‘हेल्मेट लेडी’ जोपासतेय जनजागृतीचा वसा!

अदिती पराडकर-लोंढे
सोमवार, 3 डिसेंबर 2018

पोलिसांनी दंड केला म्हणून हेल्मेट विकत घेणाऱ्या लिझा सदान्हा. त्यानंतर हेल्मेट घालून त्यांनी स्वत:चे फोटो काढले. ते सोशल मीडियावर टाकले. हळूहळू ही सवय वाढत गेली. त्यांच्या फोटोंना पसंत करणारे, त्यांना फॉलो करणारेही वाढले. या फोटोसोबत त्या हेल्मेटविषयी जनजागृती करत राहिल्या. मग शाळेत जाऊन हेल्मेटचे महत्त्व पटवून देऊ लागल्या. हेल्मेट वाटू लागल्या. आता लिझा सदान्हा ‘हेल्मेट लेडी’ म्हणून ओळखल्या जात आहेत. हेल्मेटविषयी जनजागृती करणाऱ्या  वांद्रे येथील लिझा यांच्या उपक्रमाचा प्रवास त्यांच्या मुलाखतीत उलगडला.

पोलिसांनी दंड केला म्हणून हेल्मेट विकत घेणाऱ्या लिझा सदान्हा. त्यानंतर हेल्मेट घालून त्यांनी स्वत:चे फोटो काढले. ते सोशल मीडियावर टाकले. हळूहळू ही सवय वाढत गेली. त्यांच्या फोटोंना पसंत करणारे, त्यांना फॉलो करणारेही वाढले. या फोटोसोबत त्या हेल्मेटविषयी जनजागृती करत राहिल्या. मग शाळेत जाऊन हेल्मेटचे महत्त्व पटवून देऊ लागल्या. हेल्मेट वाटू लागल्या. आता लिझा सदान्हा ‘हेल्मेट लेडी’ म्हणून ओळखल्या जात आहेत. हेल्मेटविषयी जनजागृती करणाऱ्या  वांद्रे येथील लिझा यांच्या उपक्रमाचा प्रवास त्यांच्या मुलाखतीत उलगडला. राज्यभर वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असलेल्या ‘हेल्मेटसक्ती’च्या मोहिमेसाठी तो प्रेरणादायी 
ठरणारा आहे. 

हेल्मेट लेडी ही ओळख कशी मिळाली?
- तीन वर्षांपूर्वी स्कूटर चालवत असताना हेल्मेट न घातल्यामुळे पोलिसांनी मला पकडलं. तिथे दंड भरायला लागला. दररोज दंड भरण्यापेक्षा हजार रुपयांचं हेल्मेट खरेदी केलेलं काय वाईट, म्हणून हेल्मेटची खरेदी केली. नवीन हेल्मेट मला कसं दिसतंय, हे पाहण्यासाठी सुरुवातीला गंमत म्हणून घरातच हेल्मेट घालून फोटो काढले. हेल्मेट घातल्यावर मी खूप विनोदी दिसतेय, असं मला सांगण्यात आलं आणि माझ्या मैत्रिणी म्हणाल्या, की तू सगळीकडेच हेल्मेट घाल ना. मग मी जिममध्ये, स्विमिंग करताना, हॉटेलमध्ये, थिएटरमध्ये; इतकंच नाही, तर हेल्मेट घालून फॅशन शोदेखील केला आहे. अशा सगळ्या ठिकाणी हेल्मेट घालून फोटो काढले आणि ते वेळोवेळी सोशल मीडियावर मजा म्हणून अपडेट केले आणि माझ्या या फोटोजना खूप फॉलोव्हर्स मिळत गेले. त्यातून तुम्ही असं का करता, अशी विचारणा करण्यात आली. त्याच वेळी एक प्रसंग आठवला. एकदा मी आणि मुलगी बाईकवरून जात होतो. मुलगी लहान असल्यामुळे ती पुढे बसली होती. आम्ही रस्त्यावरून जात असताना अचानक एक रिक्षा समोर आली आणि मी ब्रेक दाबला. माझी मुलगी पडली आणि तिच्या हाताला फ्रॅक्‍चर झालं. आपण मुलांसाठी सगळं काही करतो. मग आपण ही साधी गोष्ट का नाही करत, असं मला वाटायला लागलं आणि हेल्मेट घालायला सुरुवात केली. मुळात प्रत्येक जण केवळ पोलिसांपासून बचाव करण्यासाठी हेल्मेट घालतोय. मात्र हेल्मेट ही आपली स्वत:ची जबाबदारी आहे; हे समजून कोणीच घालत नाही. म्हणूनच आपणच काहीतरी पावलं उचलावीत, असं मी ठरवलं. कारण प्रत्येकाला आपल्या मुलांची काळजी असते. माझ्यातली आई जागरूक झाली आणि मोठ्या माणसांना सांगण्यापेक्षा लहान मुलांपासूनच सुरुवात करायला हवी, असं मनात आलं आणि मग स्वत:च काही शाळांमध्ये जाऊन तिथल्या मुलांना हेल्मेट का घालायचं आणि रस्त्यावर जाताना काय खबरदारी घ्यायची याविषयी जागरूकता करीन, असं ठरवलं आणि तशी सुरुवातदेखील केली. आज तीन वर्षं झाली; हे काम सातत्याने करत आहे. विरारपासून दक्षिण मुंबईपर्यंत जवळपास ४ हजार हेल्मेट मुलांना दिली आहेत. त्यातूनच ‘हेल्मेट लेडी’ ही माझी ओळख झाली आणि मला याचा अभिमान आहे.

