तीन वेळा हल्ले होऊनही ती उभी आहे ताठ मानेनं..!

हर्षदा परब
सोमवार, 10 एप्रिल 2017

हल्ला कोणावरही असो आणि कोणताही असो, हल्लेखोराची मानसिकता हे सैतानीच असते. प्राण्यालाही मारणं जमत नाही, तिथं असे सैतान माणसाला मारायला निघतात. पण अशा लोकांना घाबरायचं का आणि किती?

माझ्यावरील प्रत्येक हल्ल्यानंतर लोकांच्या नजरा बदलल्या. ऍसिड हल्ल्यानंतर तर डोळ्यात सहानुभूती, दया, तिरस्कार असे वेगवेगळे भाव दिसले. समाजाने अशा नजरा रोखणं थांबवलं पाहिजे. या नजरा हल्लेखोरांवर, वाईट कृत्य करणाऱ्यांवर रोखल्या पाहिजेत. पोलिसांनीही हल्लेखोरांना जास्तीत जास्त शिक्षा मिळावी म्हणून शक्‍य ते प्रयत्न केले पाहिजेत. मुलींनीही धमक्‍या, हल्ले, हल्लेखोर यांना न घाबरता समाजात वावरलं पाहिजे... लग्नासाठी ऍसिड हल्ला झाल्यानंतर स्वतःला सावरून नव्यानं सुरवात केलेल्या आरती ठाकूरच्या संघर्षाची ही कहाणी... 

--------------------------------------------------------------------- 

तिच्यावर दोनदा चाकूचा हल्ला. दोन्ही वेळेस वाचली म्हणून 22 वर्षांच्या आरती ठाकूरवर 31 जानेवारी 2012 रोजी ऍसिड हल्ला झाला. त्यानंतर आरती डॉक्‍टरकडे मरणाची भीक मागत होती. लग्न ठरलेल्या आरतीनं ते तोडावं आणि ज्या बाईच्या घरात भाड्यानं राहते त्या बाईच्या चरसी मुलाशी लग्न करावं, या हट्टातून आरतीवर हे हल्ले झाले होते.

ऍसिडनं झालेल्या जखमांनी विव्हळणं तिला त्रासाचं होतंच, पण त्याहीपेक्षा अधिक पटीनं त्रासाची होती असुरक्षिततेची भावना. हॉस्पिटलच्या त्या खाटेवरही कोणीतरी येऊन मारण्याचा प्रयत्न करेल, या भावनेतून रात्र रात्रभर झोप नव्हती. जगण्यापेक्षा मरणं तिला सोपं वाटू लागलं होतं. गेली पाच वर्षं आरती वैद्यकीय उपचारांसाठी झगडते आहे. डिसेंबर 2011मध्ये झालेल्या पहिल्या चाकू हल्ल्यात आरतीच्या चेहऱ्यांवर 17 टाके पडले होते. जानेवारी 2012 मध्ये दुसरा चाकू हल्ला झाला. त्याच महिन्यात 31 तारखेला झालेल्या ऍसिड हल्ल्यानंतर काही वर्षं आरतीनं डिप्रेशनमध्ये काढली. या घटनेतून आलेल्या असुरक्षिततेच्या भावनेला, त्रासाला, समाजातील चोरट्या, घृणास्पद, दयेच्या नजरांना, असाह्यतेला, कमकुवतपणाला, दुःखाला तिनं कवटाळणं सोडून दिलं आहे. प्रॅक्‍टिकल जगण्यासाठी ती सज्ज झाली आहे... 

आरती ठाकूर घरातील कर्ती स्त्री. तिच्यावर बहिणीची आणि आईची जबाबदारीही होती. पहिल्यांदा झालेल्या चाकू हल्ल्यानंतर तिच्या कुटुंबीयांना तिला बाहेर एकटं पाठवणं जिकरीचं वाटू लागलं. आरती आईबरोबर फिरायची. हल्ल्यानंतर नोकरी सोडणं आरतीला जमणारं नव्हतंच. मग तिची आई तिला ऑफिसला सोडायला आणि आणायला जायची.

