#HappyBdayDrNarlikar आकाशाशी नाते जोडणारा माणूस!

डॉ. प्रकाश तुपे
गुरुवार, 19 जुलै 2018

विख्यात शास्त्रज्ञ, व्याख्याते डॉ. जयंत नारळीकर यांचा आज ८० वा वाढदिवस. त्यांना उत्तम आरोग्य लाभो आणि प्रेरणेचा हा तारा तरूण शास्त्रज्ञ, संशोधकांसाठी सतत उजळत राहो, या सदिच्छा.

जागतिक कीर्तीचे खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचा आज ८० वा वाढदिवस. कुतूहलापायी आकाशाशी नाते जोडणाऱ्या या शास्त्रज्ञाचे पाय मात्र जमिनीवर घट्ट आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील लोभस पैलूंना सुहृदाने दिलेला उजाळा.

जयंतराव नारळीकरांकडे पाहिलं की मी चकित होतो. त्यांच्या बुद्धिवैभवाचे मोजमाप करायला आकाशातील ग्रह-नक्षत्रांची वजनमापे आणायला लागतील. दोन ध्रुवांचा तराजू उभा करावा लागेल.

खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकरांबाबत मराठी माणसाच्या मनातील ही भावना प्रसिद्ध इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे यांच्या या शब्दांत नेमकी व्यक्त झाली आहे. ५३ वर्षांपूर्वी मी या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या शास्त्रज्ञाला पाहिले. ‘जयंत नारळीकर या भारतीय युवकाने खगोलशास्त्रात फार मोठा शोध लावला आहे,’ असे वृत्त प्रसिद्ध झाले. हा युवक भारतभेटीवर आला असल्याचे त्यात म्हटले होते. मोठ्या उत्सुकतेने आम्ही काही शालेय विद्यार्थी त्यांना पाहण्यासाठी नि ऐकण्यासाठी ‘फर्ग्युसन’मध्ये गेलो. अॅम्फी थिएटरचा परिसर गर्दीने फुलून गेला होता. कसाबसा प्रवेश मिळाला. स्टेजवरील सुटाबुटातील त्या तरुणाच्या चेहेऱ्यावरील निर्व्याज, लोभस भाव आजही लक्षात आहेत.

‘‘ट्‌विंकल ट्‌विंकल लिटल स्टार, हाऊ आय वंडर व्हॉट यू आर’’, या बालगीताने सुरवात करीत त्यांनी श्रोत्यांना जिंकून घेतले. पुढे तासभर अस्खलित इंग्रजीत आपल्या संशोधनाचे मर्म त्यांनी विशद केले. अर्थात, त्या वेळी ते भाषण आम्हा मुलांच्या डोक्‍यावरून गेले. मात्र, तेव्हापासून मी या खगोलशास्त्रज्ञाच्या प्रेमात पडलो. त्यांना भेटावे, जमल्यास त्यांची स्वाक्षरी मिळावी, असे वाटत होते. मात्र, कार्यक्रम संपल्यानंतर, त्यांच्या भोवतालची बड्या लोकांची गर्दी पाहून माझी इच्छा अपुरीच राहिली आणि नारळीकरांना प्रत्यक्ष भेटण्यासाठी आणखी २५ वर्षे वाट पाहावी लागली. 
डॉ. नारळीकर १९६३-६४ च्या सुमारास प्रा. फ्रेड हॉयेल यांच्याबरोबर मांडलेल्या गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतामुळे प्रसिद्धीच्या झोतात आले. बराच काळ ‘केंब्रिज’मध्ये रमला व नंतर १९७० मध्ये मुंबईच्या ‘टीआयएफआर’मध्ये आल्याचे समजले.