जनजागृती करताना काही अडचणींचा सामना करावा लागला का?
- अडचणी अशा आल्या नाहीत. मुळात लोकच याविषयी अनभिज्ञ आहेत. केवळ पोलिसांच्या भीतीपोटी ते हेल्मेट घालतात आणि थोडं पुढे गेलं की परत काढून ठेवतात. याची बीजं लहानपणीच रुजवावीत, असं मला वाटलं. कारण तरुण मंडळी कोणाला जुमानत नाहीत आणि म्हणूनच मी शाळेची निवड केली. जिथे मुलांसोबतच त्यांच्या पालकांशीही संवाद साधता येईल. आपण आपल्या मुलांची किती काळजी घेतो. रात्री उशिरा बाहेर पडू देत नाही, लिफ्टमध्ये एकटं पाठवत नाही, एकटं कुठे सोडत नाही... का? तर मुलांची काळजी. मग तुम्हाला बाईकवर असताना आपल्या जीवाला काही धोका आहे, ही भीती का वाटत नाही. म्हणजे यांच्या लेखी मरण स्वस्त झालंय, असं म्हणायला हरकत नाही. आताच वेळ आहे, उद्या वेळ निघून गेल्यावर याचं महत्त्व पटून काय उपयोग आहे? कधी काय होईल हे आपण सांगू शकत नाही. असं सांगितल्यावर याचं महत्त्व पटतं. नंतर भेटून मला त्याची ते पावती देतात; तेव्हा मला खूप बरं वाटतं. शाळांतल्या मुलांनाही माझ्याबरोबर मैत्री करावीशी वाटते. त्यांच्या पालकांना माझ्याशी बोलावंसं वाटणं, हीच माझं काम पोहोचल्याची पावती आहे. म्हणून मला हे काम अगदी मनापासून आवडतं.  

हेल्मेट तुम्ही स्वखर्चाने वाटता का?
- सुरुवातीला हेल्मेटविषयी केवळ जनजागृती करत होते. मात्र माझं हे काम पाहून एका कंपनीने मला तीनशे हेल्मेट वाटायला दिली. पण कोणत्या शाळा निवडायच्या हे सर्वस्वी माझ्यावर सोपवलं. त्यातूनच मी महानगरपालिकेच्या शाळांची निवड केली. तिथल्या मुलांच्या घरची परिस्थिती नसते. घरात केवळ एकच हेल्मेट वापरलं जातं. त्यामुळे तिथल्या मुलांना याचं वाटप केलंय. आतापर्यंत चार हजार मुलांना भेट दिली आहे. त्यातल्या शंभर मुलांनी मनावर घेतलं तरी माझं काम झालं, असंच मी म्हणेन.