''हल्ल्यानंतर असुरक्षितता आली होती, पण बाहेर जाणं सोडण्याचा मूर्खपणा केला नाही. मला जगायचं होतं. हल्ला होईल या भीतीनं मी घरात लपले असते, तर हल्लेखोरांना आणखी बळ मिळालं असतं. मजबुरी होती, पण मी धैर्यही केलं,'' असं स्पष्टच सांगते आरती. हल्ल्यानंतर आरतीला आरोपींच्या ओळख परेडसाठी बोलावलं. पण आरतीनं हल्लेखोराचा चेहराच पाहिला नव्हता, तेव्हा तिला सांगताही येत नव्हतं नेमका हल्ला कोणी केला. हल्लेखोर माहीत नाही, तर तपास कसा होणार, असा प्रश्न आरतीला करत पोलिसांनी आरतीच्या केसवर काम करणंही सोडलं होतं. 

कमावत्या मुलीवर हल्ला झाला होता. तिचा चेहरा खराब झाला होता. उपचारांसाठी पैसे नव्हते. तेव्हा आरती आणि तिच्या आईनं कर्ज काढून, सामाजिक संस्थांकडून आर्थिक मदत घेत उपचार पूर्ण केले. आरती सांगते, ''आई तेव्हा डगमगली असती, तर आज ऍसिड हल्ल्यानं होरपळलेली कातडी आणि मन घेऊन जगावं लागलं असतं. पण तिला ते मान्य नव्हतं. म्हणून आजही शक्‍य त्या पद्धतीनं उपचार घेते आहे.'' हल्ल्यानंतर संस्थांनी दयाबुद्धीनं नोकरी देऊ केली, मात्र आरतीनं त्या नोकऱ्या स्वीकारणं टाळलं. तिला तिच्या इच्छेनुसार, तिच्या क्षमतेसारख्या नोकऱ्या अपेक्षित होत्या. त्यासाठी तिनं प्रयत्न केले. मुलाखती देऊन मिळालेल्या नोकऱ्या स्वीकारताना तिनं स्वतःला बजावलं, 'इथं जसे चांगले लोक मिळतील, तसे वाईट लोकही मिळणार आहेत.' या दोन्ही तऱ्हेच्या माणसांशी जुळवून घेण्याचा निर्णय उपयोगाचा ठरल्याचं आरती सांगते. या काळात स्वतःलाच प्रोत्साहन देत राहिले म्हणून जगले, असंही आरती मोठ्या खुबीने सांगते. तोच सल्ला ती इतर वाचलेल्या आणि पीडितांना देते. 

''हल्ला कोणावरही असो आणि कोणताही असो, हल्लेखोराची मानसिकता हे सैतानीच असते. प्राण्यालाही मारणं जमत नाही, तिथं असे सैतान माणसाला मारायला निघतात. पण अशा लोकांना घाबरायचं का आणि किती? तीन हल्ल्यांनंतरही न डगमगता मी घराबाहेर पडते यात त्या हल्लेखोरांची हार मला दिसते,'' आरती अगदी शांत शब्दांत सांगत होती. 

पीडितांना नव्यानं उभं राहण्याचा कानमंत्र देताना आरती सांगते, ''भावनिक होण्यापेक्षा प्रॅक्‍टिकल व्हा. तुम्हाला जे आणि जसं हवं तसं वागा. समाजाची, लोकांची पर्वा करू नका. तुमचं जगणं, वागणं यावर तुमचा अधिकार आहे. झालेल्या हल्ल्यानंतर, घटनेनंतर, छेडछाडीनंतर तुम्ही खचून जाऊ नका, लज्जित होऊ नका. सगळ्यात महत्त्वाचं, शक्‍य तितकं चांगलं काम करा, ते तुमच्यासाठी चांगले दिवस आणेल.''

Web Title: Harshada Parab writes a story of Aarti Thakur-victim of acid attacks