अजिबात नाही! नाही व्हायचं मला 'या' देशाची मुलगी!

हर्षदा कोतवाल
Sunday, 1 December 2019

- तिनं ओरडायचा प्रयत्न नक्कीच केला असणार, पण तिचा आवाज दाबला गेला.

तिनं ओरडायचा प्रयत्न नक्कीच केला असणार, पण तिचा आवाज दाबला गेला. तिच्या गळ्याभोवतीचे हात घट्ट होत गेले. तिच्या भोवतीचे कृर हास्य वाढत गेले आणि तिचा आवाज बंद होत गेला. जर कुणी ऐकणारच नसेल तर, या आवाजाचा उपयोग तरी काय? जीव सोडताना हेच वाटलं असेल का तिला?

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

आता ती गेल्यावर आम्ही सगळे मेणबत्त्या घेऊन बाहेर पडू, मुक मोर्चे काढू, तिला निर्भयासारखं आणखी काहीतरी नाव देऊ, ती किती शूर होती याचे गुणगाण गाऊ. मी म्हणते ती शूर नव्हतीच. स्वत:चं काम संपवून वेळेत घरी जाणाऱ्या मुलीनं शूर असण्याची गरजच काय? स्वत:च्या हक्काचं आयुष्य जगणाऱ्या मुलीनं शूर असण्याची गरजच काय? आता तिलाही कोणतं तरी शूर नाव देण्याआधी मला सांगायचंय की, आमच्यापैकी कोणालाच भारताची मुलगी व्हायचं नाहीये.

तुम्हाला तुमची मुलगी भारताची मुलगी व्हावी असं वाटतं नाहीये. अशा देशात जिथं मुलीशी जनावरांपेक्षा घाण वागलं जातं त्या देशाची मुलगी होण्यात मला काहीही रस नाही. 'बेटी बचाओ बेटी पढाओ' का? तुम्हाला समानता हवीये तर मुलींना इंजिनिअर बनवा, डॉक्टर बनवा, का? कारण हे फेमिनिझम आहे. हे खरचं फेमिनिझम आहे का? काय करायचं त्या शिक्षणाचं जे तिचा जीव वाचवू शकलं नाही? ती डिग्री तिच्या सेफ्टीचं लेबल घेऊन आली नाही. ती डिग्री तिला रात्री कामावरुन घरी जाताना वाचवू शकली नाही.

भाजपच्या सापळ्यातून सुटका; शिवसेैनिकांना बळ

आमच्याकडे पुरुषांना महिलांबाबत शून्य शिक्षण दिलं जातं. आमचं शरीर, आमची मासिक पाळी, आमचं सत्व याबाबत पुरुषांना काहीही घेणं देणं नसतं. घेणं असतं ते फक्त आमच्या शरिरातून त्यांना मिळणाऱ्या दिडदमडीच्या सुखाशी, कृर समाधानाशी आणि त्यांच्या या निर्लज्ज वृत्तीची लाज ना त्यांना आहे, ना आमच्या देशाला. माझ्या देशात आम्ही नेहमी फक्त एक मुलगी, एक बायको आणि एक आई असतो, आम्ही कधीच एक माणूस नसतो. याच जागी जर एखादा मुलगा असता तर त्यांनी त्याला लुटलं असतं, मारलं असतं पण त्याच्यावर बलात्कार करुन त्याला जाळलं नक्कीच नसतं. का? कारण तो मुलगा आहे, त्याच्याकडे फक्त 'ते' दोन अवयव नाहीत जे आमच्याकडे आहेत. एवढाच काय तो फरक.

आमच्याकडे पुरुष 'हवस के पुजारी' आहेत आणि त्यांना मुलगी कोठेही असो, कोणत्याही कपड्यांमध्ये असो तिचा आदर करायचो असतो हे चुकूनही माहित नाही. श्रीमतांपासून ते गरिबांपर्यंत, घराघरांत आपल्या परंपरा आणि संस्कार मुलीची आयडेन्टीटी हिरावून घेतात आणि पुरुषांना तिच्याबाबत कोणत्याच प्रकारची अक्कल दिली जात नाही. याबाबत बोलणं आता आम्ही सोडून दिलंय. 

प्रियांका रेड्डीने तिच्या बहिणीला रात्री 9.22ला फोन करुन टोल प्लाझावर एकटी असून गाडी पंक्चर झाल्याचे सांगितले. त्यानंतर केवळ 15 मिनिटांत तिचा फोन बंद पडला. अर्ध्या तासाच्या आत तिची बहिण टोल प्लाझावर पोहोचली होती मात्र, प्रियांका तिथे नव्हती. टोल प्लाझापासून दहा मिनिटांच्या अंतरावर असलेल्या RGIA पोलिस ठाण्यात तिच्या बहिणीने धाव घेतली.

इथे त्वरित कारवाई होणं अपेक्षित होतं. मात्र, तो टोल प्लाझा आमच्या हद्दीत येत नाही असं सांगत त्यांनी हात वर केले आणि तिला शामशाबाद पोलिस ठाण्यात जाण्यास सांगितले. तिने लगेच तिकडे धाव घेतली. वर जाहीर केलेल्या निवेदनपत्रानुसार तिची तक्रार ती वाजून दहा मिनिटांनी नोंदवून घेण्यात आली. या सर्वांत तब्बल साडेचार तासांचा वेळ वाया गेला होता. त्यानंतर पहाटे पाच वाजता तिचा मृतदेह सापडला. 

Image may contain: text

हास्यास्पद गोष्ट म्हणजे या निवेदनपत्रात लिहीले आहे की ''अडचणीच्या काळात 100 वर फोन करुन मदत मागावी.'' जर तिच्या बहिणीच्या तक्रारीची वेळीच नोंद घेतली असती तर... RGIA पोलिस ठाण्याने त्या रात्री तक्रार नोंदवून घेण्यास हात वर केले नसते तर...पोलिस म्हणतात, टोल प्लाझापाशी आम्ही रोज रात्री नऊनंतर गस्त घालतो, ही गस्त फक्त नावापुरती नसती तर..., तर आज कदाचित ती जिवंत असली असती. 

प्रियांका जेव्हा तिच्या बहिणीशी अखेरचं बोलली तेव्हा ती म्हणाली, ''मला भीती वाटतीये''. मी म्हणते ''मला भीती वाटतीये, या देशातल्या प्रत्येक मुलीला आज भीती वाटतीये''. ती अवेळी कोणत्याही पार्टीवरुन परतत नव्हती, ती कोणतेही आक्षेपार्ह वर्तन करत नव्हती, तिने अगदी समाजाच्या दृष्टीने सोजवळ असेच कपडे घातले होते, ती तुमचे सगळे नियम पाळले आणि आता ती या जगात नाहीये. 

मला लाज वाटते सांगयला की, ''मी अशा देशात राहते जिथे मी ना आईच्या गर्भात सुरक्षित आहे, ना बाहेरच्या वातावरणात. या सगळ्यानंतर आता मी माझ्या आईला कोणत्या तोंडाने म्हणून की, ''आई, तू खूप काळजी करतेस गं माझी, एवढी नको करत जाऊ?'', माझ्या बाबांना खरंच मी सांगू का की, ''मी माझी सुरक्षा करु शकते, मी खरचं करु शकते का?'' तुम्ही तरी तुमच्या बाहेर एकट्या फिरणाऱ्या मुलीची सुरक्षा करु शकता का?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Harshada Kotwal writes Article Hyderabad Rape Incident