याला काँग्रेसमधून कोणी आव्हान देईल असेही नाही.

प्रचाराची धुरा हाती

गुजरात, हिमाचल प्रदेश निवडणुकीत राहुल गांधी प्रचाराची धुरा पूर्णपणे आपल्या हातात घेऊन नेतृत्व सिद्ध करण्यास सुरवात केली. या दोन्ही राज्यांत त्यांना मिळालेला प्रतिसाद पाहता राहुल यांचे नेतृत्वगुण परिपक्व होत असल्याचे दिसून आले. युवक, महिला आणि शेतकरी या तीन घटकांना लक्ष्य करत राहुल यांनी प्रचाराचा धडाका लावला. साधारण महिनाभरापूर्वी त्यांनी सुरु केलेली नवसर्जन यात्रा ही कमालीची लोकप्रिय ठरली. थेट लोकांपर्यंत पोहचून प्रश्न जाणून घेण्याचे त्यांचे कसब पूर्वीपासूनचे आहे. त्याचाच वापर त्यांनी गुजरातमध्ये करत पीडितांच्या भेटी घेऊन प्रश्न जाणून घेतले. याचीच धास्ती म्हणून की काय भाजपला अखेर राहुल गांधी आता पूर्वीचे राहिले नाहीत, याची जाणीव झाली असावी. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री यांच्यासह भाजपशासित राज्यांतील मुख्यमंत्र्यांनी प्रचारात थेट सहभाग घेत गुजरातची निवडणूक प्रतिष्ठेची बनविली. या निवडणुकीत झालेल्या प्रचाराचा विचार केला, तर आपल्याला चांगलेच आठवत असेल विकास गांडो थयो छे या वाक्याने विरोधकांनी भाजपच्या 22 वर्षांच्या सत्तेला हादरा दिला होता. याच मुद्द्यावर मोदींनीही विकासाच्या मुद्यावरून सुनावले होते. तोच विकास मागे पडून थेट पाकिस्तानपर्यंत प्रचारातील विषय पोचले. त्यामुळे भाजपच्या फौजेसमोर एकटे लढणाऱ्या राहुल गांधींची दखल घ्यावी लागणे आणि त्यांच्या भाषणाला होत असलेली गर्दीचा घेतलेला धसका हा भाजपसाठी झटकाच होता.

सोशल मीडिया उलटवला

काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत देशभरातून 89 प्रस्तावकांनी राहुल गांधी यांचेच नाव सुचविले. 16 डिसेंबरला राहुल गांधी यांनी पक्षाचा पदभार स्वीकारला तरी 47 वर्षे वयाच्या राहुल गांधींपुढे आपली युवा इमेज कायम ठेवून वरिष्ठ नेत्यांना संभाळून नेण्याचीही जबाबदारी असेल. लहानपणापासून घरात राजकारण पाहत आलेल्या राहुल गांधींनी प्रत्यक्षात राजकारणात पाऊल ठेवले ते देशात काँग्रेस सत्तेत असताना 2007 मध्ये. काँग्रेसचे महासचिव म्हणून पक्षात प्रवेश करणाऱ्या राहुल गांधींकडे 2013 मध्ये पक्षाच्या उपाध्यक्षाची जबाबदारी आली. त्यानंतर लगेचच पुढील वर्षी 2014 मध्ये मोदींसारख्या तगड्या व्यक्तीसमोर राहुल गांधी प्रचारात उतरले. या निवडणुकीत काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. यासाठी कारणे विविध असली तरी राहुल गांधींना अपयशाला सामोरे जावे लागले हे नक्की. त्यानंतरही विधानसभा निवडणुकांमध्ये पराभव हा काँग्रेसला स्वीकारावा लागला. पण, आता परिस्थिती बदलली असून, ज्या सोशल मीडीयापासून काँग्रेस दूर होती आणि भाजप त्याचा प्रभावी वापर करत होती, तोच सोशल मिडीया राहुल गांधी आणि काँग्रेसची इमेज सुधारण्यासाठी सेतू ठरला आहे. गेल्या वर्षभरात राहुल गांधी सोशल मीडीयावरून आपली इमेज तयार करण्यात यशस्वी ठरले आहेत. त्यांची हीज इमेज याच माध्यमातून विरोधकांकडून बदनाम करून ठेवली होती. आज याचाच वापर राहुल गांधी करताना दिसत आहेत.