अधूनमधून त्यांच्याविषयीच्या बातम्या व त्यांचे मराठीतील सुबोध लेख येऊ लागले. असा हा शास्त्रज्ञ पुण्यात येऊन खगोलशास्त्राच्या संशोधनासाठीचे केंद्र स्थापणार, असे समजल्यावर माझ्यासह अनेक आकाशनिरीक्षकांना आनंद झाला. ‘आयुका’ची इमारत पूर्ण होण्याअगोदर विद्यापाठीतील गोळे बंगल्यातील दोन खोल्यांमध्ये ‘आयुका’चे कार्यालय थाटले होते. कालांतराने मी पुण्यातील हौशी आकाशनिरीक्षकांच्या ज्योतिर्विद्या परिसंस्थेचा कार्यवाह झालो. त्यामुळे माझे ‘आयुका’त जाणे-येणे वाढले. या काळात एका महान खगोलशास्त्रज्ञाच्या स्वभावाचे व त्यांच्या वागणुकीचे अनेक पैलू पाहावयास मिळाले. बाहेरून अतिशय गंभीर व कडक वाटणारे नारळीकर काहीसे लाजरेबुजरे व विनोदी स्वभावाचे असल्याचे जाणवले. त्यांच्या आवडत्या विनोदी लेखकांचा म्हणजे पी. जी. वुडहाउस व पु. ल. देशपांडे यांच्या पुस्तकांचा त्यांच्यावर मोठा पगडा आहे. घड्याळाच्या काट्याबरोबर आपले कार्यक्रम ते पार पाडतात. कधीही ते वेळ वाया घालवत नाहीत. विशिष्ट कामाशिवाय त्यांना भेटता येत नाही व भेटीची वेळ संपल्यावर ते तुम्हाला तशी जाणीव करून देतात. एकदा मी आकाशवाणीसाठीच्या मुलाखतीकरिता त्यांच्याबरोबर होतो. मुलाखतीची वेळ संपल्याबरोबर त्यांनी आकाशवाणीच्या अधिकाऱ्याला सांगितले, ‘‘ठीक आहे, एवढी मुलाखत पुरेशी आहे.’’

एखादे काम वेळेतच व्हावे याबद्दल त्यांचा कटाक्ष असतो. ‘आयुका’च्या इमारतीचे बांधकाम चालू असताना एक कॉन्ट्रॅक्‍टर काहीबाही कारणे देऊन सांगितलेले काम पूर्ण करत नव्हता. नारळीकरांनी त्याच्यावर न ओरडता स्वतःच हातात फावडे, घमेले घेतले. ‘आयुका’च्या जागी पूर्वी मोठमोठी झाडे असलेली शेती होती. ‘आयुका’च्या बांधकामासाठी नारळीकरांनी कुठलेही झाड तोडले नाही, तर काही झाडे मूळ जागेवरून हलवून दुसरीकडे लावली. विद्यापीठातून ‘आयुका’कडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा प्लॅस्टिकचा कचरा पाहून एके दिवशी त्यांनी स्वतःच पोते घेऊन कचरा उचलावयास सुरवात केली. त्यांनी कचरा उचलतानाच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यावर विद्यापीठ प्रशासन खडबडून जागे झाले. लोकांकडून काम करवून घेण्याची त्यांची ही आगळी-वेगळी पद्धत. 

विज्ञान सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचावे, यासाठी ते सतत धडपड करीत असतात. निरनिराळ्या वर्तमानपत्रांत, मासिकांमध्ये लेख व पुस्तके लिहून विज्ञानप्रसाराचे काम ते अव्याहतपणे करीत आहेत. पुणेकरांना परदेशातील प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञांचे विचार ऐकावयास मिळावेत म्हणून त्यांनी त्यांची भाषणे पुण्यात आयोजित केली. आपल्या सहकाऱ्यांना, विद्यार्थ्यांना व विशेषतः माझ्यासारख्या हौशी आकाशनिरीक्षकांना जगप्रसिद्ध शास्त्रज्ञांबरोबर संवाद करण्याची संधी ते कटाक्षाने देतात. याचमुळे नोबेल पारितोषिक विजेते डॉ. चंद्रशेखर, डॉ. हॉयेल, डॉ. पेनरोज यांच्याबरोबर मला वेळ घालवता आला. हौशी आकाशनिरीक्षकांना मदत करण्याचा वसाच त्यांनी घेतलेला दिसतो. भारतभरच्या आकाशनिरीक्षकांना एकत्र आणण्याचे काम त्यांनी ‘ज्योतिर्विद्या’च्या माध्यमातून एकत्र परिषद भरवून केले होते. ‘आयुका’मध्ये दर शनिवारी शालेय विद्यार्थ्यांना बोलावून त्यांना भाषणे व प्रात्यक्षिकाद्वारे विज्ञानाची गोडी निर्माण करण्याचे काम नारळीकर करीत आहेत. हे काम करताना अंधश्रद्धा निर्मूलनाचे कामही ते जोमाने करतात. इतर अनेक सन्मानांबरोबरच डॉ. नारळीकरांना यूएसए फाउंडेशनचा ‘स्टार ऑफ इंडिया’चा किताब दिला गेला. असा हा ध्रुवाप्रमाणे अढळ असणारा ‘स्टार’ सर्वसामान्यांना विविध उपक्रमांद्वारे विज्ञानाची गोडी लावीत आहे. आज त्यांच्या ८० व्या वाढदिवशी, त्यांचे उर्वरित आयुष्य सुखासमाधानाचे व खगोलशास्त्रीयदृष्ट्या भरभराटीचे जावो, हीच साऱ्यांची प्रार्थना आहे.

Web Title: HappyBdayDrNarlikar Indian astrophysicist Jayant Narlikar birthday