हेल्मेटसक्ती हा मार्केटिंग फंडा आहे, अशी ओरड आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं?
- अतिशय चुकीचा विचार करतात. मी तीन अपघात अतिशय जवळून पाहिले आहेत. त्यामुळे अशा लोकांना सांगावंसं वाटतं, की तुम्हाला जे काही करायचं आहे ते करा. पण कधी कधी आपल्यावर असे काही प्रसंग येतात, जिथे आपण हतबल असतो. बाईकवरून पडून मृत्यू झाल्याच्या कित्येक घटना आपण ऐकतो. हे सगळे त्याचेच परिणाम आहेत. अशा वेळी आपण काहीही करू शकत नाही. तेव्हा नंतर पश्‍चात्ताप करून काहीच उपयोग होत नाही. म्हणूनच जे काही करायचं ते सावधानता बाळगूनच करायला हवं. हेल्मेटसक्तीमुळे तुमचाच जीव वाचू शकतो, हे कळायला हवं. बाईकवर मागे बसणाऱ्यांनीही हेल्मेट घालणं आवश्‍यक आहे. कारण तुम्ही पाहिलं असेल; एक तर मागे बसणाऱ्याचं रोडकडे लक्ष नसतं. पाठचा माणूस सतत मोबाईलवर बोलत असतो किंवा चॅट करताना दिसतो. त्यामुळे अचानक काय होईल हे त्याला कळतही नाही आणि मागे बसणाऱ्याचाच नेहमी बळी जातो. 

हेल्मेटसक्तीच्या विरोधात सरकारने आकारलेला दंड योग्य आहे का? की जनजागृती होण्यासाठी आणखी काही पावले उचलणे आवश्‍यक आहे?
- दंड घेण्याशिवाय त्यांच्याकडे अन्य कोणताही मार्ग नाही. कारण कोणी लोकांपर्यंत जाऊन त्यांच्याशी बोलेल आणि जनजागृती करील, एवढी त्यांच्याकडे मुबलक माणसंच नाहीत. प्रत्येकाला थांबवून सांगणं त्यांना शक्‍य नाही. मी आरटीओ ऑफिसर्सशी बोलले आहे. त्यांचंही म्हणणं बरोबरच आहे. त्यांना पाहून लांबूनच लोक पळून जातात. त्यांना समजावलं तरी पालथ्या घड्यावर पाणीच असतं. 

बाईक स्टंट करणाऱ्यांना काय सांगाल?
- बाईक स्टंट करणारी बहुतांश मुलं ही कॉलेजचीच असतात. स्वत:ची नाही तर अन्य मित्रांची बाईक घेऊन ती चालवतात. त्यात ती हेल्मेट घालत नाही. घातलं तर अर्धवट घालतात. बेल्ट लावत नाहीत... अशीच मुलं मृत्युमुखी पडतात. म्हणूनच मी केवळ शाळांमध्येच नाही; तर कॉलेजमध्येही गेले आहे. एचआर कॉलेजच्या मुलांसाठी वॉक केलं आहे. बाईक रॅली केली आहे. जुहूच्या एम. के. कॉलेजच्या बाहेर रस्त्यावर उभी राहून हेल्मेटसक्तीचे धडे दिले आहेत. पण कॉलेजच्या मुलांमध्ये तेवढं गांभीर्यच नाही. दुसरं असं, की पोलिसांना कसं चकवायचं हेदेखील त्यांना चांगलं समजतं. म्हणूनच मी लहान मुलांपासूनच सुरुवात केली आहे. लहानपणीच त्यांच्या अंगवळणी पडलं पाहिजे आणि त्यांच्या पालकांनादेखील त्याची समज दिली पाहिजे.

घरी प्रतिसाद कसा मिळाला?
- सुरुवातीला माझ्या मुलांना सोशल मीडियावरचे माझे फोटो आवडायचे नाहीत. त्यांना बाहेर फिरताना अवघडल्यासारखं वाटायचं; मात्र त्यांचे मित्र-मैत्रिणी माझ्या फोटोंना लाइक्‍स करायला लागले. मला फॉलो करायला लागले. त्यांना माझ्या नावावरून ओळखायला लागले, तेव्हा त्यांना कुठे बरं वाटायला लागलं. आता त्यांना माझा अभिमान वाटायला लागला आहे. पण मी त्यांना समजावते, की माझी मुलं या नात्याने तुमचीदेखील तेवढीच जबाबदारी आहे. तुम्ही दोघंही गावाला जाऊन बाईक चालवता किंवा शिकता तेव्हा तुम्हीदेखील हेल्मेट घालणं ही तुमची जबाबदारी आहे.
aditi.londhe@esakal.com

Web Title: Helmet Lady Liza Sadanha Public Awareness