पक्षांतर्गत निर्णयाची बदलली पद्धत
काँग्रेसकडे वरिष्ठ नेत्यांची फौज असून, नव्या नेत्यांना मिळणारी संधी ही नगण्य आहे. सोनिया गांधी यांचा 19 वर्षांचा अध्यक्षपदाच्या कार्यकाळाचा अस्त होत असताना काँग्रेसमध्येही अमूलाग्र बदल होताना दिसत आहेत. 2014 च्या निवडणुकीत आपल्या बेताल वक्तव्यांनी प्रसिद्ध झालेल्या दिग्विजयसिंहसारख्या दिग्गज नेत्याकडे पद ठेवले तरी बेताल वक्तव्यांपासून त्यांना रोखले. त्याचऐवजी रणदीप सुरजेवाला, अजय माकन, ज्योतिरादित्य शिंदे, सचिन पायलट यासारख्या युवा नेत्यांना काँग्रेसचे व्हिजन आणि भाजप सरकारच्या निर्णयांना लक्ष्य करण्यासाठी पुढे आणले. याचे ताजे उदाहरण म्हणजे मणिशंकर अय्यर या वरिष्ठ नेत्याने मोदींबद्दल नीच हा शब्द वापरल्याने तत्काळ त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. परंपरागत काँग्रेसमध्ये असे धडाक्यात निर्णय घेणे हे राहुल गांधींच्या नेतृत्वाची चुणूकच आहे. गुजरातमध्ये प्रचाराची पातळी घसरूनही, विरोधकांकडून वैयक्तिक टीका होऊनही राहुल गांधी यांनी आपल्या सर्व नेत्यांना खडसावत पंतप्रधानांबद्दल अपशब्द उच्चारणे योग्य नसल्याची तंबीच दिली. धोरण, निर्णय याबद्दल टीका करा पण वैयक्तिक टीका करणे योग्य नाही ही राहुल गांधी यांनी घेतलेल्या भूमिका पाहता खरंच काँग्रेस बदललंय याची जाणीवच होते.

भविष्यात अनेक आव्हाने
चार वर्षे उपाध्यक्षपदाचे काम पाहिल्यानंतर राहुल गांधींना आता अध्यक्ष म्हणून आपली छाप पाडावी लागेल. यासाठी त्यांच्यासमोर सर्वांत मोठे आव्हान असेल ते 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीचे. या निवडणुकीत खासदारांची संख्या वाढविण्याचे आणि सत्तेपर्यंत पुन्हा पोहचण्याचा भीम पराक्रम राहुल गांधींना करावा लागणार आहे. अवघ्या बोटांवर मोजता येईल इतक्या राज्यांमध्ये सत्ता असलेल्या काँग्रेसला विधानसभा निवडणुकांमध्ये यश मिळवून देण्याचीही जबाबदारी त्यांच्यावर असेल. त्यासाठी त्यांना सुरवातीला आपली टीम सक्षम बनविण्यास सुरवात केली पाहिजे. नवी कार्यकारिणी, प्रदेशाध्यक्षांची निवड करताना वरिष्ठांचा आदर आणि युवा नेत्यांना संधी देणे जिकरीचे ठरणार आहे. यावरून मोदी, शहा यासारख्या तगड्या नेत्यांना टक्कर देण्यासाठी राहुल गांधींना बळ मिळणार आहे. याबरोबरच घराणेशाहीचा शिक्का पुसण्याची संधीही त्यांच्याकडे आहे. आपल्या कर्तृत्वावर काँग्रेसला उंचीवर नेऊन ठेवण्याचे काम त्यांना आपल्या आजी व आईकडून प्रेरणा घेऊन करावे लागणार आहे.

विरोधी पक्षांकडून मारून ठेवण्यात आलेले अनेक शिक्के पुसण्यात राहुल गांधींना यश आले असले तरी आपल्या नेतृत्वात काँग्रेसचा धर्मनिरपेक्षतेचा नारा त्यांना जपावा लागणार आहे. गांधी कुटुंबातून पाचव्यांदा ते अध्यक्ष झाले असले तरी भारताला प्रगतीपथावर नेण्याचे काम याच कुटुंबाच्या नेतृत्वात झालेले आहे. याचाच वारसा पुढे चालविण्यासाठी राहुल गांधींकडे हातात हात मिळवत काँग्रेसला यश मिळवून देण्याची जबाबदारी असणार आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com